Wednesday, May 18, 2011

वळवाअगोदरचा पाऊस...!





चिंचपोकळीतून लालबागमध्ये उतरणा-या आर्थर ब्रिजच्या फुटपाथवर पाच कुटुंबं वस्तीला आहेत. मुंबईत आलो, तेव्हापासून मी त्यांना पाहतो आहे. त्यांच्यातल्या तीन कुटुंबांतल्या माणसांची संख्या सांगता नाही येणार, पण मोठं लेंढार आहे. तिथं विटांच्या तीन चुली दिसतात, म्हणून कुटुंबांची संख्या तीन असल्याचा अंदाज. ही तिन्ही कुटुंबं एकाच गणगोतावळ्यातली असावीत. त्यांच्यातल्या बाया-बाप्ये-पोरं सकाळी लवकर गायब होतात. रात्री सगळे फूटपाथच्या आश्रयाला असतात. कधीमधी ऑफिसवरून घरी परतताना मध्यरात्र होते, तेव्हा रांगेनं पंधरा-वीस जण पांघरुणाशिवाय झोपलेले दिसतात. पण, एरवी घरातून बाहेर पडण्याच्या आणि येण्याच्या माझ्या वेळा ठरलेल्या असतात. त्यावेळी तिथं तिघी जणी कायम दिसतात. जबरी भाजल्यामुळं छातीवर पांढरट काळ्या रंगाच्या जखमांच्या गुठळ्या वागवणारी फुलाफुलांच्या निळ्या मॅक्सीतली पंचेचाळिशीतली बाई, तिची म्हातारी आई आणि एक उफाड्याची काळेली पोरगी यांना मी कायम तिथं पाहतो. ही सारी मंडळी रांगोळी तयार करण्याचा व्यवसाय करतात. त्यातून त्यांना काही मिळत नाही. रांगोळीचा भाव सध्या किलोमागं पाच रुपये आहे. पण, तरीही जगण्यासाठी गरजवंताला काहीतरी करावंच लागतं. हे रांगोळी तयार करतात. उन्हात चमचमणा-या विविधरंगी रांगोळीच्या ढिगा-यांनी तो फूटपाथ कायमच सजलेला असतो. ती तीन कुटुंबं फूटपाथचा जवळपास पंधरा ते वीस फूट भाग आपल्या संसारासाठी वापरतात. बाकीच्या दोन कुटुंबांनी मध्ये दोन-अडीच फुटांची जागा सोडून त्यांना शेजार दिला आहे. साधूसारखी दाढी वाढवलेला आणि चेह-यावर नि:संगपणाचे भाव वागवत आडवा पहुडलेला म्हातारा आणि त्याच्या उशाशी बसून तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहणारी त्याची म्हातारी, त्यांच्या पलीकडं एक वाळकु़ड्या अंगाची विधवा आणि तिची टुमटुमीत गाय.

ब्रिजला लगटून वाढलेल्या उंबरानं या दोन कुटुंबांवर कायम सावली धरलेली दिसते. तसा ह्या उंबराच्या सावलीचा पसारा मोठा आहे. जाता-येता अनेक जण विधवेकडनं चारा, नाही तर पेंडीपासून बनवलेला मोठ्ठा लाडू विकत घेतात आणि तिच्याच गायीला खाऊ घालतात. तेहेतीस कोटी देव जिच्या पोटात साठवलेत, तिला खाऊ घातल्यानं स्वर्गात जाण्याइतपत पुण्य जमा होतं, अशी हिंदू धर्मात पूर्वापार समजूत आहे. पुण्य कमावण्यासाठी गायीला पौष्टिक रतिबाकरिता पैसे खर्चणारे कधीमधी तिच्या पोट खपाटीला गेलेल्या मालकिणीलाही एखादा रुपया देतात. आयुष्याच्या अंत:काळी उघड्यावर येऊन पडावे लागलेल्या आपल्या देहावर सावली धरणा-या झाडाविषयीचा अपार कृतज्ञभाव त्या साधुसदृश म्हातारबाबांच्या चेह-यावर झळकताना दिसतो. कारण, पहावं तेव्हा त्यांची नजर झाडाकडेच असते. म्हातारी बहुदा त्यांना उघड्यावर आणून टाकणा-या आपल्या पोरा-पोरींना शिव्या घालते. पण, म्हातारपणामुळं तोंडाचा जोर ओसरून जातो. त्यामुळे त्या पुटपुटल्यासारख्या ओठांवर येतात. तसंही जरी त्या मोठ्यानं दिल्याच, तर ज्याला आणि ज्यांना त्या ऐकवायच्यात, तो आणि ते तिथं नसतो आणि नसतात. इतरांना त्या ऐकायला वेळ नसतो.

त्या तीन कुटुंबांनी उंबराच्या सावलीच्या मोहानं आपली जागा कधी बदलली नाही. उलट, त्यांच्या ताटातलंच थोडंसं म्हातारा-म्हातारीच्या पुढ्यात ठेवलेलं दिसतं. तसंच, तिथल्या धष्टपुष्ट गायीला खायला घालून पुण्य मिळवण्याचंही त्यांच्या मनात आलेलं मला पहायला मिळालेलं नाही. तिन्ही कुटुंबांचे सारेच व्यवहार रखरखीत ऊन्हात, नाही तर काळ्यामिट्ट् अंधारात. वर्षातले आठ महिने ह्या सा-यांचा मुक्काम ह्याच फूटपाथवर असतो. शेजारून तुफान वेगानं गाड्यांची आवक-जावक सुरू असते. त्यामुळं सलमान खान अथवा संजीव नंदाछाप चालकांनी फुटपाथवरल्या या रहिवाशांशी सलगी करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी महापालिकेनं फुटपाथला भरभक्कम लोखंडी कठडे बसवले आहेत. पूल उतरला की, डाव्या हाताला सार्वजनिक शौचालय आहे. तिथं हागून आलं की, बाकीचे सगळे व्यवहार फुटपाथवरच उरकायचे. आंघोळीचं ते फारसं मनावर घेत नाहीत. दर आठ-दहा दिवसांनी ओलेत्या अंगाची पोरं, केस सुकवत बसलेल्या बायका अथवा ब्रिजच्या दगडांवर वाळत घातलेली कपडे यापैकी एखादं दृष्य दिसतं. तो त्यांच्या सामूहिक आंघोळीचा दिवस असतो. पंधरा-वीस जणांच्या कबिल्याला रोज दोन-तीन बॅरल पाणी आंघोळीसाठी आणणं त्यांना नामंजूर आहे. छोट्या पोरींच्या आंघोळी उरकल्यानंतर त्यांच्या डोक्यातल्या उवा काढायचा कार्यक्रम पार पडतो. ब्रिजच्या कठड्याला टेकवून ठेवलेल्या दहा-बारा प्लास्टीकच्या कॅरीबॅग्ज आणि तीन-चार डबे. दोन-तीन ताटं. भीक मागून आणलेलं वैविध्यपूर्ण चवी आणि वासांचं जेवण. काही वेळा चूल पेटवून बिनमसाल्याची भाजी. एकदा शिजवलेले बटाटे बकाबका खातानाही मी एका बाईला पाह्यलंय. छोटी पोरं-पोरी कालवा करत एकाच ताटात जेवायला बसतात. मग जो तो आपापल्या कामाला पांगतो. ती जळकी बाई, तिची म्हातारी आई आणि ती काळी पोरगी तिथंच सांडलेल्या असतात.

तर त्यांचं असं राहणं आणि त्यांचा त्या फुटपाथवरला हक्काचा वावर जवळपास सगळ्यांच्याच अंगवळणी पडलाय. भिंती नसलेलं त्यांचं हक्काचं घर. तशी दिवसा ही मंडळी शहाणपणानं घराच्या भिंती आक्रसून घेतात. फुटपाथवरून लोकांना जायला- यायला जागा सोडतात. पण, जवळपास कुणीही तिथनं जात नाहीच. तसं काही जण फुटपाथ अडवल्याबद्दल त्यांचा राग-राग करतात. पण, म्हणून कुणीही त्यांना तिथून हटकत नाही. फुटपाथवर उभारलेल्या त्या अदृष्य घरांमध्ये राहणा-यांचा निवा-याचा हक्क इतरांनी मान्य केलेला आहे आणि आमंत्रण नसताना दुस-यांच्या घरी जाऊ नये, याचे संस्कार लोकांवर झालेले असतातच. त्या आपसूक शहाणपणातनंच त्या अदृष्य़ घरांच्या अदृष्य उंब-यांबाहेरूनच बाकीचे ये-जा करतात.

पण, जूनच्या पंधरवड्यात फूटपाथ एकदम मोकळा-मोकळा दिसू लागतो. एरवी तिथल्या माणसांच्या रुपानं जिवंतपणाच्या खुणा अंगावर वागवणारा फूटपाथ आता अचेत दगडासारखा कोरडा दिसू लागतो. पाण्याचे ओघळ तिथून वाहतात. पण, हा फूटपाथ ती ओल काही आपल्या अंगाला लागू देण्याचे मनावर घेत नाही. जवळपास चार महिने या चित्रात बदल होत नाही. पण, ती कुटुंबं त्यांच्या ठरलेल्या वेळी फुटपाथवर परत रहायला येतातच. लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर महिनाभरानं आपल्या या बिनभिंतींच्या घरात प्रवेश करणा-या कुटुंबांची चहल-पहल फुटपाथला भारून टाकते. गोष्टीत कावळ्यांनी बांधलेली शेणाची घरं पावसात वाहून जातात. त्यांना आसरा घ्यायला इमारतीचा एखादा कोनाडा पुरतो. पाच-साडेपाच फूट लांबीची ही फुटपाथवरची माणसं आणि त्यांची पोरंबाळं कुठं जात असतील ?

परवा चार-दोन थेंब बरसले. लवकरच वळीव झोडपून काढील.

मळभ अंगावर लोटू पाहणारे ढग आता आकाशाच्या सवयीचं झालेत आणि त्याबरोबर येणारी उदास बेचैनी माझ्या...

पावसाळा येतोय...

21 comments:

  1. Good one, Ajit... Fantastic Observation!!! Keep it up...

    ReplyDelete
  2. atyant marmik lihile aahes ajit... I am proud of u... relly gr8... lihit ja asach... thambu nakos... jiyo...

    ReplyDelete
  3. मळभ अंगावर लोटू पाहणारे ढग आता आकाशाच्या सवयीचं झालेत आणि त्याबरोबर येणारी उदास बेचैनी माझ्या...
    पावसाळा येतोय..

    अजय अरे मला शेवट भन्नाट वाटला रे..
    फारच सुंदर..

    ReplyDelete
  4. हर्षद धन्यवाद... पण, माझं नाव अजित आहे.

    ReplyDelete
  5. Last 4 lines just like a rain.... very coooool!!!

    ReplyDelete
  6. अजित, मस्त लिहला आहेस ब्लॉग. लगे रहो!

    ReplyDelete
  7. ब्लॉग खरच सुंदर आहे...निरीक्षण वाखाणण्याजोगं आहे..तू मुंबईत येण्यापूर्वी ही सर्व कुटुंब त्याच पुलाखाली राहायची...तेव्हा त्यांचा चिंचपोकळीतला वास्तव्याचा काळ हा पूर्ण 12 महिन्यांचा होता. मात्र स्थानिकांनी त्यांना पुलाखालून हाकलून लावलं आणि पुलाच्या छताखालून ते आभाळाच्या छताखाली आले आठ महिन्यांसाठी...

    ReplyDelete
  8. Me tumche article vachle,chaan lihile aahe pan tya manasnachya paristiti var daya yete,no one likes to live like that but still they have to survive.Who knows what ur future brings for u!

    ReplyDelete
  9. खुप छान ब्लॉग आहे!!!!! अगदी ते फुटपाथ वरच दृश्य डोळ्यासमोर उभ राहिल. एरवी आपण या गोष्टिंकडे लक्ष देत नाही..... पण या सामान्य गोष्टितिल मनाला भावनारे क्षण तुम्ही अचूक मांडले आहेत!!!

    --
    ADhiRAJ Loke

    ReplyDelete
  10. धन्यवाद मित्रांनो...

    ReplyDelete
  11. are

    Best lihilays... Mee loksatta la jaycho teva maza hach rasta, padpath hota. ti kutumba kimwa aankhi kahi mandali tithe asaychi. sandhyakali kombdiche pankh wa pay shijwun khaychi. kadhitari purn kombdichi diwali pan asaychi tyanchi... All the best to Blogger Ajit@@@

    ReplyDelete
  12. khupch savendanshil nirikshane...vachatana man dhukhwat neles ani aplya swachhandi an swatantra jagnyacha hewa watala...!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  13. खूपच मस्त लिहिलं आहेस तुझा blog पण झकास आहे

    ReplyDelete
  14. Thanks mapping and documenting..

    ReplyDelete
  15. खूपच जबरदस्त लिहलं आहे. निरीक्षण शक्ती आणि संवेदनक्षमता या दोन्ही गोष्टी जागृत असणारी तरुण पत्रकारांची पिढी आता इतिहासजमा होत चालली आहे अशी नेहमी ओरड असते अशा प्रकारची आरडाओरड करणा-यांना तुझा ब्लॉग हे खणखणीत उत्तर आहे.

    ReplyDelete
  16. ओंकार मित्रा धन्यवाद !

    ReplyDelete
  17. khoopach chan...
    dhanyawad
    ganesh sawant

    ReplyDelete