Thursday, January 5, 2012

जन हे सुखाचे !

 

       आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नवंकोरं जोडपं राहतं. नवंकोरं अशासाठी की, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालंय. लव्ह मॅरेज. लग्न होऊन आठ दिवस होतात न् होतात, तोच त्यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले. आता त्यांचा आवाज एवढा वाढतो की, रणक्षेत्राची मर्यादा आपसूक ओलांडली जाते. त्यांचे शाब्दिक बाँबगोळे भिंतींच्या बंधनांना न जुमानता थेट आमच्या हद्दीत येऊन पडतात. आमच्यापैकी कुणीही नाईट शिफ्ट करून सकाळी आलं की, या युद्धाची झळ त्याला बसतेच. देवळातील काकड्याप्रमाणे त्यांच्या भांडणाचा कडाकाही मोठाच असतो. एवढ्याशा वीस मिलीमीटर लांबीच्या मानवी स्वरयंत्रातूनदेखील गगनभेदी आवाज निघू शकतो, याची आम्हाला या दोघांकडे पाहून खात्री पटली आहे. त्यांचा आवाज सुपरसॉनिक विमानाचा पल्ला गाठून आख्ख्या फ्लोअरवर घुमत राहतो. डेसिबलची मर्यादा ओलांडल्याबद्दल नवरा-बायकोविरोधात गुन्हा नोंदवणारा कायदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अद्याप संमत केलेला नाही, हे यांचं सुदैव! अन्यथा, या दोघांसमवेत जगातील खूप सा-या पती-पत्नींना तुरुंगात खितपत पडावं लागेल, असं माझं स्पष्ट मत आहे. भिंतींना कान असतात, असं म्हणतात. पण, आमच्या भिंतींना ते नाहीत. कारण, या दोघांचे कानठळी आवाज ऐकून त्या ठार बहि-या झाल्या आहेत. भिंतींचं काम खिडक्या करतात. त्या कायम उघड्या असतात. शेजा-यांच्या आदळ-आपटीला झणझणीत शब्दांची फोडणी मिळाली, की तो ठसकेबाज वास आपोआप आमच्या नाकात शिरतो. अंग झटकून ताठ होत सावध झालेल्या कुत्र्याप्रमाणे खिडक्या स्वतःचे कान टवकारतात. पलीकडला शब्द न् शब्द आमच्यापर्यंत पोहोचवतात. रात्रभर काम करून डोळ्यांत दाटलेली झोप यांची भांडणं ऐकून माझ्याशी काडीमोड घेत पसार होते.
         बव्हंशी जोडप्यांच्या भांडणांना तात्त्विक किनार कधीच नसते. किंबहुना अशी किनार नसणा-या भांडणांवरती खास या दोन प्राण्यांचीच मक्तेदारी असते, असेही माझे ठाम मत बनले आहे. कुठल्याही गोष्टीवरून ते वादाचा फुफाटा उडवू शकतात. त्यातून उडालेला खकाणा नाकातोंडात जाऊन जीव गुदमरल्याशिवाय यांना चैन पडत नाही. रविवारची भाजी कुणी आणावी, यावरून ते आठवड्यातून एकदा मिळणा-या सुट्टीचं भजं करून टाकतील. कारणं क्षुल्लक असतात. पण, आव मात्र धर्मयुद्ध लढायला उतरलेल्या युधिष्ठिराचा आणतात. अंगावर हात उगारणं सभ्य समाजात शोभत नाही. त्याला पर्याय म्हणून ही मंडळी एकमेकांच्या इगोला रक्तबंबाळ होईतोवर लाथाळतात. हे शाब्दिक घाव इतके खोल-गहिरे असतात की, नंतर मने सांधता सांधली जात नाहीत. ग्रीष्मात विहिरीने तळ गाठावा त्याप्रमाणे नात्यातली ओल आटत जाते. कोरड्या रखरखीत चिखलासारखे नुसते व्यवहार शिलकीला पडतात. समाजासमोर नात्याचे कलेवर जिवंत असल्याची कसरत करणे नशिबी येते.
         शेजारच्यांची भांडणे हे एक उदाहरण झाले. लोकलमध्ये प्रवास करताना लोकांच्या चेह-याकडे पाहिलं की संसाराचं त्रासलेपण त्यांच्या कपाळावरील जाळीदार आठ्यांमध्ये विणलेलं दिसतं. सप्तपदीच्या वेळी जोडीदारासोबत चालायची शपथ घेतलेली असतानाही जो तो स्वतंत्रपणे प्रवासाला निघाल्यासारखा भासतो. भांडण झालं. ठीक आहे. पण, भांडण मिटवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याचा समजूतदारपणा दाखवण्याऐवजी पती-पत्नीला दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपापल्या ऑफिसातले कलीग का जवळचे वाटावेत ? हे असं का होत चाललंय ?
नात्याच्या मयत होण्याची प्रक्रिया किती गतिमान झाली आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. चायनामेड प्रॉडक्टप्रमाणेच नात्यांच्याही टिकाऊपणाची खात्री देता येत नाही. पण, तरीही हे लोक एकत्र राहतात. भांडतात, भांडतात आणि भांडतात. अखेर एकाच छताखाली झोपतात. भांडण मिटलंय, असं तर काही दिसत नाही. युद्धभूमीवर दिवसभर मोर्चा सांभाळून थकून गेलेले दोन्ही बाजूंचे सैन्य ज्याप्रमाणे रात्री विश्रांतीसाठी शस्त्रे म्यान करते, तसा तात्पुरता तह या दोघांत होतो. दुस-या दिवशी नव्या दमाने नव्या विषयांची रसद पाठीशी बांधली की, यांचे युद्ध पुन्हा सुरू. लग्न झाल्यानंतर सहा महिने, वर्षा-दोन वर्षातच असले प्रकार सुरू होतात. याला काय एकत्र राहणं आणि संसार करणं म्हणायचं ? हा किंवा ही नसल्यानंतर दुसरं कोणी आपल्या आयुष्यात येईलच, या तारुण्यातल्या मस्तीतून हे येतं ? दोन्ही बाजूंना कमिटमेन्ट नको वाटेनाशी का होते ? मूल्ये तकलादू झालीयत, म्हणून हे चित्र सर्वत्र दिसतंय का ? एक मात्र खरं की, भुसभुशीत वाळूत अजिंठा-वेरूळ आकाराला येत नाही. त्याला घडणीचा ठाशीव कातळच लागतो.
         तुकारामाने म्हंटलंय की, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे; अंतकाळाचे, नाही कोणी.आजूबाजूचे फक्त सुखाचे वाटेकरी असतात. पाप अथवा दुःख सर्वांनाच नकोसं वाटतं. पण, कुठल्याही परिस्थितीत पती अथवा पत्नीने कायम एकमेकांच्या साथीसाठी सज्ज असावं, अशी अंगभूत अपेक्षा खुद्द या नात्यातच सामावलेली असते. वाल्या कोळ्याच्या बायको-पोरांना फक्त सुखातच हिस्सा हवा होता, हा रामायणातील भाग अपवादात्मक मानला जात होता. पण, हेच अपवादात्मक चित्र आता घराघरातील रामायण बनून समाजव्यवस्थेत सर्वाधिक घट्ट नातं मानलं जाणा-या नवरा-बायकोच्या नातेसंबंधांबाबत सर्रास दिसू लागले आहे. खुद्द नवरा-बायकोच एकमेकांची गणना जनांमध्ये करायला लागले आहेत. 
         गणितातील सेट थेअरीप्रमाणे नवरा-बायकोच्या कॉमन सेटमध्येही फार कमी गोष्टी उरल्या आहेत. दोघांचाही सवता सुभा असतो. नरभक्षी वेलींप्रमाणे संसाराचे पाश काहींना गुदमरवून टाकतात. काही पाण्यात राहूनही अंगाला थेंब लागू न देणा-या कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहण्याची किमया साधतात. दुधात साखर विरघळून जावी त्याप्रमाणे सुखाने चालणा-या संसारांचे समाजाशी असलेले गुणोत्तर व्यस्त होत चालले आहे. पराकोटीचे व्यक्तिस्वातंत्र्य आणि त्यातून येणारे भकास एकाकीपण पेलण्यासाठी आताचा माणूस सज्ज आहे का, हादेखील प्रश्नच आहे. पण, कसर लागलेल्या लाकडाप्रमाणे नात्यांचा भुसा पडत चालला आहे आणि समाजाचे वासे पोकळ बनू लागले आहेत. पावसात वाहून जाणा-या चिमणीच्या शेणाच्या घरासारखे यांचे संसारदेखील अवकाळीच विस्कटून जात आहेत. नवरा-बायकोच्या बाबतीत ही वेगळीच त-हा दिसू लागली आहे. एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटणं, आता दूरची गोष्ट झाली आहे. घराची सामाईक जागा सोडली, तर एकाच्या जगण्याच्या कप्प्यात दुस-याला जागा असत नाही. नाईलाजास्तव एकमेकांसोबत दिवस कंठले जातात. अशा प्रकारे नाईलाजाचं जगणं सोयीचं व्हावं, यासाठी एकतर कमालीची खुनशी एडजस्टमेन्ट, नाही तर हाराकिरीसाठी लढाईवर निघालेल्या उतरलेल्या सैनिकाचा आवेश. तुझ्यावाचून माझं काहीच अडत नाही, असं दाखवणं अथवा वागणं म्हणजे खुनशी एडजस्टमेन्ट. 
         या समाजदत्त नात्यामध्ये उत्स्फूर्तपणा असा काही उरलेला नाहीच. यांच्या रागातील भरती-ओहोटी समुद्राप्रमाणे नसतेच. ती जागृत ज्वालामुखीसारखी असते. कायम उफाळत राहते. दोघांमधील पोकळीचे भयावहपण कृष्णविवराप्रमाणे खोल-गर्द होत जाते. कधीमधी एकत्र पिक्चरला जाणं, हॉटेलिंग करणं आणि जुहू चौपाटीवर फिरून येणं, असल्या थुकरट गोष्टींनी ही पोकळी भरून येण्याची अपेक्षा करणं, म्हणजे डोकं दुखत असताना गुडघ्याला बाम चोळण्यासारखं आहे. आपलं आतूनच काही तरी निखळलेलं आहे. ते सांधायचं सोडून वरवरच्या मलमपट्ट्या काय कामाच्या ? हे एकत्र राहतात, म्हणजे नेमकं काय करतात ?  प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

2 comments:

  1. खूप छान! खरंच प्रत्येकाने आणि प्रत्येक नात्यांचा विचार करण्याची परिस्थिती झाली आहे..... एकत्र राहणं म्हणजे एकत्र जगणं का?
    की फक्त राहणं?......छान लिहीलयेस! शुभेच्छा !!
    ------ सुशांत आवटे.

    ReplyDelete
  2. jo dar gaya wo mar gaya...
    Ghabarlays ki kay...
    Baki chaan lihile aahes
    tula jara lavkar kalaly asha natyatla shushk niraspana... Good

    ReplyDelete