Friday, September 21, 2012

चहाच्या पेल्यातलं (पहिलं) वादळ

-->
हल्ली टिनपाट वादांना चहाच्या पेल्यातील वादळे म्हंटलं जातं. पण, ज्या वादावरून चहाच्या पेल्यातील वादळ हा शब्दप्रयोग मायम-हाटीत रुढ झाला, तो वाद मात्र अजिबात क्षुल्लक नव्हता. या वादामुळे जे वादळ उठलं, तेदेखील भयंकरच होतं. प्रचलित सामाजिक संकेतांना त्याने हादरे दिले. पुणे ही सामाजिक वाद आणि सुधारणांची भूमी मानली जाते. पहिलं चहाच्या पेल्यातलं वादळदेखील इथंच निर्माण झालं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातलं अखेरचं दशक. जगाचा ज्ञानविस्तार आपल्यापाशीच येऊन थांबतो, अशी तत्कालीन सनातनी पुणेकर ब्राम्हणमंडळींची ठाम समजूत होती. त्यामुळे विज्ञानाशी या ब्रम्हवृंदाचा तितकाच संबंध होता, जितका चर्चचा गॅलिलिओशी.
      इथली सुधारक मंडळी ज्या तडफेने परिवर्तनाच्या चळवळींना चालना देण्याचा प्रयत्न करायचे, तितक्याच आसुरी उत्साहाने त्यांच्या प्रयत्नांत खोडा घालण्यासाठी सनातनी लोक इरेला पेटायचे. पुण्यात जगद्वंद्य समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला आणि त्यांनी पचवलेल्या विरोधाला जगाच्या पाठीवर तोड नाही. बहुधा कर्मठांच्या या कडव्या विरोधामुळेच सुधारकांच्या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे मोठेपण आणखी उजळून निघाले असेल. ही बोटभर पुणेकर मंडळी ज्या प्राणपणाने समाजात पुरोगामीपण वर्धिष्णू करू पाहत होती, त्याहून अधिक कट्टरता सनातन्यांच्या धार्मिक आचरणात होती. समाजसुधारणेसाठी पुढे पडणारे कुठलेही पाऊल लगेच वादांची वादळे निर्माण करत असे. असे बखेडे उभे करणा-या पुणेकरांना इतर लोकांनी दोष देण्याऐवजी त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा खास शालजोडीतला आपल्या 'सुधारक'मधून गोपाळ गणेश आगरकरांनी मारला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील पहिले चहाच्या पेल्यातील वादळ निर्माण करण्याचे पितृत्व याच मंडळींकडे जाते. या चहा प्रकरणावरून त्या वेळी सनातन्यांनी प्रचंड कोल्हेकुई केली होती. ती इतकी की, चहाच्या पेल्यांना लावलेली तोंडं आता कुठं लपवायची असा प्रश्न हे अमृततुल्य प्राशन करणा-यांना पडला असेल. अर्थात, मराठी भाषेला नकळतपणे असा शब्दप्रयोग बहाल केल्याबद्दल सनातन्यांचे ऋण मानत 'जैसे थे' स्थितीत रहायचे की इतिहासापासून धडे घेत सुधारकी बाण्याने प्रगतीच्या दिशेने जायचे, हे ज्याच्या-त्याच्या मेंदूच्या घडणावळीवर अवलंबून आहे.
ग्रामण्य प्रकरण या नावाने ही घटना कुख्यात आहे. ग्रामण्य म्हणजे बहिष्कृत करणे अथवा वाळीत टाकणे. युरोपियन मिशनरी पुण्यात शिक्षणप्रसाराचं काम करत होते. गोपाळराव जोशी नामक गृहस्थाने पंचहौद मिशनच्या शाळेतील मिशनरी शिक्षकांकरवी पुण्यातील काही लब्धप्रतिष्ठीत मंडळींना शाळेत एका व्याख्यानाला आमंत्रित केले होते. त्याला रावबहादूर रानडे, लोकमान्य टिळक अशा नामी असामी हजर राहिल्या. व्याख्यानानंतर सर्वांना चहा देण्यात आला. या मंडळींनी मिशन-यांच्या हातचा चहा प्यायल्याची बातमी जोशींनी 'पुणे वैभव' नावाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून पुण्याचे कर्मठ वातावरण ढवळून निघाले. मिशन-यांच्या हातचा चहा पिऊन धर्मभ्रष्ट झाल्यामुळे या मंडळींना बहिष्कृत करावे, अशी सनातन्यांची मागणी होती. चहा पिण्याचे 'पातक' केलेल्या मंडळींची कागाळी थेट शंकराचार्यांपर्यंत नेण्यात आली. क्षुल्लक चहाच्या पेल्यातून खरोखर मोठेच वादळ निर्माण झाले. शंकराचार्यांनी जानेवारी 1892मध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामण्य कमिशन नेमले. म्लेंच्छांच्या हातचा चहा प्यायल्याबद्दल दोषी ठरवत या अपराधाबद्दल प्रत्येकाने वैयक्तिक प्रायश्चित्त घ्यावे, असा निर्णय कमिशनने दिला. सनातन्यांनी उठवलेले काहूर त्यावेळी टिपेला पोहोचले होते. तेव्हा टी पार्टीला उपस्थित असलेल्या टिळक आणि इतर सुधारकांनी प्रायश्चित्त घेण्याचे कबूल केले. लोकनिंदेपुढे सुधारणावाद्यांचे पाय लटपटले. त्यांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा तिथेच गळून पडला. प्रायश्चित्त घेण्याचा पळपुटेपणा करणा-या या मंडळींची आणि ग्रामण्य प्रकरणाची आगरकरांनी 'सुधारक'मधून यथेच्छ टर उडवली आहे.
" आगगाडीतून प्रवास करताना स्टेशनावरील ख्रिस्ती किंवा मुसलमान लोकांकडून चहाचे पेले, सोडावॉटरच्या बाटल्या आणि गरज लागल्यास कणकेची बिस्कुटे घेणे आणि त्यांच्या योगाने तहान व भूक भागविणे हा सामान्य प्रकार झाला आहे. अशा रितीने आचरण करणारे लोक राजरोसपणे समाजात वावरत असून, आणि त्यांचे घरी हवे ते भिक्षुक आणि शास्त्री जेवत-खात असून त्यांच्या वर्तनाबद्दल कोणीच शंका घेत नाही, हे आश्चर्य नव्हे काय ? " असा प्रश्न विचारत आगरकर पुढे म्हणतात, " आम्हांस तर असे वाटते की, असल्या आचारास अधर्मी आचार म्हणावयाचे असेल, तर असला अधर्म परंपरेने ज्याच्या हातून घडला नाही, असा एकही ब्राम्हण या देशात सापडणार नाही. खुद्द श्रीशंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांच्या पोटात पतितांच्या स्पर्शामुळे त्याज्य होणारे अन्नपाणी प्रतिदिवशी जात आहे व आजपर्यंत पुष्कळ गेले आहे, असे दाखवता येईल."
  स्थित्यंतर हा संस्कृतीचा स्थायीभाव असून उगीच खोटा धर्माभिमान बाळगून जुन्या चाकोरीला चिकटून राहण्याचा अनैसर्गिक प्रयत्न केल्यास समाजमन विकृत होत जाते, असा सज्जड इशाराही या प्रकरणाच्या निमित्ताने आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन धुरिणांना देऊन ठेवला होता. आगरकर भलतेच दूरदृष्टीचे ठरले. अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा, या गाजलेल्या टिळक-आगरकर वादात प्रथम सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणा-या आगरकरांचं म्हणणं किती अचूक होतं, याचा प्रत्यक्ष पुरावा आजूबाजूला सुरू असणा-या सामाजिक आणि धार्मिक अनागोंदीवरून मिळतोच आहे. सामाजिक सुधारणांअभावी राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यास प्रजा असमर्थ ठरेल, अशी आगरकरांची धारणा होती. ती खरी ठरलीय.
   अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी स्त्रियांना ड्रेसकोड सक्तीचा केलाय. त्याच्या विरोधात एखादीच टिकेची टिटवी टिवटिवली असेल. बाकी सा-या समाजानं ठार बहि-याचं सोंग घेतलंय. या ड्रेसकोड प्रकरणावरून पुरोगामी महाराष्ट्रात वादळ उठेल, अशी अपेक्षा होती. पण, सध्या वादळं घोंघावतात ती फक्त राजकीय नेत्यांच्या चहाच्या कपांमध्ये. एक दिवस बातम्यांचा विषय बनतात आणि शमतात. अहो आगरकर ! हल्ली चहाच्या पेल्यातली वादळं म्हणजे खरोखरीच टिनपाट वाद !! ज्यातून सामाजिक आशय एकदम बाद !!!

Thursday, January 5, 2012

जन हे सुखाचे !

 

       आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नवंकोरं जोडपं राहतं. नवंकोरं अशासाठी की, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालंय. लव्ह मॅरेज. लग्न होऊन आठ दिवस होतात न् होतात, तोच त्यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले. आता त्यांचा आवाज एवढा वाढतो की, रणक्षेत्राची मर्यादा आपसूक ओलांडली जाते. त्यांचे शाब्दिक बाँबगोळे भिंतींच्या बंधनांना न जुमानता थेट आमच्या हद्दीत येऊन पडतात. आमच्यापैकी कुणीही नाईट शिफ्ट करून सकाळी आलं की, या युद्धाची झळ त्याला बसतेच. देवळातील काकड्याप्रमाणे त्यांच्या भांडणाचा कडाकाही मोठाच असतो. एवढ्याशा वीस मिलीमीटर लांबीच्या मानवी स्वरयंत्रातूनदेखील गगनभेदी आवाज निघू शकतो, याची आम्हाला या दोघांकडे पाहून खात्री पटली आहे. त्यांचा आवाज सुपरसॉनिक विमानाचा पल्ला गाठून आख्ख्या फ्लोअरवर घुमत राहतो. डेसिबलची मर्यादा ओलांडल्याबद्दल नवरा-बायकोविरोधात गुन्हा नोंदवणारा कायदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अद्याप संमत केलेला नाही, हे यांचं सुदैव! अन्यथा, या दोघांसमवेत जगातील खूप सा-या पती-पत्नींना तुरुंगात खितपत पडावं लागेल, असं माझं स्पष्ट मत आहे. भिंतींना कान असतात, असं म्हणतात. पण, आमच्या भिंतींना ते नाहीत. कारण, या दोघांचे कानठळी आवाज ऐकून त्या ठार बहि-या झाल्या आहेत. भिंतींचं काम खिडक्या करतात. त्या कायम उघड्या असतात. शेजा-यांच्या आदळ-आपटीला झणझणीत शब्दांची फोडणी मिळाली, की तो ठसकेबाज वास आपोआप आमच्या नाकात शिरतो. अंग झटकून ताठ होत सावध झालेल्या कुत्र्याप्रमाणे खिडक्या स्वतःचे कान टवकारतात. पलीकडला शब्द न् शब्द आमच्यापर्यंत पोहोचवतात. रात्रभर काम करून डोळ्यांत दाटलेली झोप यांची भांडणं ऐकून माझ्याशी काडीमोड घेत पसार होते.
         बव्हंशी जोडप्यांच्या भांडणांना तात्त्विक किनार कधीच नसते. किंबहुना अशी किनार नसणा-या भांडणांवरती खास या दोन प्राण्यांचीच मक्तेदारी असते, असेही माझे ठाम मत बनले आहे. कुठल्याही गोष्टीवरून ते वादाचा फुफाटा उडवू शकतात. त्यातून उडालेला खकाणा नाकातोंडात जाऊन जीव गुदमरल्याशिवाय यांना चैन पडत नाही. रविवारची भाजी कुणी आणावी, यावरून ते आठवड्यातून एकदा मिळणा-या सुट्टीचं भजं करून टाकतील. कारणं क्षुल्लक असतात. पण, आव मात्र धर्मयुद्ध लढायला उतरलेल्या युधिष्ठिराचा आणतात. अंगावर हात उगारणं सभ्य समाजात शोभत नाही. त्याला पर्याय म्हणून ही मंडळी एकमेकांच्या इगोला रक्तबंबाळ होईतोवर लाथाळतात. हे शाब्दिक घाव इतके खोल-गहिरे असतात की, नंतर मने सांधता सांधली जात नाहीत. ग्रीष्मात विहिरीने तळ गाठावा त्याप्रमाणे नात्यातली ओल आटत जाते. कोरड्या रखरखीत चिखलासारखे नुसते व्यवहार शिलकीला पडतात. समाजासमोर नात्याचे कलेवर जिवंत असल्याची कसरत करणे नशिबी येते.
         शेजारच्यांची भांडणे हे एक उदाहरण झाले. लोकलमध्ये प्रवास करताना लोकांच्या चेह-याकडे पाहिलं की संसाराचं त्रासलेपण त्यांच्या कपाळावरील जाळीदार आठ्यांमध्ये विणलेलं दिसतं. सप्तपदीच्या वेळी जोडीदारासोबत चालायची शपथ घेतलेली असतानाही जो तो स्वतंत्रपणे प्रवासाला निघाल्यासारखा भासतो. भांडण झालं. ठीक आहे. पण, भांडण मिटवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याचा समजूतदारपणा दाखवण्याऐवजी पती-पत्नीला दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपापल्या ऑफिसातले कलीग का जवळचे वाटावेत ? हे असं का होत चाललंय ?
नात्याच्या मयत होण्याची प्रक्रिया किती गतिमान झाली आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. चायनामेड प्रॉडक्टप्रमाणेच नात्यांच्याही टिकाऊपणाची खात्री देता येत नाही. पण, तरीही हे लोक एकत्र राहतात. भांडतात, भांडतात आणि भांडतात. अखेर एकाच छताखाली झोपतात. भांडण मिटलंय, असं तर काही दिसत नाही. युद्धभूमीवर दिवसभर मोर्चा सांभाळून थकून गेलेले दोन्ही बाजूंचे सैन्य ज्याप्रमाणे रात्री विश्रांतीसाठी शस्त्रे म्यान करते, तसा तात्पुरता तह या दोघांत होतो. दुस-या दिवशी नव्या दमाने नव्या विषयांची रसद पाठीशी बांधली की, यांचे युद्ध पुन्हा सुरू. लग्न झाल्यानंतर सहा महिने, वर्षा-दोन वर्षातच असले प्रकार सुरू होतात. याला काय एकत्र राहणं आणि संसार करणं म्हणायचं ? हा किंवा ही नसल्यानंतर दुसरं कोणी आपल्या आयुष्यात येईलच, या तारुण्यातल्या मस्तीतून हे येतं ? दोन्ही बाजूंना कमिटमेन्ट नको वाटेनाशी का होते ? मूल्ये तकलादू झालीयत, म्हणून हे चित्र सर्वत्र दिसतंय का ? एक मात्र खरं की, भुसभुशीत वाळूत अजिंठा-वेरूळ आकाराला येत नाही. त्याला घडणीचा ठाशीव कातळच लागतो.
         तुकारामाने म्हंटलंय की, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे; अंतकाळाचे, नाही कोणी.आजूबाजूचे फक्त सुखाचे वाटेकरी असतात. पाप अथवा दुःख सर्वांनाच नकोसं वाटतं. पण, कुठल्याही परिस्थितीत पती अथवा पत्नीने कायम एकमेकांच्या साथीसाठी सज्ज असावं, अशी अंगभूत अपेक्षा खुद्द या नात्यातच सामावलेली असते. वाल्या कोळ्याच्या बायको-पोरांना फक्त सुखातच हिस्सा हवा होता, हा रामायणातील भाग अपवादात्मक मानला जात होता. पण, हेच अपवादात्मक चित्र आता घराघरातील रामायण बनून समाजव्यवस्थेत सर्वाधिक घट्ट नातं मानलं जाणा-या नवरा-बायकोच्या नातेसंबंधांबाबत सर्रास दिसू लागले आहे. खुद्द नवरा-बायकोच एकमेकांची गणना जनांमध्ये करायला लागले आहेत. 
         गणितातील सेट थेअरीप्रमाणे नवरा-बायकोच्या कॉमन सेटमध्येही फार कमी गोष्टी उरल्या आहेत. दोघांचाही सवता सुभा असतो. नरभक्षी वेलींप्रमाणे संसाराचे पाश काहींना गुदमरवून टाकतात. काही पाण्यात राहूनही अंगाला थेंब लागू न देणा-या कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहण्याची किमया साधतात. दुधात साखर विरघळून जावी त्याप्रमाणे सुखाने चालणा-या संसारांचे समाजाशी असलेले गुणोत्तर व्यस्त होत चालले आहे. पराकोटीचे व्यक्तिस्वातंत्र्य आणि त्यातून येणारे भकास एकाकीपण पेलण्यासाठी आताचा माणूस सज्ज आहे का, हादेखील प्रश्नच आहे. पण, कसर लागलेल्या लाकडाप्रमाणे नात्यांचा भुसा पडत चालला आहे आणि समाजाचे वासे पोकळ बनू लागले आहेत. पावसात वाहून जाणा-या चिमणीच्या शेणाच्या घरासारखे यांचे संसारदेखील अवकाळीच विस्कटून जात आहेत. नवरा-बायकोच्या बाबतीत ही वेगळीच त-हा दिसू लागली आहे. एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटणं, आता दूरची गोष्ट झाली आहे. घराची सामाईक जागा सोडली, तर एकाच्या जगण्याच्या कप्प्यात दुस-याला जागा असत नाही. नाईलाजास्तव एकमेकांसोबत दिवस कंठले जातात. अशा प्रकारे नाईलाजाचं जगणं सोयीचं व्हावं, यासाठी एकतर कमालीची खुनशी एडजस्टमेन्ट, नाही तर हाराकिरीसाठी लढाईवर निघालेल्या उतरलेल्या सैनिकाचा आवेश. तुझ्यावाचून माझं काहीच अडत नाही, असं दाखवणं अथवा वागणं म्हणजे खुनशी एडजस्टमेन्ट. 
         या समाजदत्त नात्यामध्ये उत्स्फूर्तपणा असा काही उरलेला नाहीच. यांच्या रागातील भरती-ओहोटी समुद्राप्रमाणे नसतेच. ती जागृत ज्वालामुखीसारखी असते. कायम उफाळत राहते. दोघांमधील पोकळीचे भयावहपण कृष्णविवराप्रमाणे खोल-गर्द होत जाते. कधीमधी एकत्र पिक्चरला जाणं, हॉटेलिंग करणं आणि जुहू चौपाटीवर फिरून येणं, असल्या थुकरट गोष्टींनी ही पोकळी भरून येण्याची अपेक्षा करणं, म्हणजे डोकं दुखत असताना गुडघ्याला बाम चोळण्यासारखं आहे. आपलं आतूनच काही तरी निखळलेलं आहे. ते सांधायचं सोडून वरवरच्या मलमपट्ट्या काय कामाच्या ? हे एकत्र राहतात, म्हणजे नेमकं काय करतात ?  प्रश्न विचार करायला लावणारा आहे.