Friday, September 30, 2011

निळे निर्माल्य !



    जेवण पचवून झोपण्याच्या तयारीत असलेली मुंबई शेवटचा ढेकर देत होती, तेव्हा दिग्विजय लॅपटॉपवर खुडबुडत होता. त्याचा डेस्क सोडला तर ऑफिसातल्या सगळ्या लाईट्स केव्हाच स्वतःला विझवून अंधारातल्या घुबडाप्रमाणं निपचित बसल्या होत्या. घरी जायच्या ओढीनं डेस्कवरल्या इतर की-बोर्डांवरच्या बोटांनाही जरा वेग आल्याचे आवाजावरून जाणवत होते. टायपून टायपून मानेला रग लागल्यानं त्यानं काही सेकंदांसाठी हातांना सुट्टी दिली. अवघडलेल्या शिरा मोकळ्या करण्यासाठी खोलवर श्वास घेत त्यानं मान डावीकडं वळवली. शिरांना ताण बसल्यासारखं जाणवलं. परत तिला लॅपटॉपच्या पुढ्यात आणून रोखून धरलेला श्वास सोडणार, तेवढ्यात शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरल्या क्रेनच्या थोबाडात फिट्ट केलेला हॅलोजन ऑफिसच्या पारदर्शक निळ्या काचेला न जुमानता दिग्विजयच्या डोळ्यांत सूर्यासारखा रुतला. 

    त्या रासवट पिवळ्या उजेडानं ऑफिसातली तलम पांढरी शांतता विस्कटली. बुब्बुळांमध्ये आग पेटली. त्या भगभगीत प्रकाशानं आपले डोळे जळून कोळसे होतील की काय, अशी भिती वाटून त्यानं पापण्या मिटून घेतल्या. क्रेन वळाली, तसा हॅलोजनही तोंड फिरवून तिच्यासोबत चालता झाला. दिग्विजयनं डोळे उघडले, तेव्हा ऑफिसमधला मृदू पांढरा प्रकाश देवदूताप्रमाणं पुन्हा परतला होता. क्रेन आता थांबली होती. त्यासरशी मघाशी त्रास दिलेल्या त्या परप्रकाशी सूर्याचं परिवलनही बंद पडलं होतं.
    दिग्विजयचं काम आटपलं होतं. पण, कॉम्प्युटरच्या स्क्रीनला चिकटलेला बॉस काही हलायला मागत नव्हता. तो निघेपर्यंत बाहेर पडायला काही चान्सच नव्हता. शेजारी पाहिलं, तेव्हा मांडीवर बॅग ठेवून बसलेल्या प्रितीनं बाकीच्या सेक्शन्सकडल्या अंधाराकडं सूचक बोट केलं. घरी जाण्यासाठी बॉसकडून सामूहिक परवानगी दिग्विजयनं आणावी, अशी तिची इच्छा होती. मी काय करू शकणार बये! आमच्यापैकी कुणाचं नाही तरी तुझंच ऐकेल बॉस... पण, ओठांशी बाणासारखं आलेलं वाक्य त्यानं गिळलं आणि चेह-याची प्रत्यंचा ताणून हसल्यासारखं दाखवत मानेनंच नाही म्हणून सांगितलं. ती चडफडली. त्याला उगीचच तिच्यावर दया आली.
      काही मिनिटं तोदेखील इतरांप्रमाणंच अस्वस्थ बसून राहिला. जीन्सच्या डाव्या खिशात हुळहुळल्यासारखं झालं. गडबडीत त्यानं मोबाईल कानाला लावला.   
             “ सत्संगाला येतोस का?” दिनेशनं कानात अभंग खणकावला. त्याच्या शब्दांच्या टिप-या मेंदूपर्यंत झिणझिणत गेल्या. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणं डोळे आपोआप समोरच्या टीव्हीकडं वळले. ब्रेकिंग न्यूजच्या पट्टीपाशी थबकले नि तोंडातून शिटणा-या अँकरला वळसा घालून ते उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात सेकंदा-सेकंदाला लुकलुकणा-या घड्याळाच्या दिशेनं लपकले. आकडे नजरेत भरवून घेतले. अकरा त्रेचाळीस. च्यायला! सकाळपासनं मरमर करून दमलोय आपण. शिवाय सत्संग म्हंटलं की तो स्वस्त आरसी पाजणार, जिचा हँगओव्हर दुस-या दिवशी दुपारपर्यंत उतरत नाही. वेश्यांवरच्या (त्याच्या भाषेत कॉलगर्ल्स) अर्ध्या-कच्च्या रिसर्चचे इन्फरन्सेस ऐकवणार. आपल्या स्कँडिनेव्हियन एनजीओची टिमकी वाजवणार. फ्रॉईड, युंग, लोवेनफेल्ड, एहरेनफेल, क्रॉली, श्नाईल्त्झर ,अर्नेस्ट जोन्स... असे जाडजूड संदर्भ फेकणार की, जांभईसाठीसुद्धा तोंड उघडता येणार नाही. कुणी वेश्येनं थेट निरुपण केलं तर ठीक आहे. पण, दिन्याचं रात्रभर चालणारं प्रवचन कोण ऐकून घेणार. तसंही तुका म्हणे शीण, होईल अनुभवावीण... अशा आशयाचं काही तरी तुकोबांनी म्हंटलंच आहे. त्यापेक्षा नक्कोच जाऊयात, असा विचार दिग्विजयनं केला.  
    टीव्हीवरला वेळेचा आकडा दिनेशच्या कानात ओतत तो म्हणाला, ही काय वेळाय का ? अजून बॉससुद्धा ऑफिसातून बाहेर पडला नाहिए… वेळेचं तू नको सांगू मला. मागच्या बुधवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तुमची गँग पहाटे तीन वाजता काकड आरतीला जमा झाली होती काय ? आख्ख्या पार्कावर काळे ढग जमा झालेले पाहिले मी तुम्ही फुकलेल्या सिगारेटींच्या धुरांचे. कसला बोडक्याचा इंटलेक्च्युअल डिस्कोर्स सुरू होता रे तुमचा ? एकाला तरी तोल सांभाळून उभं राहता येत होतं का तुमच्यापैकी ?” प्रश्नासुरासारखा तो उत्तर दे, नाही तर माझ्याबरोबर येच्या पवित्र्यात पलीकडून थेट अंगावरच चाल करून आला. पार्कात काय भरीव विचारमंथन झालं, हे दिनेशला आठवडा झालं तरी सांगितलं नव्हतं. म्हणून तो चिडल्याचं दिग्विजयच्या लक्षात आलं. तो शांतपणे निघालोम्हणाला. अर्थात, मागच्या वेळची निम्मी जॅक डॅनिएल्स दिनेशकडं अजूनही शिल्लक असल्याची ट्यूब ऐन वेळी त्याच्या डोक्यात पेटली होती.
       “ काम नाहिए तर उगीच बॉससमोर शेपटी हलवत बसून राहण्यात अर्थ आहे का ?”  दिग्विजयवर तणतणत शेवटी तो म्हणाला, बच्चे ! दो घंटे से निगार बैठी हैं यहाँ पें. मिलना है  तो जल्दी से टॅक्सी पकड.” पलीकडून नाजूक बोलण्याचा आवाज ऐकू आला. शब्द कळले नाहीत. पण, आवाज परिचयाचा जाणवला. तो ऐकून दिग्विजय शाळकरी पोरासारखा धांदलला. जागेवरून तटकन उठत ओरडला, फुकणीच्या ! बाकीची लांबड लावत बसण्यापेक्षा आधी मुद्द्याचं बोलायला काय झालं होतं ?”  निगारचा गोरा-भुरा शांत सोशीक चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. निळ्या सलवार-कमीजमध्ये गुलाबासारखी डवरून आलेली निगार. ती मागल्या वेळी भेटली होती, तेव्हा किती तरी प्रश्नांनी त्याच्या मेंदूला खिळे ठोकले होते. त्यांची उत्तरं मिळवायची राहून गेली होती. आज कुठल्याही परिस्थितीत भेटायलाच हवं तिला.. मनाशी विचार करत दिग्विजयनं फोन कट केला नि बॉससमोर जाऊन उभा राहिला. सर! घाई आहे. जाऊ का ?”
           “ कुठल्या दिशेचे प्रवासी तुम्ही ?” बॉसनं फिलॉसॉफिकल फिरकी घेतली. म्हणजे ?” “ अरे! सहज आपलं जनरल नॉलेज म्हणून विचारलं. चाललायस कुठं ? अंधेरी की कुलाबा ?” “कुलाबा...बॉसचा खेळकर मूड हीच संमती असल्याचं चाणाक्षपणे लक्षात येऊन तो जाण्यासाठी वळला. पाठून भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातल्या तिरकस पात्राप्रमाणं बॉसनं डायलॉग हाणला, “ लई दिसांनी तुमचं फिरंगी पाखरू आलंया वाटतं. जावा बिगीबिगी…” ह्युमन काय, वुमन डिग्निटीपण नाही याला. बायको, आई आणि बहीण सोडली की, प्रत्येक बाई याच्या दृष्टीनं पाखरू! जाऊ देत. त्याचा तरी काय दोष ? समाजात प्रत्येक संबंधाला लेबल लावल्याशिवाय भागतच नाही. निगारकडं तर साधं रेशनकार्डही नाही. बंगाली की बांग्लादेशी आहे ती. वीतभर पोटाला कुठे आखीव सीमांचं बंधन असतं. रेशनकार्ड नसलेली माणसं इथल्या व्यवस्थेत सर्वार्थानं अदखलपात्र असतात. मग अशा अस्तित्वातच नसलेल्या माणसांशी उरलेला समाज आपली बांधिलकी अशी ती मानतच नाही. पण, ही माणसं हाडामांसानिशी असतातच अवतीभोवती. अशा किती कोवळ्या गुलाबांना हे शहर चुरगाळून टाकत असेल ?
       प्रश्नांचा असह्य ठणका डोक्यात घेऊन दिग्विजय लिफ्टनं सरसरत खाली आला. गेटवर झोपाळलेल्या चेह-यानं उभारलेल्या टॅक्सीवाल्याला कुलाबाअसं जोरात ओरडून सांगितलं. टॅक्सीवाल्यानं फाटदिशी मीटर खाली घेत डोळ्यांत साकळलेली झोप तंबाखूच्या पिंकेसोबत थुंकून टाकली. वारा जास्तच माजावर आल्यामुळं टॅक्सीवाल्यानं स्वतःच्या बाजूच्या काचा वर केल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या डेरेदार झाडांनी गाडी कॅडेल रोडच्या तोंडाला लागत असल्याची वर्दी दिली. चौपाटीवरून येणारी हवा इमारतींचा अडथळा चुकवून त्या काळ्या-करड्या काँक्रीटच्या रस्त्यावर स्वतःला वा-यावर सोडून दिल्यासारखी बागडत होती.
      एकुलतं गि-हाईक गवसल्याच्या भावनेतून हवेनं नखरेल होत दिग्विजयचा कान हलक्या दातांनी चावला. मधमाशीचा डंख बसल्यासारखा तो काही सेकंद शहारला. आता तिचा मुलायम हात दिग्विजयचा चेहरा कुरवाळू लागला होता.
     अस्वस्थ होत त्यानं खिशातून बेन्सन लाईटचं पाकीट काढलं. ओठांमध्ये धरलेली सिगारेट डाव्या हाताचा आडोसा करून निरांजनाप्रमाणं तेवणा-या लायटरच्या मंद आगीवर पेटवली. काही सेकंद त्यानं धूर तसाच फुफ्फुसांत घोळवला आणि उरलेला लयीत तोंडातून बाहेर सोडला. शरिरातून निघून बाहेर पडलेल्या त्या धुराचा आकार त्याला मन दगड केलेल्या रानटी पुरुषासारखा भासला. सिगारेटच्या उग्र वासानं दिग्विजयला झोंबून राहिलेली हवा हात-पाय आपटत बाजूला झाली, तेव्हा आपल्या आत्म्याला आणि शरिराला चिकटलेला सगळा किटाळ निघून गेल्यासारखं त्याला वाटलं. बरं वाटल्यासरशी त्यानं आपल्याही बाजूच्या काचा वर केल्या.  
      टॅक्सीत आरंभलेल्या होमात एकापाठोपाठ एक शिलगावलेल्या सिगारेटी फुफ्फुसांचा बळी मागत होत्या. टॅक्सीवाल्यानं शहाणं होत स्वतःच्या काचा खाली घेतल्या. पण, दिग्विजयला कशाचीच फिकीर नव्हती. अखेर धुरांच्या रथातून निगार खाली उतरली आणि दिग्विजयजवळ गेली. कितनी पिओगे आप?”, असं म्हणत त्याच्या तोंडातून सिगारेट काढून घेत पायाखाली चुरडली. ही शेवटची, असे तो म्हणणार इतक्यात आपला गोल्डन कश ओढून झाल्याचं, हातात शेवटल्या सिगारेटची केवळ बट उरल्याचं, पाकिट संपल्याचं आणि तेवढ्याशा वेळात निगार स्वप्नात येऊन गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.
      दिग्विजयनं काचा खाली घेत ओलसर हवेला नाकात प्रवेश करू दिला, तेव्हा त्याला कोरड्या पडलेल्या फुफ्फुसांवर बर्फाचा गोळा फिरवल्यासारखं वाटलं.
....
बिनस्वेटराचं शहर - भाग 3





6 comments:

  1. आवडली पोस्ट. निगार साठी वापरलेली निर्माल्याची उपमा निशब्द करणारी...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. धन्यवाद!पण, मी स्वतः खूष नाहिए या पोस्टवर. मला लिहायचं होतं भलतंच आणि लिहिलं काही तरी वेगळंच, असं झालं. फार विचित्र झालंय ते... काही तरी लपवून लिहिल्यासारखं वाटलं. अगदी वरवरचं आणि ख-याखु-या अनुभवांना न्याय न देणारं. त्यामुळे या पोस्टमध्ये अजिबात जीव नाहिए असं मला वाटतं. अॅक्च्युअली, ब्लॉगसारखं माध्यम धाडसी, प्रचलित नीतीनियमांविरोधात बंडखोरी करणा-या अथवा थेट लैंगिकतेशी संबंध असणा-या गोष्टी लिहिण्यासाठी योग्य आहे की नाही, हाच विचार मी सध्या करतो आहे. 'बिनस्वेटराचं शहर' इथंच थांबवतोय. 'लव्ह ट्वेंटी ट्वेंटी'चंही काय करेल, सांगता येत नाही. But,thanks for cheering me up. Either I will try my best in next attempt or I won't write a single word again.

    ReplyDelete
  4. Wow!! incredible description of the simple day-today undramatic events...halogen lamp, cigarette, ani gaar waryala dilela personification khup interesting ahe.. Eagerly looking forward to the continuation of BinSweateracha Shahar..
    Ani y do u think that blog isnt the right medium?? Its afterall only a medium to express feelings irrespective of the genre of the content..

    ReplyDelete