Friday, September 21, 2012

चहाच्या पेल्यातलं (पहिलं) वादळ

-->
हल्ली टिनपाट वादांना चहाच्या पेल्यातील वादळे म्हंटलं जातं. पण, ज्या वादावरून चहाच्या पेल्यातील वादळ हा शब्दप्रयोग मायम-हाटीत रुढ झाला, तो वाद मात्र अजिबात क्षुल्लक नव्हता. या वादामुळे जे वादळ उठलं, तेदेखील भयंकरच होतं. प्रचलित सामाजिक संकेतांना त्याने हादरे दिले. पुणे ही सामाजिक वाद आणि सुधारणांची भूमी मानली जाते. पहिलं चहाच्या पेल्यातलं वादळदेखील इथंच निर्माण झालं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातलं अखेरचं दशक. जगाचा ज्ञानविस्तार आपल्यापाशीच येऊन थांबतो, अशी तत्कालीन सनातनी पुणेकर ब्राम्हणमंडळींची ठाम समजूत होती. त्यामुळे विज्ञानाशी या ब्रम्हवृंदाचा तितकाच संबंध होता, जितका चर्चचा गॅलिलिओशी.
      इथली सुधारक मंडळी ज्या तडफेने परिवर्तनाच्या चळवळींना चालना देण्याचा प्रयत्न करायचे, तितक्याच आसुरी उत्साहाने त्यांच्या प्रयत्नांत खोडा घालण्यासाठी सनातनी लोक इरेला पेटायचे. पुण्यात जगद्वंद्य समाजसुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला आणि त्यांनी पचवलेल्या विरोधाला जगाच्या पाठीवर तोड नाही. बहुधा कर्मठांच्या या कडव्या विरोधामुळेच सुधारकांच्या व्यक्तित्वाचे आणि कर्तृत्वाचे मोठेपण आणखी उजळून निघाले असेल. ही बोटभर पुणेकर मंडळी ज्या प्राणपणाने समाजात पुरोगामीपण वर्धिष्णू करू पाहत होती, त्याहून अधिक कट्टरता सनातन्यांच्या धार्मिक आचरणात होती. समाजसुधारणेसाठी पुढे पडणारे कुठलेही पाऊल लगेच वादांची वादळे निर्माण करत असे. असे बखेडे उभे करणा-या पुणेकरांना इतर लोकांनी दोष देण्याऐवजी त्यांचे आभार मानले पाहिजेत, असा खास शालजोडीतला आपल्या 'सुधारक'मधून गोपाळ गणेश आगरकरांनी मारला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील पहिले चहाच्या पेल्यातील वादळ निर्माण करण्याचे पितृत्व याच मंडळींकडे जाते. या चहा प्रकरणावरून त्या वेळी सनातन्यांनी प्रचंड कोल्हेकुई केली होती. ती इतकी की, चहाच्या पेल्यांना लावलेली तोंडं आता कुठं लपवायची असा प्रश्न हे अमृततुल्य प्राशन करणा-यांना पडला असेल. अर्थात, मराठी भाषेला नकळतपणे असा शब्दप्रयोग बहाल केल्याबद्दल सनातन्यांचे ऋण मानत 'जैसे थे' स्थितीत रहायचे की इतिहासापासून धडे घेत सुधारकी बाण्याने प्रगतीच्या दिशेने जायचे, हे ज्याच्या-त्याच्या मेंदूच्या घडणावळीवर अवलंबून आहे.
ग्रामण्य प्रकरण या नावाने ही घटना कुख्यात आहे. ग्रामण्य म्हणजे बहिष्कृत करणे अथवा वाळीत टाकणे. युरोपियन मिशनरी पुण्यात शिक्षणप्रसाराचं काम करत होते. गोपाळराव जोशी नामक गृहस्थाने पंचहौद मिशनच्या शाळेतील मिशनरी शिक्षकांकरवी पुण्यातील काही लब्धप्रतिष्ठीत मंडळींना शाळेत एका व्याख्यानाला आमंत्रित केले होते. त्याला रावबहादूर रानडे, लोकमान्य टिळक अशा नामी असामी हजर राहिल्या. व्याख्यानानंतर सर्वांना चहा देण्यात आला. या मंडळींनी मिशन-यांच्या हातचा चहा प्यायल्याची बातमी जोशींनी 'पुणे वैभव' नावाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून पुण्याचे कर्मठ वातावरण ढवळून निघाले. मिशन-यांच्या हातचा चहा पिऊन धर्मभ्रष्ट झाल्यामुळे या मंडळींना बहिष्कृत करावे, अशी सनातन्यांची मागणी होती. चहा पिण्याचे 'पातक' केलेल्या मंडळींची कागाळी थेट शंकराचार्यांपर्यंत नेण्यात आली. क्षुल्लक चहाच्या पेल्यातून खरोखर मोठेच वादळ निर्माण झाले. शंकराचार्यांनी जानेवारी 1892मध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामण्य कमिशन नेमले. म्लेंच्छांच्या हातचा चहा प्यायल्याबद्दल दोषी ठरवत या अपराधाबद्दल प्रत्येकाने वैयक्तिक प्रायश्चित्त घ्यावे, असा निर्णय कमिशनने दिला. सनातन्यांनी उठवलेले काहूर त्यावेळी टिपेला पोहोचले होते. तेव्हा टी पार्टीला उपस्थित असलेल्या टिळक आणि इतर सुधारकांनी प्रायश्चित्त घेण्याचे कबूल केले. लोकनिंदेपुढे सुधारणावाद्यांचे पाय लटपटले. त्यांच्या पुरोगामित्वाचा मुखवटा तिथेच गळून पडला. प्रायश्चित्त घेण्याचा पळपुटेपणा करणा-या या मंडळींची आणि ग्रामण्य प्रकरणाची आगरकरांनी 'सुधारक'मधून यथेच्छ टर उडवली आहे.
" आगगाडीतून प्रवास करताना स्टेशनावरील ख्रिस्ती किंवा मुसलमान लोकांकडून चहाचे पेले, सोडावॉटरच्या बाटल्या आणि गरज लागल्यास कणकेची बिस्कुटे घेणे आणि त्यांच्या योगाने तहान व भूक भागविणे हा सामान्य प्रकार झाला आहे. अशा रितीने आचरण करणारे लोक राजरोसपणे समाजात वावरत असून, आणि त्यांचे घरी हवे ते भिक्षुक आणि शास्त्री जेवत-खात असून त्यांच्या वर्तनाबद्दल कोणीच शंका घेत नाही, हे आश्चर्य नव्हे काय ? " असा प्रश्न विचारत आगरकर पुढे म्हणतात, " आम्हांस तर असे वाटते की, असल्या आचारास अधर्मी आचार म्हणावयाचे असेल, तर असला अधर्म परंपरेने ज्याच्या हातून घडला नाही, असा एकही ब्राम्हण या देशात सापडणार नाही. खुद्द श्रीशंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांच्या पोटात पतितांच्या स्पर्शामुळे त्याज्य होणारे अन्नपाणी प्रतिदिवशी जात आहे व आजपर्यंत पुष्कळ गेले आहे, असे दाखवता येईल."
  स्थित्यंतर हा संस्कृतीचा स्थायीभाव असून उगीच खोटा धर्माभिमान बाळगून जुन्या चाकोरीला चिकटून राहण्याचा अनैसर्गिक प्रयत्न केल्यास समाजमन विकृत होत जाते, असा सज्जड इशाराही या प्रकरणाच्या निमित्ताने आगरकरांनी शंभर वर्षांपूर्वी तत्कालीन धुरिणांना देऊन ठेवला होता. आगरकर भलतेच दूरदृष्टीचे ठरले. अगोदर राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा, या गाजलेल्या टिळक-आगरकर वादात प्रथम सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणा-या आगरकरांचं म्हणणं किती अचूक होतं, याचा प्रत्यक्ष पुरावा आजूबाजूला सुरू असणा-या सामाजिक आणि धार्मिक अनागोंदीवरून मिळतोच आहे. सामाजिक सुधारणांअभावी राजकीय स्वातंत्र्य उपभोगण्यास प्रजा असमर्थ ठरेल, अशी आगरकरांची धारणा होती. ती खरी ठरलीय.
   अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी स्त्रियांना ड्रेसकोड सक्तीचा केलाय. त्याच्या विरोधात एखादीच टिकेची टिटवी टिवटिवली असेल. बाकी सा-या समाजानं ठार बहि-याचं सोंग घेतलंय. या ड्रेसकोड प्रकरणावरून पुरोगामी महाराष्ट्रात वादळ उठेल, अशी अपेक्षा होती. पण, सध्या वादळं घोंघावतात ती फक्त राजकीय नेत्यांच्या चहाच्या कपांमध्ये. एक दिवस बातम्यांचा विषय बनतात आणि शमतात. अहो आगरकर ! हल्ली चहाच्या पेल्यातली वादळं म्हणजे खरोखरीच टिनपाट वाद !! ज्यातून सामाजिक आशय एकदम बाद !!!

Thursday, January 5, 2012

जन हे सुखाचे !

 

       आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये नवंकोरं जोडपं राहतं. नवंकोरं अशासाठी की, दोन महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालंय. लव्ह मॅरेज. लग्न होऊन आठ दिवस होतात न् होतात, तोच त्यांच्यात शब्दयुद्ध सुरू झाले. आता त्यांचा आवाज एवढा वाढतो की, रणक्षेत्राची मर्यादा आपसूक ओलांडली जाते. त्यांचे शाब्दिक बाँबगोळे भिंतींच्या बंधनांना न जुमानता थेट आमच्या हद्दीत येऊन पडतात. आमच्यापैकी कुणीही नाईट शिफ्ट करून सकाळी आलं की, या युद्धाची झळ त्याला बसतेच. देवळातील काकड्याप्रमाणे त्यांच्या भांडणाचा कडाकाही मोठाच असतो. एवढ्याशा वीस मिलीमीटर लांबीच्या मानवी स्वरयंत्रातूनदेखील गगनभेदी आवाज निघू शकतो, याची आम्हाला या दोघांकडे पाहून खात्री पटली आहे. त्यांचा आवाज सुपरसॉनिक विमानाचा पल्ला गाठून आख्ख्या फ्लोअरवर घुमत राहतो. डेसिबलची मर्यादा ओलांडल्याबद्दल नवरा-बायकोविरोधात गुन्हा नोंदवणारा कायदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने अद्याप संमत केलेला नाही, हे यांचं सुदैव! अन्यथा, या दोघांसमवेत जगातील खूप सा-या पती-पत्नींना तुरुंगात खितपत पडावं लागेल, असं माझं स्पष्ट मत आहे. भिंतींना कान असतात, असं म्हणतात. पण, आमच्या भिंतींना ते नाहीत. कारण, या दोघांचे कानठळी आवाज ऐकून त्या ठार बहि-या झाल्या आहेत. भिंतींचं काम खिडक्या करतात. त्या कायम उघड्या असतात. शेजा-यांच्या आदळ-आपटीला झणझणीत शब्दांची फोडणी मिळाली, की तो ठसकेबाज वास आपोआप आमच्या नाकात शिरतो. अंग झटकून ताठ होत सावध झालेल्या कुत्र्याप्रमाणे खिडक्या स्वतःचे कान टवकारतात. पलीकडला शब्द न् शब्द आमच्यापर्यंत पोहोचवतात. रात्रभर काम करून डोळ्यांत दाटलेली झोप यांची भांडणं ऐकून माझ्याशी काडीमोड घेत पसार होते.
         बव्हंशी जोडप्यांच्या भांडणांना तात्त्विक किनार कधीच नसते. किंबहुना अशी किनार नसणा-या भांडणांवरती खास या दोन प्राण्यांचीच मक्तेदारी असते, असेही माझे ठाम मत बनले आहे. कुठल्याही गोष्टीवरून ते वादाचा फुफाटा उडवू शकतात. त्यातून उडालेला खकाणा नाकातोंडात जाऊन जीव गुदमरल्याशिवाय यांना चैन पडत नाही. रविवारची भाजी कुणी आणावी, यावरून ते आठवड्यातून एकदा मिळणा-या सुट्टीचं भजं करून टाकतील. कारणं क्षुल्लक असतात. पण, आव मात्र धर्मयुद्ध लढायला उतरलेल्या युधिष्ठिराचा आणतात. अंगावर हात उगारणं सभ्य समाजात शोभत नाही. त्याला पर्याय म्हणून ही मंडळी एकमेकांच्या इगोला रक्तबंबाळ होईतोवर लाथाळतात. हे शाब्दिक घाव इतके खोल-गहिरे असतात की, नंतर मने सांधता सांधली जात नाहीत. ग्रीष्मात विहिरीने तळ गाठावा त्याप्रमाणे नात्यातली ओल आटत जाते. कोरड्या रखरखीत चिखलासारखे नुसते व्यवहार शिलकीला पडतात. समाजासमोर नात्याचे कलेवर जिवंत असल्याची कसरत करणे नशिबी येते.
         शेजारच्यांची भांडणे हे एक उदाहरण झाले. लोकलमध्ये प्रवास करताना लोकांच्या चेह-याकडे पाहिलं की संसाराचं त्रासलेपण त्यांच्या कपाळावरील जाळीदार आठ्यांमध्ये विणलेलं दिसतं. सप्तपदीच्या वेळी जोडीदारासोबत चालायची शपथ घेतलेली असतानाही जो तो स्वतंत्रपणे प्रवासाला निघाल्यासारखा भासतो. भांडण झालं. ठीक आहे. पण, भांडण मिटवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याचा समजूतदारपणा दाखवण्याऐवजी पती-पत्नीला दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपापल्या ऑफिसातले कलीग का जवळचे वाटावेत ? हे असं का होत चाललंय ?
नात्याच्या मयत होण्याची प्रक्रिया किती गतिमान झाली आहे, हे पाहून आश्चर्य वाटते. चायनामेड प्रॉडक्टप्रमाणेच नात्यांच्याही टिकाऊपणाची खात्री देता येत नाही. पण, तरीही हे लोक एकत्र राहतात. भांडतात, भांडतात आणि भांडतात. अखेर एकाच छताखाली झोपतात. भांडण मिटलंय, असं तर काही दिसत नाही. युद्धभूमीवर दिवसभर मोर्चा सांभाळून थकून गेलेले दोन्ही बाजूंचे सैन्य ज्याप्रमाणे रात्री विश्रांतीसाठी शस्त्रे म्यान करते, तसा तात्पुरता तह या दोघांत होतो. दुस-या दिवशी नव्या दमाने नव्या विषयांची रसद पाठीशी बांधली की, यांचे युद्ध पुन्हा सुरू. लग्न झाल्यानंतर सहा महिने, वर्षा-दोन वर्षातच असले प्रकार सुरू होतात. याला काय एकत्र राहणं आणि संसार करणं म्हणायचं ? हा किंवा ही नसल्यानंतर दुसरं कोणी आपल्या आयुष्यात येईलच, या तारुण्यातल्या मस्तीतून हे येतं ? दोन्ही बाजूंना कमिटमेन्ट नको वाटेनाशी का होते ? मूल्ये तकलादू झालीयत, म्हणून हे चित्र सर्वत्र दिसतंय का ? एक मात्र खरं की, भुसभुशीत वाळूत अजिंठा-वेरूळ आकाराला येत नाही. त्याला घडणीचा ठाशीव कातळच लागतो.
         तुकारामाने म्हंटलंय की, “ जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे; अंतकाळाचे, नाही कोणी.” आजूबाजूचे फक्त सुखाचे वाटेकरी असतात. पाप अथवा दुःख सर्वांनाच नकोसं वाटतं. पण, कुठल्याही परिस्थितीत पती अथवा पत्नीने कायम एकमेकांच्या साथीसाठी सज्ज असावं, अशी अंगभूत अपेक्षा खुद्द या नात्यातच सामावलेली असते. वाल्या कोळ्याच्या बायको-पोरांना फक्त सुखातच हिस्सा हवा होता, हा रामायणातील भाग अपवादात्मक मानला जात होता. पण, हेच अपवादात्मक चित्र आता घराघरातील रामायण बनून समाजव्यवस्थेत सर्वाधिक घट्ट नातं मानलं जाणा-या नवरा-बायकोच्या नातेसंबंधांबाबत सर्रास दिसू लागले आहे. खुद्द नवरा-बायकोच एकमेकांची गणना जनांमध्ये करायला लागले आहेत. 
         गणितातील सेट थेअरीप्रमाणे नवरा-बायकोच्या कॉमन सेटमध्येही फार कमी गोष्टी उरल्या आहेत. दोघांचाही सवता सुभा असतो. नरभक्षी वेलींप्रमाणे संसाराचे पाश काहींना गुदमरवून टाकतात. काही पाण्यात राहूनही अंगाला थेंब लागू न देणा-या कमळाच्या पानाप्रमाणे अलिप्त राहण्याची किमया साधतात. दुधात साखर विरघळून जावी त्याप्रमाणे सुखाने चालणा-या संसारांचे समाजाशी असलेले गुणोत्तर व्यस्त होत चालले आहे. पराकोटीचे व्यक्तिस्वातंत्र्य आणि त्यातून येणारे भकास एकाकीपण पेलण्यासाठी आताचा माणूस सज्ज आहे का, हादेखील प्रश्नच आहे. पण, कसर लागलेल्या लाकडाप्रमाणे नात्यांचा भुसा पडत चालला आहे आणि समाजाचे वासे पोकळ बनू लागले आहेत. पावसात वाहून जाणा-या चिमणीच्या शेणाच्या घरासारखे यांचे संसारदेखील अवकाळीच विस्कटून जात आहेत. नवरा-बायकोच्या बाबतीत ही वेगळीच त-हा दिसू लागली आहे. एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटणं, आता दूरची गोष्ट झाली आहे. घराची सामाईक जागा सोडली, तर एकाच्या जगण्याच्या कप्प्यात दुस-याला जागा असत नाही. नाईलाजास्तव एकमेकांसोबत दिवस कंठले जातात. अशा प्रकारे नाईलाजाचं जगणं सोयीचं व्हावं, यासाठी एकतर कमालीची खुनशी एडजस्टमेन्ट, नाही तर हाराकिरीसाठी लढाईवर निघालेल्या उतरलेल्या सैनिकाचा आवेश. तुझ्यावाचून माझं काहीच अडत नाही, असं दाखवणं अथवा वागणं म्हणजे खुनशी एडजस्टमेन्ट. 
         या समाजदत्त नात्यामध्ये उत्स्फूर्तपणा असा काही उरलेला नाहीच. यांच्या रागातील भरती-ओहोटी समुद्राप्रमाणे नसतेच. ती जागृत ज्वालामुखीसारखी असते. कायम उफाळत राहते. दोघांमधील पोकळीचे भयावहपण कृष्णविवराप्रमाणे खोल-गर्द होत जाते. कधीमधी एकत्र पिक्चरला जाणं, हॉटेलिंग करणं आणि जुहू चौपाटीवर फिरून येणं, असल्या थुकरट गोष्टींनी ही पोकळी भरून येण्याची अपेक्षा करणं, म्हणजे डोकं दुखत असताना गुडघ्याला बाम चोळण्यासारखं आहे. आपलं आतूनच काही तरी निखळलेलं आहे. ते सांधायचं सोडून वरवरच्या मलमपट्ट्या काय कामाच्या ? हे एकत्र राहतात, म्हणजे नेमकं काय करतात ?  प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

Tuesday, December 20, 2011

सातारा ! एक कंदी गाव

      काही गावांचा गोडवा तुमच्या मनात कायम घर करून असतो. तिथल्या आठवणीही मिठास असतात. तुम्ही त्या गावाच्या प्रेमात असता. इतरांना वावगी वाटणारी त्या गावाची एकही गोष्ट तुम्हाला खटकत नाही. कुणी सांगितलं की, ह्या गावात पाणी दिवसाआड येतं. तर तुम्ही म्हणता की, त्यात काय! तरीही भाग्यवानच आहात ! अदिस अबाबा आणि मुम्बासाच्या लोकांना तर आठवड्यातून एकदाच पाणी पहायला मिळतं. कुणी नाकाला रुमाल लावून म्हणाला की, ही उघड्यावरची गटारं आणि डुकरं फार त्रासदायक आहेत हो. तर तुम्ही सांगावं की, मुंबईत तर नाल्यांवर झोपड्या उभ्या राहतात.  कुणी कुरकुरला की, इथले रिक्षावाले भामटे आहेत. फार पैसे उकळतात. तर तुम्ही उत्तरता की, त्यात काय! दिल्लीतले रिक्षावाले तर आख्खा माणूसच लुटून नेतात. सांगायचं तात्पर्य असं की, तुमच्या आवडत्या गावाला नावं ठेवलेली तुम्हाला बिलकुल खपत नाही. आता कुणाला गावद्वेषाची कावीळच झाली असेल, तर त्यांच्यासाठी आपली मराठी भाषा ओवीपासून शिवीपर्यंत किती लवचिक आहे हे तुम्हाला माहिती आहेच. 
 
   ज्या त्या गावाचं वेगळं माहात्म्य असतं, हे खरंच! पण, त्यांच्यातही काही गावं खरंच सुंदर असतात. म्हणजे देवाची कशी काही माणसं अगदी लाडकी असतात ना, तशीच काही गावंसुद्धा देवाची लाडकी असतात, असं वाटतं. त्या गावावर त्याने कायम कृपाछत्र धरलेलं असतं.
   अजिंक्यता-याच्या वळचणीला पाय पोटाशी घेऊन आरामात पहुडलेलं सातारादेखील देवाचं एक लाडकं गाव असावं. इसवी सनाच्या बाराव्या शतकात दुस-या भोजराजानं अजिंक्यतारा बांधून काढला. अजिंक्यता-याच्या शिसवी बुरुजांखाली सातारकरांच्या शेकडो पिढ्या सुखात नांदल्या. आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीच्या नाकावर टिच्चून शिवरायांनी उभे केलेले टीचभर स्वराज्य औरंगजेब जेव्हा धुळीस मिळवण्यास आला, तेव्हा महाराणी ताराऊने याच शहरात राजधानी हलवली आणि मुघलांविरूद्ध एल्गार पुकारला. पुढे शाहू आणि ताराबाईत झालेल्या वारणेच्या तहातून छत्रपतींची थोरली पाती स्थापन झाली ती इथेच. शाहूंची फर्मानं घेऊन पेशवा आणि सरदारमंडळींची घोडी खैबरपार सुसाटली ती इथूनच. अटक, पंजाब, दिल्ली, रोहिलखंड, बुंदेलखंड, गुजरात, माळवा, बंगाल, ओरिसा, बंगळूर, म्हैसूर, भागानगर ( म्हणजे आताचे हैदराबाद), जिंजी, तंजावर... जरीपटक्याच्या स्वागतार्थ नौबती झडल्या नाहीत, असा भारतातला एकही प्रांत नव्हता. मराठेशाहीच्या एका देदीप्यमान पर्वाचे आणि अस्ताचे साक्षीदार असणारे असे हे शहर. सरंजामी वातावरणाच्या खाणाखुणा अजूनही या शहरात दिसतात. ( छे.. हे फारच पॅट्रिऑटिक होतंय राव.. खरे म्हणजे, अजूनही मला आपले पोलिस आणि मिलिटरी शोषणकर्त्या फ्युडल राज्यव्यवस्थेचेच हस्तक वाटतात... जाऊ द्या. मध्ययुगातली वांगी मध्ययुगातच ठेवूयात.)
     कर्मवीर भाऊराव पाटलांनी इथेच कराडजवळच्या काले गावात १९१९मध्ये ‘रयत’चे रोपटे रुजवले. १९२४मध्ये तिचं मुख्यालय साता-यात आणलं. पिढ्यान् पिढ्या औतकाठी करत वावरात ढेकळं तुडवणा-या महाराष्ट्रातल्या बहुजन पोरांना शिक्षणाचा रस्ता दाखवण्याचं काम याच ‘रयत’ने केलं. शिवरायांचं रयतकल्याणाचं ध्येय आधुनिक युगात ही संस्था अशा पद्धतीने साध्य करत आहे. लाखो मुलं या संस्थेच्या शिक्षणकेंद्रांमध्ये शिकत आहेत. ‘रयत’च्या बोधचिन्हावरचा वटवृक्ष संस्थेचा महाराष्ट्रभर वाढलेला पसारा दाखवतो. (बाप रे! लिहिण्याची ऊर्मी आतून आली की, तिला शैली, रुपबंध आणि आशयाच्या आटोपशीरतेचं बंधन उरत नाही. बहुतेक हा लेख त्याच वाटेवर आहे.)
    तर सध्यादेखील तितक्याच प्रमाणात ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या संपन्न असलेल्या सातारा शहरात आमच्या एका मित्राचे परवा लग्न होते. मुहूर्त दुपारी साडेबाराचा होता. आम्ही निशाचर आहोत. त्यामुळे लग्नाच्या दिवशी पहाटे उठून साता-याची एसटी पकडण्याची हिंमत कुणातच नव्हती. आदल्या रात्री बारा वाजता मुंबई सेंट्रलहून सुटणा-या गाडीने निघायचे ठरले. मुंबईत तेव्हा गाल हळुवारपणे हुळहुळतील, एवढीच माफक गोड थंडी पडली होती. यावरून साता-यात थंडीने कहर केला असणार, या शंकेची पाल माझ्या मेंदूत चुकचुकली. एसटी सुटण्यासाठी एक तास बाकी असताना मी रुममध्ये स्वेटर शोधू लागलो. पोलिसी कुत्र्यासारखी सगळी रुम हुंगूनही अपेक्षित ऐवज हाती लागला नाही. आमच्यापैकी दोघे स्वेटर- कानटोपी घालून थंडीच्या मुकाबल्यासाठी जय्यत तयारीनिशी सज्ज झाले. उरलेला एक माझ्यासारखाच लढाईवर निघालेला, परंतु ढाल-तलवार नसलेला शेंदाड शिपाई निघाला. स्वेटरशिवायच निघावे लागणार, या कल्पनेने आम्ही दोघेही गारठलो. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मी मोबाईलवरून गणेशअण्णाचा धावा केला. देव आणि दैव, या दोन्हींवर काही माझा विश्वास नाही. पण, गणेशअण्णावर आहे. अण्णाजीनं तत्पर कृपा केली. लगोलग त्याचा पो-या पाठवला. त्यानं दात विचकत पिशवीत पेपराच्या आत गुंडाळलेली ओल्ड मंक काढून माझ्या हातात ठेवली. बाकीच्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. यामुळे कंडक्टर आपल्याला अर्ध्या वाटेतच खाली उतरवू शकतो, अशी भिती त्यांनी मला घातली. पण, रमचे औषधी गुणधर्म मी त्यांच्या गळी उतरवले. न पाहिलेल्या कंडक्टरच्या वतीने त्याच्या सद्वर्तनाची हमीही दिली. शिवाय, अजूनही माणसं रात्रीच झोपतात. त्यांचे आपल्यासारखे नसते, हे मी त्यांना पटवून दिले. अखेर कडवट तोंड करत मित्रांनी अंगावरून वारं गेल्यासारखं आपले चेहरे वाकडेतिकडे केले. या चित्रविचित्र हावभावांनाच परवानगी समजत ओल्ड मंक कोकच्या बाटलीत भरून बॅगेत टाकली. 
    एसटीतून प्रवास करायच्या कल्पनेने एक जण आधीपासूनच नाखूष होता. लब्धप्रतिष्ठीत मंडळी एसटीला लाल डब्बा म्हणून हिणवत असतात. परंतु, उपजीविकेसाठी शहरात स्थलांतर करणा-यांना आपली मुळं नेमकी कुठं रुजलेली आहेत, याची आठवण हा लाल डब्बा करून देत असतो. युरोप-अमेरिकेत रंगावरून वर्णाला आणि आपल्याकडे आडनावावरून जातीला हीन लेखण्याचा प्रकार केला जातो. एसटीला नाके मुरडणा-यांची मानसिकता याच जातकुळीतली असते. लोक सेवेबद्दल तक्रारी करायच्या सोडून एसटीच्या रंगरुपाचीच गा-हाणी गात असतात. असो.
    गाडी खंडाळ्याचा घाट चढून पुण्याकडे येऊ लागली, तशी थंडी झोंबू लागली. पण, तोपर्यंत अर्ध्या-अधिक ओल्ड मंकने आपले काम चोख बजावले होते. मळ्यात राखणीवर असलेल्या कुत्र्यासारखी ती आमच्यापासून थंडीला दूर पळवून लावत होती. तिने पोटात निर्माण केलेली ऊब शरीरभर पोहोचली, तेव्हा डोळ्यांची दारे आपोआप मिटून गेली.
     मोळाच्या ओढ्याजवळ असलेल्या शिंदे फर्निचरवाल्याने एसटी प्रवाशांच्या अभिवादनासाठी सातारा स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळच फ्लेक्स बोर्ड लावला होता. त्याचे स्वागत स्वीकारून आमची गाडी आत शिरली, तेव्हा सकाळचे साडेसहा वाजले होते.
    जवळपास साडेतीन-चार वर्षांनंतर मी या गावात पाय ठेवला होता. त्या काळात मुंबईच्या बाहेर इतर राज्यांत जाणं झालं. पण, महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावात मी जाऊ शकलो नव्हतो. बरं वाटलं. निरोप घेतेवेळी या शहराची जी चित्रं मनात जपून नेली होती, ती अजिबातच पुसट झाली नव्हती. चित्रे पुसट झाली की, आठवणींचे रंगही फिके होण्याची भिती असते. मग आपल्या लेखी स्थळाचंही महत्त्व उरत नाही. पण, आता तसं काही झालं नाही. जणू हे गाव माझ्या सवयीचंच होतं.
     आवरून मंगल कार्यालयात पोहोचलो. मित्राला तोंड दाखवण्याचा सोपस्कार पार पाडला. त्याने नव्या वहिनींशी ओळख करून दिली. माघारी फिरलो. पोवईनाक्यावर लाटकरांचे कंदी पेढे तोंडात कोंबले. (हे चितळ्यांप्रमाणे मुंबईत शाखा का काढत नाहीत ?) स्टँडवर आलो. सज्जनगडची एसटी पकडली. 

.
.

रात्री गडावरल्या मारुतीच्या मंदिराबाहेरच्या ओट्यावर बसून आकाशातले तारे मोजायचे होते. ढगांच्या कुटीतल्या यज्ञवेदीवर अनंतकाळापासून ठाण मांडून बसलेल्या वृद्ध सप्तर्षींना नमस्कार करायचा होता. अलिप्तपणे स्वतःपुरतंच चमकणा-या तरूण व्याधाला मुंबईला नोकरीसाठी येतोस का, असं विचारायचं होतं. कोलमडून जात असताना आधाराचा हात पुढे करणा-या एकांतातल्या क्षणांशी भांडायचे होते. समोर उरमोडी धरणाच्या आरश्यासारख्या पसरलेल्या पात्रात स्वतःचा चेहरा निरखायचा होता. मुंबईच्या अप्रतिहत प्रवाहात स्वतःला झोकून दिल्यापासून या धरणाच्या सांडव्यावरून आणि आयुष्याच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं, त्याचा जमाखर्च मांडायचा होता...

Friday, September 30, 2011

निळे निर्माल्य !



    जेवण पचवून झोपण्याच्या तयारीत असलेली मुंबई शेवटचा ढेकर देत होती, तेव्हा दिग्विजय लॅपटॉपवर खुडबुडत होता. त्याचा डेस्क सोडला तर ऑफिसातल्या सगळ्या लाईट्स केव्हाच स्वतःला विझवून अंधारातल्या घुबडाप्रमाणं निपचित बसल्या होत्या. घरी जायच्या ओढीनं डेस्कवरल्या इतर की-बोर्डांवरच्या बोटांनाही जरा वेग आल्याचे आवाजावरून जाणवत होते. टायपून टायपून मानेला रग लागल्यानं त्यानं काही सेकंदांसाठी हातांना सुट्टी दिली. अवघडलेल्या शिरा मोकळ्या करण्यासाठी खोलवर श्वास घेत त्यानं मान डावीकडं वळवली. शिरांना ताण बसल्यासारखं जाणवलं. परत तिला लॅपटॉपच्या पुढ्यात आणून रोखून धरलेला श्वास सोडणार, तेवढ्यात शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरल्या क्रेनच्या थोबाडात फिट्ट केलेला हॅलोजन ऑफिसच्या पारदर्शक निळ्या काचेला न जुमानता दिग्विजयच्या डोळ्यांत सूर्यासारखा रुतला. 

    त्या रासवट पिवळ्या उजेडानं ऑफिसातली तलम पांढरी शांतता विस्कटली. बुब्बुळांमध्ये आग पेटली. त्या भगभगीत प्रकाशानं आपले डोळे जळून कोळसे होतील की काय, अशी भिती वाटून त्यानं पापण्या मिटून घेतल्या. क्रेन वळाली, तसा हॅलोजनही तोंड फिरवून तिच्यासोबत चालता झाला. दिग्विजयनं डोळे उघडले, तेव्हा ऑफिसमधला मृदू पांढरा प्रकाश देवदूताप्रमाणं पुन्हा परतला होता. क्रेन आता थांबली होती. त्यासरशी मघाशी त्रास दिलेल्या त्या परप्रकाशी सूर्याचं परिवलनही बंद पडलं होतं.
    दिग्विजयचं काम आटपलं होतं. पण, कॉम्प्युटरच्या स्क्रीनला चिकटलेला बॉस काही हलायला मागत नव्हता. तो निघेपर्यंत बाहेर पडायला काही चान्सच नव्हता. शेजारी पाहिलं, तेव्हा मांडीवर बॅग ठेवून बसलेल्या प्रितीनं बाकीच्या सेक्शन्सकडल्या अंधाराकडं सूचक बोट केलं. घरी जाण्यासाठी बॉसकडून सामूहिक परवानगी दिग्विजयनं आणावी, अशी तिची इच्छा होती. मी काय करू शकणार बये! आमच्यापैकी कुणाचं नाही तरी तुझंच ऐकेल बॉस... पण, ओठांशी बाणासारखं आलेलं वाक्य त्यानं गिळलं आणि चेह-याची प्रत्यंचा ताणून हसल्यासारखं दाखवत मानेनंच नाही म्हणून सांगितलं. ती चडफडली. त्याला उगीचच तिच्यावर दया आली.
      काही मिनिटं तोदेखील इतरांप्रमाणंच अस्वस्थ बसून राहिला. जीन्सच्या डाव्या खिशात हुळहुळल्यासारखं झालं. गडबडीत त्यानं मोबाईल कानाला लावला.   
             “ सत्संगाला येतोस का?” दिनेशनं कानात अभंग खणकावला. त्याच्या शब्दांच्या टिप-या मेंदूपर्यंत झिणझिणत गेल्या. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणं डोळे आपोआप समोरच्या टीव्हीकडं वळले. ब्रेकिंग न्यूजच्या पट्टीपाशी थबकले नि तोंडातून शिटणा-या अँकरला वळसा घालून ते उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात सेकंदा-सेकंदाला लुकलुकणा-या घड्याळाच्या दिशेनं लपकले. आकडे नजरेत भरवून घेतले. अकरा त्रेचाळीस. च्यायला! सकाळपासनं मरमर करून दमलोय आपण. शिवाय सत्संग म्हंटलं की तो स्वस्त आरसी पाजणार, जिचा हँगओव्हर दुस-या दिवशी दुपारपर्यंत उतरत नाही. वेश्यांवरच्या (त्याच्या भाषेत कॉलगर्ल्स) अर्ध्या-कच्च्या रिसर्चचे इन्फरन्सेस ऐकवणार. आपल्या स्कँडिनेव्हियन एनजीओची टिमकी वाजवणार. फ्रॉईड, युंग, लोवेनफेल्ड, एहरेनफेल, क्रॉली, श्नाईल्त्झर ,अर्नेस्ट जोन्स... असे जाडजूड संदर्भ फेकणार की, जांभईसाठीसुद्धा तोंड उघडता येणार नाही. कुणी वेश्येनं थेट निरुपण केलं तर ठीक आहे. पण, दिन्याचं रात्रभर चालणारं प्रवचन कोण ऐकून घेणार. तसंही ‘तुका म्हणे शीण, होईल अनुभवावीण...’ अशा आशयाचं काही तरी तुकोबांनी म्हंटलंच आहे. त्यापेक्षा नक्कोच जाऊयात, असा विचार दिग्विजयनं केला.  
    टीव्हीवरला वेळेचा आकडा दिनेशच्या कानात ओतत तो म्हणाला, “ ही काय वेळाय का ? अजून बॉससुद्धा ऑफिसातून बाहेर पडला नाहिए…” “ वेळेचं तू नको सांगू मला. मागच्या बुधवारी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तुमची गँग पहाटे तीन वाजता काकड आरतीला जमा झाली होती काय ? आख्ख्या पार्कावर काळे ढग जमा झालेले पाहिले मी तुम्ही फुकलेल्या सिगारेटींच्या धुरांचे. कसला बोडक्याचा इंटलेक्च्युअल डिस्कोर्स सुरू होता रे तुमचा ? एकाला तरी तोल सांभाळून उभं राहता येत होतं का तुमच्यापैकी ?” प्रश्नासुरासारखा तो ‘उत्तर दे, नाही तर माझ्याबरोबर ये’च्या पवित्र्यात पलीकडून थेट अंगावरच चाल करून आला. पार्कात काय ‘भरीव’ विचारमंथन झालं, हे दिनेशला आठवडा झालं तरी सांगितलं नव्हतं. म्हणून तो चिडल्याचं दिग्विजयच्या लक्षात आलं. तो शांतपणे ‘निघालो’ म्हणाला. अर्थात, मागच्या वेळची निम्मी जॅक डॅनिएल्स दिनेशकडं अजूनही शिल्लक असल्याची ट्यूब ऐन वेळी त्याच्या डोक्यात पेटली होती.
       “ काम नाहिए तर उगीच बॉससमोर शेपटी हलवत बसून राहण्यात अर्थ आहे का ?”  दिग्विजयवर तणतणत शेवटी तो म्हणाला, “ बच्चे ! दो घंटे से निगार बैठी हैं यहाँ पें. मिलना है  तो जल्दी से टॅक्सी पकड.” पलीकडून नाजूक बोलण्याचा आवाज ऐकू आला. शब्द कळले नाहीत. पण, आवाज परिचयाचा जाणवला. तो ऐकून दिग्विजय शाळकरी पोरासारखा धांदलला. जागेवरून तटकन उठत ओरडला, “ फुकणीच्या ! बाकीची लांबड लावत बसण्यापेक्षा आधी मुद्द्याचं बोलायला काय झालं होतं ?”  निगारचा गोरा-भुरा शांत सोशीक चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. निळ्या सलवार-कमीजमध्ये गुलाबासारखी डवरून आलेली निगार. ती मागल्या वेळी भेटली होती, तेव्हा किती तरी प्रश्नांनी त्याच्या मेंदूला खिळे ठोकले होते. त्यांची उत्तरं मिळवायची राहून गेली होती. आज कुठल्याही परिस्थितीत भेटायलाच हवं तिला.. मनाशी विचार करत दिग्विजयनं फोन कट केला नि बॉससमोर जाऊन उभा राहिला. “सर! घाई आहे. जाऊ का ?”
           “ कुठल्या दिशेचे प्रवासी तुम्ही ?” बॉसनं फिलॉसॉफिकल फिरकी घेतली. “म्हणजे ?” “ अरे! सहज आपलं जनरल नॉलेज म्हणून विचारलं. चाललायस कुठं ? अंधेरी की कुलाबा ?” “कुलाबा...” बॉसचा खेळकर मूड हीच संमती असल्याचं चाणाक्षपणे लक्षात येऊन तो जाण्यासाठी वळला. पाठून भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातल्या तिरकस पात्राप्रमाणं बॉसनं डायलॉग हाणला, “ लई दिसांनी तुमचं फिरंगी पाखरू आलंया वाटतं. जावा बिगीबिगी…” ह्युमन काय, वुमन डिग्निटीपण नाही याला. बायको, आई आणि बहीण सोडली की, प्रत्येक बाई याच्या दृष्टीनं पाखरू! जाऊ देत. त्याचा तरी काय दोष ? समाजात प्रत्येक संबंधाला लेबल लावल्याशिवाय भागतच नाही. निगारकडं तर साधं रेशनकार्डही नाही. बंगाली की बांग्लादेशी आहे ती. वीतभर पोटाला कुठे आखीव सीमांचं बंधन असतं. रेशनकार्ड नसलेली माणसं इथल्या व्यवस्थेत सर्वार्थानं अदखलपात्र असतात. मग अशा अस्तित्वातच नसलेल्या माणसांशी उरलेला समाज आपली बांधिलकी अशी ती मानतच नाही. पण, ही माणसं हाडामांसानिशी असतातच अवतीभोवती. अशा किती कोवळ्या गुलाबांना हे शहर चुरगाळून टाकत असेल ?
       प्रश्नांचा असह्य ठणका डोक्यात घेऊन दिग्विजय लिफ्टनं सरसरत खाली आला. गेटवर झोपाळलेल्या चेह-यानं उभारलेल्या टॅक्सीवाल्याला ‘कुलाबा’ असं जोरात ओरडून सांगितलं. टॅक्सीवाल्यानं फाटदिशी मीटर खाली घेत डोळ्यांत साकळलेली झोप तंबाखूच्या पिंकेसोबत थुंकून टाकली. वारा जास्तच माजावर आल्यामुळं टॅक्सीवाल्यानं स्वतःच्या बाजूच्या काचा वर केल्या होत्या. दोन्ही बाजूंच्या डेरेदार झाडांनी गाडी कॅडेल रोडच्या तोंडाला लागत असल्याची वर्दी दिली. चौपाटीवरून येणारी हवा इमारतींचा अडथळा चुकवून त्या काळ्या-करड्या काँक्रीटच्या रस्त्यावर स्वतःला वा-यावर सोडून दिल्यासारखी बागडत होती.
      एकुलतं गि-हाईक गवसल्याच्या भावनेतून हवेनं नखरेल होत दिग्विजयचा कान हलक्या दातांनी चावला. मधमाशीचा डंख बसल्यासारखा तो काही सेकंद शहारला. आता तिचा मुलायम हात दिग्विजयचा चेहरा कुरवाळू लागला होता.
     अस्वस्थ होत त्यानं खिशातून बेन्सन लाईटचं पाकीट काढलं. ओठांमध्ये धरलेली सिगारेट डाव्या हाताचा आडोसा करून निरांजनाप्रमाणं तेवणा-या लायटरच्या मंद आगीवर पेटवली. काही सेकंद त्यानं धूर तसाच फुफ्फुसांत घोळवला आणि उरलेला लयीत तोंडातून बाहेर सोडला. शरिरातून निघून बाहेर पडलेल्या त्या धुराचा आकार त्याला मन दगड केलेल्या रानटी पुरुषासारखा भासला. सिगारेटच्या उग्र वासानं दिग्विजयला झोंबून राहिलेली हवा हात-पाय आपटत बाजूला झाली, तेव्हा आपल्या आत्म्याला आणि शरिराला चिकटलेला सगळा किटाळ निघून गेल्यासारखं त्याला वाटलं. बरं वाटल्यासरशी त्यानं आपल्याही बाजूच्या काचा वर केल्या.  
      टॅक्सीत आरंभलेल्या होमात एकापाठोपाठ एक शिलगावलेल्या सिगारेटी फुफ्फुसांचा बळी मागत होत्या. टॅक्सीवाल्यानं शहाणं होत स्वतःच्या काचा खाली घेतल्या. पण, दिग्विजयला कशाचीच फिकीर नव्हती. अखेर धुरांच्या रथातून निगार खाली उतरली आणि दिग्विजयजवळ गेली. “ कितनी पिओगे आप?”, असं म्हणत त्याच्या तोंडातून सिगारेट काढून घेत पायाखाली चुरडली. ही शेवटची, असे तो म्हणणार इतक्यात आपला गोल्डन कश ओढून झाल्याचं, हातात शेवटल्या सिगारेटची केवळ बट उरल्याचं, पाकिट संपल्याचं आणि तेवढ्याशा वेळात निगार स्वप्नात येऊन गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.
      दिग्विजयनं काचा खाली घेत ओलसर हवेला नाकात प्रवेश करू दिला, तेव्हा त्याला कोरड्या पडलेल्या फुफ्फुसांवर बर्फाचा गोळा फिरवल्यासारखं वाटलं.
....
बिनस्वेटराचं शहर - भाग 3