Thursday, June 23, 2011

चिन्हांचे ठायी.. अर्थांच्या नाना परी !


द लॉस्ट सिंबॉलही डॅन ब्राऊनची सध्या जगभर गाजत असलेली कादंबरी! प्राचीन रहस्यं आणि त्यातून सूचित होणाऱ्या अर्थाच्या आधाराने सुरू झालेला अंतिम सत्याचा शोध, अशा दणकट पायावर उभी राहिलेली ही कादंबरी वाचकाला पूर्णपणे कवेत घेते. १५ सप्टेंबर २००९ रोजी बाजारात आलेल्या या कादंबरीने खपाचा उच्चांक मांडला. सुरुवातीच्या पंधरा दिवसांतच ६५ लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली. सहा वर्षाची विश्रांती घेऊन ब्राऊननं पुन्हा जागतिक साहित्य वर्तुळात धडाक्यानं पुनरागमन केलंय.
     आपण जगत असलेलं पोस्टमॉडर्न युग कसं आहे? तीव्र गळेकापू स्पर्धा असलेलं आणि भौतिक सुखासाठी कमालीचं आसुसलेलं! जगातल्या सर्व सुखांनी आपल्या पायांशी लोळण घ्यावी, यासाठी प्रयत्न करत असतानाच आयुष्यातली अर्थपूर्णता नेमकी कशात आहे, ते शोधणारं! आधुनिक म्हणवल्या जाणा-या या युगात देवाच्या बरोबरीनं डेमी गॉड झालेल्या बाबा-बुवांच्या संप्रदायांत वाढ होत आहे, ती काही उगीच नाही. अंधश्रद्ध रेम्याडोक्यांची जगात कधीच कमतरता नव्हती. पण त्यांच्याही काही परी आहेत. पुराणांत जागोजागी घुसडलेल्या चमत्कारांच्या कथा फोल आहेत, हे त्यापैकी अनेकांना कळतं. देव ही गोष्ट नेमकी काय आहे, हे आपल्या नजरेच्या आणि बुद्धीच्या टप्प्यात येणार नाही, याची त्यांना पुरेपूर जाणीव असते. ते एकदा मान्य केल्यानंतर, ते जवळच्या पर्यायाचा शोध सुरू करतात. देव नाही, तर देवासारखा दुसरा कोण? स्वयंघोषित अवतारी बाबा. देवाऐवजी आपल्यासारखाच हाडामांसाचा एक माणूस आयुष्य उलगडून सांगत आहे, हे त्यांच्या बुद्धीला पटणारं असतं. त्यांच्यासमोर तुमचे प्रश्न मांडा. ते तुम्हाला मार्ग सांगतील. त्या मार्गाने तुम्ही गेलात, तर तुम्हाला देवत्व प्राप्त होईल. देव आणि देवत्व प्राप्त झालेला माणूस, यांच्यात नेमका काय फरक असतो? देवाच्या ठायी ज्या अचाट शक्ती असतात, त्या देवत्व प्राप्त झालेल्या मनुष्याच्या अंगी येतात काय? स्वत:च्या बुद्धीला ताण न देता त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत रहा. आयुष्य संपेल. मार्ग संपणार नाही. उत्तरं तर अजिबातच सापडणार नाहीत. देव म्हणा किंवा देवत्व म्हणा, या दोन शब्दांचा खरा अर्थ कधीच कळत नाही. पण, प्राचीन काळापासून जगाच्या पाठीवर ज्या वेग-वेगळ्या संस्कृती नांदत आहेत, त्यांच्यातील काहींना तो समजला होता. टोळी आणि झुंडीतून सुसंस्कृत समाजाकडे वाटचाल करताना धर्माने जगण्याची आचारसंहिता ठरवली. मनुष्याला पडणा-या प्रश्नांची उत्तरे धर्म आणि अध्यात्माने दिली. पण धर्मात देव नावाची अतिमानवी आणि प्रतिभाशाली संकल्पना घुसवल्यानंतर मनुष्याच्या ठायी असलेली कार्य-कारणभाव प्रवृत्ती नष्ट झाली. त्याला पडणा-या प्रत्येक प्रश्नाच्या समाधानासाठी तो देवाकडे पाहू लागला. त्यामुळे संस्कृतीच्या विकासात खंड पडला. इतकं अंधारमय वातावरण झालं असं असतानाही काही जणांनी आयुष्याची अर्थपूर्णता नेमकी कशात आहे, याचा शोध घेतला. अंतिम सत्य, म्हणजे नेमकं काय असावं, याचा ते धांडोळा घेत राहिले. शेवटी त्यांना अंतिम सत्याचे प्रकाशकण गवसले. म्हणूनच त्यांना एनलायटन्ड सोल म्हटलं गेलं.
     डॅन ब्राऊनची द लॉस्ट सिंबॉल ही सध्या गाजत असलेली कादंबरीदेखील हाच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवते. देव ही अजिबात अप्राप्य गोष्ट नाही. प्रत्येक मनुष्यात देवत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे, असं वेगवेगळ्या काळातल्या तत्त्वचिंतकांनी सांगून ठेवलंय. शिवाय, सत्य सांगितल्याबद्दल त्यांना समाजाचा रोषही पत्करावा लागला. पण आताच्या धावपळीच्या काळात या दार्शनिकांचा अभ्यास करण्याची फुरसत कोणाकडेच नाही. जे करतात, त्यांच्यापैकी बहुतेक विचारांची सखोलता आणि विचक्षण बुद्धीची वानवा असणारे असतात. मग मूळ अर्थाची मोडतोड होते आणि उरतात फक्त पढीक पांडित्य मिरवणारे धर्मभाट! मध्ययुगातली धार्मिक सेन्सॉरशिप आता नाही. त्यामुळे ती भिती ब्राऊनला नाही. दा व्हिन्सी कोड लिहून आणि गाजवून ही बाब त्यानं सिद्धही केलीय. आपलं पुस्तक दणकून खपावं, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असतेच. ब्राऊन तर अजिबात स्वान्तसुखाय लेखन करणा-या लेखकांपैकी नाही. त्यामुळेच ब्राऊनची खासियत असलेला प्राचीन रहस्यांचा मालमसाला याही कादंबरीत ठासून भरला आहे. वाचकांना खिळवून ठेवणारा तपशील, हेच कुठल्याही कादंबरीचं बलस्थान असतं. पण असं असलं तरी कलाकृतीचं व्यावसायिक मूल्य ही एक वेगळी गोष्ट आहे. त्या कलाकृतीतला अंगभूत संदेश, ही त्यापेक्षा वेगळी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
     ब्राऊनलादेखील तेच सांगायचं असावं. जगभर अस्तित्वात असलेल्या फ्री मॅसनरी (पंथ म्हणा किंवा संघटना!) या संस्थेने मध्ययुगीन काळापासून जपलेल्या रहस्यांची उकल ब्राऊन कादंबरीतून करतो. हार्वर्ड विद्यापीठातला रॉबर्ट लँग्डन नावाचा प्राध्यापक आपला मित्र पीटर सॉलोमन याच्या आमंत्रणावरून वॉशिंग्टनमध्ये व्याख्यान देण्यासाठी येतो. सॉलोमन हा जगातल्या अतिविशाल स्मिथ्सोनियन वास्तुसंग्रहालयाचा प्रमुख आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचं कामकाज जिथून चालतं, त्या कॅपिटॉलमध्ये हे व्याख्यान होणार असतं. पण, त्याला तिथं सापडतो केवळ आपल्या मित्राचा तुटलेला उजवा हात! तिथून ही ५०९ पानांची कादंबरी सुरु होते. प्राचीन काळातील गोंदण रेखाटलेला तो हात म्हणजे निमंत्रण असतं, लँग्डनला जुन्या काळातली रहस्यं उलगडण्यासाठी दिलेलं. हँड ऑफ मिस्टरीज. पीटरचा जीव वाचवायचा असेल, तर ही रहस्यं तुला शोधावी लागतील, अशी धमकीवजा विनंती लँग्डनला पीटरच्या अपहरणकर्त्यांकडून मिळते. या शोधात मग कॅपिटॉलसह लायब्ररी ऑफ काँग्रेस, जॉर्ज वॉशिंग्टनचं स्मारक, फ्रीडम प्लाझा, नॅशनल कॅथ्रेडल अशा इमारती त्यांच्या मध्ययुगीन इतिहासासह सामील होतात. कादंबरीची खुमारी वाढावी, म्हणून जगातली अतिबलिष्ठ गुप्तचर संघटना सीआयए आहेच! पाठशिवणीचा हा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो. ब्राऊन अशा खेळांचे प्लॉट आखण्यात वाकबगार आहे. प्राचीन रहस्याचा शोध लागतोच. पण या प्रवासात इतरही काही भयंकर रहस्यांचा गौप्यस्फोट होतो. कादंबरीकार म्हणून ब्राऊनची महती ओळखायची असेल, तर ही कादंबरी वाचण्याशिवाय पर्याय नाही. अपहरणकर्ता पीटरचा सख्खा मुलगा असतो. आपल्या आयुष्याच्या मुळावर उठलेला स्वत:चाच मुलगा झॅकॅरी आहे, हे पीटरला अगदी शेवटच्या टप्प्यात कळतं. इतका त्याच्या मुलाचा अवतार अंतर्बाह्य बदललेला असतो. पण त्याने इतका माथेफिरूपणा कशासाठी केला? कुठलं अंतिम सत्य तो शोधत असतो? ते अंतिम सत्य जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो कसा आतून हादरतो? उत्पत्ती, विकास आणि व्यय, या मानवी आयुष्याला न चुकलेल्या अवस्था आहेत. बाकीचा सारा भौतिक तपशील त्या कोऱ्या आयुष्यात केवळ रंग भरण्यासाठी असतो. त्या पलीकडचंही असं कोणतं सत्य असतं, जे शाश्वत आहे. ते अंतिम सत्य शोधण्यासाठी कादंबरी हातात घ्यावीच लागेल. शेवटी आपणही त्याच गोष्टीच्या शोधात असतो, जिथे सगळ्या शोधांना पूर्णविराम मिळतो.
..........
बुकमार्क- प्रहार 
जानेवारी २०१०

Friday, June 17, 2011

लव्ह ट्वेंटी ट्वेंटी !


       ‘बरोब्बर तीन वर्षापूर्वी 29 फेब्रुवारीला याच हॉटेलात आपण दोघांनी पोट फुटेपर्यंत कसाटा खाल्लं होतं. आठवतंय का तुला?’ आता आजची व्हॅलंटाइनची संध्याकाळ कशी साजरी करायची, याचा अजेंडा आखायचा सोडून तिनं 29 फेब्रुवारीच्या आठवणीत, तेही तीन वर्षापूर्वीच्या, का शिरावं? मागल्या पाच वर्षातल्या आमच्या दोघांच्या प्रत्येक भेटीचा बारीकसारीक तपशील लक्षात ठेवून अशी परीक्षा घेण्यात तिला एक प्रकारचा खोडकर आनंद मिळतो. बॉयफ्रेंडला झापण्याचं सुख मिळतं.
     पूर्वी तिनं क्लूदिला की, मी चुकत-माकत का होईना, उत्तरापर्यंत तरी पोहोचायचो. पण, नोकरीला लागल्यापासनं अशा गोष्टी आठवायला हल्ली मेंदूवर बराच जोर द्यावा लागतो. तेवढा वेळच मिळत नाही. म्हणून आता गोंधळ आणि वैताग दोन्हीही मनातल्या मनातच दाबून ठेवले. उगीच तेवढय़ावरनं माझी शाळा घ्यायची नाहीतर ही! तसं व्हॅलंटाइन डे भारतात साजरा करण्यामागचं लॉजिक आपल्याला तेव्हा अजिबात पटत नव्हतं. दोस्तांतदेखील मी माझं मत ठामपणे मांडायचो. पण तिच्यासमोर एकदाच
चुकून हे बोललो होतो. आता शेती करायला तुम्ही बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरता ना. तरीही, बैलपोळ्याला पुरणपोळी खातोस की नाही? तसाच व्हॅलंटाइनपण साजरा करायचा..आमच्या मातोश्रींनी हिला एकदा बेंदुराला जेवायला बोलावलं होतं. तीच आठवण तिनं उदाहरणासाठी वापरली असावी, मला बैल म्हणण्यासाठी नाही?! पण माझ्याबाबतच्या तिच्या टोमण्यांबद्दल असा संशयाचा फायदा घेऊन इज्जतीचा कचरा करून न घेतल्याचं समाधान मिळवणं रोज-रोज शक्य नाही व्हायचं.
 आजही तोच बाका प्रसंग उद्भवला होता. तिच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? घोर विवंचनेत सापडल्यासारखं झालं. बोल ना रे ! आठवतंय का?’ आवाजात असा एकाच वेळी लडीवाळपणा आणि धमकावणी, अशा परस्परविरोधी गोष्टींचं संतुलन तीच साधू शकते. जातिवंत स्टेज आर्टिस्ट. एकदम जयश्री गडकर की दुस-या क्षणाला दुर्गा खोटे. हो.. अगदी व्यवस्थित आठवतंय. ते लीप इयर होतं..माझा पीजेतिनं नाकाच्या शेंडय़ानंच उडवून लावला. पण एरवीसारखा माझी रेवडी उडवायचा तिचा मूड नव्हता. कारण तिनं थेट मुद्दय़ालाच हात घातला. काय घेतलंयस माझ्यासाठी?’ गिफ्ट तिच्यासमोर धरलं.
सेकंदसुद्धा न दवडता तिनं कव्हर काढलं. मी आणलेला ड्रेस तिनं निरखला, खूश झाली. आपण आनंदलो आहोत, हे ती कधी बोलून नाही दाखवत. पण अशा वेळी एरवी पीचच्या फळासारखे दिसणारे गोबरट गोरे-तांबूस गाल पिकण्याच्या वाटेवर असलेल्या स्ट्रॉबेरीप्रमाणं हळूहळू लाल होऊ लागतात. अस्फुट स्मित ओठांवर उमटतं. गालावरचा तीळ काही सेकंदांकरता खळीत जाऊन विसावतो. या तिन्ही क्रिया जेव्हा एकाच वेळी होतात, तेव्हा मॅडम तुफान खूश झाल्यात, हे लक्षात येतं.
 
आता तिच्याकडून गिफ्ट घेण्याची पाळी माझी होती. तिनं हातात एकापाठोपाठ एक असे बोर्नव्हिटाचे तीन मोठे डबे टेकवले नि माझा चेहरा न्याहाळण्यास सुरुवात केली. तसाही तो तिचा आवडता छंदच आहे. पाहतोस काय असा डब्यांकडं? त्यापेक्षा स्वत:कडे पाहा. नोकरी सुरू केल्यापासनं केवढा वाळलायस. आता तुझी हाडंसुद्धा कातडीला हाड हाड करत असतील. जरा जिवाला खात-पीत जा.हाताच्या दोन्ही मुठी डोक्याशी नेत काडकन बोटं मोडून तिनं माझी दृष्ट उतरवली. टॉप-जीन्सवाली पोरगी असं काय करतेय, या उत्सुकतेनं आजूबाजूच्या भोचक नजरा आमच्याकडे वळल्या. पण, तिची ही नेहमीची सवय आहे.
  माझ्या नोकरीला ती स्वत:ची सवत समजते. ही नोकरी मी का करू नये, याची किमान एकशे पंधरा कारणं पटवून देणं, हा तिचा आवडता छंद. एरवी रोज भेटणारे आम्ही आता आठवडय़ातून एकदाच एकमेकांना पाहू शकायचो, हे तिच्या माझ्या नोकरीवरच्या रागाचं मुख्य कारण आहे. जन्मल्यानंतर तू पंधरा दिवस डोळे उघडले नव्हतेस. आंधळेपणाचा हा वारसा तू अजून चालवतो आहेस, हे तुझ्या नोकरीवरून सिद्ध होतं. आणि असं माझंच नाही, हे भावी सासूबाईंचंही म्हणणं आहे.’ ‘तूही ज्या ब्रह्ममुहूर्तावर जन्माला आलीस, तेव्हा दगडूशेठ गणपतीवर कुणीतरी शेण फेकलं होतं आणि पुण्यात दंगल झाली होती. हे मी नाही, माझ्या भावी सासूबाई सांगतात.
      आता पुढचं सारं ऐकून घेण्यासाठी मी मनाला तयार केलं. कारण, व्हॅलंटाइन डे हा प्रेमाचा वार्षिक ताळेबंद मांडण्याचा दिवस असतो, अशी तिची धारणा आहे. त्यामुळं ती दारुगोळा डोक्यात भरूनच येते. हल्ली असंच होतं. नोकरी करता-करता दिवस कसा उडून जातो, समजतच नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसतं राबणं. सकाळी थोडी सवड असते, तेव्हा तिची मेडिकलची लेक्चर्स असतात. दुपारी जेवायला येतेस का, हे विचारण्यासाठी फोन करावा, तर तिची नाटकाची प्रॅक्टिस असते. त्यानंतर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट तपासायचे असतात. तिथून पुढं ती मोकळी होते, तेव्हा माझा दिवस पॅक झालेला असतो. हॅलेचा धूमकेतू ७६ वर्षानी पाहायला मिळतो ना, तसंच आमच्याही भेटीगाठींचं होतं. मग, दोघांच्याही सवडीप्रमाणं फोन अ फ्रेंडकरत समाधान मानायचं. 
     तिचा त्रागा ऐकून आपण पृथ्वीऐवजी प्लुटोवर राहायला असतो, तर बरं झालं असतं, असं वाटतं कधीमधी. आपला एक दिवस तिथं साडेसहा दिवसांचा असतो म्हणे. होईल सगळं व्यवस्थित..’, तिची पाठ थोपटत आश्वस्त केलं. मिनिटभर आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेलो. सुंदर दिसतेयस.. सुरुवातीलाच द्यायची होती कॉम्प्लिमेंट. पण आता संधी मिळाली. परत बोल..स्वत:चं कौतुक तिला दुस-यांदा ऐकायचं होतं. लय भारी.. जगात भारी..शब्दांची कंजुषी करायला आपल्याला नाही जमत. ती हसली. तुफान गोड हसली. दोन-तीन आठवड्यांपासून वस्तरा न लागलेल्या गालावर बक्षीस टेकवून बाजूला होताना कुजबुजली, ‘पुढल्या वेळी भेटू तेव्हा कामातनं वेळ काढून शेव्हिंग करून ये. पैसे नसतील, तर तेही खिशात ठेवलेत.
 .....
'प्रहार'च्या 'व्हॅलेंटाइन डे स्पेशल'मधला लेख 

Monday, June 13, 2011

... खळांची व्यंकटी सांडो !

       गोष्टीचा संदर्भ थेट जगण्याशीच असेल, तर तीत उसना अभिनिवेश आणावा लागत  नाही. लक्ष वेधण्यासाठी आवश्यक असलेली रंजनमूल्ये वजा करूनही ती गोष्ट थेट हृदयाची पकड घेण्यात यशस्वी ठरते. जे डेंच्या स्टो-याही तशाच असायच्या. कुणी मसाला म्हणून त्या चवीनं वाचत असतीलही. अनेकांना ह्या बातम्या वाचताना आपण भडक आणि रंगीत नाट्यपटाचा आनंद लुटतो आहोत, असा भास होत असेल. पण, त्या रुग्णशय्येवर निपचित  पहुडलेल्या समाजव्यवस्थेच्या जर्जरतेच्या निदर्शक होत्या. 
         आता बहुतांश जणांना बातमीत वेधकता आणण्यासाठी कमी-अधिक प्रमाणात कल्पकता आणि शैलीचा आधार घ्यावा लागतो. छापण्यापूर्वी अथवा बोलण्याअगोदर अनुभवाच्या पातळीवरच उतरणं गरजेचं आहे, ही बातमीदारीची पूर्वअट इतिहासजमा झाली असं वाटण्याजोगा हा काळ आहे. कारण, दळणवळणाची साधनं त्यांची कमाल दाखवताहेत. सारं जग आपल्या खिशात आहे, असं त्यात ठेवलेल्या हाय एन्ड मोबाईलमुळं आपण वाटून घेतो आहोत. आख्खी मुंबई पाण्यात बुडाली, हे सहजगत्या सांगताना आता आम्हाला पुराव्यादाखल केवळ हिंदमाता अथवा मिलन सबवेत गोळा झालेला गुडघाभर पाऊस पुरेसा ठरतो. ओलेत्या मान्सूनच्या ड्राय बातम्या, हा त्याचा परिणाम. पण, या बाबतीत ऑड मॅन आऊट असल्याप्रमाणं डे कायमच कळपाबाहेरचे भासत आले. 'मिड डे'मधल्या त्यांच्या खणखणीत स्टो-या वाचून हे जाणवायचं. पत्रकारितेच्या जगतात दुर्मीळ झालेल्या जमातीचे ते प्रतिनिधी होते. अनुभवांचं अवगुंठण लाभलं की, निर्जीव शब्द दाहक बनतात. डेंचं लिखाण तसं होतं. ते क्राईम बीटचे एक्का होते, या गोष्टीचा विसर त्यांच्या बातम्या कधीच पडू द्यायच्या नाहीत. एरवी टॅब्लॉईडमधल्या बातम्या  चवदार पदार्थ मिटक्या मारत चाखावा, तशा वाचल्या जातात. पेपर खपवण्यासाठी  त्यांना ट्रीटमेंटही तशीच दिलेली असते. पण, बातमी म्हणून असलेलं एखाद्या घटनेचं मूल्य केवळ पेपराच्या फॉर्ममुळं कसं काय कमी होऊ शकेल ? डे यांचं लिखाणदेखील अंडरवर्ल्डच्या तळाचा ठाव घेऊन जिवाच्या करारानं स्वतःला पृष्ठभागावर तरंगत ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचं जाणवायचं.
            समाजव्यवस्थेची निकोपता तपासायची असेल, तर क्राईमच्या बातम्यांशिवाय दुसरी भरवशाची फूटपट्टी कुठली ? त्या लिटमस पेपरसारखं काम करतात. डेंच्या बातम्यांसारखं. लोकशाही व्यवस्थेत ज्या मोठ्या सामाजिक प्रतलाचा एक हिस्सा पत्रकारितेनं व्यापला आहे, त्याचा सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे क्राईम रिपोर्टिंग. खून आणि बलात्कार, तस्करी आणि मारामारी, भुरट्या चो-या आणि घरफोड्या, गँगवॉर आणि पोलीस डायरी... यांच्या ठोकळेबाज नोंदी म्हणजे क्राईम रिपोर्टिंग नव्हे. डे यांची वार्तांकनं घटनेचे सारे तपशील गोळा करून ती एका सूत्रात समेटणारी वाटायची. ते सूत्र समाजाच्या घसरत्या मूल्यव्यवस्थेप्रती नातं जोडू पहायचं. 'गुड मॉर्निंग जर्नालिझम'च्या  नावाखाली सटरफटर बातम्यांचं पीक गाजरगवताप्रमाणं फोफावलेलं असताना डेंचं रिपोर्टिंग रात्रीच्या अंधारात गूढ आणि भयप्रद भासणा-या अक्राळविक्राळ पिंपळवृक्षाप्रमाणे अंगावर यायचं. त्या झाडाच्या डेरेदार घे-यानं अनेक पत्रकारांना प्रभावित केलं आहे. पण, त्याची काळीकभिन्न सावली आपल्याला गिळून टाकील की काय, अशांचं प्रमाण अधिक. मुंबईच्या बदनाम गल्ल्यांच्या, खौफनाक़ मोहल्ल्यांच्या, गुन्हेगारी विश्वाच्या बाजिंद्या म्होरक्यांच्या, मुजोर पोलिसी खाक्याच्या, बेबंद सामाजिक  अनाचाराच्या... समाजाची एकही काळी बाजू अशी नव्हती की, जिला डेंनी आपल्या लेखणीतून स्पर्श केला नाही.              

      इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टिंग ही बातमीदाराची वैयक्तिक खाज असते आणि तो कंड शमवू  इच्छिणा-या 'खतरों के खिलाडीं'चा एंड रिझल्ट ब-याचदा ठरलेला असतो, असा महामूर्ख दावा करणारे तर्कदुष्ट महाभाग आपल्याकडे आहेतच. त्यांचे तर्क त्यांना लखलाभ होवोत. पण, राज्यघटनेच्या सरनाम्यापासून ते संविधानाच्या तिस-या भागातल्या एकविसाव्या आर्टिकलनुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जीवितरक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. तो अधिकार प्रत्येकाला बजावता येईल, याची व्यवस्था करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेवर आहे. मग, चेहरा टोपीत दडवून कायम सावधपणे वावरावं लागलेल्या आणि तरीही गुंडांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या डेंच्या मृत्यूचं उत्तरदायित्व कोण शिरावर घेणार आहे ? पत्रकार म्हणून असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून नव्हे, तर या देशाचे सर्वसामान्य नागरिक म्हणून असलेल्या घटनादत्त अधिकारांवर बोट ठेवून आम्ही उत्तराची अपेक्षा करतो आहोत.

Wednesday, June 8, 2011

रोज रोज अमेरिका !



     आमचं ऑफिस हा जर आरंभबिंदू म्हणून पकडला, तर समोर पाचएकशे पावलांवरती हार्ड रॉक कॅफे आणि साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर ब्ल्यू फ्रॉग एवढ्या परिघात माझी अमेरिका वसते. अमेरिका म्हणजे खरोखरची अमेरिका. जागतिकीकरणाची सारी सिम्बॉल्स या साधारणतः एक वर्ग चौरस किलोमीटरच्या परिसरात एकवटलेली आहेत. तंग निळ्या काचांची वन इंडिया बुल्स सेंटरची चकचकीत इमारत. सभ्यतेचे सारे संकेत ओलांडून ती आपल्या अंगाला घसटू पाहतेय की काय, अशी शंका यावी, अशा पद्धतीनं हाफीज कॉन्ट्रॅक्टरनं तिचं डिझाईन केलंय. दुरून पाहिलं, तर कुणावर तरी ओणवी होऊ पाहतेय, असं वाटतं. पण, येरागबाळ्यांना हाताच्या अंतरावर ठेवणारी आणि कोट-टायवाल्यांना तेच हात फैलावून मिठीत घ्यायला आसुसून पुढे धावणारी, असा एक प्रकारचा हिशेबी सहजभाव बाळगणारी ही आलिशान इमारत आहे. नवश्रीमंत नीलवर्णा. सौष्ठवांकित रुपगर्विता. अंगाभोवती चिरेबंद कुंपण लपेटून कोप-यातल्या झोपडपट्टीशी, शेजारच्या शाळेशी नि समोरच्या रस्त्याशी नि एकंदरच या परिसरातल्या सर्वच नैमित्तिक व्यवहारांशी नातं तोडत फटकून वागणा-या या अठरा मजली इमारतीमध्ये एतद्देशीय अमेरिकनाईज्ड कार्पोरेट जगताची वस्ती आहे.
  पोर्चमधून लॉबीत प्रवेशतानाच एक दमदार अक्कडबाज मिश्यांचा नि सहा-सव्वासहा फूट उंचीचा धिप्पाड सरदारजी तुम्हाला खाडकन कडक सॅल्यूट मारतो. तो स्वीकारून तुम्ही आतमध्ये येता, तेव्हा समोरचं दृष्य पाहून आपोआप डोळे विस्फारले जातात. त्या इमारतीच्या लॉबीत आणि अमेरिकेत तुमचा प्रवेश एकदमच होतो. जवळपास तीन मजली उंचीचं अट्रियम पायांना झटदिशी मागे खेचत जोराचा झोका घेऊन आता आपल्या अंगावरच उडी मारतंय की काय, असा भास होतो. त्याची चकाचौंध अवाढव्यता गोळ्याच्या रुपानं पोटात जमा होऊ पाहते. उजव्या बाजूच्या कोप-यात पाण्यानं काठोकाठ भरलेल्या टँकमधले हिरवेगार बांबू एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या नादात सरसरून अट्रियमच्या छताला टेकू पाहतायत. डावीकडं मोठ्ठा फिशटँक ठेवलाय. पण, आपल्या समुद्रातले मासे त्यात नाहीत. अटलांटिक वा पॅसिफिकमधले असावेत. पाणी मात्र इथलंच आहे. त्या पाण्याशी वैरभाव न बाळगता, पण सलगीही न करता मासे अलिप्तपणे फिशटँकमध्ये सुळक्या घेताना दिसतात. आपलं पडलोय, म्हणून पोहायचं, एवढाच निर्मम भाव त्यांच्या संथ लयीत हलणा-या कल्ल्यांतून व्यक्त होतो. अरबी समुद्रातले बोंबील बाल्टिक समुद्रात नेऊन टाकले तर तिथं ते पूर्वीच्या मस्तीत झुळझुळतील का ?
 त्या दगडी गुलाबी ग्रॅनाईटी पार्श्वभूमीवर एक रिसेप्शन काऊंटर आहे. त्या काऊंटरवरच्या चार मुलींचे ड्रेसही लॉबीच्या गुलाबी रंगाशी मॅच होणारे. गर्दगुलाबी टॉप आणि त्याच रंगाशी मिळत्याजुळत्या साड्या. प्रत्येकीचा चेहरा इतका कोरीव, इतका कोरीव की, त्या हसतात, तेव्हा मनाला शंका चाटून जाते की, यांना समोरच्याशी संवाद साधण्यासाठी ओठांची हालचाल ठराविक सेंटीमीटरमध्येच अशा प्रकारे करण्याचं प्रशिक्षण दिलं असावं की, ज्याची अंतिम फलनिष्पत्ती हसणं या कृतीच्या जवळपास जावी. शिवाय, या मुलीही सुबक नि प्रमाणबद्ध हसलं नाही तर, आपली नोकरीतून गच्छंतीच होईल, या भितीनं त्यांच्या जिवण्यांची ठरवून दिलेल्या हसण्याच्या प्रमाणाशी ईमान राखून हालचाल करण्याच्या नेहमीच प्रयत्नात असतात. हसणं ही त्यांच्यासाठी एक सवयीची प्रतिक्षिप्त क्रिया. उत्स्फूर्त नाहीच. दिवसाला किमान दीड-दोन हजार माणसं त्या लॉबीतून येत-जात असतील. त्यांचं स्वागत करताना या मुलींना किमान दोन हजार वेळा तरी नक्की हसावं लागत असेल. शिवाय, या माणसांपैकी कुणी एखादा प्रश्न विचारला, तर उत्तर संपेपर्यंत आपलं हसू चेहराभर ताणून धरण्याची त्यांची चिकाटी दाद देण्यासारखी असते. हसण्याच्या बाबतीत अक्रीय राहण्याचं सुख कधीमधी त्या अनुभवत असतील का, असा प्रश्न मला पडतो. किमान, त्यामुळं तरी एखाद्या क्षणी त्यांच्या ओठांवर खरंखुरं स्मित उमलून येईल, अशी आशा वाटते. ह्या सुंदर पोरी, तो पोर्चमधला सव्वासहा फुटी धिप्पाड सरदारजी, मॅट्रिक्समधल्या मि. स्मिथप्रमाणं काळे सूट पेहरून लॉबीत उभी राहिलेली हॉस्पिटॅलिटी सेक्शनमधली ती तरुण पोरं, अदबीनं प्रत्येकाला विच फ्लोअर सरअसं विचारणारे बसक्या गोल टोपीचे सातवी पास लिफ्टमन. प्रत्येकालाच काटेकोर एटिकेट्स आणि मॅनरबाजी रक्तात मुरवून घेणं अगत्याचं. कसूर झाली, तर थेट नोकरीशीच गाठ. यांच्यातला प्रत्येक जण माझ्या अमेरिकेच्या पायातला एक एक चिरा आहे.
 लिफ्टमध्ये घुसल्यानंतर समोरचा टीव्ही एनडीटीव्ही प्रॉफिट, नाही तर सीएनबीसी दाखवत असतो. शेअर बाजाराचे आकडे कधी खाली जातायत, तर कधी वरती चढतायत. समोर टीव्ही दिसत असूनही त्यात बडबडणा-या अँकरवर अजिबात विश्वास न दाखवता लिफ्टमधली माणसं आपापल्या ब्लॅकबेरीजवर वारंवार शेअर बाजाराचा ईसीजी चेक करतायत. डोकं वर काढून कुलीगशी गप्पा मारतानाही त्यांच्या विषयाचा आरंभ, मध्य आणि अंत्यबिंदू तोच असतो. शेअर बाजार. डील्स. प्रपोजल्स. प्रेझेंटेशन्स. त्यांचं सारं कसं आखीव नि नियमबद्ध. गप्पांचा विषय कधीतरीच भरकटतो नियमाला अपवाद असल्यासारखा. पण, एरवी प्रत्येक जण कालपेक्षा आज मोठ्ठं स्वप्न डोळ्यांत घेऊन वावरतो. माझी एक अमेरिका मला त्या डोळ्यांत भेटते.
  हार्ड रॉक आणि ब्ल्यू फ्रॉग तर टोटल अमेरिकन. स्कर्टिल्या सुंदर पोरी नि मुस्तैद हंक पोरं. वातावरण एकदम इलेक्ट्रिफाईंग असतं. वाट सापडत नसलेली एक अफाट ऊर्जा इथं संध्याकाळनंतर कायम कोंडलेली असते. गिटारींचा कल्लोळ उठला की, ही ऊर्जा सैरभैरपणे बेधुंद थिरकते. या बाबतीत हार्ड रॉक जरा जास्त अमेरिकन आहे. कारण, ते मुळातच अमेरिकन आहे. तिथल्या म्युझिकचा सारा भर अमेरिकन रॉकवर. भारतीय प्रयोगशीलतेला तिथं फारसा वाव नाहीच. पण, ते तसं नाही, म्हणूनच आम्ही हार्ड रॉकला जातो ना. प्युअर अमेरिकन असल्याचा फील येतो. पण, फुकट ड्रिंक्सचे लाड तिथं ब-याचदा नसतातच. ब्ल्यू फ्रॉगचं तसं नाही. म्हणजे वीकेन्ड सोडून बाकीच्या दिवशी तुम्ही एक ड्रिंक घ्या. दुसरं फ्री. टकिलाचे दोन शॉट्स नि कडवट मार्टिनी. थोडं पोटात खळबळल्यासारखं होतं. पण, तिस-या सेकंदाला झूप्पदिशी अमेरिकाच. आतापर्यंत आजूबाजूला तुकड्या-तुकड्यांत दिसणारी अमेरिका थेट मेंदूत शिरते. मानसिकदृष्ट्या समग्र अमेरिकामय झाल्याची नशा दाटून येते. माझ्या अवतीभोवतीची पोरं-पोरीदेखील अशीच गरगरत्या गोंधळात बेफाम घुमत असतात. आम्ही जितके नागर नि अर्वाचीन, तितकेच एकलकोंडे नि पराधीन. आतमध्ये कोंडलेल्या ऊर्जेचा आविष्कार त्या कल्लोळी गाण्यांच्या सुरावटींवर प्रत्येक जण अनुभवतो. एक विलक्षण आक्रमक हतबलता त्यावेळी मनाची पकड घेताना जाणवते. तेव्हादेखील आमच्या अडखळत्या पावलांची त्या नव्या जगाचा ताल पकडण्याची धडपड सुरू असते. माझी एक अमेरिका इथं वसते. मघापासनं नुसतंच कानात किंचाळणारं ते अद्वैतवालं भन्नाट टोळकं आता पोट फाडून आतमध्ये शिरलेलं असतं नि आतड्यांची प्रत्यंचा ताणून गाण्यातला शब्द न् शब्द वर मेंदूच्या दिशेनं ढकलतंय, असं वाटू लागायला आस्ते आस्ते सुरुवात होते.....
                   I can see the light now
Shining through the shadows
Dreams unraveled stories untold
And visions yet unknown

And I wanna walk this way
To a place I have known
And I wanna walk this way
Just walk on….

Get up and make the change right now
Get up and free yourself right now

You won’t tell me what went wrong
Your world was shaken
We have been waiting for too long
To find a way back home……….

Thursday, June 2, 2011

पहाटेच्या भू(भू)पाळ्या !


    झोपेचं बोट धरून स्वप्नांच्या जगात प्रवेश करत असतानाच जाग आली. कुत्र्यांनी निषेधसभा आरंभली होती. प्रत्येकाचा सूर टिपेचा. काहीच पसंत नसल्यासारखा आणि संपूर्ण बदलाची मागणी करणारा. त्यांच्या आलापी एकाच वेळी करूण आणि धारदार होत्या. मध्येच एखादं कुत्रं कान पाडून सामोपचाराचा सूर लावे. साराच गोंधळ. गलक्याचा म्हणून जो एक सामूहिक आवाज असतो, तसा तो नव्हता. गलक्यामध्ये वेगवेगळ्या आवाजांची सरमिसळ असते. त्या आवाजाच्या पट्ट्यांमध्ये चढउतार होऊ शकतात. पण, मतैक्याची एक मध्यम लय सर्वांनीच अंगभूत समजूतदारपणानं साधलेली असते. पण, या कुत्र्यांना आपल्याला नेमकं हवंय काय, हेच ठरवता आलेलं नसावं. त्यामुळंच त्यांचे आवाज असे चहू दिशांना फाटलेले. ऐकणा-यांच्या मनात गोंधळ निर्माण करणारे. मरगळल्यागत काही अंतर चालून जाऊन शरणागताप्रमाणं हवेमध्ये विरणारे. आंदोलनादरम्यान नाही का, घसा फाटेपर्यंत सरकारविरूद्ध मुर्दाबादच्या घोषणा देऊन-देऊन थकलं की, काही काळ मोर्चेकरी शांत बसतात. थोडं हुशारल्यासारखं वाटलं की, पुन्हा जोरदार हाळ्या टाकतात. पण, पहिल्या वेळच्या तुलनेत नंतरच्या आवाजाचा जोर कमीच असतो. घोषणांची आवर्तनं हळूहळू आक्रसत जातात. एकच चहा पावडर चार वेळा वापरल्यानंतर चहाचा रंग फिका पडू लागतो, तसा सुरुवातीचा आवाजाचा कडक पोत नंतर विसविशीत बनून जातो. बेंबीच्या देठापासून ओरडलो... आतडी पिळवटून शंख केला... पण, सारं व्यर्थ ! कुणीच दखल घेत नसल्याची निराशा पायांमध्ये दाटून येते. माघारी फिरणारी पावलं एकदम जडजड पडायला लागतात. या व्यवस्थेनं देऊ केलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही वापरलं. पण, आवाजाचे तरंग लोखंडी पडद्याच्या कानांवरच जाऊन पडणार असतील, तर असल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग काय ?

     छ्या ! कुत्री असले विचार नक्कीच करत नसावेत. आमच्या इथली कुत्री त्यांचं तारस्वरातलं समूहगान ऐकण्याचा बहुमान मला नेहमीच देतात. घड्याळात पाहिलं. अडीच वाजले होते. पहाटे तीनच्या सुमारास दररोज पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन सोसायटीसमोरच्या रस्त्यावरून चक्कर मारून जाते, तेव्हा कुत्री पांगतात. पण, तिला यायला अजून अर्धा तास वेळ होता. कुत्र्यांनीही तोच मोका साधून कल्लोळ उठवला होता. नाही तर, पोलिसांसमोर ओरडण्याची त्यांची काय बिशाद ?
पण, कुत्र्यांचा हा कर्णकर्कश्श भोंगा आणखी अर्धा तास ऐकावा लागणार, या कल्पनेनंच जीव कासावीस झाला. आता ती सारी एका समेवर शोकगीत गात असल्यासारखी ओरडत होती.  फार वाईट असतो तो आवाज. एका जित्याजागत्या- हसत्याखेळत्या वस्तीत सामूहिक मयती व्हाव्यात नि अंतराळभर लटकलेल्या त्या दुःखाच्या सुतकी पताकांच्या टोकांतून थेंब थेंब रक्त ठिबकावं नि ते नेमकं कुठून टपकतंय, याच्या शोधात भिरभिरल्याप्रमाणं असतं हे भांबावतं मलूल रडणं. त्यात स्वदुःखाची कैफियत असतेच. पण, भवतालाविषयीचा उपहास जास्त तीव्र असतो. कुत्री नुसतीच भुंकली, तर एकवेळ ठीक आहे. त्यानं डोक्यात चिरड सणकते. कुत्र्यांविषयी फारसं काही वाटून घ्यायला आपण बांधील राहत नाही. पण, त्यांचं रडणं-विव्हळणं ?  ते अस्वस्थ करतं.  मन कुरतडतं. सिग्नलवर भीक मागणा-या काळ्याबिद्र्या पोराला घरीही घेऊन जाऊ शकत नाही नि दोन रुपयांच्यावर हातात जास्त पैसे टेकवण्यास धजावतही नाही, यादरम्यानच्या काळात मनाची जी अवस्था असते, तिचाच पुनःप्रत्यय कुत्र्यांचं रडणं ऐकताना येतो. कधी कधी वाटतं, ही कुत्री परिस्थितीशरण माणसांप्रमाणंच वागतायत. माणूस माणसाळला. त्यानं कुत्र्यांनाही माणसळवलं. अरे पण, माणसाळले, म्हणून काय झालं ? शेवटी आहेत प्राणीच ना ! मग सुळे विचकून दुःखाच्या नरड्याचा घोट का नाही घेत ? पंजे परजून का नाही चाल करून जात दुःख जन्माला घालणा-या परिस्थितीवर ? माणसांबरोबर राहून यांनाही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा विसर पडला की काय ?  
पहाटेच्या वेळी सारं जग कसं शांत पहुडलंय. टॉवर्स झोपलेत. चाळी निजल्यात. आणखी पंधरा- वीस मिनिटांनी शेजारच्या स्टेशनातनं शंटिंगचा विशिष्ट आवाज करत नेहमीचं इंजिन कानांना वर्दी देऊन जाईल. पण, झोपेचा कोश त्याच्यानंतरही आणखी काही काळ मोडला जाणार नाही. कुत्र्यांचं काय घेऊन बसलात ? कुत्रीच ती. ओरडतील- ओरडतील नि शेपूट घालून शांत बसतील.
दहा तास अगोदर इथं समोरच्या चाळीची जागा जबरदस्तीनं खाली करायला लावणा-या बिल्डरविरोधात रहिवाश्यांनी आंदोलन केलंय. ऑब्वियसली, सुरुवातीच्या निवेदनांना दाद दिली नाही म्हणूनच. पण, आंदोलनात कुणी तरी दगड फेकल्याचं निमित्त पुढं करून पोलिसांनी त्यांची ढोपरं फोडलीयत. ढुंगणं सुजवलीयत. फार काही झालं नाही. इतर कुणी सरकारी कामात हस्तक्षेप केला नाही. जे दिसलं, ते फक्त डोळे भरून पाहिलं आणि मग सारे झोपायला गेले. त्या वस्तीतल्या घरांच्या दिशेनं गेलेल्या जखमी जडशीळ पराभूत पावलांच्या वेड्यावाकड्या खुणा पटांगणातल्या मातीत अजूनही आपलं अस्तित्व शोधताना दिसतील. दुरूनच आणखी थोडासा कानोसा घेतला, तर विव्हळणंही फारच ओळखीचं वाटलं. नेमकं पहाटस्वप्नांच्या वेळीच जागं करणारं.
या शहरात असल्या वस्त्याही अमाप आहेत नि आडदांड बिल्डरही. कानात इयरप्लग घालून झोपायचं की थेट नख्याच वाढवायच्या... फैसला करायलाच पाहिजे!