Sunday, July 24, 2011

लव्ह ट्वेंटी ट्वेंटी : भाग ३


भांडणं जितकी अधिक, तितकीच प्रेमाची खुमारीही जास्त वाढते, असं या क्षेत्रातले जाणकार महानुभाव सांगतात. प्रेम मोजण्यासाठी भांडणांचाच निकष लावायचा झाल्यास आमच्या प्रेमानं केव्हाच हिमालयाची उंची गाठली आहे, यावर कधी नव्हे ते आम्हा दोघांचंही एकमत होईल. अर्थात ती उंची वाढवण्यात सिंहाचा वाटा माझाच आहे. कारण, इतर गोष्टींप्रमाणेच याही बाबतीत मी पूर्णपणे अमेरिकावादी आहे. अमेरिकेप्रमाणेच मलाही भांडण करायला कारण लागत नाही.
भांडण हे एककल्ली संतापाचंच अपत्य असतं. पण, हे समजूनही मी त्याला आवर घालण्यात यशस्वी होत नाही. स्वतःचं बालिशपण जपण्याची आणि संताप व्यक्त करण्याची हक्काची जागा म्हणजे प्रेयसी असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. तिनेही या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही.
    मला पडणा-या प्रश्नांचं मूर्त रुप म्हणजे माझा संताप होय. म्हणजे त्यासाठी मी स्वतःलाच जबाबदार मानून काहीएक उपाय केला पाहिजे. तो कोणावरही काढून उपयोगाचा नाही, हे मला कळतं. स्वतःला शहाणीसुरती समजणारी माणसं असं वागत नाहीत, हेदेखील मला माहिती आहे. पण, माझ्या संतापाचा दरारा इतका जबरदस्त आहे की, त्याला घाबरून शहाणपण मागच्या दारानं पोबारा करतं. हे नेहमीच होतं.
    घरचे, दारचे, ऑफिसचे... या सगळ्यांनी डोक्यात घुसडलेला संताप गर्लफ्रेंडवर काढणं, हे काही कार्यकारणभावाचं चपखल उदाहरण असू शकत नाही. मग ते बालिशच म्हणायला हवं ना!
   उर्वरित जगाच्या नजरेत स्वतःची संयमी इमेज जपताना माझ्या संतापाचं एकमेव आणि सॉफ्ट टार्गेट तीच असते. मग यालाही बालसुलभ मूर्खपणा  म्हणणार नाही तर काय ? ते कसं असतं ना... एकीकडे जगाकडून तुम्हाला तुमच्या दिखाऊ शांतपणाचं कौतुकही करवून घ्यायचं असतं नि दुसरीकडे रागीष्टपणाच्या बाबतीत आपण विश्वामित्र, जमदग्नी आणि दुर्वासाच्याच भावकीतले आहोत, हेही दाखवायचं नसतं.  मग रागविसर्जनासाठी हमखास भरवशाची जागा ती कोणती ? नक्कीच प्रेयसी. म्हणजे इतरांच्या मैत्रिणींबाबत मला माहिती असायचं कारण नाही. पण, माझी बुवा तशी आहे. अर्थात तीदेखील संतापी आहे. पण, तिच्या लेखी तिच्या संतापाला प्रायोरिटी माझ्या संतापानंतर आहे. त्यामुळं माझा कोपीष्टपणा सहजच खपून जातो. रागाचं महत्त्व केव्हा असतं ? जेव्हा तो झेलायला कुणीतरी तयार असतो. नाही तर ऊठसूठ चिडणा-यांची काय कमतरता आहे का जगात ? त्यांच्या रागाला कोण हिंग लावून विचारतो.
 तिच्याकडून समजूत काढून घेणं मला फार आवडतं. ही फार आनंददायक प्रक्रिया असते. भोकाड पसरलेल्या लहान मुलाला चॉकलेट दाखवूनअगदी नाहीच दाद दिली तर परीराणीच्या गोष्टी सांगून उगी करावं ना तसं असतं तिचं समजावणं. बहुतेक वेळा तिच्या उत्तरांनी अथवा सांत्वनाने माझं समाधान होतं. तिच्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या गुलाबजामांसोबत एक डबा उत्तरांचाही असतो की काय, अशी मला दाट शंका आहे. शिवाय माझ्या तोंडात गुलाबजामचा घास भरवताना, शॉनंय ना माझ्झं बाळ... माझ्झं पिल्लू... अशा प्रकारातलं तिचं माझ्या संतापावर बर्फ फिरवणं असतं. एक अनुभव गारेगार. मनःपूत आनंददायक. असं वाटतं, ते अनुभवण्यासाठी सारखं-सारखं संतापावं. पण, कधीकधी तिच्याही सहनशीलतेचा कडेलोट होतो. आता झाला तसा.
    आमच्या ब-याचशा संध्याकाळी या तलावाच्या काठावर जातात. माणसांनी गजबजलेल्या या शहरात असूनही स्वतःच्या एकांताचा आब राखून असलेला असा तो तलाव आहे. दुपारी एक बाष्कळ करण जोहरटाइप हिंदी पिक्चर पाहून आलो होतो. मेरे मरनें के बाद तुम दुसरी शादी करना…” असं पिक्चर संपायला अर्धा तास बाकी असताना हिरो हिरोईनला सांगतो. कॅन्सरसदृश आजार असतो त्याला. त्यानंतर प्रेमाच्या उदात्ततेबद्दल लोकांना डोस पाजत तो आणि पिक्चर एकत्रच तिरडीवर जातात. सुतकी चेह-यानं प्रेक्षक थिएटरबाहेर पडतात.
     पण, दोन प्रेमीजीवांपैकी एक जण असा स्वर्गलोकी प्रयाण करता झाला, तर पृथ्वीतलावर उरलेल्या दुस-या व्यक्तीच्या पुढील आयुष्य कंठण्याच्या शक्यता नेमक्या काय नि कशा असाव्यात, याची पुसटशीही कल्पना न देता पिक्चर संपवला दिग्दर्शकानं. डायलॉगबाजीचाच निव्वळ भडिमार होता त्याच्यात. ज्या थीमवर तुमचा चित्रपट बेतलेला आहे, त्याबद्दल एक अवाक्षरही न काढता खुशाल पडदा पाडतात ही लोकं. म्हणूनच, ब-याचदा आख्ख्या पिक्चरऐवजी असलाच एखादा नफ्फड डायलॉग राहतो लक्षात. तो डोक्याला खुराक पुरवतो आयुष्याबद्दल विचार करण्यासाठी.
    तरी मी पिक्चर सुरू झाल्यानंतर देवाचे आभारच मानले होते. कारण, तो हॉरर मूव्ही नव्हता. ती हॉररपटांची फॅन आहे. तसं मीही तिला त्यावेळी कंपनी देतो. पण, डोळे मिटून. पिक्चर संपेपर्यंत अगदी नकळत माझ्या हातांची पाचही बोटं तिच्या हाताला घट्ट बिलगून असतात. पिक्चर संपतो, तेव्हाच हातांचे घामेजलेले तळवे कोरडे व्हायला सुरुवात होते. उघड्या डोळ्यांनी भुताखेतांचे प्रताप पाहणं, माझ्यासारख्या देवगणातल्या व्यक्तीला मानवत नाही. हॉररपट आवडणा-यांचा गण राक्षस असतो बहुधा.
    संध्याकाळ व्हायला वेळ होता थोडासा. तोपर्यंत सूर्याची किरणं तलावाच्या पाण्यावर चमचमती कशिदाकारी गुंफण्यात एकतानतेनं रंगली होती. वारा सळसळायचा, तेव्हा सूर्यानं विणत आणलेलं ते चमकदार वस्त्रही लाटा-लाटांनी तळपून उठायचं. हिच्या अंगावर तर ते आणखी उजळून दिसेल.
 हळूहळू तलावाच्या शुभ्र पाण्यात संध्याकाळचा करडा रंग मिसळायला सुरुवात झाली. वस्त्र विणण्याचं काम नेटानं पूर्ण करून सूर्य समोरच्या बिल्डिंगआड अस्ताला गेला. त्यामुळं आता कोणी त्या पाण्याकडं पाहिलं असतं, तर त्याला तलावाच्या खोलीचा अंदाज आला नसता. मघापर्यंत बदकं तलावाच्या मध्यभागी घोळका करून दंगा करत होती. आता एक-एक करून ती पायांनी पाणी मागं लोटत काठाकडं परतू लागली होती. पाच फूट अंतरावर असतील, तेव्हा पाण्यात वल्हं मारणारे त्यांचे गुलाबी पंजे दिसायला लागले. आम्ही दोघंही शांतपणे त्यांची लगबग पाहत काठावरच्या हिरवळीवर बसून होतो. त्या शांततेचा भंग करण्याचं महापातक मी केलंच.
पुन्हा मी तो डायलॉग उच्चारला. पिक्चर संपल्यापासून बहुधा दहाव्यांदा तरी असेल. ती त्यामुळंच संतापली होती. पण, आतापर्यंत तरी ती संयम बाळगण्यात यशस्वी ठरली होती. ती रागावली की, तिचा चेहरा विचित्र गोड दिसतो. टोमॅटो सूपसारखा. टोमॅटो सूप लालच असतं. पण, काही ठिकाणी त्याचा रंग जर्दगडद दिसतो. तर काही ठिकाणी शांतफिकट. तिच्या चेह-यावरचा एकजिनसी रक्तिमा रागावल्यानंतर असाच विखुरलेला दिसतो. तिच्या या अवताराला मी कोपामुद्रा असं म्हणतो. तसाच आताही तिचा चेहरा लाल झाला होता.    
प्रश्न पडला की, उत्तर सापडेपर्यंत मला स्वस्थता लाभत नाही. त्यातून त्या पिक्चरमधला तो डायलॉग वाळवीप्रमाणं मेंदू पोखरून थेट आतवर पोहोचला होता. अचानक आलेल्या भूकंपानं सातमजली स्वप्न क्षणार्धात भुईसपाट व्हावं, तसा असतो का हा अकाली मृत्यूचा धक्का ? ज्या व्यक्तीसोबत वाट चालण्यासाठी पावलं उचलावीत, तीच अशी अचानक पुढे निघून जावी आपल्याला पूर्ण रस्ताभर पोरकं करण्यासाठी ? कुठल्या जातकुळीतलं असतं ते दुःख ? की अशा वेळी काही प्लॅन बी ठरवायचा असतो ? की आणखी काही विचार करायचा असतो ? साराच गोंधळ.
.
.
.
उत्तर तिलाही सापडलं नव्हतं, हे तर तिच्या संतापावरून स्पष्टच जाणवत होतं.
.
.
.
स्वतःच्या डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंकडे दुर्लक्ष करत तिनं मला आवेगानं पोटाशी कवटाळलं. अदृष्य शक्तीनं फेकलेल्या जाळ्यात अडकण्यापासून मला वाचवण्याची धडपड करत असल्यासारखं होतं तिचं कवटाळणं. संरक्षणाची हमी देणा-या शक्तिकवचाप्रमाणं.

12 comments:

  1. @ अजित, भाग २ कुठेय? आणि सुंदर लिहिलयस... शब्दच नाहीत बोलायला...

    ReplyDelete
  2. Hi! काही आर्टिकल्स कुठे सेव्ह केलेत, ते आठवत नाहिए... पण, सापडल्यावर नक्की ब्लॉगवर टाकीन. थँक्स...

    ReplyDelete
  3. सचिन ढवणJuly 25, 2011 at 8:09 AM

    अज्या, तोडलयंस लेका....मस्तच!

    ReplyDelete
  4. असं काही तुझ्या सारखा वेडाच लिहू शकतो .............. .........................वाचणाऱ्याला वेड लावणारं !!!!

    ReplyDelete
  5. @ सचिन! कुठल्याही लिहिण्यातून तोडने का नय जोडने काम होना मंगता... But, I take it as a compliment assuming that you consider yourself as Avadhut Gupte... ha ha ha...

    ReplyDelete
  6. @ सुशांत! धन्यवाद...दररोज वेड लावणा-या बातम्या करून-करून वैताग येतो ना.. मग हे असं....

    ReplyDelete
  7. खरच अजित मस्तच लिहिलय...मला ही वाचान्या अधि पहिला प्रश्न पडला होता की भाग २ कुठे आहे...पण तो तू नक्की टाकशील हा विश्वास ठेवते..नुकताच मीही असच अनुभव घेतला आहे..म्हणजे थेट माझा नाही. (i will pray ki it wont happen for anybody) माझ्या इमारतीतील एक तिशितिल विवाहितेचा नुकताच मृत्यु झाला...तिला ६ वर्षाचे एक मूल आनी मरणाला सामोरे जाण्याच्या ५ दिवस अधि तिने एक पिटूकलीला जन्म दिला होता. मरणाला कारण असतच किंवा नसतच..कोणाला ठाउक ...म्हणजे त्यात्यल नेमक आनी खरे काय हे फक्त नियतीला ठाउक असावे अन फार तर मर्नार्याला स्वत..तिचा देह अमबुलंसमधून बाहेर काढताना मला तो दिसला...तिचा नवरा..सोबती..जोड़ीदार..ज्याच्या सोबतचा डाव अर्ध्यावर टाकुन ती गेली होती...त्याला पाहिल्यावर एकदम गलबलुन आले..आनी खुप त्रास ही झाला....अख्ख आयुष्य ज्यसोबत जोडून घेतले..स्वप्ने रंगवली ते सगल फिस्कटून अगदी उध्वस्त होताना पाहने कसल भयानक आहे....प्रवासाची सुरवात एकट्याने करने वेगले अन जोड़ीदारासह करून तो फिस्कटने वेगले..नाही का..

    ReplyDelete
  8. हीना थँक्स!काही आर्टिकल्स कुठं सेव्ह केलेत, ते मला आठवत नाहिए. पण, सापडल्यानंतर टाकील नक्कीच. तसं बातम्या आणि हार्ड आर्टिकल्स वगळता मी ललित फारसं लिहित नाही. किंवा, तसं लिहिणं मला फारसं आवडत नाही, हे तुला तिथल्या कुणीतरी सांगितलं असेलच.प्रेमाच्या प्रवासात पडणा-या अशा काही प्रश्नांच्या अनुषंगानं केलेलं ढोबळ लिखाण आहे हे. तुझा अनुभव भयंकर आणि अनिश्चिततेच्या शक्यतांनी भोवंडून टाकणारा...

    ReplyDelete
  9. आत्ता परत वाचताना या वाक्याशी अडले मी... ''उघड्या डोळ्यांनी भुताखेतांचे प्रताप पाहणं, माझ्यासारख्या देवगणातल्या व्यक्तीला मानवत नाही. हॉररपट आवडणा-यांचा गण राक्षस असतो बहुधा...'' पण मग देव गण असलेले लोक कोपिष्ट, शीघ्रकोपी, संतापी असतात का??? विश्वामित्र, जमदग्नी, दुर्वासाच्या पंक्तीतले...??? :)

    ReplyDelete
  10. कथेची सोय म्हणून मेल कॅरॅक्टर देवगणातलं ठेवलं आहे. मुळात माणूस हा भंपकपणा,-प्रामाणिकपणा स्वार्थीपणा-निःस्वार्थीपणा, प्रेम-राग अशा गोष्टींचं प्रचंड बेमालूम मिश्रण आहे, हे मला त्यातून दाखवायचं होतं. कुठलीही व्यक्ती काही वेळा अशा भंपक पद्धतीनेच वागते. अगदी आपल्या जवळच्यांशीसुद्धा. हे सिद्ध करण्यासाठी म्हणून मी अशा पद्धतीने वाक्यांची रचना केली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझा देव आणि भविष्य या दोन्हीही गोष्टींवर विश्वास नाही. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. देवावर विश्वास ठेवणं, म्हणजे आपण आपल्या कर्तृत्वाचा आणि माणूस म्हणून असलेल्या सुसंस्कृतपणाचा अपमान करणे होय, असे माझे स्पष्ट मत आहे.

    ReplyDelete
  11. Ok... sahamat ahe me!! Thank you for ur detailed explanation...!!!

    ReplyDelete