
" चिंतनातून तत्वज्ञानाचे दालन समृद्ध करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. पण चिंतनातून मांडलेले विचार वर्तनात अंमलात आणण्यासाठी लागणारी निष्ठा फार कमी जणांनी दाखवली. कामूने दोन्हींची सांगड घातली. आयुष्यही तसंच जगला. न्याय-समतेचा आग्रह धरणारा आणि अराजकतावादाला कडाडून विरोध करणारा कामू विरळातला विरळा तत्त्वचिंतक म्हणावा लागेल."
आजपासून बरोब्बर पन्नास वर्षापूर्वी ४ जानेवारीला आल्बेर कामूला जगाचा निरोप घ्यावा लागला. फ्रान्समधल्या विलेब्लेविन गावात मोटार अपघातात तो मरण पावला. विसाव्या शतकावर ज्या तत्त्ववेत्त्यांचा प्रभाव पडला आहे, त्यांच्या मांदियाळीत कामूला अग्रक्रम द्यावाच लागेल. लेखक, तत्त्वचिंतक आणि पत्रकार अशा भूमिकांत समर्थपणे वावरलेल्या कामूला त्याच्या समकालिनांनी अस्तित्ववादाचा पुरस्कर्ता म्हणून संबोधलं, तरी कामूनं स्वत:ला कुठल्याही एका गटात बसवलं नाही. संस्कृतीचं देणं म्हणून पाश्चिमात्य समाजानं जोपासलेल्या अनेक रूढ विचारांना त्याने हादरे दिले. ते अडगळीत टाकायला लावले. सॉक्रेटिस-प्लेटो-अॅरिस्टॉटलच्या विचारांतून रुजलेली पाश्चिमात्य तत्त्वप्रणाली कामूने आणखी समृद्ध केली.
फ्रेंचांची वसाहत असलेल्या अल्जिरियात १९१३मध्ये गरीब शेतकरी कुटुंबात कामूचा जन्म झाला. फ्रेंच सैन्यात असलेले त्याचे वडील पहिल्या महायुद्धात मारले गेले. कामूचा तरुणपणापर्यंतचा काळ फारच हलाखीत गेला. १९२३मध्ये तो शिक्षणासाठी अल्जिअर्स विद्यापीठात दाखल झाला. फुटबॉलमध्ये प्रावीण्य मिळवणा-या कामूला क्षयबाधा झाल्याने स्वत:च्या छंदावर पाणी सोडावं लागलं. त्याने मग स्वत:ला अभ्यासालाच जुंपून घेतलं. १९३५मध्ये त्याने तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली. त्यानंतर वर्षभरातच कामूच्या प्रबंधाला मान्यता देत विद्यापीठानं पदव्युत्तर पदवीही बहाल केली. त्या काळात फ्रान्स हे युरोपातल्या सर्व सामाजिक चळवळींचं केंद्रस्थान होतं. रशियातली क्रांती यशस्वी झाल्याने फ्रान्समध्येही सोशालिस्ट चळवळी सुरू होत्या. साहजिकच कामूलाही डाव्या विचारांचं आकर्षण निर्माण झालं. त्याच वेळी त्याने फ्रान्सच्या जोखडात असलेल्या अल्जिरियाच्या स्वातंत्र्याला पाठिंबा जाहीर करणारी मतं व्यक्त केली. फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाला हे रुचलं नाही. त्यांनी कामूची ‘गद्दार’ म्हणून हेटाळणी करीत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर ‘अॅनार्किझम’च्या प्रेमात पडलेल्या कामूने पूर्व-पश्चिम जर्मनीच्या एकत्रीकरणाला पाठिंबा दिला. १९५६मध्ये हंगेरीत कामगारांनी केलेल्या उठावामागे ठामपणे उभा राहिला. कामूचं वैवाहिक आयुष्य मात्र अजिबात सुखाचं गेलं नाही. त्याची बायको ‘ड्रग अॅडिक्ट’ होती. त्याहीपेक्षा तिच्या विवाहबाह्य प्रकरणांनी कामूचं कौटुंबिक जीवन फारच तणावाचं राहिलं. पण या बाबतीत सगळा दोष तिच्याकडेच जात नाही. कामूदेखील बाहेरख्यालीपणासाठी तिच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होता. कौटुंबिक आघाडीवर एवढं सारं घडत असताना सामाजिक क्षेत्रात त्याचं नाव होऊ लागलं होतं. सात्र्शी मैत्रीदेखील याच काळात झाली. एवढ्यात क्षयाची बाधा उफाळली. कामूला सार्वजनिक जीवनातून दोन वर्ष सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. क्रांतीचं तात्त्विक भूमिकेतून विश्लेषण करणारं ‘द रिबेल’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. कामूला साम्यवादाचं असलेलं वावडं, याच पुस्तकानं सिद्ध केलं. पाच कादंब-या, सात वैचारिक ग्रंथांसह अनेक नाटकं आणि लघुकथा कामूने लिहिल्या.
कामूचा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला दबदबा वाढला होता. १९५७मध्ये कामूच्या कामगिरीची दखल घेत त्याला साहित्याचं नोबेल देऊन गौरवण्यात आलं. वयाच्या ४३व्या वर्षी जगातील अत्युच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला तो एकमेव साहित्यिक असावा. त्यानंतर तीनच वर्षानी अपघातात त्याचा मृत्यू झाला.
कामूचं नाव झालं, ते त्याच्या ‘अॅबसर्डिझम’वरील विचारांमुळं! त्याच्या नावावर ‘अॅबसर्डिझम’च्या जनकत्वाचं श्रेय थोपवण्याचा प्रयत्न झाला, पण कामूनं तेही नम्रपणे नाकारलं. डॅनिश तत्त्ववेत्ता किर्केगार्द यानं ‘अॅबसर्डिझम’ची कल्पना मूर्त स्वरूपात मांडली. ज्याँ पॉल सार्त् ती पुढं घेऊन गेला आणि कामूनं ‘द मिथ ऑफ सिसिफस’ लिहून तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. विश्वाचा अर्थ शोधण्याचे मानवजातीचे प्रयत्न निष्फळ आहेत. कारण व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण विश्वाच्या अस्तित्वाचा आपण अर्थ लावू पाहतो, तेव्हा त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे तसा अर्थ शोधू पाहणं निर्थक ठरतं, ही ‘अॅबसर्डिझम’ची मूळ विचारधारा आहे. ‘द मिथ ऑफ सिसिफस’द्वारे कामूनं तिला आणखी बळकटी दिली. कामूनं दुसरं महायुद्ध पाहिलं. फ्रान्ससारख्या जगातल्या नितांतसुंदर देशाची झालेली वाताहतही त्यानं अनुभवली. या महायुद्धानं पूर्वीच्या चौकटी मोडून नव्या दिशेने विचार करणं कामूला भाग पाडलं. या वैचारिक घुसळणीतूनच तो ‘अॅबसर्डिझम’चा पुरस्कर्ता बनला. ‘द प्लेग’, ‘ द टू साइड्स ऑफ कॉइन’, ‘ न्यु पायटल्स’, ‘ द स्ट्रेंजर’ अशा पुस्तकांतून कामूचा ‘अॅबसर्डिझम’ दृग्गोचर होतो. दोन महायुद्धांचे चटके अनुभवलेल्या कामूच्या लिखाणातून हिंसेला तीव्र विरोध जाणवतो. लोकशाही तत्त्वांचा तो कट्टर पुरस्कर्ता होता.
चिंतनातून तत्वज्ञानाचे दालन समृद्ध करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. पण चिंतनातून मांडलेले विचार वर्तनात अंमलात आणण्यासाठी लागणारी निष्ठा फार कमी जणांनी दाखवली. कामूने दोन्हींची सांगड घातली. आयुष्यही तसंच जगला. न्याय-समतेचा आग्रह धरणारा आणि अराजकतावादाला कडाडून विरोध करणारा कामू विरळातला विरळा तत्त्वचिंतक म्हणावा लागेल.