Monday, April 19, 2010

लॉर्ड बायरन- रोमँटिसिझम’चा अध्वर्यू


''युरोपातल्या औद्योगिक क्रांतीने बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिमाणांची प्रतिक्रिया म्हणून रोमँटिसिझमची चळवळ उदयाला आली। लॉर्ड बायरन हा त्या चळवळीचा अध्वर्यू होता. इंग्लंडमधील उमराव घराण्यात जन्माला आलेल्या या कवीला फक्त छत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं. २२ जानेवारी १७८८मध्ये जन्मलेल्या या उमद्या कवीने १९ एप्रिल १८२४मध्ये जगाचा निरोप घेतला. त्याला आज बरोब्बर १८६ वर्षे होताहेत. बायरनच्या कवितांनी तत्कालीन समाजाला एवढं झपाटून टाकलं होतं, की त्याचं अनुकरण करत पानंच्या पानं खरडणाऱ्या, महाकाव्य प्रसवणाऱ्या अनेक कवींचं पीक त्या काळात फोफावलं.''

युरोपातल्या औद्योगिक क्रांतीने बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिमाणांची प्रतिक्रिया म्हणून रोमँटिसिझमची चळवळ उदयाला आली. लॉर्ड बायरन हा त्या चळवळीचा अध्वर्यू होता. इंग्लंडमधील उमराव घराण्यात जन्माला आलेल्या या कवीला फक्त छत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं. २२ जानेवारी १७८८मध्ये जन्मलेल्या या उमद्या कवीने १९ एप्रिल १८२४मध्ये जगाचा निरोप घेतला त्याला आज बरोब्बर १८६ र्वष होताहेत. बायरनच्या कवितांनी तत्कालीन समाजाला एवढं झपाटून टाकलं होतं, की त्याचं अनुकरण करत पानंच्या पानं खरडणाऱ्या, महाकाव्य प्रसवणाऱ्या अनेक कवींचं पीक त्या काळात फोफावलं.

कॅप्टन जॉन बायरन आणि कॅथरीन गॉर्डन या दांपत्याचं जॉर्ज गॉर्डन बायरन हे अपत्य! जॉन बायरन त्याच्या विक्षिप्तपणामुळे मॅड जॅक म्हणून कुप्रसिद्ध होता. उमराव खानदानातल्या कॅथरिनशी त्यानं लग्न केलं, ते तिच्या वडिलोपार्जित संपत्तीकडे पाहून! बिचाऱ्या कॅथरिनलाही आपल्या उधळ्या नवऱ्याने घेतलेले कर्ज चुकवण्यासाठी संपत्तीचा बराचसा भाग फुंकून टाकावा लागला. तिला पुरती कंगाल केल्यानंतर जॉननं तिला टाकून दिलं. त्यामुळे कॅथरिनला नैराश्याचे झटके येऊ लागले. लंडन सोडून ती लहानग्या जॉर्जला स्कॉटलंडला घेऊन आली. इंग्लंडच्या राजदरबारात बॅरन असलेल्या काकाचा मृत्यू झाल्यानंतर तो किताब, संपत्ती आणि अधिकार वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी जॉर्जच्या पदरात पडले. उमरावाचं पोरगा असल्याने हॅरोसारख्या नामांकित शाळेतून त्याने शिक्षण घेतलं. वयाच्या १४व्या वर्षी एलिझाबेथ प्युजो नामक मैत्रीण त्याच्या आयुष्यात आली. त्याच्यातील कविता जागी करण्याचे श्रेय एलिझाबेथकडेच जातं. या शाळकरी वयातच फ्युजिटिव्ह पिसेस नावाचा काव्यसंग्रह त्याने लिहिला खरा! पण, या कवितांमध्ये कामुकता फार असल्याने हा संग्रह प्रसिद्ध करु नये, असं त्याच्या धर्मगुरू मित्राचं मत पडलं. त्याचा सल्ला शिरोधार्य मानत बायरननं तो संग्रह जाळूनही टाकला. त्यानंतर लिहिलेल्या अवर्स ऑफ आयडलनेसला चांगली प्रसिद्धी लाभली. १८०९मध्ये लिहिलेलं इंग्लिश बार्ड्स आणि स्कॉच रिव्ह्यूअर्स हे व्यंगोक्तीपूर्ण (सटायर) लिखाणही फार गाजलं. बायरनचा दबदबाही एवढा वाढला की, समीक्षकांना त्याची दखल घेणं स्वत:साठी प्रतिष्ठेचं वाटू लागलं. पण, त्याला खऱ्या अर्थानं व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली, ती चाईल्ड हॅराल्ड पिलग्रिमेजनं!

बायरनचं वैयक्तिक आयुष्यही फार रंगेल आणि छानछोकीचं होतं. त्या बाबतीत तो बापाच्याच वळणावर गेला. त्याच्या समलैंगिक संबंधांनी तो लंडनमध्ये टिकेचं लक्ष्य बनला. त्यावरुन होणारा टीकेचा भडीमार आणि कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावणाऱ्या सावकारांपासून वाचण्यासाठी त्याने जगप्रवासाचा निर्णय घेतला. परंतु तो काळ नेपोलिनयनं युरोपात छेडलेल्या युद्धाचा होता. त्यामुळे पोर्तुगाल, अल्बानिया आणि ग्रीससारख्या युरोपच्या वेशीवर असणाऱ्या देशांना त्याने भेटी दिल्या. या काळात त्याची प्रेमप्रकरणं आणि कवितालेखन चालूच होतं. त्यातच तो ॅनाबेल मेलबँकशी विवाहबद्ध झाला. पण लग्नाची बेडी त्याला रुतू लागली आणि तिच्याबरोबरचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर इंग्लंड सोडण्याचाही! त्याने आपला मुक्काम स्वित्झर्लंडलडमध्ये हलवला. तिथे त्याची शेलीसारख्या जगप्रसिद्ध कवीशी मैत्री झाली. बायरनच्या प्रतिभेला आणखीनच धुमारे फुटले.

डॉन जुआनसारखी दीर्घकविता याच काळातली. जवळपास १४ खंड भरतील, एवढय़ा कविता बायरनने आपल्या ३६ वर्षाच्या आयुष्यात केल्या. त्याने नुसत्या कविताच केल्या नाहीत. तर, इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्येही त्याच्या सुधारणावादी विचारांनी खळबळ माजवली. तुर्काच्या विरोधात ग्रीकांच्या बाजूने तो स्वातंत्र्ययुद्ध लढला. त्या काळात ग्रीसच्या घराघरांतून बायरनला पुजले जात होते. त्याचा मृत्यूही या युद्धाच्या दगदगीतच झाला. तुर्काच्या ताब्यात असलेला ग्रीकांचा एक किल्ला घेण्यासाठी तो मोर्चेबांधणी करीत असताना तो आजारी पडला. हा आजार एवढा विकोपाला गेला, की त्यातच त्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत त्याची लोकप्रियता एवढी वाढली होती, की त्याच्या मृत्यूच्या बातमीवर इंग्लंडमधली जनता विश्वासच ठेवायला तयार नव्हती. ग्रीकांनी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अथेन्समधल्या एका उपनगराला त्याचे नाव दिले आहे. पॅराडाईज लॉस्टसारखी सुंदर कलाकृती निर्माण करणाऱ्या जॉन मिल्टननंतर बायरनचेच नाव घेतले जाते.