Saturday, July 9, 2011

बारा रुपयांतला बैदा


   वेटरनं जेवण आणेपर्यंत पेपराचं पहिलं पान वाचून काढायला सुरुवात केली. तुकोबारायांची पालखी अकलूजमुक्कामी पोहोचली होती. देहूतून सुरू झालेला हा राजस सोहळा इथं गोल रिंगणात एकवटतो. नीरास्नानानं शूचिर्भूत झाल्यानंतरचं तुकोबांचं हे पहिलंच रिंगण. वारक-यांच्या कपाळावर वर्तुळाच्या आकारात गोळा झालेल्या बुक्क्याप्रमाणं. तेवढा गोलाकृती भाग वगळता चेह-यावर नांगरानं पाडाव्यात, तशा सरी पाडल्यात चिंतेनं. मृगानं केव्हाच पाठ फिरवलीय. वावरातली माती वापसा विसरलीय. दुबार पेरणीच्या संकटाची बातमीही होतीच. फेसबुकला टक्कर देण्यासाठी नव्यानेच सुरू झालेल्या गुगल प्लसच्या भेटीला पहिला स्पॅम आलाय. भावी पंतप्रधान राहुल गांधींच्या उत्तरप्रदेश दौ-याविषयी आजही काही तरी छापून आलं होतं. तिथल्या एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडून टाकण्यात आलेत. तिच्याच सांत्वनासाठी गांधी गेले होते. बलात्कार करून अवघ्या देहाचा चोळामोळा केलेल्या नि नंतर दृष्टी हिरावून घेण्यात आलेल्या मुलीचे सांत्वन कसे करावे, हा आतापर्यंतचा एक क्रांतिकारी मानसशास्त्रीय प्रयोग आपण श्रीयुत गांधींकडूनच समजून घेणे श्रेयस्कर.
 वेटरनं ऑर्डर पुढ्यात आणून ठेवली. समोरच्या ताटाकडं पाहिलं. पिवळ्या पडलेल्या बोनचायना डिशच्या कडेवर बसलेल्या किड्यानं सपशेल माघार घेतली. शरणागतीचा पांढरा रुमाल फडकवण्याची बुद्धी त्याला व्हावी, यासाठीच इतका वेळ पेपरातल्या बातम्या चाळत होतो. थोडं उशिरानं कळलं त्याला. पण, ठीक आहे. जेव्हापासनं ताट माझ्यासमोर होतं, तेव्हापासनंच तो किडाही ताटाच्या कडेवर माझ्या बरोबरीनं समोरच्या ऐवजावर स्वतःचा हक्क सिद्ध करत असल्याच्या आविर्भावात बसला होता. ऐवज म्हणजे काय... ती बारा रुपयांची अंडा करी! अंड्याचा आकार पाहिला असता, तर ते नक्कीच खुडूक होण्याच्या वाटेवरती असलेल्या कोंबडीनं प्रसवलेलं असलं पाहिजे, असा ठाम समज झाला असता कुणाचाही. एरवी ज्या हॉटेलांत जातो, तिथं भाजीतून वाफेबरोबर मसाल्याचा वासही दरवळत असतो. इथं मात्र त्याचा भपकारा सुटला होता. मी किड्याकडे पाहत होतो. तोसुद्धा समोरच्या अन्नब्रम्हाचे सेवन करावे अथवा नाही किंवा कसे, या विचारात असावा. त्याच्या मनात बराच खल चालला असावा. अन्यथा, इतका वेळ ताटाच्या कडेवर बसण्याचं त्याला कारण नव्हतं. शिवाय, माझ्याकडंही घालवायला म्हणून वेळ जरा बराच होता. नाही तर किड्याच्या भवितव्याचा केव्हाच फैसला करून टाकला असता. इतक्या वेळात त्याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहिला नसता. पण, तरीही मी त्या किड्याला मागच्या चार-पाच मिनिटांपासून नुसताच न्याहाळत होतो. तोसुद्धा ताटात उडी मारायची किंवा नाही, याचा निर्णय घेण्यापूर्वी समोरच्या बैदा करीची रेकी करत होता. शेवटी त्यानं आपला बेत बदलला. त्यानं त्याचा संकल्प तडीस नेला असला, तरी मला ताट बदलूनच मिळणार होतं. म्हणूनच त्याचं ताटाच्या कडेवरचं फिरणं फारस मनावर घेतलं नव्हतं. म्हंटलं पाहूयात, हा नेमकं करतोय तरी काय? शेवटी त्यानं काहीही केली नाही. नमतं घेत मागची चाल चालू लागला. आणि प्लेटच्या पसरट आवरणाखाली दिसेनासा झाला. टोटल रिट्रीट. मी विजयाच्या धुंदीत समोरचा घास उचलला. 
     पहिला घास घशात गेल्यानंतर आजूबाजूला पाहिलं. माझ्यापासनं सुमारे फूटभर अंतरावर काऊंटरवर उभ्या असलेल्या मालकानं आनंदमिश्रित हास्य केलं. हो... माझ्याकडंच पाहून. माझ्यासारखे वेडे इथं काही नवीन नाहीत, असं काही तरी त्याचे ते पांढरट-पिवळट दात सांगत असावेत. मी चक्रावलोच. हे चक्रावणंसुद्धा ओळखीचं असल्याप्रमाणं तो हसला. मी जास्त खजील होऊ नये, या उद्देशानं त्यानं त्याच्या करड्या ओठांमध्ये नंतर स्वतःचे दात लपवलेदेखील. किड्यांबरोबर अशा प्रकारे सलगी करणा-या नि त्यांना उगीचच आव्हानं देणा-या माणसांना ओळखत असल्यासारखं हसणं होतं त्याचं. म्हणाला, साब! आप जर्नालिस्ट हो ना?” कशानं संताप आला, खरंच कळालं नाही. त्याच्यावर रागावून काही उपयोगही नव्हता नि स्वतःवरही. मग सरळ म्हणालो,हाँ... आप जब खटमल की तरफ इतना घूर रहें थे, तभी मैंने पहचान लिया, की आप जर्नालिस्टही होंगे...त्याचा तर्क तर बरोबर होता. पण, त्यानं माझी ओळख पटवण्यासाठी नेमक्या कोणत्या कसोट्या लावल्या होत्या, ते जाणून घेणं माझ्या दृष्टीनं गरजेचं होतं. नाही तर, रात्री झोपतेवेळी हा प्रश्न ढेकणासारखा मला चावला असता. शिवाय, तो जो कोण कीडा होता, तो ढेकूण होता, हादेखील माझ्या सर्वाधिक संतापाचा विषय होता. कुणी आपल्या खडूस बॉसचा करू नये, कुणी आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीचा करू नये, कुणी आपल्या कजाग सासूचा करू नये, इतका राग माझ्या मनात ढेकणांविषयी एकवटला आहे. पण, तो विषय वेगळा. मालकानं सांगितलं, यहाँ पें दो-तीन मीडिया कंपनी हैं. लेकिन, प्रॉब्लेम यह हैं की, इस एरिया में अच्छे होटल नहीं हैं. हमारें होटल में आते हैं सिर्फ टॅक्सीवाले, कचरा जमा करनेंवाले ओर भिकारी. दुसरा कोई नहीं आता. आपके कपडें, जुतें, घडी, बडा सा मोबाईल फोन...सब कुछ बतलातें हैं. ऐसे लिबास में तो जर्नालिस्टही ऐसी जगह आतें हैं. ऐसी जगहों से उन्हें कोई परहेज नहीं रहता और ना लगावभीं... बाकी सोफिस्टिकेटेड लोग कतरातें हैं... और जर्नालिस्ट भीं गिने-चुनेहीं आतें है यहाँ पें.. बाकी के एकाद बार आये तो, फिर मुड कें भी नहीं देखते. हर कोई उठाया बक्सा और आया... ऐसा यहाँ नहीं होता... इसी लिए मैंने पूछा आपसे की, आप जर्नालिस्ट हों की नहीं... त्याचा अंदाज बरोबर होता. त्याच्या दांडग्या निरीक्षणशक्तीचं मलाच अप्रूप वाटलं. इतरांनी यावं तरी कशाला इथं ? या आझाद हिंदनामक हॉटेलात ? कुठल्याही टेबलावर पहा. पोपडे उडालेल्या भिंतीप्रमाणं प्लायवूडही लाकडाची संगत सोडण्याच्या तयारीत असल्यासारखं. आझाद मैदानात थव्यानं मोर्चेकरी जमावेत, तसा माशांचा महामेळावा भरलेला. वेटरच्या मानेवरले खरजाचे चट्टे सहज नजरेत भरतात. चांगली हॉटेलं सगळी स्टेशनाजवळ नि स्टेशन इथून पावणेदोन किलोमीटरवर.खास चांगलंचुंगलं जेवणासाठी एवढ्या लांबवर पायपीट करत कशाला कोण जाईल ?  त्यामुळं त्याच हॉटेलात काही तरी मागवायचं नि पोटोबामाऊलीला शांत करायचं. महागातलं महाग जेवण मागवा... तीस रुपयांच्या पुढं बिल जाणार नाही. अर्जुन सेनगुप्ता समितीचा अहवाल हॉटेलमालकानं व्यवस्थित रिचवला असावा बहुधा. म्हणूनच इथली महागातली महाग डिश आहे पंधरा रुपयांना. दैनंदिन उत्पन्न वीस रुपयांच्या घरात असणा-यांच्या उदरभरणासाठी मुंबईतली असली हॉटेलं किती चांगली सोयीची आहेत! मुंबईतल्या सगळ्या माशा इथं आपल्या ताटाभोवती एकवटलेल्या सापडतील, धारावीची सगळी घाण तुमच्या समोरच्या पाण्याच्या पेल्याला चिकटलेली आढळेल, त्या पाण्यातल्या ई-कोलाय नामक बॅक्टेरियाचं प्रमाण नेहमीपेक्षा पन्नास टक्के जास्त असल्याचंदेखील तुम्हाला आढळेल. पण, फरक काय पडतो ? सत्तर टक्के मुंबई हे असलंच जेवण जेवते नि असलंच पाणी पिते. एक वेळचं पोटभर जेवण मिळतं, या समाधानातच या हॉटेलातले कस्टमर आनंदानं रोट्या तोडतात. इथं तुम्हाला त्यातल्या त्यात लजीज नि लज्जतदार जायक्याच्या पदार्थांचा फुफ्फुसं भरून कुणी श्वास घेतलाय नि मग रोटीचा बिलोरी तुकडा त्या मसालेदार भाजीत बुडवून तोंडात घालत स्वर्गसुखाची अनुभूती मिळवलीय, या भावनेशी मिळताजुळता असा एकही चेहरा इथं सापडणार नाही. माझ्या ताटात पडलेल्या दुस-या रोटीनंतर जगातल्या सर्व रोट्या संपणार आहेत, याच भावनेनं त्यांची तोंडं त्या रोट्यांचं अधाशी स्वागत करत असतात. 
    गरिबातला गरीब माणूस असो, तो मुंबईत उपाशी मरत नाही, असं सांगितलं जातं. तो गरीब रोज मरत-मरत जगतो तो अशा पद्धतीनं. असलं खाणं खाऊन. जागतिकीकरणाच्या आभाळाला लागलेली सुबत्तेची झुंबरं पेडर रोडला, नाही तर अल्टामाऊंट रोडला, नाही तर नेपियन सी रोडला लटकलेली तुम्हाला आढळतील. त्या झुंबरांची चतकोर आभा उपनगरांतल्या मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये फाकलेली आढळेल. इथं वस्तीला आहे तो फक्त लख्ख अंधार. तिथल्या पाठमो-या झुंबरांनी इथं अडवून ठेवलेला ठसठशीत काळाकभिन्न काळोख. या अंधा-या हॉटेलात मी जेवायला येतो. गरिबांचं जग अनुभवावं म्हणून नाही, तर मला इतर पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून. गरिबीचं वारं अंगाला लागू देणं कुणाला आवडतं ? गरिबांनासुद्धा नाही.
    कालच मी नेहमीच्या टेबलवर बसलो होतो. रात्रीचे साडेआठ वाजले असतील. आजूबाजूला बसलेले तिस-या पाळीचे टॅक्सीवाले जेवण उरकत होते. शेजारच्या टेबलावरदेखील डोळ्यांना सवयीची झालेली बाई बसली होती. स्वतःच्या मापाचा नसलेला अघळपघळ कमीज तिच्या अंगावर होता. तिच्या स्तनांमधली घळ जिथे सुरू होते, तिथूनच तिच्या कमीजची हद्ददेखील. त्या हद्दीच्या पलीकडच्या भागाचा माग काढण्यासाठी वखवखलेल्या काही नजरांचे डीपर कमीज फाडून आत झेपावण्याच्या प्रयत्नात होते नेहमीसारखेच. तिचा आवाज कायमच चढा असतो. शिवीशिवाय तिचं वाक्य सुरूही होत नाही नि संपतही नाही. स्वतःचं प्रत्येक वाक्य समोरच्याबरोबर उर्वरित जगालाही उद्देशून बोलत असल्यासारखी. पण, त्या दिवशी ती कमालीची शांत होती. वेटरला म्हणत होती, इन लोगों के सामने तू मेरे को खाला बोलता हैं ना! चल, मैं आज तेरे लिए खाला जैसे ही बनती. अभीं पैसा हैं मेरे पास. आज छूना मत मुझे. मेरे से खाला जैसाही बर्ताव कर. त्यावर त्या वेटरचं हसणं लोचटल्यासारखं. इकडं आपल्या डोक्याची काशी. या हॉटेलात येईल तेव्हा फक्त बैदा करीची ऑर्डर देणा-या या पन्नाशीतल्या महिलेचा आवाज नि मळकटलेला चेहरा आठवडाभरापासून माझ्या परिचयाचा आहे. पण आतापर्यंत या हॉटेलात ती फुकट खात होती, हे कळण्याचा तो पहिलाच दिवस होता. ती खात होती वेटरच्या क्रेडिटवर. नि वेटरनं क्रेडिट कशाच्या आधारावर दिलं, तर ती त्याला वाट्टेल तिथं हात लावायला देत होती म्हणून. इथल्या बैदा करीची किंमत आहे बारा रुपये. या मायानगरीत अशा गरजवंत बायांची किंमतही एरियानुसार बदलते. पेडर रोडपासून पोईसरपर्यंत नि कुलाब्यापासून कर्जतपर्यंत. एके ठिकाणी बैदा करीच्या बदल्यात वाट्टेल तिथं हात लावण्याची नाईलाजी मुभा नि दुस-या ठिकाणी बाईच्या मांसल मांड्या कुरवाळण्यासाठी लाख रुपये मोजा. बरं! ज्यांना आपल्या मांसल मांड्या दाखवायची फारच हौस असते, त्यांना दररोज बारा रुपयेवाली बैदा करी खावी लागते, असं अजून तरी ऐकिवात नाहिए.

6 comments:

  1. tujha hi observation khup chhan ahe... an te observation mandanychi kala hi...farshi comment n karata hi samajachi aasal mandani tula uttam jamate..samaj asa ahe tasa ahe kinwa ithe ashi dukha ahet an asha vyadha ahet he sangat sutalo na ki vasatw rahata bajulach an aplyach dyan apan pajalat rahto...typeksha tujha nuste vastaw lihinech khup bolake aste..i really like ur writings..tujhya lekhanachi fan jhaley...

    ReplyDelete
  2. खरं तर या सगळ्यावर comment म्हणून काय द्यावी हा या क्षणाला मनात उडालेला संभ्रम आहे... अप्रतिम आणि सुंदर म्हणावं तर काहीतरी जळजळीत वास्तव समोर मांडलेलं आहेस.. प्रतिक्रिया ना देता शांत बसावं तर तेही करवेना... अजित, तुझ्या लेखणीने मी खूप अस्वस्थ झालो... पण लिहिता राहा.. हे मी मागे पण तुला सांगितला होतं पुन्हा सांगतोय.. खूप सुंदर संवेदनशीलता तुझ्या ठायी आहे आणि ती नेमकेपणाने मांडण्याचे कसबही.... हे फार फार कमी लोकांना लाभतं...

    ReplyDelete
  3. Thanks Heena and Parag sir! I would definitely write as per your expectations as this reality also haunts me like anything.

    ReplyDelete
  4. ajitji mala pahila prashn ha padala ki nemaki "बारा रुपयांतला बैदा" mhanje kay....pan jevha hi purna katha vachali tevha nemki tula hya kathe madhun kay darshvayache aahe he samajale.....ya saglya goshatina samaj jabab dar....aahe.mi hi katha vachayala suruvat keli aani mi svataha tya hotelat aslya sarkhe mala janavale .karach atishay uttam ritya mandani keli aahe tu... atishay bhari.....

    ReplyDelete
  5. Thanks Ganesh for spontaneous comment!

    ReplyDelete
  6. Ajit ajjacha baida story wachli.tya kathe pramane changle lihinaranya

    aplya dhandyat tari kuthe sandhi dili jate.soiee nusar lihave lagte.

    thuze likhan waqchun phar bare watle.

    keep it up. Vinayak Dalvi

    ReplyDelete