Friday, May 27, 2011

यार गुलजार !




आजचा दिवस स्वतःसोबत विलक्षण ताजेपणा घेऊन आला होता. जाहिरातीत ताजमहालाच्या बॅकड्रॉपवर चहाचा कडक घोट घशाखाली उतरल्यानंतर तबल्यावर कडकडणारा झाकीर हुसेन ऐकून कसलीशी जादू व्हावी अन् अंगांगात आतूनच एक मोहोरून- फुलून- डवरून आल्याची भावना निर्माण होते ना तसं. आज वाटणारा ताजेपणा त्या कॅटेगरीतला आहे. एरवी ताजमहाल हे अतिशय उदास प्रकरण आहे. शहाजहाननं निरतिशय प्रेम केलेल्या पत्नीची ही मूर्त आठवण वास्तुशास्त्रीयदृष्ट्या कितीही भव्य असली, तरी शेवटी ते थडगंच. शहाजहान बोलूनचालून शहेनशहा ए हिंदोस्ताँ. जगातल्या अतिबलाढ्य राजसत्तांपैकी एक अशा मुघल सल्तनतीचा महामहीम कारभारी. साहजिकच त्याच्या दुःखाचा आविष्कारही तितकाच तोलामोलाचा. पातशाहीला साजेसा. आग्र्याच्या किल्ल्यात पोरानं बंदिवासात ठेवल्यानंतर तो किल्ल्याच्या गवाक्षातनं ( खिडकी म्हंटलं असतं, पण शहाजहानच्या स्थावर जंगम मालमत्तेला असं सर्वसामान्य पातळीवर आणून या प्रेमवीराची मरणोत्तरसुद्धा तौहीन करायची जुर्रत मी करणार नाहीए. धन्य धन्य ते प्रेम! बाय द वे, शहाजहानच्या जनानखान्यात फक्त दोन हजार बायका होत्या म्हणे.) ताजमहालाकडं एकटक पाहत बसायचा. प्या-या बेगमेच्या आठवणींनी विरहव्याकुळ अवस्थेत दिवस कंठले. आयुष्यातली शेवटची आठ वर्षं त्यानं आपलं हे दुःख साजरं केलं आणि शेवटी जन्नत पधारली. असा ह्या वास्तूचा अश्रुपाती इतिहास.
दुःखाचं आविष्करण कितीही भरजरी असलं, तरी ते खुपतंच. तसंही आपण संवेदनशील माणसं. ताजमहालाच्या संगमरवरी पायरीशी चार फुलं वाहून शहाजहानच्या दुःखात आपल्या सहवेदना प्रगट कराव्यात आणि त्यानंतर मागं वळूनही न पाहता तोंडात पेठा घोळवत चालू पडावं. का कोण जाणे, ताजमहाल पहायला आलेल्या अनेक नव्हाळीतल्या जोडप्यांपैकी अनेक तरुणांच्या चेह-यांवर फारच करूण भाव दिसतात. त्यामागचा कार्यकारणभाव लक्षातही येतो लगेच. अशांचे खिसे बायकोच्या शॉपिंगमध्ये कुर्बान झालेले असतात. कुठलीही शाही खिदमत खजिन्यावर ताण आणणारच. मग तो कुण्या शहाजहाननं कुण्या मुमताजला नजर केलेला पर्शियन मोत्यांचा बेशकिंमती कंठा असो अथवा कुणा संदीपच्या कुणा तेजश्रीच्या गळ्याशी सलगी करणारं नाजूकसं पेन्डन्ट. लाडेलाडे, प्रसंगी कृतककोपानं बायकोकडनं वसूलण्यात येणा-या या जिझिया कराची सक्ती कुणाला चुकलीय. तरीही, बायकोचे हट्ट न पुरवणारा नवरा नामकूल नाकाराच म्हणावा लागेल. पण, बायकांची उधळपट्टी नि त्यामुळं नव-यांची होणारी ससेहोलपट पाहिली की, ' प्रेमात मोठी किंमत चुकवावी लागते', हे दार्शनिकदृष्ट्याच काय, पण वाच्यार्थानंसुद्धा तितक्याच गांभिर्यानं घेण्याचं वाक्य आहे, हे खरोखरच पटून जातं. त्यामुळंच 'मुमताज बायको व्हावी, पण ती दुस-याची' असं त्या तरूणमंडळींचे चेहरे एकजातपणे सांगताहेत की काय, असं वाटतं.

बाय द वे ! ( हे 'बाय द वे' दुस-यांदा नि या लेखातलं शेवटचं) कुणीतरी हिंदुत्ववादी लेखक आहेत. आडनाव आठवत नाहिए. त्यांनी 'ताजमहाल नव्हे, तेजोमहाल' नामक पुस्तक लिहिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वास्तूची निर्मिती मुळातच हिंदू राजाची आहे. तिचं क्रेडिट या 'उपटसुंभ' शहाजहाननं घेतलंय. असो. तो ताजमहाल की तेजोमहाल, याची पुरातत्त्वीय थडगी उकरण्यात रस असण्याचं मला मुळीसुद्धा कारण नाहिए. पहिली गोष्ट म्हणजे, आपण सौंदर्याचे भोक्ते आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे, परिक्षेत विचारलेल्या प्रश्नाला आज्ञाधारक मुलानं सिलॅबसमधलंच उत्तर लिहावं, असा सर्वमान्य शिरस्ता आहे. त्याच न्यायानं ताजमहालचं कर्तेपण शहाजहानकडं आणि करवितेपण मुमताजकडं देण्याचा अगोचरपणा करण्यास मी धजावलो आहे. (काळ मोठा विपरीत प्राप्त जाहला. कुसळ म्हणता मुसळ बोलिताती. जाबसाल करून समेट घडवावा, तो पुंडाई माजवून डोचकी उडविताती. ये समयी कुणाचा भरवसा धरावा ? असो. आपुले आपण हिंमत राखोन असावे. )

हे आग्रा म्हंटलं की, मला ताजमहालच्याही अगोदर तिथली मिठाईच आठवते. आपोआप अर्धपारदर्शक पेठ्याची मोठ्ठीच्या मोठ्ठी चळत नजरेसमोर तरळते. जीभ चळू लागते. तो गोडमिट्ट वास नाकपुड्यांतून आत शिरतो. मनात माशा घोंघावू लागतात. तशी शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटकादेखील आठवते. पण, अगोदर पेठाच. शिवरायांनीही दुस-या कशाच्या नाही, तर मिठाईच्याच ( मोअर स्पेसिफिकली, पेठ्याच्या) पेटा-यातूनच औरंगजेबाला गुंगारा दिला होता. त्यामुळं मुघलांच्या नव्हे, मराठ्यांच्या नव्हे, तर मिठाईच्या इतिहासापासून माझं आग्राप्रेम सुरू होतं, हे एव्हाना कळलंच असेल आपल्याला.
ह्या मिठाईच्या वासानं मेंदूचा कब्जा घेतला की, इतर गोष्टींचा मला तसा विसर पडतो. पण, जगातल्या सातव्या आश्चर्याच्या बाबतीत असं व्हावं, हे आणखी मोठं आश्चर्य आहे. प्रेमाचं अत्त्युच्च प्रतीक आणि मी मारतो आहे मिठाई नि पेठ्याच्या गप्पा... क्षमस्व. त्रिवार क्षमस्व.
पण, त्या जाहिरातीत झाकीरजींच्या तबल्यातून थिरकत उठणारी कंपनं ताजमहालाचा चिरा न् चिरा व्यापून राहिलेल्या मुमताजला जिवंत करतात आणि शहाजहानच्या दुःखाची खपली भरून काढतात, हे माझं मत दिवस संपतानाही कायम आहे.

आजचा दिवस इतका तरोताजा अनुभव देणारा कसा काय होता ? तर गुलजारची एक छोटी कविता वाचण्यात आली सकाळी सकाळी. हा आजचा मावळून गेलेला दिवस त्या कवितेनं भेट म्हणून दिलाय. या दिवसातला प्रत्येक क्षण अगदी उत्फुल्लतेचा अनुभव देणारा. मूळ कविता हिंदीत आहे. तिचा हा मराठी अनुवाद तुमच्यासाठी....
रिकामा डबा आहे फक्त, चेपलेला नि उघडावाघडा
उगीचच भिंतींशी भिडतो आहे टक्कर देत

विनाकारण सडकेवर सांडल्यासारखा, पसरल्यासारखा
येणा
-या-जाणा-यांच्या ठोकरा खात लुढकून पडल्यासारखा



तसा येतोच कधी तरी एखादा रिकामा बेकार दिवस

बेरंगी, बेईमान नि बेवारशी असा दिवस...

कविता वाचली अन् सुट्टी असली तरी, आपण असं रिकाम्या डब्यासारखं काय बसलोय, असं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच.

Sunday, May 22, 2011

पाणीवाला बाबा !



मुंबईतल्यामहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात त्या दिवशी जमलेली माणसं वेगळीच होती. जिथे एरवी औपचारिक जिव्हाळा दाखवत तोंडभरबिझनेस स्माइलकेलं जातं, तिथं चक्क मोकळ्या-ढाकळ्या गप्पांचा फड रंगला होता. मुंबईतल्या महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी हे एक. इथं एरवी आर्थिक विकासाच्या आणि नियोजनाच्या चर्चा सुरू असतात. पण त्या दिवशी मात्र तिथं पैशाऐवजी पाण्यावरच गंभीर चर्चा सुरू होती आणि थेंबभर पाण्याची महती सांगायला एक सरस्वतीपुत्र थेट उत्तर प्रदेशातल्या गम्हरहून तिथे थडकला होता.

पाणीवाले बाबाया नावाने सुपरिचित राजेंद्र सिंह आदल्या दिवशी गम्हरचीगंगा परिषदआटोपून थेट मुंबईत दाखल झाले होते. गंगेच्या शुद्धीकरणासाठी गंगोत्रीपासून फराक्कापर्यंत केलेली पायपीट त्यांच्या थकलेल्या डोळ्यांतून दिसत होती. त्यांच्याशी बातचीत करायला पाण्याबद्दल-पर्यावरणाबद्दल आस्था-आपुलकी असलेले किशोरवयीन मुलं-मुली आणि बरेचसे बुढे-बुजुर्ग उपस्थित होते. प्रत्येकजण त्यांच्याशी पाण्यासंबंधी काही ना काही संवाद साधत होता आणि राजेंद्र सिंह त्यांना तेवढय़ाच उत्साहाने उत्तर देत होते. प्रवासाने शरीर थकलं होतं, पण पाण्यासंबधी बोलायला मन तेवढंच उत्सुक होतं. जणू त्यांच्यासाठी पाणी हेच जीवन!

पाण्यावरच्या गप्पा अशा रंगलेल्या असतानाच गप्पांच्या फडातूनच राजेंद्र सिंह ऊर्फपाणीवाले बाबाम्हणतात, ‘इनसे हो जाने दो, आपसे आरामसें बातें करेंगे’- मी तुफान खूष. त्यांच्याच तोंडून त्यांनी पाण्यासाठी, पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी केलेला संघर्ष ऐकायला मिळणार म्हणून!

थोडय़ाच वेळात ऐकू येतंबोलो भई..मॅगसेसे पुरस्कार विजेत्यानंफॉम्र्यालिटीठेवलीच नाही. कोचावर ऐसपैस बसत ते बोलायला सुरुवात करतात. आधी गंगा परिक्रमेचे अनुभव सांगतात. यमुना शुद्धीकरणाच्या मोहिमेमुळे दोन वर्षात दहा हजार हेक्टर जमीन प्रदूषणापासून मुक्त झाल्याची गोड बातमीही देतात. पण हा गोडवा ते आत्ता चाखत आहेत. समाजाने ठरवून दिलेली चौकट मोडू पाहणा-यांच्या वाट्याला सुरुवातीला मात्र अवहेलनाच येते. शाबासकीची थाप मिळण्याऐवजी नमनाला सणसणीत शिव्यांचे रट्टेच बसतात. तो सारा अनुभव राजेंद्रजींच्या तोंडून ऐकायला उत्सुक होतो. म्हणूनच त्यांना विचारलं, डॉक्टर झालेला तरुण पैशाच्या पाठीमागे न लागता राजस्थानातल्या रखरखीत वाळवंटात समाजसेवा करायला गेला, तेव्हा लोकांनी वेडय़ात नाही काढलं?

थोडी-थोडकी नाही, तब्बल चार र्वष लोकांनी वेडा समजून माझ्याकडं दुर्लक्ष केलं’, असं सांगून राजेंद्र सिंह हसतात नि म्हणतात, ‘महाराष्ट्राचं सरकार असो, राजस्थानचं असो किंवा केंद्राचं! दुष्काळ आणि पुरासारखी आपत्ती येते, तेव्हा बेशरमपणे सरकारं सांगून मोकळी होतात की, हा वातावरण बदलाचा परिणाम आहे. मागल्या वर्षी ढगफुटीमुळे आमच्या राजस्थानात बारमेरला पूर आला होता. तर चवताळलेल्या कोसीनं तिकडं बिहारी जनतेला रडवलं. बारमेरच्या वेळी त्यांची कातडी बचावली. पण कोसीचा पूर हा मानवी चुकीमुळेच उद्भवला होता, हे आम्ही सरकारला कबूल करायला लावलं.

ग्लोबल वॉर्मिग हा जागतिक मुद्दा आहे. त्याचाच फायदा घेऊन प्रत्येक सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतं. भारत म्हणतो, अमेरिकाक्योटो प्रोटोकॉलवर सही करण्यास तयार नसल्याने अशा आपत्ती ओढवतात. तर अमेरिका बाकीच्यांना हिंग लावून विचारत नाही. मोठ्या गोष्टींची जबाबदारी कुणा एकावरच टाकता येत नाही. ग्लोबल वॉर्मिगदेखील इतकीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळंच सगळे देश हात वर करून मोकळे होतात. मला असं वाटतं की, छोट्या उपायांनी हे संकट दूर करता येईल. सगळेच प्रश्न सुटतील, असं नाही. पण ब-याच गोष्टींवर मार्ग तरी निघेल.ग्लोबलप्रश्नलोकल अ‍ॅटिट्यूडने सोडवायचा प्रयत्न तरी करू या. राजस्थानात ते आम्ही सिद्धही करून दाखवलंय.

राजेंद्र सिंह यांच्याभगीरथप्रयत्नांमुळे राजस्थान आता पुन्हापाणीदार झालं आहे. पण मुळात राजस्थानवर पाणीपाणी करत फिरण्याची पाळी का आली? याचं कारण सांगताना राजेंद्र सिंह म्हणतात,‘स्वातंत्र्यानंतर खायला अन्न नव्हतं. त्यामुळे सिंचनाच्या माध्यमातून धान्याचं उत्पादन वाढवायचे प्रयत्न झाले. सिंचन वाढलं, तर उत्पादन वाढेल, असा वैज्ञानिकांचा सरधोपट समज होता. हे समीकरण सा-यांनीच केलं होतं. पण ते चुकलं. कारण, जमिनीचा पोत न पाहताच त्यांनी सरसकट सगळीकडे सिंचनाची सोय करायची ठरवलं. पण ते कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध करून द्यायचं, याचा आराखडा त्यांच्याकडे नव्हता. प्रत्येक राज्याला भरमसाट सबसिडी मिळाली. राजस्थानच्या वाट्याला सगळ्यात जास्त आली. त्या पैशातून पहिल्यांदा आम्ही विहिरी खोदल्या.

इतक्या खोदल्या की, सा-या विहिरींचं पाणीच आटून गेलं. कारण, आमच्या जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच मर्यादित होती. मग आम्ही विंधन विहिरींकडे वळलो. तीनशे मीटपर्यंतचं पाणी उपसलं. त्याही कोरड्याठक्क पडल्या. शेवटचा उपाय म्हणून हातपंप घेतले. पंधरा वर्षात जमिनीतलं सारं पाणी आम्ही संपवून टाकलं. तोपर्यंत सबसिडीचेही पैसे संपले आणि गावक-यांकडलेही! प्यायलाच पाणी मिळेना, तिथं शेतीला कुठून देणार? त्याचा फटका बसला, तो इथल्या तरुणांना! पोट भरण्यासाठी सारे अहमदाबाद, सुरत, दिल्ली, मुंबईला पांगले. पाणी संपल्याने लाचारी, बेकारी आणि रोगराई राजस्थानातल्या गावा-गावांत एकापाठोपाठ वसतीला आली. जमिनीची क्षमता लक्षात न घेताच आंधळेपणाने सिंचन योजना राबवल्याने आमच्यावर इतरांकडे तोंड वेंगाडण्याची वेळ आली. जमिनी पाण्यानंरिचार्जकरायचं सोडून आम्ही त्यांनाओव्हर डिस्चार्जकेलं, त्याचं हे फळ होतं. या परिसरातून बाराही महिने वाहणा-या नदीचं पात्र त्यामुळं कोरडं पडलं. पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली.

अशा परिस्थितीत १९८४मध्येतरुण भारत संघाची एक ग्रुप पाण्यासंबंधी कार्य करण्यासाठी राजस्थानातील अलवार भागात गेला. आश्चर्य म्हणजे त्या वेळी त्या साऱ्यांमध्ये पाण्याविषयी सर्वात कमी माहिती असलेले राजेंद्र सिंह एकटेच होते. त्यावेळी आपलं वैद्यकीय ज्ञान तिथल्या गरीबांसाठी वापरायचं, एवढी एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात पक्की होती. पाण्याबिण्याविषयी त्यांनी तेव्हा काहीही विचार केला नव्हता. गोपालपुरा गावात त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांची हा खटपट सत्तर उन्हाळ्यांनी रापलेले एक म्हातारबाबा पाहत होते. त्यांनी एक दिवस राजेंद्र सिंह यांना विचारलं, ‘का रे बाबा! तू या गावातल्या पोरा-सोरांना शिकवून कशाला तुझ्यासारखं बिघडवतोयस?’

म्हातारबाबाच्या त्या प्रश्नाने मी उडालोच. म्हटलं, क्या बोलरिया मामू तू? मी नाही का, शिकून-सवरून तुमच्यासाठी काम करायला आलो? पण यावर त्या मामूने दिलेलं उत्तर मार्मिक होतं. डॉक्टरकी बंद करण्याचा सल्ला देऊन तो म्हातारबाबा मला म्हणाला, ‘तू तो पाग्गल है, अपनी बाता मत कर. असं काम कर, जे पैशाने होत नाही. नोकरीसाठी घरदार सोडून गेलेल्या मुलांना परत कसं बोलावता येईल, ते बघ. तू पाणी आणण्यासाठी काही तरी कर. जेव्हा इथल्या शेतीला पाणी मिळेल, तेव्हा आमच्या पोरांना शिकताही येईल आणि औषधंही खरेदी करता येतील. सगळेच सुखी होतील.हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. त्या अडाणी माणसाने असं मला प्रश्नाचं मूळ दाखवलं. तिथून पुढं मी पाण्यासाठी काम सुरू केलं. उघडी-बोडकी बंजर जमीन. गावातलेच चार-पाच म्हातारे आणि दोन-एक तरुण यांना जोडीला घेऊन आमचं काम सुरू झालं. टिकाव-फावडं घेऊन आम्ही गोपालपु-यांत जोहड बांधायचं काम सुरू केलं. तोपर्यंत मी गावक-यांच्या नजरेतरिजेक्टेडहोतो. शिकून बहकलेला माणूस त्यांच्या दृष्टीने निरुपयोगी असतो. गावात काय याचं गठुडं ठेवलंय. तो शहरात जाऊन पैका मिळवणार, अशीच त्यांची ठाम समजूत असते. पण त्यांच्याबरोबर मीदेखील दहा-बारा तास मातीत काम करायला लागलो. त्यांची नजर बदलली.रिजेक्टेडपासूनसिलेक्टेडपर्यंतचा माझा प्रवास असा झाला.’- हसत-हसत राजेंद्र सिंहजी सांगतात.

त्यानंतर राजेंद्र सिंह व त्यांच्या सहका-यांनी चार र्वष घेतलेली मेहनत फळाला आली. अडवलेलं पाणी विहिरींत उतरलं. शेतात पिकं घेतली गेली. राजेंद्र सिंह म्हणतात,‘आम्ही राजस्थानी लोकफंक्शन ओरिएंटेड’! हे यश साजरं करायला गावक-यांनी त्यांच्या पस्तीस गावांतल्या सोय-यांना आवतण पाठवलं. आले फक्त साठ लोक. जेव्हा गरीब बोलावतो, तेव्हा त्याच्याकडे कुणीच जात नाही. आमचंही तसंच झालं. या साठ जणांकडून कौतुक करायचं लांबच राहिलं. हे काम याने का केलं, म्हणून ते गावक-यांबरोबर हमरीतुमरीवर आले. म्हणायला लागले, ‘ये काम राजिंदर का नही च्छे, कलेक्टर साला! जो तीस हज्जार रुपै महिना खावे च्छे, ये ऊ का काम छे. राजिंदर ये गलत करे च्छे.तेव्हा ज्या म्हातारबुवांनी चार वर्षापूर्वी मला पाण्याचं काम करायला सांगितलं होतं, ते सोय-यांना शांत करण्यासाठी भाषण देण्यास उठले. खणखणीत आवाजात गोंधळ शांत करत म्हणाले, ‘ज्यांना आमचं काम आवडलं, त्यांनी ते आपल्या गावात सुरू करावं. ज्यांना पसंत पडलं नाही, वो दलिया खाव और घर जाव. बेकार का बाता मत करो.मग सारेच शांत झाले. रात्री दोन वाजता बैठक संपली. बैठकीच्या शेवटी जो निर्णय झाला, त्याने मलापाणीवाला बाबाबनवलं. या सा-या पस्तीस गावांमध्येतरुण भारत संघाचं काम सुरू झालं. एक अरवारी कोरडी पडली होती. अशा सात नद्या आम्ही पुन्हा वाहात्या केल्या. तेही वर्षातले बारा महिने. पाण्याचा थेंबन् थेंब अडवण्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास केला. गोपालपु-याप्रमाणेच ही गावंही सुजलाम झाली. त्यानंतर अकराशे गावांमध्ये आमचं काम विस्तारलं. पाणी वाफेत दवडणंही आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणून तलावांच्या कडेला झाडं लावली. साडेसहा हजार चौरस किलोमीटरचा परिसर आम्ही ओलिताखाली आणला. एक काळ असा होता, की आमची एकही मुलगी शाळेत जात नव्हती. आता एकही गाव असं नाही की, जिथं मुली शाळेत जात नाहीत. गो-या मंडळींना आपल्यालाजेण्डर सेन्सिटिव्हिटी’, ‘जेण्डर इक्विटीशिकवण्याचा हक्क नाही. ती मंडळी हे विसरतात की, त्यांनी महिलांना मतदानाचा हक्क द्यायला १९६४पर्यंत वाट पाहायला लावली. इथं तर शिव आणि पार्वती अर्धनारीनटेश्वराच्या रूपात हजारो वर्षापासून आम्ही पाहतोय. महिलांची पाण्यासाठीची वणवण थांबवून आम्ही हेच साध्य केलंय.

पाणीवाला बाबांनी केलेली ही किमया आता सारा देश बघतोय. जिथून तिथून त्यांना यासाबंधी व्याख्यानं देण्यासाठी आमंत्रणं येत आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्यावर दुसरीकडून टीकाही सुरू आहे. विशेषत: केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाविरोधात असलेली त्यांची भूमिका तर अनेक विचारवंतांना अजूनही समजत नाही. पण ते आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत. नदीजोडणी निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याचा पुनरुच्चार करताना ते म्हणतात, ‘कृत्रिम पद्धतीने गंगा-ब्रह्मपुत्रेला कृष्णा-कावेरीशी जोडण्यापेक्षा माणसांनाच नद्यांशी जोडा. नद्यांचे प्रश्न मानवनिर्मित आहेत. त्यामुळे काठावरच्या माणसांनीच नदीची काळजी घ्यायला सुरुवात करावी. त्यांना पाणी अजिबात कमी पडणार नाही. शेतीसाठीही पुरेसे पाणी मिळेल आणि प्रदूषणही होणार नाही.

वाळवंटात पाणी फिरवण्यासाठी राजेंद्र सिंहांनी प्रयत्न केले. ते यशस्वी झाले. त्यांना मॅगसेसे अ‍ॅवॉर्ड मिळालं. काम आणखी जोमानं सुरू झालं. पण राजस्थान सरकारनं त्यांना फुटक्या कवडीचीही मदत केली नाही. उलट भैरोसिंह शेखावत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या भागातल्या तलावांमध्ये मासेमारीचे ठेके गावक-यांना न विचारताच देऊन टाकले. आपण साठवलेल्या पाण्यावर डल्ला मारायला हे सरकार मधूनच कसं उपटलं, या प्रश्नाने गावकरी संतापले. राजेंद्र सिंहांच्या नेतृत्वाखाली ही गावं एकवटली. सरकारनं निर्णय मागं घेतला. सरकारच्या कृतघ्नतेचं वैषम्य त्यांच्या मनात अजूनही ताजं असावं. ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे, त्यांनातरुण भारत संघाच्या जल विद्यापीठामध्ये प्रवेश न देण्याचा कायदाही त्यांनी याच भावनेतून केला असावा. साहजिकच आहे.राज्यसंस्था जेवढी बळकट, तेवढी ती संवेदनाहीन असते’, याचा कडवट प्रत्यय त्यांनी या सव्वीस वर्षामध्ये प्रत्येक वेळी घेतलाय. त्यामुळे परिवर्तन समाजाकडूनच घडेल, हाच विश्वास त्यांना काम करण्यासाठी हत्तीचं बळ देत असावा।

२० जून २००९

Wednesday, May 18, 2011

वळवाअगोदरचा पाऊस...!





चिंचपोकळीतून लालबागमध्ये उतरणा-या आर्थर ब्रिजच्या फुटपाथवर पाच कुटुंबं वस्तीला आहेत. मुंबईत आलो, तेव्हापासून मी त्यांना पाहतो आहे. त्यांच्यातल्या तीन कुटुंबांतल्या माणसांची संख्या सांगता नाही येणार, पण मोठं लेंढार आहे. तिथं विटांच्या तीन चुली दिसतात, म्हणून कुटुंबांची संख्या तीन असल्याचा अंदाज. ही तिन्ही कुटुंबं एकाच गणगोतावळ्यातली असावीत. त्यांच्यातल्या बाया-बाप्ये-पोरं सकाळी लवकर गायब होतात. रात्री सगळे फूटपाथच्या आश्रयाला असतात. कधीमधी ऑफिसवरून घरी परतताना मध्यरात्र होते, तेव्हा रांगेनं पंधरा-वीस जण पांघरुणाशिवाय झोपलेले दिसतात. पण, एरवी घरातून बाहेर पडण्याच्या आणि येण्याच्या माझ्या वेळा ठरलेल्या असतात. त्यावेळी तिथं तिघी जणी कायम दिसतात. जबरी भाजल्यामुळं छातीवर पांढरट काळ्या रंगाच्या जखमांच्या गुठळ्या वागवणारी फुलाफुलांच्या निळ्या मॅक्सीतली पंचेचाळिशीतली बाई, तिची म्हातारी आई आणि एक उफाड्याची काळेली पोरगी यांना मी कायम तिथं पाहतो. ही सारी मंडळी रांगोळी तयार करण्याचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांना काही मिळत नाही. रांगोळीचा भाव सध्या किलोमागं पाच रुपये आहे. पण, तरीही जगण्यासाठी गरजवंताला काहीतरी करावंच लागतं. हे रांगोळी तयार करतात. उन्हात चमचमणा-या विविधरंगी रांगोळीच्या ढिगा-यांनी तो फूटपाथ कायमच सजलेला असतो. ती तीन कुटुंबं फूटपाथचा जवळपास पंधरा ते वीस फूट भाग आपल्या संसारासाठी वापरतात. बाकीच्या दोन कुटुंबांनी मध्ये दोन-अडीच फुटांची जागा सोडून त्यांना शेजार दिला आहे. साधूसारखी दाढी वाढवलेला आणि चेह-यावर नि:संगपणाचे भाव वागवत आडवा पहुडलेला म्हातारा आणि त्याच्या उशाशी बसून तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहणारी त्याची म्हातारी, त्यांच्या पलीकडं एक वाळकु़ड्या अंगाची विधवा आणि तिची टुमटुमीत गाय.

ब्रिजला लगटून वाढलेल्या उंबरानं या दोन कुटुंबांवर कायम सावली धरलेली दिसते. तसा ह्या उंबराच्या सावलीचा पसारा मोठा आहे. जाता-येता अनेक जण विधवेकडनं चारा, नाही तर पेंडीपासून बनवलेला मोठ्ठा लाडू विकत घेतात आणि तिच्याच गायीला खाऊ घालतात. तेहेतीस कोटी देव जिच्या पोटात साठवलेत, तिला खाऊ घातल्यानं स्वर्गात जाण्याइतपत पुण्य जमा होतं, अशी हिंदू धर्मात पूर्वापार समजूत आहे. पुण्य कमावण्यासाठी गायीला पौष्टिक रतिबाकरिता पैसे खर्चणारे कधीमधी तिच्या पोट खपाटीला गेलेल्या मालकिणीलाही एखादा रुपया देतात. आयुष्याच्या अंत:काळी उघड्यावर येऊन पडावे लागलेल्या आपल्या देहावर सावली धरणा-या झाडाविषयीचा अपार कृतज्ञभाव त्या साधुसदृश म्हातारबाबांच्या चेह-यावर झळकताना दिसतो. कारण, पहावं तेव्हा त्यांची नजर झाडाकडेच असते. म्हातारी बहुदा त्यांना उघड्यावर आणून टाकणा-या आपल्या पोरा-पोरींना शिव्या घालते. पण, म्हातारपणामुळं तोंडाचा जोर ओसरून जातो. त्यामुळे त्या पुटपुटल्यासारख्या ओठांवर येतात. तसंही जरी त्या मोठ्यानं दिल्याच, तर ज्याला आणि ज्यांना त्या ऐकवायच्यात, तो आणि ते तिथं नसतो आणि नसतात. इतरांना त्या ऐकायला वेळ नसतो.

त्या तीन कुटुंबांनी उंबराच्या सावलीच्या मोहानं आपली जागा कधी बदलली नाही. उलट, त्यांच्या ताटातलंच थोडंसं म्हातारा-म्हातारीच्या पुढ्यात ठेवलेलं दिसतं. तसंच, तिथल्या धष्टपुष्ट गायीला खायला घालून पुण्य मिळवण्याचंही त्यांच्या मनात आलेलं मला पहायला मिळालेलं नाही. तिन्ही कुटुंबांचे सारेच व्यवहार रखरखीत ऊन्हात, नाही तर काळ्यामिट्ट् अंधारात. वर्षातले आठ महिने ह्या सा-यांचा मुक्काम ह्याच फूटपाथवर असतो. शेजारून तुफान वेगानं गाड्यांची आवक-जावक सुरू असते. त्यामुळं सलमान खान अथवा संजीव नंदाछाप चालकांनी फुटपाथवरल्या या रहिवाशांशी सलगी करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी महापालिकेनं फुटपाथला भरभक्कम लोखंडी कठडे बसवले आहेत. पूल उतरला की, डाव्या हाताला सार्वजनिक शौचालय आहे. तिथं हागून आलं की, बाकीचे सगळे व्यवहार फुटपाथवरच उरकायचे. आंघोळीचं ते फारसं मनावर घेत नाहीत. दर आठ-दहा दिवसांनी ओलेत्या अंगाची पोरं, केस सुकवत बसलेल्या बायका अथवा ब्रिजच्या दगडांवर वाळत घातलेली कपडे यापैकी एखादं दृष्य दिसतं. तो त्यांच्या सामूहिक आंघोळीचा दिवस असतो. पंधरा-वीस जणांच्या कबिल्याला रोज दोन-तीन बॅरल पाणी आंघोळीसाठी आणणं त्यांना नामंजूर आहे. छोट्या पोरींच्या आंघोळी उरकल्यानंतर त्यांच्या डोक्यातल्या उवा काढायचा कार्यक्रम पार पडतो. ब्रिजच्या कठड्याला टेकवून ठेवलेल्या दहा-बारा प्लास्टीकच्या कॅरीबॅग्ज आणि तीन-चार डबे. दोन-तीन ताटं. भीक मागून आणलेलं वैविध्यपूर्ण चवी आणि वासांचं जेवण. काही वेळा चूल पेटवून बिनमसाल्याची भाजी. एकदा शिजवलेले बटाटे बकाबका खातानाही मी एका बाईला पाह्यलंय. छोटी पोरं-पोरी कालवा करत एकाच ताटात जेवायला बसतात. मग जो तो आपापल्या कामाला पांगतो. ती जळकी बाई, तिची म्हातारी आई आणि ती काळी पोरगी तिथंच सांडलेल्या असतात.

तर त्यांचं असं राहणं आणि त्यांचा त्या फुटपाथवरला हक्काचा वावर जवळपास सगळ्यांच्याच अंगवळणी पडलाय. भिंती नसलेलं त्यांचं हक्काचं घर. तशी दिवसा ही मंडळी शहाणपणानं घराच्या भिंती आक्रसून घेतात. फुटपाथवरून लोकांना जायला- यायला जागा सोडतात. पण, जवळपास कुणीही तिथनं जात नाहीच. तसं काही जण फुटपाथ अडवल्याबद्दल त्यांचा राग-राग करतात. पण, म्हणून कुणीही त्यांना तिथून हटकत नाही. फुटपाथवर उभारलेल्या त्या अदृष्य घरांमध्ये राहणा-यांचा निवा-याचा हक्क इतरांनी मान्य केलेला आहे आणि आमंत्रण नसताना दुस-यांच्या घरी जाऊ नये, याचे संस्कार लोकांवर झालेले असतातच. त्या आपसूक शहाणपणातनंच त्या अदृष्य़ घरांच्या अदृष्य उंब-यांबाहेरूनच बाकीचे ये-जा करतात.

पण, जूनच्या पंधरवड्यात फूटपाथ एकदम मोकळा-मोकळा दिसू लागतो. एरवी तिथल्या माणसांच्या रुपानं जिवंतपणाच्या खुणा अंगावर वागवणारा फूटपाथ आता अचेत दगडासारखा कोरडा दिसू लागतो. पाण्याचे ओघळ तिथून वाहतात. पण, हा फूटपाथ ती ओल काही आपल्या अंगाला लागू देण्याचे मनावर घेत नाही. जवळपास चार महिने या चित्रात बदल होत नाही. पण, ती कुटुंबं त्यांच्या ठरलेल्या वेळी फुटपाथवर परत रहायला येतातच. लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर महिनाभरानं आपल्या या बिनभिंतींच्या घरात प्रवेश करणा-या कुटुंबांची चहल-पहल फुटपाथला भारून टाकते. गोष्टीत कावळ्यांनी बांधलेली शेणाची घरं पावसात वाहून जातात. त्यांना आसरा घ्यायला इमारतीचा एखादा कोनाडा पुरतो. पाच-साडेपाच फूट लांबीची ही फुटपाथवरची माणसं आणि त्यांची पोरंबाळं कुठं जात असतील ?

परवा चार-दोन थेंब बरसले. लवकरच वळीव झोडपून काढील.

मळभ अंगावर लोटू पाहणारे ढग आता आकाशाच्या सवयीचं झालेत आणि त्याबरोबर येणारी उदास बेचैनी माझ्या...

पावसाळा येतोय...

Sunday, May 8, 2011

वित्तपीठाचा जगद्गुरू..!


‘सब प्राईम’मुळं अमेरिकन अर्थव्यवस्था जेव्हा मंदीच्या राक्षसी अरिष्टात अडकली होती, तेव्हा वॉरेन बफेंच्या वृत्तपत्रांतून छापून येणाऱ्या अथवा टीव्हीवरून प्रसारित होणा-या मुलाखती अमेरिकन जनता भक्तिभावानं वाचत- ऐकत होती। प्रापंचिक कटकटींनी कावलेले आपल्याकडचे संसारी जीव मोठय़ा तल्लीनतेनं बाबा-बुवाचं प्रवचन कानांत प्राण आणून साठवतात तसं. शेअर बाजाराच्या भजनी लागलेल्या विशिष्ट जागतिक समुदायाच्या लेखी वॉरेन बफेचं स्थानही तेच आहे.



टाईम इज मनीया वाक्प्रचारामागचं इंगित कळल्याप्रमाणं तोच वाक्प्रचार आयुष्याच्या सूत्रस्थानी मानून कुबेर बनलेली वॉरन बफे ही जगाच्या इतिहासातली एकमेव व्यक्ती. टाइम इज मनी’, हे तर खरंच! पण, योग्य वेळ ही जरा अधिकचा पैसा मिळवून देणारी असते. असा मोका बघून चौका मारत संपत्ती कमावलेला बफेंइतका संधिसाधूगुंतवणूकदार दुसरा कुणी नाही. एखाद-दुस-या वर्षाचा अपवाद वगळता बिल गेट्स फोब्र्जच्या यादीत कायम श्रीमंतांच्या पंगतीत मानाचं पहिलं स्थान पटकावून बसलेला आहे आणि गेट्सच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पाटावर वॉरन बफेदेखील आहेतच. सदोदित वर-खाली होणाऱ्या शेअर बाजाराच्या स्पंदनांचा अचूक ठाव घेणारे. म्हणूनच ते जगातल्या तमाम गुंतवणूकदारांचा आदर्श आहेत. सब प्राइममुळं अमेरिकी अर्थव्यवस्था जेव्हा मंदीच्या राक्षसी अरिष्टात होती, तेव्हा वॉरेन बफेंच्या मुलाखती अमेरिकन जनता वृत्तपत्रांत वा टीव्हीवरून भक्तिभावानं वाचत- ऐकत होती. प्रापंचिक कटकटींनी कावलेले आपल्याकडचे संसारी जीव मोठय़ा तल्लीनतेनं बाबा-बुवाचं प्रवचन कानांत प्राण आणून साठवतात तसं. शेअर बाजाराच्या भजनी लागलेल्या विशिष्ट जागतिक समुदायाच्या लेखी वॉरेन बफेचं स्थानही तेच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेनं निर्मिलेल्या वित्तपीठाचे जगद्गुरू. अर्थव्यवस्थेची नाडी ओळखून रोगाचा अक्सीर इलाज सांगणारा वा पुढं चालून जे खरंच ठरेल, असं भाकीत वर्तवणारा.

वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांनी कोक विकून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. कोकच्या प्रत्येक बाटलीमागे त्यांना एक निकेल फायदा मिळायचा. एक अमेरिकन निकेल म्हणजे पाच सेंट. वडील यशस्वी उद्योजक आणि राजकारणी असल्यामुळे घरची काही ददात नव्हती. पण, व्यवसाय करण्याचा कीडा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अकराव्या वर्षी बफेंनी एका कंपनीचे तीन शेअर्स 38 डॉलर्सना विकत घेतले. त्यांची किंमत घसरून 27 डॉलरवर आली. ते घाबरले. पण, संयम ठेवत शेअर वर चढेपर्यंत वाट पाहिली. 40 डॉलपर्यंत शेअरचा भाव वधारल्यानंतर ते झटकन विकून वॉरेन मोकळे झाले. पण, तेवढय़ात त्या शेअर्सनी थेट 200 डॉलर्सवर झेप घेतली होती. पस्तावलेले वॉरेन एक धडा शिकले. योग्य वेळ आल्याशिवाय शेअरच्या खरेदी अथवा विक्रीत घाई-गडबड करायची नाही. आपल्याला जे काही करायचंय, ते याच क्षेत्रात, याची लख्ख जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली होती. त्यामुळे त्या काळचा विख्यात गुंतवणूक गुरू आणि इंटलिजंट इन्व्हेस्टरचा लेखक बेंजामिन ग्रॅहम जिथं शिकवायचा, त्या कोलंबिया विद्यापीठात ते उच्च शिक्षणासाठी दाखल झाले.

ग्रॅहमच्या विचारांनी काही काळ त्यांना फारच प्रभावित केलं होतं. पण, ग्रॅहमचे शेअर खरेदी-विक्रीबाबतचे दृष्टिकोन फारच पारंपरिक होते. म्हणजे, सध्याच्या परिस्थितीत खरेदी करण्यास धोकादायक, परंतु भविष्यात नफ्याची शक्यता दाट असलेल्या शेअरकडे तो लक्षच द्यायचा नाही. तसंच, शेअरचे भाव चढले की, तात्काळ भांडवल आणि नफा मोकळा करून घ्यायचा. शेअरची संख्या वाढवत नेऊन एखाद्या कंपनीची मालकी हस्तगत करण्याचा तो विचारही करू शकत नव्हता. थोडक्यात, म्हैस दूध देतेय ना. मग, ती जाफराबादी आहे की पंढरपुरी, याचा विचार करायचं कारण नाही, असा त्याचा खाक्या होता.

त्याच्या विचारांप्रमाणं बफेंनी काही काळ काम केलंदेखील. पण, नंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचं सूत्र बदललं. तोटय़ाच्या गर्तेत चाललेल्या, पण चांगले भवितव्य असलेल्या कंपन्यांचे शेअर पडेल किंमतीत विकत घेणे, कंपन्यांचे विलिनीकरण अथवा मालकीबदलासारख्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून शेअर बाजारात खेळी करणे, एखाद्या कंपनीतील शेअर्सची संख्या वाढवून नंतर तिच्यावर ताबा मिळवणे या त्रिसूत्रीतून त्यानं आपली बर्कशायर हॅथवेही जगातील एक बलाढय़ कंपनी बनवली. या कंपनीकडे कोकाकोलासारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सपासून वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रथितयश वृत्तपत्रापर्यंत तब्बल 70 कंपन्यांची मालकी आहे. आजमितीस बफे 44 बिलियन डॉलरचा धनी आहे. पण, यापैकी सुमारे 99 टक्के संपत्ती वेगवेगळ्या सामाजिक कार्याना दान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय.

अर्थातच, त्यापैकी बराचसा वाटा बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि स्वत:च्या पोरांच्या सामाजिक संस्थेला मिळणार आहे. सध्या भारतभेटीवर असलेले बफे विमा व्यवसायात त्यांच्या कंपनीला असलेल्या संधी चाचपडण्यासाठी आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश भारतीय नवकोट नारायणांना समाजकार्यासाठी प्रवृत्त करण्याचाही आहे. पत्नीसाठी महागडं जेट अथवा आलिशान क्रूझ खरेदी करणा-या या उद्योजकांना ज्या समाजातून आपण आलो आहोत, त्याचं आपण काही देणं लागतो’, याचं भान आणून देण्यासाठी बफेंइतकी दुसरी योग्य व्यक्ती कोण असू शकेल?