Monday, August 29, 2011

श्रावण जाशी, हर्ष मानसी !



   मुंबईत किमान दर्जाची शांततासुद्धा विकत घ्यावी लागते. आम्हा मित्रमंडळींना ती विकत घेण्यासाठी ड्रीमलँड बार हा अतिशय स्वस्त पर्याय आहे. शांतता विकणा-या मॉल्सच्या भपकेबाज गर्दीत अंग चोरून उभं राहिलेलं किराणा मालाचं दुकान असावं, तसा हा बार आहे. मनासारखा एकांत आणि शटर अगोदरच बंद झालं तरी रात्री दीडपर्यंत गप्पा मारण्याची मुभा, या दोन गोष्टींमुळे आम्ही या बारवर निहायत खूष असतो. बारचा मालक गणेशअण्णा तर आमच्या दृष्टीने संतच आहे. बिलावर नेहमीच वीस टक्के डिस्काऊंट. कधी-कधी शिर्डीहून जाऊन आलेला असला की, एक ड्रिंक मोफत देतो. अण्णाच्या पाप-पुण्याविषयीच्या कल्पना नेमक्या काय आहेत, ते मी एकदा त्याच्याकडून समजावून घेणार आहे. 

     शुक्रवारी आम्ही आणि गणेशअण्णादेखील आझाद मैदानावर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून आलो होतो. त्याशिवाय, आम्ही फेसबुकवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणा-या प्रत्येक वॉलवर लाईकचं सिमेंटही थापलंय. मैदानावर उभ्या असलेल्या अनेकांच्या डोक्यावर टोप्या होत्या. पण, आमच्यापैकी कुणाचीच त्या टोप्या घालण्याची हिंमत झाली नाही. कारण, टोप्यांची किंमत आम्हाला फार जास्तच वाटली. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक चारित्र्य आणि थोडासा त्याग. अशा टोपीच्या वजनाने डोकेच दडपून जायचे. किमान गणेशअण्णाला सरकारी वेळेत बार बंद करायला लावूयात आणि मग ती टोपी घालूयात, असा विचार करून आम्ही तिथून निघालो होतो. टोपी घालायची असेल, तर सुरुवातीला एवढी माफक पात्रता तरी आम्ही मिळवायला हवी. आमच्या देशाला पहिल्याच गांधींचे विचार अजूनही पेलवत नाहिएत आणि ते समजावून देण्या-घेण्याची तसदीही कुणी दाखवत नाहिएत. इथे टोपी घातली, रस्त्यावर तासाभरापुरतं एकत्र आलं आणि फेसबुकवर लाईक केलं, की झालं. केवढं सोप्पं आंदोलन आणि केवढी सोप्पी क्रांती !
    अण्णा आणि त्यांचे मुंबई- राळेगणमधले शेलके कार्यकर्ते यांनी सरकारच्या हृदयपरिवर्तनासाठी उपोषण केलं आणि ते यशस्वी झाले. गांधीजी राज्यसंस्थेला necessary evil  म्हणायचे. सुरुवातीस राज्यसंस्थेची मदत घेऊन शोषणमुक्त आणि समतावादी समाज निर्माण केल्यावर नंतर तिची अजिबात गरज उरणार नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. कारण, आपल्या तत्त्वांवर चालणारा माणूस शासनव्यवस्थेचा पांगुळगाडा न घेण्याइतपत नक्कीच प्रगल्भ होईल, इतकी त्यांची त्या तत्त्वांवर श्रद्धा होती. आपल्यात तितके माणूसपण आले आहे, असे वाटण्याजोगी परिस्थिती आज नाही. पण, आपण किमान त्या दिशेने वाटचाल तर करू शकतो. अण्णांसारखा एक गांधीवादी न्याय्य मागण्यांसाठी सरकारला झुकवतो. आपण सारेच गांधीवादी झालो, तर सगळंच विधायक का नाही होऊ शकणार ? सरकारची गरजच उरणार नाही. मग आता नागरिक म्हणून आपण आत्मपरिक्षण करणार आहोत की नाही? भ्रष्टाचाराला विरोध आणि प्रामाणिकपणाचा आग्रह, हे एक मूल्य म्हणून समाजात रुजावं आणि रुजवावं लागतं, हे आमच्या कुणाच्या गावीच नाही. प्रेषित, महात्मा आणि अण्णा समाजसफाईचं काम करतीलच. आता घटनेच्या चौकटीत राहून आपण आपली मने खराट्याने खरवडणार आहोत की नाही, हा प्रश्न आहे.  
    आमच्यातल्या अपूर्णत्वाची जाणीव आम्हाला आहे. म्हणून ती टोपी डोक्यावर चढवण्याची हिंमत होऊ शकली नाही. साईबाबांच्या दानपेटीत हजारो रुपयांची बंडलं बिनदिक्कत टाकणा-या गणेशअण्णानं मात्र ही टोपी तितक्याच सहजतेने घातली. त्याला त्याविषयी विचारलं, तेव्हा तो हसत म्हणाला, अरे! मैं भी अण्णा हैं... दारु पिऊन पिऊन खोबणीबाहेर आलेले त्याचे बटाट्यासारखे डोळे तसेच ओढून घ्यावेत, असं वाटलं होतं. पण, आवरलं. आम्ही काय किंवा तो काय... ह्या अण्णापासून त्या अण्णांपर्यंतचा प्रवास फार मोठा आहे... जाणीव होणं महत्त्वाचं. तिथून पुढला प्रवास करणे, हे ज्याच्या-त्याच्या हातात आहे. तेदेखील असोच.
     आपल्या बारमध्ये दारू पिऊन तार लागलेल्या गि-हाईकांना आणखी उपदेशामृत पाजणे, हा गणेशअण्णाचा छंद आहे. काऊंटरसमोरच्या निमुळत्या उच्चासनावर बसून तो बेसुमार बडबडणा-या गि-हाईकांच्या जिभांना लगाम घालत ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ अशा आविर्भावात बरळत असतो. खोचकपणे का होईना, त्याला संत म्हणण्यापाठीमागचं हे आणखी एक कारण. आपल्या तोंडाचा पट्टा हा संत अजिबात उसंत न घेता चालवीत असतो. परंतु, त्याची एकट्याची संतत्वाची आभा बारला प्रकाशमान करण्यास असमर्थ ठरते. त्यामुळे रात्री उशिरा ऑफिसमधून सुटल्यानंतर आम्ही अकलेचे दिवे पाजळवत ( की उजळवत ?) धुरकट अंधाराने व्यापलेला तो बार आमच्या परीने देदीप्यमान करण्याचा प्रयत्न करत बसतो. आम्ही त्या बारमध्ये ज्या सेक्शनमध्ये बसतो, तिथं कुणाचाही आवाज ऐकू येत नाही. अर्थात त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कारण तिथं दारुचे रेट जवळपास पाऊणपट जास्त आहेत. त्यामुळेच या सेक्शनमध्ये फारसं कुणी फिरकत नाही. इथं दारू बायका सर्व्ह करतात. या बायकांचं शरीर आणि वय पाहून त्यांना सर्रास आंटी’ म्हंटलं जातं. पण, तुम्ही त्यांच्या ओठांवरील लिपस्टीकचं गडद आवरण काढून पाहाल, तर समोर आई-काकू-मावशी उभे असल्याचाच भास होईल. इतक्या वयाच्या बायका काही नेत्रदीपक असत नाहीत. त्या ग्रँट रोड परिसरातल्या डान्स बारमध्ये (आताचे ऑर्केस्ट्रा बार) काम करणा-या मुलींएवढं कमवतही नाहीत. कारण, बार संपल्यानंतरचे व्यवहार त्या करत नाहीत. त्यांना रात्री अकराची विरार लोकल पकडायची असते. जवळपास सगळ्याच मीरा रोड-नायगाव परिसरात राहतात. घरी त्यांची मुलं वाट पाहत असतात. यांच्यापैकी खूपच कमी जणींना नवरे आहेत. पण, त्यांच्या लेखी नव-यांचे पुरुषत्व आणि अस्तित्व केवळ कपाळावर टिकली लावण्यापुरतेच आहे. त्यामुळे घरे चालवण्याचे काम या बायकांनाच करावे लागते.  
    सीमाने ग्लास मांडले. दारूही ओतून झाली. पण, आमच्याशी एक शब्दही बोलली नाही. ती अशी नाही. प्रचंड बडबडी आहे. पोरांच्या व्रात्यपणाचे किस्से, त्यांच्या शाळेच्या अडचणी आणि सासू अशी वागते वगैरे वगैरे असं बरंच काही सांगत असतं. मन्याने तिला तिच्या गप्प राहण्याचं कारण विचारलं.
.
तिनं एकच शब्द कमालीच्या कोरडेपणानं उच्चारला... श्रावण...
.
श्रावणाचा काय संबंध ? नंतर ट्यूब पेटली. श्रावणात बारमध्ये गि-हाईकं कमी येतात... या महिन्यात तिची नेहमीपेक्षा बरीच ओढाताण झाली असणार. तसा प्रत्येक महिना तिच्या दृष्टीनं परीक्षेचाच असतो. कारण, बारमध्ये होणा-या एकूण कमाईपैकी ३० टक्के हिस्सा त्यांना बारमालकाला आणि १० टक्के हिस्सा त्यांना या बारमधले काम शोधून देणा-या दलालाला द्यावा लागतो. दलालाला पैसे असेही द्यावेच लागतात. कारण, आपली जागा घ्यायला किमान हजार मुली तयार आहेत, याची जाणीव तिला असते. आपण मध्यमवर्गीय श्रावणाची मनमोहक रुपं डोळ्यांत सजवतो. तिचा श्रावण हा असा आहे. तो जितक्या लवकर जाईल, तितकं चांगलं.
दुस-या क्रांतीची हाक देऊन येऊ घातलेल्या नव्या भ्रष्टाचारविरहित समाजव्यवस्थेत तरी तिला माणूस म्हणून स्थान असणार आहे काय किंवा जर ते स्थान मिळणार असेल तर ते कशा स्वरुपाचे असेल, या प्रश्नांची उत्तरं सापडेपर्यंत आपल्याला सीमाला टीप देणं भाग आहे. केवळ तुमचा अहंकार सुखावतो, म्हणून तुम्ही हा माणुसकीचा स्वस्त आणि भंपक देखावा करता, असं कुणी म्हंटलं तरी पर्वा नाही. ठीक आहे. आज तिचं घर चालणं महत्त्वाचं.
 क्रांत्यांचे यशापयश सैद्धान्तिक आणि तात्त्विक भूमिकांवर ठरते. पण, शेक्सपीअरने हॅम्लेटमध्ये म्हणून ठेवलंय की, There are more things in heaven and earth than are dreamt of in philosophy.  स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाल्यानंतरही सीमा आणि तिच्यासारख्या कोट्यवधी जनतेचं जगणं हे प्रचलित व्यवस्थेच्या परिघावरचं आहे. ते अजूनही मुख्य समाजव्यवस्थेचा भागच बनू शकलेले नाहीत. क्रांतीचं नवं तत्त्वज्ञान हे जगणं समजावून घेईल ? तोपर्यंत सीमाला आमच्यासारख्या लोकांचे ग्लास भरावे लागतील, वासनांध लोचटांचे स्पर्श सहन करावे लागतील, गणेशअण्णाच्या लक्षात येऊ नये, म्हणून काही पैसे त्याची नजर चुकवून तिला आपल्या ब्लाऊजमध्ये कोंबावे लागतील. पण, ती जगेल. जगणं तिला सोडताच येणार नाही. सर्वसमावेशक क्रांतीची वेळ येईपर्यंत ही माणसं उपाशी मरूनही चालणार नाहीत. 
...
'बिनस्वेटराचं शहर'मधील दुसरा भाग

16 comments:

  1. font jara chota kar be

    ReplyDelete
  2. एक दाहक वास्तव... छान मांडलं आहेस. विचार करायला लावणारी पोस्ट आहे...!!!

    ReplyDelete
  3. Thanks Ram, Saumiti and Parag sir!

    ReplyDelete
  4. "तोपर्यंत सीमाला आमच्यासारख्या लोकांचे ग्लास भरावे लागतील, वासनांध लोचटांचे स्पर्श सहन करावे लागतील, गणेशअण्णाच्या लक्षात येऊ नये, म्हणून काही पैसे त्याची नजर चुकवून तिला आपल्या ब्लाऊजमध्ये कोंबावे लागतील. पण, ती जगेल. जगणं तिला सोडताच येणार नाही. सर्वसमावेशक क्रांतीची वेळ येईपर्यंत ही माणसं उपाशी मरूनही चालणार नाहीत." हे वाचल्यावर सुन्न होणारे लोक जोपर्यंत आहेत, तोपर्यंत तथाकथित सर्वसमावेशक क्रांतीची निदान अपेक्षा तरी नक्कीच करता येईल.

    ReplyDelete
  5. अमोल ! माणूस खरेच माणूस बनू शकतो, यावर विश्वास ठेवणा-यांना इतर लोक युटोपियन किंवा आयडियलिस्टीक समजतात. पण, असं होऊ शकतं नक्कीच. तुला माझे म्हणणे पटल्याबद्दल धन्यवाद. या निमित्ताने तुझेही मत जवळपास असेच आहे, हे कळाल्यामुळे आनंद झाला.

    ReplyDelete
  6. अजित खूप चांगला ब्लॉग लिहिलाय

    ReplyDelete
  7. अजित, खर आहे..क्रांतीची सर्वसमावेशक हाक यायला माहित नाही अजुन किती वर्ष अन किती सीमा द्याव्या लागतील पण व्यवस्थे बाहेरच्या या माणसाचे जग्नेही तितकेच महत्वाचे आहे..खुप महत्वाचे आहे...मुलात गम्मत बघ ना, व्यवस्थे बाहेरच्या या लोकाना आपणच नावे ठेवण्यात सर्वात पुढे असतो..त्यांच्या जगण्याच्या पातल्या न समजता आपण थेट त्याना आपल्यासारखे तथाकधित स्वच्छ जगण्याचे डोस देण्याचे प्रयत्न करत असतो..आपल्या साठी जे तरल आहे ते कोणासाठी तरी त्रासदायक असू शकते या शक्यतेचा आपल्याला विसर्च पडला आहे...नवमध्यम वर्गाचे भाग होउन आपण मदमस्त झालोय..क्रांति अन अन्दोलाने आपल्याला नव माध्यमातून हवीये प्रत्यक्ष जगातानाच काही मूल्य जपैची असतात याचा सपशेल विसर पडले..तुझे लेखन नेहमीसारखेच टोकदार..अन त्यातील वास्तव गम्भिर्याने घेण्यासारखे...

    ReplyDelete
  8. शीर्षक सुरेख आहे .....आणि अर्थातच हा लेख सुद्धा !!
    तू उल्लेखलेल्या शेक्सपिअरच्या त्या ओळीचा अर्थ मराठीत "वास्तव हे कल्पनेहून अद्भुत असते" असा घेता येईल...
    फक्त हे 'अद्भुत' नेहमीच रोचक असेल असे नाही , शहरे आणणारेही असते बरेचदा...
    आणि असे वास्तव पाहण्यासाठी तुझ्यासारखी नजर सगळ्यांची असायला पाहिजे पण ती असतेच असे नाही ..

    ReplyDelete
  9. Thanks Heena! But, We should be a part of that holistic revolution which would not be restricted upto any class or creed.

    ReplyDelete
  10. @ Pashya! Thanks. Sometimes I couldn't enjoy a luxury of having Marathi fonts. That's why I have replied in English.

    ReplyDelete