Monday, August 29, 2011

श्रावण जाशी, हर्ष मानसी !



   मुंबईत किमान दर्जाची शांततासुद्धा विकत घ्यावी लागते. आम्हा मित्रमंडळींना ती विकत घेण्यासाठी ड्रीमलँड बार हा अतिशय स्वस्त पर्याय आहे. शांतता विकणा-या मॉल्सच्या भपकेबाज गर्दीत अंग चोरून उभं राहिलेलं किराणा मालाचं दुकान असावं, तसा हा बार आहे. मनासारखा एकांत आणि शटर अगोदरच बंद झालं तरी रात्री दीडपर्यंत गप्पा मारण्याची मुभा, या दोन गोष्टींमुळे आम्ही या बारवर निहायत खूष असतो. बारचा मालक गणेशअण्णा तर आमच्या दृष्टीने संतच आहे. बिलावर नेहमीच वीस टक्के डिस्काऊंट. कधी-कधी शिर्डीहून जाऊन आलेला असला की, एक ड्रिंक मोफत देतो. अण्णाच्या पाप-पुण्याविषयीच्या कल्पना नेमक्या काय आहेत, ते मी एकदा त्याच्याकडून समजावून घेणार आहे. 

     शुक्रवारी आम्ही आणि गणेशअण्णादेखील आझाद मैदानावर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून आलो होतो. त्याशिवाय, आम्ही फेसबुकवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणा-या प्रत्येक वॉलवर लाईकचं सिमेंटही थापलंय. मैदानावर उभ्या असलेल्या अनेकांच्या डोक्यावर टोप्या होत्या. पण, आमच्यापैकी कुणाचीच त्या टोप्या घालण्याची हिंमत झाली नाही. कारण, टोप्यांची किंमत आम्हाला फार जास्तच वाटली. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य आणि थोडासा त्याग. अशा टोपीच्या वजनाने डोकेच दडपून जायचे. किमान गणेशअण्णाला सरकारी वेळेत बार बंद करायला लावूयात आणि मग ती टोपी घालूयात, असा विचार करून आम्ही तिथून निघालो होतो. टोपी घालायची असेल, तर सुरुवातीला एवढी माफक पात्रता तरी आम्ही मिळवायला हवी. आमच्या देशाला पहिल्याच गांधींचे विचार अजूनही पेलवत नाहिएत आणि ते समजावून देण्या-घेण्याची तसदीही कुणी दाखवत नाहिएत. इथे टोपी घातली, रस्त्यावर तासाभरापुरतं एकत्र आलं आणि फेसबुकवर लाईक केलं, की झालं. केवढं सोप्पं आंदोलन आणि केवढी सोप्पी क्रांती !
    अण्णा आणि त्यांचे मुंबई- राळेगणमधले शेलके कार्यकर्ते यांनी सरकारच्या हृदयपरिवर्तनासाठी उपोषण केलं आणि ते यशस्वी झाले. गांधीजी राज्यसंस्थेला necessary evil  म्हणायचे. सुरुवातीस राज्यसंस्थेची मदत घेऊन शोषणमुक्त आणि समतावादी समाज निर्माण केल्यावर नंतर तिची अजिबात गरज उरणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. कारण, आपल्या तत्त्वांवर चालणारा माणूस शासनव्यवस्थेचा पांगुळगाडा न घेण्याइतपत नक्कीच प्रगल्भ होईल, इतकी त्यांची त्या तत्त्वांवर श्रद्धा होती. आपल्यात तितके माणूसपण आले आहे, असे वाटण्याजोगी परिस्थिती आज नाही. पण, आपण किमान त्या दिशेने वाटचाल तर करू शकतो. अण्णांसारखा एक गांधीवादी न्याय्य मागण्यांसाठी सरकारला झुकवतो. आपण सारेच गांधीवादी झालो, तर सगळंच विधायक का नाही होऊ शकणार ? सरकारची गरजच उरणार नाही. मग आता नागरिक म्हणून आपण आत्मपरिक्षण करणार आहोत की नाही? भ्रष्टाचाराला विरोध आणि प्रामाणिकपणाचा आग्रह, हे एक मूल्य म्हणून समाजात रुजावं आणि रुजवावं लागतं, हे आमच्या कुणाच्या गावीच नाही. प्रेषित, महात्मा आणि अण्णा समाजसफाईचं काम करतीलच. आता घटनेच्या चौकटीत राहून आपण आपली मने खराट्याने खरवडणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे.  
    आमच्यातल्या अपूर्णत्वाची जाणीव आम्हाला आहे. म्हणून ती टोपी डोक्यावर चढवण्याची हिंमत होऊ शकली नाही. साईबाबांच्या दानपेटीत हजारो रुपयांची बंडलं बिनदिक्कत टाकणा-या गणेशअण्णानं मात्र ही टोपी तितक्याच सहजतेने घातली. त्याला त्याविषयी विचारलं, तेव्हा तो हसत म्हणाला, अरे! मैं भी अण्णा हैं... दारु पिऊन पिऊन खोबणीबाहेर आलेले त्याचे बटाट्यासारखे डोळे तसेच ओढून घ्यावेत, असं वाटलं होतं. पण, आवरलं. आम्ही काय किंवा तो काय... ह्या अण्णापासून त्या अण्णांपर्यंतचा प्रवास फार मोठा आहे... जाणीव होणं महत्त्वाचं. तिथून पुढला प्रवास करणे, हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे. तेदेखील असोच.
     आपल्या बारमध्ये दारू पिऊन तार लागलेल्या गि-हाईकांना आणखी उपदेशामृत पाजणे, हा गणेशअण्णाचा छंद आहे. काऊंटरसमोरच्या निमुळत्या उच्चासनावर बसून तो बेसुमार बडबडणा-या गि-हाईकांच्या जिभांना लगाम घालत ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ अशा आविर्भावात बरळत असतो. खोचकपणे का होईना, त्याला संत म्हणण्यापाठीमागचं हे आणखी एक कारण. आपल्या तोंडाचा पट्टा हा संत अजिबात उसंत न घेता चालवीत असतो. परंतु, त्याची एकट्याची संतत्वाची आभा बारला प्रकाशमान करण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे रात्री उशिरा ऑफिसमधून सुटल्यानंतर आम्ही अकलेचे दिवे पाजळवत ( की उजळवत ?) धुरकट अंधाराने व्यापलेला तो बार आमच्या परीने देदीप्यमान करण्याचा प्रयत्न करत बसतो. आम्ही त्या बारमध्ये ज्या सेक्शनमध्ये बसतो, तिथं कुणाचाही आवाज ऐकू येत नाही. अर्थात त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कारण तिथं दारुचे रेट जवळपास पाऊणपट जास्त आहेत. त्यामुळेच या सेक्शनमध्ये फारसं कुणी फिरकत नाही. इथं दारू बायका सर्व्ह करतात. या बायकांचं शरीर आणि वय पाहून त्यांना सर्रास आंटी’ म्हंटलं जातं. पण, तुम्ही त्यांच्या ओठांवरील लिपस्टीकचं गडद आवरण काढून पाहाल, तर समोर आई-काकू-मावशी उभे असल्याचाच भास होईल. इतक्या वयाच्या बायका काही नेत्रदीपक असत नाहीत. त्या ग्रँट रोड परिसरातल्या डान्स बारमध्ये (आताचे ऑर्केस्ट्रा बार) काम करणा-या मुलींएवढं कमवतही नाहीत. कारण, बार संपल्यानंतरचे व्यवहार त्या करत नाहीत. त्यांना रात्री अकराची विरार लोकल पकडायची असते. जवळपास सगळ्याच मीरा रोड-नायगाव परिसरात राहतात. घरी त्यांची मुलं वाट पाहत असतात. यांच्यापैकी खूपच कमी जणींना नवरे आहेत. पण, त्यांच्या लेखी नव-यांचे पुरुषत्व आणि अस्तित्व केवळ कपाळावर टिकली लावण्यापुरतेच आहे. त्यामुळे घरे चालवण्याचे काम या बायकांनाच करावे लागते.  
    सीमाने ग्लास मांडले. दारूही ओतून झाली. पण, आमच्याशी एक शब्दही बोलली नाही. ती अशी नाही. प्रचंड बडबडी आहे. पोरांच्या व्रात्यपणाचे किस्से, त्यांच्या शाळेच्या अडचणी आणि सासू अशी वागते वगैरे वगैरे असं बरंच काही सांगत असतं. मन्याने तिला तिच्या गप्प राहण्याचं कारण विचारलं.
.
तिनं एकच शब्द कमालीच्या कोरडेपणानं उच्चारला... श्रावण...
.
श्रावणाचा काय संबंध ? नंतर ट्यूब पेटली. श्रावणात बारमध्ये गि-हाईकं कमी येतात... या महिन्यात तिची नेहमीपेक्षा बरीच ओढाताण झाली असणार. तसा प्रत्येक महिना तिच्या दृष्टीनं परीक्षेचाच असतो. कारण, बारमध्ये होणा-या एकूण कमाईपैकी ३० टक्के हिस्सा त्यांना बारमालकाला आणि १० टक्के हिस्सा त्यांना या बारमधले काम शोधून देणा-या दलालाला द्यावा लागतो. दलालाला पैसे असेही द्यावेच लागतात. कारण, आपली जागा घ्यायला किमान हजार मुली तयार आहेत, याची जाणीव तिला असते. आपण मध्यमवर्गीय श्रावणाची मनमोहक रुपं डोळ्यांत सजवतो. तिचा श्रावण हा असा आहे. तो जितक्या लवकर जाईल, तितकं चांगलं.
दुस-या क्रांतीची हाक देऊन येऊ घातलेल्या नव्या भ्रष्टाचारविरहित समाजव्यवस्थेत तरी तिला माणूस म्हणून स्थान असणार आहे काय किंवा जर ते स्थान मिळणार असेल तर ते कशा स्वरुपाचे असेल, या प्रश्नांची उत्तरं सापडेपर्यंत आपल्याला सीमाला टीप देणं भाग आहे. केवळ तुमचा अहंकार सुखावतो, म्हणून तुम्ही हा माणुसकीचा स्वस्त आणि भंपक देखावा करता, असं कुणी म्हंटलं तरी पर्वा नाही. ठीक आहे. आज तिचं घर चालणं महत्त्वाचं.
 क्रांत्यांचे यशापयश सैद्धान्तिक आणि तात्त्विक भूमिकांवर ठरते. पण, शेक्सपीअरने हॅम्लेटमध्ये म्हणून ठेवलंय की, There are more things in heaven and earth than are dreamt of in philosophy.  स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाल्यानंतरही सीमा आणि तिच्यासारख्या कोट्यवधी जनतेचं जगणं हे प्रचलित व्यवस्थेच्या परिघावरचं आहे. ते अजूनही मुख्य समाजव्यवस्थेचा भागच बनू शकलेले नाहीत. क्रांतीचं नवं तत्त्वज्ञान हे जगणं समजावून घेईल ? तोपर्यंत सीमाला आमच्यासारख्या लोकांचे ग्लास भरावे लागतील, वासनांध लोचटांचे स्पर्श सहन करावे लागतील, गणेशअण्णाच्या लक्षात येऊ नये, म्हणून काही पैसे त्याची नजर चुकवून तिला आपल्या ब्लाऊजमध्ये कोंबावे लागतील. पण, ती जगेल. जगणं तिला सोडताच येणार नाही. सर्वसमावेशक क्रांतीची वेळ येईपर्यंत ही माणसं उपाशी मरूनही चालणार नाहीत. 
...
'बिनस्वेटराचं शहर'मधील दुसरा भाग

Tuesday, August 23, 2011

अडीच दिवसांचा जागर आणि उताणी घागर


कुठल्या  ना कुठल्या प्रकारचे वाद, हे अलीकडील काळात आपल्या साहित्य संमेलनांचे व्यवच्छेदक लक्षण राहिले आहे. वादांच्या या नौबती साहित्याला चालना देण्यासाठी झडणार असतील, तर त्याला कुणाची ना असण्याचे कारण नाही. पण, साहित्यबाह्य वादाच्या धुरळ्यात पूर्ण संमेलनच झाकोळून जाण्याचे चिंतास्पद प्रकार सुरू झाले आहेत, हे लक्षण काही ठीक नाही.


     
अध्यक्षीय भाषण, कविसंमेलन आणि चार-दोन परिसंवाद वगळल्यास संमेलनाच्या मंडपात फुकाच्या फुगड्या घालण्यावाचून दुसरे काही होत नाही. ज्या मराठी संस्कृती आणि साहित्याच्या उत्थानासाठी हा कोटभर रुपयांचा अक्षरयज्ञ मांडला जातो, त्याचे फलित मिळते का, हा मुख्य प्रश्न आहे. अव्याहत चालत आलेल्या मराठी सृजनाचा प्रगट आविष्कार या अडीच दिवसांच्या संमलेनांतून होत असतो. किंबहुना, तो व्हावा अशा हेतूपोटीच ती आयोजित केली जातात. पण, हा उदात्त हेतू अजिबात साध्य होत नाही. त्यामुळे संमेलनाच्या समारोपानंतर निधी किती शिल्लक राहिला, याचा ताळेबंद जुळवण्याबरोबरच या संमेलनांनी मराठी संस्कृती आणि मराठी माणसाला काय दिले, याचाही जमाखर्चही अग्रक्रमाने मांडला जावा.

 
सांस्कृतिक पुंजी किती जमा झाली, हे पाहायला गेल्यास हिशेब तुटीचाच लागतो. त्यामुळेच अखिल भारतीय साहित्य संस्कृती महामंडळाच्या या संमेलनांशी फारकत घेत महाराष्ट्रातील इतर सामाजिक प्रवाहांनी केव्हाच आपली वेगळी चूल मांडली आहे. अनेक महत्त्वाचे ज्येष्ठ साहित्यिकही या संमेलनांकडे उपेक्षेने पाहतात. त्यांच्यापासून फटकून राहतात. तरीही, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील हा सर्वात मोठा सोहळा असतो, यात कुठलीच शंका नाही. वर्षानुवर्षे संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवरमराठीची गळचेपी’, ‘सद्यस्थितीत मराठीपुढील आव्हानेया किंवा अशा तत्सम आशयांचे विषय असतातच. आव्हानांचे ठीक आहे. बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वातावरणात ती वेगवेगळ्या रुपांनी उभी ठाकतच असतात. ती थोपवण्यासाठी आपण काही इतरांशी सांस्कृतिक अनाक्रमणाचा करार करून घेऊ शकत नाही. उलट, संघर्ष आणि समन्वयाच्या खडाखडीतून भाषेचे प्रवाहीपण झुळझुळत राहील. पण, पद्धतशीरपणे होणा-या भाषेच्या गळचेपीसंदर्भात आपण अजूनही ठोस भूमिका घेऊ शकलेलो नाही. मोठी शहरेच काय, तालुका पातळीवरदेखील मराठी माध्यमाच्या शाळा धडाधड बंद पडत चालल्या आहेत. मुंबई विद्यापीठात मराठीत संशोधनासाठी गेल्या दीड वर्षांत एकही पीएचडी अथवा एम. फिल.चा अर्ज दाखल झालेला नाही. उलट, तिथे हिंदी आणि गुजराती भाषांना विद्यार्थी आहेत. हीच केविलवाणी परिस्थिती पुणे आणि नागपूर विद्यापीठांतसुद्धा आहे.

एवढे भयानक संकट उभे ठाकलेले असताना त्याच्या मुकाबल्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या नावाने ठणाणा आहे. साहित्य संमेलनाच्या मंडपात पहिल्या रांगेत बसलेले राजकारणी भाषेच्या भल्यासाठी यंव करू आणि त्यंव करू, अशी भाषणबाजी करत वेळ तेवढी साजरी करून नेतात आणि नंतर हा विषय पुढील वर्षीचे संमेलन येईपर्यंत कानाआड करतात. त्यामुळे अनेक वर्षे रांगेने या एकाच विषयावर परिसंवाद घेण्याची वेळ येणे, म्हणजे परिस्थिती खरोखरच चिंतेची आहे. मराठीच्या बाबतीतील या जैसे थेपरिस्थितीत किमान पातळीवरील तरी सुधारणा व्हायला हवी होती. हे होत नाही, याचा अर्थ प्रशासक- राजकारण्यांना यासंदर्भातील खमका निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारे साहित्य अथवा संस्कृतीबळ कमी आहे. त्यामुळेच राजकारण्यांची संमेलनांमध्ये लुडबूड वाढली आहे. त्यांच्याकडून संमेलनासाठी निधी मिळवल्यानंतर खांद्यावर येणा-या मिंधेपणाच्या ओझ्याखाली आयोजक-साहित्यिक दबून जातात. चतुर राजकारणी मग संपूर्ण संमेलनच आपल्या हेतूपूर्तीसाठी वेठीला धरतात. हा प्रकार थांबवला, तरच संमेलनांच्या व्यासपीठांवरून होणा-या साहित्यिकांच्या आवाहनांना ही मंडळी गंभीरपणे घेतील आणि मराठीच्या भल्याचा विचार करतील. त्यामुळे निधी उभारणीसाठी राजकारण्यांच्या दारात जाण्याऐवजी खरोखर पर्यायी व्यवस्था होणे आवश्यक आहे. भूमिका घेण्यास साहित्यिक कचरतात, हेदेखील अलीकडील संमेलनांतून दिसून आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून महाबळेश्वर संमेलनात सारस्वतमंडळींनी डॉ. आनंद यादव यांच्या पाठिशी उभे न राहणे आणि पुण्याच्या साहित्य संमेलनात माणिकचंद गुटख्याच्या प्रायोजकत्वाला साहित्यिकांऐवजी डॉ. अभय बंग यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याकडून पहिला विरोध होणे, ही उदाहरणे बोलकी आहेत. ठाण्याच्या संमेलनाने तर साहित्यिकांच्या कळपात घुसून नथुराम गोडसेबद्दल गौरवोद्गार काढणा-या फॅसिस्ट प्रवृत्तीही पाहिल्या. आयोजकांनी केलेल्या या वात्रटपणाचे भांडवल करणे राजकीय पक्षांकडून सुरू झाल्यानंतर आपल्या साहित्यिकांमध्ये झाल्या प्रकाराच्या निषेधासाठी अहमहमिका सुरू झाली. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याकरिता समिती स्थापन झाली असताना तिची गोडी लागावी आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा, यासाठी संमेलनांनी व्यापक पुढाकार घ्यायला हवा. अन्यथा, साहित्याचा हा घाऊक उत्सव साजरा करणा-यांपुरतेच त्याचे कवित्व मर्यादित राहील. सर्वसामान्य मराठी नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब त्यात उमटायला हवे. समकालीन मराठी वास्तवाशी सलगी करताना त्याची नाळ भूतकाळातल्या सांस्कृतिक वारशाशीही जोडली जायला हवी. हा सोहळा भव्यदिव्य जरू असावा. मराठी माणसाला त्याचा आनंदच वाटेल. पण, त्या भव्य सोहळ्याचे छोटुकले का होईना, पण परिणामही दिसायला हवेत. त्यामुळेच आता तिस-या वर्षात पदार्पण करणा-या अवाढव्य खर्चाच्या विश्व साहित्य संमेलनाला फारशी आडकाठी कुणी घेतली नाही. त्याला हजेरी लावणा-या आमंत्रितांचे वाङ्मयीन कर्तृत्व काय, हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला तरी परदेशी भूमीवर मराठीचा जागर करण्याकरिता आणि तिथे स्थायिक झालेल्या मराठी माणसांना संस्कृतीच्या मूळ प्रवाहाशी जोडून ठेवण्यासाठी हा उपक्रम स्तुत्यच आहे, यात शंका नाही. उद्या मंगळावर जीवसृष्टी आढळल्यास अथवा चंद्रावर माणसाच्या   फे-या वाढल्यास, तिथेही पहिलेवहिले अंतराळ साहित्य संमेलन आयोजन करण्यासही सर्वसामान्य मराठीजनांची काही हरकत असणार नाही. पण, या संमेलनांचे परिणाम दिसायला हवेत, इतकीच माफक अपेक्षा आहे.
...
'दिव्य मराठी'तील 'रसिक'मधील लेख

Sunday, August 14, 2011

बिनस्वेटराचं शहर : भाग १

दिग्विजयच्या डायरीतली एक नोंद (९ डिसेंबर २००९)
      बर्फाळ वाटावं, असं वारं त्या दिवशी वाहत होतं. रात्रीच्या वेळी इतकं लागट वारं वाहिलेलं क्वचितच कुणी अनुभवलं असेल. हिवाळ्यात सगळा देश जरी धुक्याच्या दुलईत लपेटलेला असला, तरी मुंबईत पांघरुणाच्या घड्या मोडण्याची वेळ येत नाही. घरा-घरांतले पंखे रात्रन् दिवस पाचच्या स्पीडनं फिरत असतात. उत्तरेकडून मुक्कामाला आलेल्या वा-यांचा हा परिणाम असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं होतं. एरवीपेक्षा पारा एकदम निम्म्यावर. म्हणून हे असलं भावनाविहीन को-या चेह-याचं बर्फिलं वारं. समुद्रावरनं ऊब घेऊन येणारी हवा त्या आडदांड वा-याला मिठीत कवटाळू पाहत होती. त्याच्या थंडगार, झोंब-या नि बेजान भासणा-या अस्तित्वात जिवंतपणाची धुगधुगी आणायची धडपड ती करत होती. पण, काहीच उपयोग होत नव्हता. उत्तरेचा हा मुजोर वारा तिला दादच लागू द्यायला तयार नव्हता. त्यामुळे चौपाटीवर फिरायला येणारी माणसं रेतीतच पाय रुतवून कुडकुडत फे-या मारत होती. चालत्या लोकलमध्ये एकमेकांवर आपटून आवाज करणा-या मोकळ्या हँडल्सप्रमाणं त्यांच्या दातांची अवस्था झाली होती. 
    पण, हे वातावरण फार दिवस राहणार नाही. नशीब काढण्यासाठी म्हणून या महानगरात येऊन इथं काही दिवस रेंगाळून नि परिस्थितीशी खडाखडी करत खांदे पाडून पुन्हा गावाची वाट धरणा-यांप्रमाणं ही थंडीही निमूट निघून जाईल.
 थंडी ही काही मुंबईची ओळख नाही. मुंबई म्हंटलं की, अति पाऊस नि अति उष्णता. इथं ऊबदार असं काहीच नाही. नाही म्हणजे नाहीच. अपवाद फक्त हिवाळ्यातल्या काही नशीबवान दिवसांचा. तेव्हा स्वेटर घालून गुलाबी थंडीची मजा अनुभवता येते. गारठा घेऊन शरिरात भिनू पाहणा-या हवेला फक्त नाकपुड्यांतनंच प्रवेश. तिनं चेह-यावर घ्यावं हवं तेवढं नाचून. बाकी स्वेटर करतोच ऊबदार ढालीचं काम. श्वास घेतल्यानंतर पोटात जाणवणारा एक खोल-खोल गारेगार खड्डा आणि बाहेर शरिरावर लोकरीचं मऊमुलायम कवच. ते क्षण अंगावर गोड शिरशिरींची आवर्तनं उठवतात. पण, हे सुख काही दिवसांपुरतंच. 
 आपल्या शहरात असताना प्रत्येक हिवाळ्यातल्या प्रत्येक दिवशी आपण ते सुख अनुभवलं. आपल्याकडं आतापर्यंत चिक्कार स्वेटर्स झालीयत नि ब्रँडेड जर्कीन्स. पण, आतापर्यंत जपून ठेवलीयत ती फक्त दोन स्वेटरं. एक आईनं विणलेलं आणि दुसरं मैत्रिणीनं दिलेलं. आईचं स्वेटर जुनं झालं... विरलं नि त्याची रवानगी माळ्यावरल्या गाठोड्यात झाली. नोकरीसाठी घर सोडून अनेक दिवस झालेत. त्यामुळं ते गाठोडंही आता आठवणींच्या एका कोप-यात पडलंय.
पण, मैत्रिणीनं दिलेलं स्वेटर आपण अजूनही घालतोच. थंडी सहन व्हायची नाही तेव्हा आपल्याला... तुफान कुडकुडायचो. एकदा आपले उकलून पांढरे पडलेले हात पाहून तिनंच बळेबळे मुंडक्यातून सरकवत हे स्वेटर अंगात ढकललं होतं. आता बाह्या जरा अप-या वाटायला लागल्यात, तरी तेच चालवतो. आतासुद्धा तेच अंगावर आहे. गळा झाकून घेणारं आणि काळ्या रेघोट्यांचं... ऊब देणारं जेन्युईन स्वेटर...

  .......एरवी दीड कोटी लोकसंख्येच्या या अस्ताव्यस्त पसरलेल्या महानगराचं वातावरण कधीच ऊब देत नाही. दाहकजाळ उष्णता देतं. घामट तलखी देतं. मानेवरून हलकासा हात फिरवला, तरी हाताला मळाच्या वळ्या लगेच चिकटतात. ऊब आणि गर्मी यात फरक आहे. ऊब आधार देते आणि गर्मी चटके. इथे पावसाचं भुरभुरणं मार्दवी नसतं. डोळ्यांत रक्त उतरलेल्या बेभान माणसानं समोरच्याला दयामाया न दाखवता कानफडावं, त्याप्रमाणं पाऊस सटासट रपके ठेवून देतो. अंगावर कोसळणा-या धारांच्या टोकांशी ब्लेड बांधलंय की काय, असं वाटतं. अशी टोकदार वातावरणीय परिस्थिती. दोन्हींचाही काहीएक मेळ साधत समशीतोष्णता इथे कधी निर्माणच होत नाही. त्यामुळंच बहुधा कायम अशांत तगमग इथं वास्तव्याला असते. हा त्या वातावरणाचा शहरातल्या माणसांवर झालेला परिणाम की, शहरातल्या माणसांमुळं वातावरण दूषित झाल्याचा...? लक्षात येत नाही...............