Tuesday, December 20, 2011

सातारा ! एक कंदी गाव

      काही गावांचा गोडवा तुमच्या मनात कायम घर करून असतो. तिथल्या आठवणीही मिठास असतात. तुम्ही त्या गावाच्या प्रेमात असता. इतरांना वावगी वाटणारी त्या गावाची एकही गोष्ट तुम्हाला खटकत नाही. कुणी सांगितलं की, ह्या गावात पाणी दिवसाआड येतं. तर तुम्ही म्हणता की, त्यात काय! तरीही भाग्यवानच आहात ! अदिस अबाबा आणि मुम्बासाच्या लोकांना तर आठवड्यातून एकदाच पाणी पहायला मिळतं. कुणी नाकाला रुमाल लावून म्हणाला की, ही उघड्यावरची गटारं आणि डुकरं फार त्रासदायक आहेत हो. तर तुम्ही सांगावं की, मुंबईत तर नाल्यांवर झोपड्या उभ्या राहतात.  कुणी कुरकुरला की, इथले रिक्षावाले भामटे आहेत. फार पैसे उकळतात. तर तुम्ही उत्तरता की, त्यात काय! दिल्लीतले रिक्षावाले तर आख्खा माणूसच लुटून नेतात. सांगायचं तात्पर्य असं की, तुमच्या आवडत्या गावाला नावं ठेवलेली तुम्हाला बिलकुल खपत नाही. आता कुणाला गावद्वेषाची कावीळच झाली असेल, तर त्यांच्यासाठी आपली मराठी भाषा ओवीपासून शिवीपर्यंत किती लवचिक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. 
 
   ज्या त्या गावाचं वेगळं माहात्म्य असतं, हे खरंच! पण, त्यांच्यातही काही गावं खरंच सुंदर असतात. म्हणजे देवाची कशी काही माणसं अगदी लाडकी असतात ना, तशीच काही गावंसुद्धा देवाची लाडकी असतात, असं वाटतं. त्या गावावर त्याने कायम कृपाछत्र धरलेलं असतं.
   अजिंक्यता-याच्या वळचणीला पाय पोटाशी घेऊन आरामात पहुडलेलं सातारादेखील देवाचं एक लाडकं गाव असावं. इसवी सनाच्या बाराव्या शतकात दुस-या भोजराजानं अजिंक्यतारा बांधून काढला. अजिंक्यता-याच्या शिसवी बुरुजांखाली सातारकरांच्या शेकडो पिढ्या सुखात नांदल्या. आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीच्या नाकावर टिच्चून शिवरायांनी उभे केलेले टीचभर स्वराज्य औरंगजेब जेव्हा धुळीस मिळवण्यास आला, तेव्हा महाराणी ताराऊने याच शहरात राजधानी हलवली आणि मुघलांविरूद्ध एल्गार पुकारला. पुढे शाहू आणि ताराबाईत झालेल्या वारणेच्या तहातून छत्रपतींची थोरली पाती स्थापन झाली ती इथेच. शाहूंची फर्मानं घेऊन पेशवा आणि सरदारमंडळींची घोडी खैबरपार सुसाटली ती इथूनच. अटक, पंजाब, दिल्ली, रोहिलखंड, बुंदेलखंड, गुजरात, माळवा, बंगाल, ओरिसा, बंगळूर, म्हैसूर, भागानगर ( म्हणजे आताचे हैदराबाद), जिंजी, तंजावर... जरीपटक्याच्या स्वागतार्थ नौबती झडल्या नाहीत, असा भारतातला एकही प्रांत नव्हता. मराठेशाहीच्या एका देदीप्यमान पर्वाचे आणि अस्ताचे साक्षीदार असणारे असे हे शहर. सरंजामी वातावरणाच्या खाणाखुणा अजूनही या शहरात दिसतात. ( छे.. हे फारच पॅट्रिऑटिक होतंय राव.. खरे म्हणजे, अजूनही मला आपले पोलिस आणि मिलिटरी शोषणकर्त्या फ्युडल राज्यव्यवस्थेचेच हस्तक वाटतात... जाऊ द्या. मध्ययुगातली वांगी मध्ययुगातच ठेवूयात.)
     कर्मवीर भाऊराव पाटलांनी इथेच कराडजवळच्या काले गावात १९१९मध्ये रयतचे रोपटे रुजवले. १९२४मध्ये तिचं मुख्यालय साता-यात आणलं. पिढ्यान् पिढ्या औतकाठी करत वावरात ढेकळं तुडवणा-या महाराष्ट्रातल्या बहुजन पोरांना शिक्षणाचा रस्ता दाखवण्याचं काम याच रयतने केलं. शिवरायांचं रयतकल्याणाचं ध्येय आधुनिक युगात ही संस्था अशा पद्धतीने साध्य करत आहे. लाखो मुलं या संस्थेच्या शिक्षणकेंद्रांमध्ये शिकत आहेत. रयतच्या बोधचिन्हावरचा वटवृक्ष संस्थेचा महाराष्ट्रभर वाढलेला पसारा दाखवतो. (बाप रे! लिहिण्याची ऊर्मी आतून आली की, तिला शैली, रुपबंध आणि आशयाच्या आटोपशीरतेचं बंधन उरत नाही. बहुतेक हा लेख त्याच वाटेवर आहे.)
    तर सध्यादेखील तितक्याच प्रमाणात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या संपन्न असलेल्या सातारा शहरात आमच्या एका मित्राचे परवा लग्न होते. मुहूर्त दुपारी साडेबाराचा होता. आम्ही निशाचर आहोत. त्यामुळे लग्नाच्या दिवशी पहाटे उठून साता-याची एसटी पकडण्याची हिंमत कुणातच नव्हती. आदल्या रात्री बारा वाजता मुंबई सेंट्रलहून सुटणा-या गाडीने निघायचे ठरले. मुंबईत तेव्हा गाल हळुवारपणे हुळहुळतील, एवढीच माफक गोड थंडी पडली होती. यावरून साता-यात थंडीने कहर केला असणार, या शंकेची पाल माझ्या मेंदूत चुकचुकली. एसटी सुटण्यासाठी एक तास बाकी असताना मी रुममध्ये स्वेटर शोधू लागलो. पोलिसी कुत्र्यासारखी सगळी रुम हुंगूनही अपेक्षित ऐवज हाती लागला नाही. आमच्यापैकी दोघे स्वेटर- कानटोपी घालून थंडीच्या मुकाबल्यासाठी जय्यत तयारीनिशी सज्ज झाले. उरलेला एक माझ्यासारखाच लढाईवर निघालेला, परंतु ढाल-तलवार नसलेला शेंदाड शिपाई निघाला. स्वेटरशिवायच निघावे लागणार, या कल्पनेने आम्ही दोघेही गारठलो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी मोबाईलवरून गणेशअण्णाचा धावा केला. देव आणि दैव, या दोन्हींवर काही माझा विश्वास नाही. पण, गणेशअण्णावर आहे. अण्णाजीनं तत्पर कृपा केली. लगोलग त्याचा पो-या पाठवला. त्यानं दात विचकत पिशवीत पेपराच्या आत गुंडाळलेली ओल्ड मंक काढून माझ्या हातात ठेवली. बाकीच्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. यामुळे कंडक्टर आपल्याला अर्ध्या वाटेतच खाली उतरवू शकतो, अशी भिती त्यांनी मला घातली. पण, रमचे औषधी गुणधर्म मी त्यांच्या गळी उतरवले. न पाहिलेल्या कंडक्टरच्या वतीने त्याच्या सद्वर्तनाची हमीही दिली. शिवाय, अजूनही माणसं रात्रीच झोपतात. त्यांचे आपल्यासारखे नसते, हे मी त्यांना पटवून दिले. अखेर कडवट तोंड करत मित्रांनी अंगावरून वारं गेल्यासारखं आपले चेहरे वाकडेतिकडे केले. या चित्रविचित्र हावभावांनाच परवानगी समजत ओल्ड मंक कोकच्या बाटलीत भरून बॅगेत टाकली. 
    एसटीतून प्रवास करायच्या कल्पनेने एक जण आधीपासूनच नाखूष होता. लब्धप्रतिष्ठीत मंडळी एसटीला लाल डब्बा म्हणून हिणवत असतात. परंतु, उपजीविकेसाठी शहरात स्थलांतर करणा-यांना आपली मुळं नेमकी कुठं रुजलेली आहेत, याची आठवण हा लाल डब्बा करून देत असतो. युरोप-अमेरिकेत रंगावरून वर्णाला आणि आपल्याकडे आडनावावरून जातीला हीन लेखण्याचा प्रकार केला जातो. एसटीला नाके मुरडणा-यांची मानसिकता याच जातकुळीतली असते. लोक सेवेबद्दल तक्रारी करायच्या सोडून एसटीच्या रंगरुपाचीच गा-हाणी गात असतात. असो.
    गाडी खंडाळ्याचा घाट चढून पुण्याकडे येऊ लागली, तशी थंडी झोंबू लागली. पण, तोपर्यंत अर्ध्या-अधिक ओल्ड मंकने आपले काम चोख बजावले होते. मळ्यात राखणीवर असलेल्या कुत्र्यासारखी ती आमच्यापासून थंडीला दूर पळवून लावत होती. तिने पोटात निर्माण केलेली ऊब शरीरभर पोहोचली, तेव्हा डोळ्यांची दारे आपोआप मिटून गेली.
     मोळाच्या ओढ्याजवळ असलेल्या शिंदे फर्निचरवाल्याने एसटी प्रवाशांच्या अभिवादनासाठी सातारा स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळच फ्लेक्स बोर्ड लावला होता. त्याचे स्वागत स्वीकारून आमची गाडी आत शिरली, तेव्हा सकाळचे साडेसहा वाजले होते.
    जवळपास साडेतीन-चार वर्षांनंतर मी या गावात पाय ठेवला होता. त्या काळात मुंबईच्या बाहेर इतर राज्यांत जाणं झालं. पण, महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावात मी जाऊ शकलो नव्हतो. बरं वाटलं. निरोप घेतेवेळी या शहराची जी चित्रं मनात जपून नेली होती, ती अजिबातच पुसट झाली नव्हती. चित्रे पुसट झाली की, आठवणींचे रंगही फिके होण्याची भिती असते. मग आपल्या लेखी स्थळाचंही महत्त्व उरत नाही. पण, आता तसं काही झालं नाही. जणू हे गाव माझ्या सवयीचंच होतं.
     आवरून मंगल कार्यालयात पोहोचलो. मित्राला तोंड दाखवण्याचा सोपस्कार पार पाडला. त्याने नव्या वहिनींशी ओळख करून दिली. माघारी फिरलो. पोवईनाक्यावर लाटकरांचे कंदी पेढे तोंडात कोंबले. (हे चितळ्यांप्रमाणे मुंबईत शाखा का काढत नाहीत ?) स्टँडवर आलो. सज्जनगडची एसटी पकडली. 

.
.

रात्री गडावरल्या मारुतीच्या मंदिराबाहेरच्या ओट्यावर बसून आकाशातले तारे मोजायचे होते. ढगांच्या कुटीतल्या यज्ञवेदीवर अनंतकाळापासून ठाण मांडून बसलेल्या वृद्ध सप्तर्षींना नमस्कार करायचा होता. अलिप्तपणे स्वतःपुरतंच चमकणा-या तरूण व्याधाला मुंबईला नोकरीसाठी येतोस का, असं विचारायचं होतं. कोलमडून जात असताना आधाराचा हात पुढे करणा-या एकांतातल्या क्षणांशी भांडायचे होते. समोर उरमोडी धरणाच्या आरश्यासारख्या पसरलेल्या पात्रात स्वतःचा चेहरा निरखायचा होता. मुंबईच्या अप्रतिहत प्रवाहात स्वतःला झोकून दिल्यापासून या धरणाच्या सांडव्यावरून आणि आयुष्याच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं, त्याचा जमाखर्च मांडायचा होता...