-->
हल्ली टिनपाट वादांना चहाच्या
पेल्यातील वादळे म्हंटलं जातं. पण, ज्या वादावरून चहाच्या पेल्यातील वादळ हा
शब्दप्रयोग मायम-हाटीत रुढ झाला, तो वाद मात्र अजिबात क्षुल्लक नव्हता. या
वादामुळे जे वादळ उठलं, तेदेखील भयंकरच होतं. प्रचलित सामाजिक संकेतांना त्याने
हादरे दिले. पुणे ही सामाजिक वाद आणि सुधारणांची भूमी मानली जाते. पहिलं चहाच्या
पेल्यातलं वादळदेखील इथंच निर्माण झालं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातलं अखेरचं
दशक. जगाचा ज्ञानविस्तार आपल्यापाशीच येऊन थांबतो, अशी तत्कालीन सनातनी पुणेकर
ब्राम्हणमंडळींची ठाम समजूत होती. त्यामुळे विज्ञानाशी या ब्रम्हवृंदाचा तितकाच
संबंध होता, जितका चर्चचा गॅलिलिओशी.
इथली सुधारक मंडळी ज्या तडफेने
परिवर्तनाच्या चळवळींना चालना देण्याचा प्रयत्न करायचे, तितक्याच आसुरी उत्साहाने
त्यांच्या प्रयत्नांत खोडा घालण्यासाठी सनातनी लोक इरेला पेटायचे. पुण्यात
जगद्वंद्य समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला आणि त्यांनी पचवलेल्या
विरोधाला जगाच्या पाठीवर तोड नाही. बहुधा कर्मठांच्या या कडव्या विरोधामुळेच
सुधारकांच्या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे मोठेपण आणखी उजळून निघाले असेल. ही
बोटभर पुणेकर मंडळी ज्या प्राणपणाने समाजात पुरोगामीपण वर्धिष्णू करू पाहत होती,
त्याहून अधिक कट्टरता सनातन्यांच्या धार्मिक आचरणात होती. समाजसुधारणेसाठी पुढे
पडणारे कुठलेही पाऊल लगेच वादांची वादळे निर्माण करत असे. असे बखेडे उभे करणा-या पुणेकरांना
इतर लोकांनी दोष देण्याऐवजी त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा खास शालजोडीतला
आपल्या 'सुधारक'मधून गोपाळ गणेश आगरकरांनी मारला
आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक
इतिहासातील पहिले चहाच्या पेल्यातील वादळ निर्माण करण्याचे पितृत्व याच मंडळींकडे
जाते. या चहा प्रकरणावरून त्या वेळी सनातन्यांनी प्रचंड कोल्हेकुई केली होती. ती
इतकी की, चहाच्या पेल्यांना लावलेली तोंडं आता कुठं लपवायची असा प्रश्न हे अमृततुल्य
प्राशन करणा-यांना पडला असेल. अर्थात, मराठी भाषेला नकळतपणे असा शब्दप्रयोग बहाल
केल्याबद्दल सनातन्यांचे ऋण मानत 'जैसे
थे' स्थितीत रहायचे की इतिहासापासून धडे घेत सुधारकी बाण्याने
प्रगतीच्या दिशेने जायचे, हे ज्याच्या-त्याच्या मेंदूच्या घडणावळीवर अवलंबून आहे.
ग्रामण्य प्रकरण या नावाने ही
घटना कुख्यात आहे. ग्रामण्य म्हणजे बहिष्कृत करणे अथवा वाळीत टाकणे. युरोपियन
मिशनरी पुण्यात शिक्षणप्रसाराचं काम करत होते. गोपाळराव जोशी नामक गृहस्थाने पंचहौद
मिशनच्या शाळेतील मिशनरी शिक्षकांकरवी पुण्यातील काही लब्धप्रतिष्ठीत मंडळींना
शाळेत एका व्याख्यानाला आमंत्रित केले होते. त्याला रावबहादूर रानडे, लोकमान्य
टिळक अशा नामी असामी हजर राहिल्या. व्याख्यानानंतर सर्वांना चहा देण्यात आला. या
मंडळींनी मिशन-यांच्या हातचा चहा प्यायल्याची बातमी जोशींनी 'पुणे वैभव' नावाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून पुण्याचे
कर्मठ वातावरण ढवळून निघाले. मिशन-यांच्या हातचा चहा पिऊन धर्मभ्रष्ट झाल्यामुळे
या मंडळींना बहिष्कृत करावे, अशी सनातन्यांची मागणी होती. चहा पिण्याचे 'पातक' केलेल्या मंडळींची कागाळी थेट शंकराचार्यांपर्यंत नेण्यात आली. क्षुल्लक चहाच्या
पेल्यातून खरोखर मोठेच वादळ निर्माण झाले. शंकराचार्यांनी जानेवारी 1892मध्ये या
प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामण्य कमिशन नेमले. म्लेंच्छांच्या हातचा चहा
प्यायल्याबद्दल दोषी ठरवत या अपराधाबद्दल प्रत्येकाने वैयक्तिक प्रायश्चित्त
घ्यावे, असा निर्णय कमिशनने दिला. सनातन्यांनी उठवलेले काहूर त्यावेळी टिपेला
पोहोचले होते. तेव्हा टी पार्टीला उपस्थित असलेल्या टिळक आणि इतर सुधारकांनी
प्रायश्चित्त घेण्याचे कबूल केले. लोकनिंदेपुढे सुधारणावाद्यांचे पाय लटपटले.
त्यांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा तिथेच गळून पडला. प्रायश्चित्त घेण्याचा
पळपुटेपणा करणा-या या मंडळींची आणि ग्रामण्य प्रकरणाची आगरकरांनी 'सुधारक'मधून यथेच्छ टर उडवली आहे.
" आगगाडीतून प्रवास करताना
स्टेशनावरील ख्रिस्ती किंवा मुसलमान लोकांकडून चहाचे पेले, सोडावॉटरच्या बाटल्या
आणि गरज लागल्यास कणकेची बिस्कुटे घेणे आणि त्यांच्या योगाने तहान व भूक भागविणे
हा सामान्य प्रकार झाला आहे. अशा रितीने आचरण करणारे लोक राजरोसपणे समाजात वावरत
असून, आणि त्यांचे घरी हवे ते भिक्षुक आणि शास्त्री जेवत-खात असून त्यांच्या
वर्तनाबद्दल कोणीच शंका घेत नाही, हे आश्चर्य नव्हे काय ? " असा प्रश्न विचारत आगरकर पुढे म्हणतात, " आम्हांस तर असे वाटते की, असल्या
आचारास अधर्मी आचार म्हणावयाचे असेल, तर असला अधर्म परंपरेने ज्याच्या हातून घडला
नाही, असा एकही ब्राम्हण या देशात सापडणार नाही. खुद्द श्रीशंकराचार्य आणि त्यांचे
अनुयायी यांच्या पोटात पतितांच्या स्पर्शामुळे त्याज्य होणारे अन्नपाणी प्रतिदिवशी
जात आहे व आजपर्यंत पुष्कळ गेले आहे, असे दाखवता येईल."
स्थित्यंतर हा संस्कृतीचा स्थायीभाव असून उगीच
खोटा धर्माभिमान बाळगून जुन्या चाकोरीला चिकटून राहण्याचा अनैसर्गिक प्रयत्न
केल्यास समाजमन विकृत होत जाते, असा सज्जड इशाराही या प्रकरणाच्या निमित्ताने आगरकरांनी
शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन धुरिणांना देऊन ठेवला होता. आगरकर भलतेच दूरदृष्टीचे
ठरले. अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा, या गाजलेल्या टिळक-आगरकर वादात प्रथम
सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणा-या आगरकरांचं म्हणणं किती अचूक होतं, याचा
प्रत्यक्ष पुरावा आजूबाजूला सुरू असणा-या सामाजिक आणि धार्मिक अनागोंदीवरून मिळतोच
आहे. सामाजिक सुधारणांअभावी राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यास प्रजा असमर्थ ठरेल, अशी
आगरकरांची धारणा होती. ती खरी ठरलीय.
अंधेरीच्या
राजाच्या दर्शनासाठी स्त्रियांना ड्रेसकोड सक्तीचा केलाय. त्याच्या विरोधात एखादीच
टिकेची टिटवी टिवटिवली असेल. बाकी सा-या समाजानं ठार बहि-याचं सोंग घेतलंय. या
ड्रेसकोड प्रकरणावरून पुरोगामी महाराष्ट्रात वादळ उठेल, अशी अपेक्षा होती. पण,
सध्या वादळं घोंघावतात ती फक्त राजकीय नेत्यांच्या चहाच्या कपांमध्ये. एक दिवस
बातम्यांचा विषय बनतात आणि शमतात. अहो आगरकर ! हल्ली
चहाच्या पेल्यातली वादळं म्हणजे खरोखरीच
टिनपाट वाद !! ज्यातून सामाजिक आशय एकदम बाद !!!