Sunday, May 8, 2011

वित्तपीठाचा जगद्गुरू..!


‘सब प्राईम’मुळं अमेरिकन अर्थव्यवस्था जेव्हा मंदीच्या राक्षसी अरिष्टात अडकली होती, तेव्हा वॉरेन बफेंच्या वृत्तपत्रांतून छापून येणाऱ्या अथवा टीव्हीवरून प्रसारित होणा-या मुलाखती अमेरिकन जनता भक्तिभावानं वाचत- ऐकत होती। प्रापंचिक कटकटींनी कावलेले आपल्याकडचे संसारी जीव मोठय़ा तल्लीनतेनं बाबा-बुवाचं प्रवचन कानांत प्राण आणून साठवतात तसं. शेअर बाजाराच्या भजनी लागलेल्या विशिष्ट जागतिक समुदायाच्या लेखी वॉरेन बफेचं स्थानही तेच आहे.



टाईम इज मनीया वाक्प्रचारामागचं इंगित कळल्याप्रमाणं तोच वाक्प्रचार आयुष्याच्या सूत्रस्थानी मानून कुबेर बनलेली वॉरन बफे ही जगाच्या इतिहासातली एकमेव व्यक्ती. टाइम इज मनी’, हे तर खरंच! पण, योग्य वेळ ही जरा अधिकचा पैसा मिळवून देणारी असते. असा मोका बघून चौका मारत संपत्ती कमावलेला बफेंइतका संधिसाधूगुंतवणूकदार दुसरा कुणी नाही. एखाद-दुस-या वर्षाचा अपवाद वगळता बिल गेट्स फोब्र्जच्या यादीत कायम श्रीमंतांच्या पंगतीत मानाचं पहिलं स्थान पटकावून बसलेला आहे आणि गेट्सच्या डाव्या-उजव्या बाजूच्या पाटावर वॉरन बफेदेखील आहेतच. सदोदित वर-खाली होणाऱ्या शेअर बाजाराच्या स्पंदनांचा अचूक ठाव घेणारे. म्हणूनच ते जगातल्या तमाम गुंतवणूकदारांचा आदर्श आहेत. सब प्राइममुळं अमेरिकी अर्थव्यवस्था जेव्हा मंदीच्या राक्षसी अरिष्टात होती, तेव्हा वॉरेन बफेंच्या मुलाखती अमेरिकन जनता वृत्तपत्रांत वा टीव्हीवरून भक्तिभावानं वाचत- ऐकत होती. प्रापंचिक कटकटींनी कावलेले आपल्याकडचे संसारी जीव मोठय़ा तल्लीनतेनं बाबा-बुवाचं प्रवचन कानांत प्राण आणून साठवतात तसं. शेअर बाजाराच्या भजनी लागलेल्या विशिष्ट जागतिक समुदायाच्या लेखी वॉरेन बफेचं स्थानही तेच आहे. मुक्त अर्थव्यवस्थेनं निर्मिलेल्या वित्तपीठाचे जगद्गुरू. अर्थव्यवस्थेची नाडी ओळखून रोगाचा अक्सीर इलाज सांगणारा वा पुढं चालून जे खरंच ठरेल, असं भाकीत वर्तवणारा.

वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांनी कोक विकून व्यवसायाचा श्रीगणेशा केला. कोकच्या प्रत्येक बाटलीमागे त्यांना एक निकेल फायदा मिळायचा. एक अमेरिकन निकेल म्हणजे पाच सेंट. वडील यशस्वी उद्योजक आणि राजकारणी असल्यामुळे घरची काही ददात नव्हती. पण, व्यवसाय करण्याचा कीडा काही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अकराव्या वर्षी बफेंनी एका कंपनीचे तीन शेअर्स 38 डॉलर्सना विकत घेतले. त्यांची किंमत घसरून 27 डॉलरवर आली. ते घाबरले. पण, संयम ठेवत शेअर वर चढेपर्यंत वाट पाहिली. 40 डॉलपर्यंत शेअरचा भाव वधारल्यानंतर ते झटकन विकून वॉरेन मोकळे झाले. पण, तेवढय़ात त्या शेअर्सनी थेट 200 डॉलर्सवर झेप घेतली होती. पस्तावलेले वॉरेन एक धडा शिकले. योग्य वेळ आल्याशिवाय शेअरच्या खरेदी अथवा विक्रीत घाई-गडबड करायची नाही. आपल्याला जे काही करायचंय, ते याच क्षेत्रात, याची लख्ख जाणीव त्यांना शिक्षण घेताना झाली होती. त्यामुळे त्या काळचा विख्यात गुंतवणूक गुरू आणि इंटलिजंट इन्व्हेस्टरचा लेखक बेंजामिन ग्रॅहम जिथं शिकवायचा, त्या कोलंबिया विद्यापीठात ते उच्च शिक्षणासाठी दाखल झाले.

ग्रॅहमच्या विचारांनी काही काळ त्यांना फारच प्रभावित केलं होतं. पण, ग्रॅहमचे शेअर खरेदी-विक्रीबाबतचे दृष्टिकोन फारच पारंपरिक होते. म्हणजे, सध्याच्या परिस्थितीत खरेदी करण्यास धोकादायक, परंतु भविष्यात नफ्याची शक्यता दाट असलेल्या शेअरकडे तो लक्षच द्यायचा नाही. तसंच, शेअरचे भाव चढले की, तात्काळ भांडवल आणि नफा मोकळा करून घ्यायचा. शेअरची संख्या वाढवत नेऊन एखाद्या कंपनीची मालकी हस्तगत करण्याचा तो विचारही करू शकत नव्हता. थोडक्यात, म्हैस दूध देतेय ना. मग, ती जाफराबादी आहे की पंढरपुरी, याचा विचार करायचं कारण नाही, असा त्याचा खाक्या होता.

त्याच्या विचारांप्रमाणं बफेंनी काही काळ काम केलंदेखील. पण, नंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचं सूत्र बदललं. तोटय़ाच्या गर्तेत चाललेल्या, पण चांगले भवितव्य असलेल्या कंपन्यांचे शेअर पडेल किंमतीत विकत घेणे, कंपन्यांचे विलिनीकरण अथवा मालकीबदलासारख्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून शेअर बाजारात खेळी करणे, एखाद्या कंपनीतील शेअर्सची संख्या वाढवून नंतर तिच्यावर ताबा मिळवणे या त्रिसूत्रीतून त्यानं आपली बर्कशायर हॅथवेही जगातील एक बलाढय़ कंपनी बनवली. या कंपनीकडे कोकाकोलासारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सपासून वॉशिंग्टन पोस्टसारख्या प्रथितयश वृत्तपत्रापर्यंत तब्बल 70 कंपन्यांची मालकी आहे. आजमितीस बफे 44 बिलियन डॉलरचा धनी आहे. पण, यापैकी सुमारे 99 टक्के संपत्ती वेगवेगळ्या सामाजिक कार्याना दान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय.

अर्थातच, त्यापैकी बराचसा वाटा बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि स्वत:च्या पोरांच्या सामाजिक संस्थेला मिळणार आहे. सध्या भारतभेटीवर असलेले बफे विमा व्यवसायात त्यांच्या कंपनीला असलेल्या संधी चाचपडण्यासाठी आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश भारतीय नवकोट नारायणांना समाजकार्यासाठी प्रवृत्त करण्याचाही आहे. पत्नीसाठी महागडं जेट अथवा आलिशान क्रूझ खरेदी करणा-या या उद्योजकांना ज्या समाजातून आपण आलो आहोत, त्याचं आपण काही देणं लागतो’, याचं भान आणून देण्यासाठी बफेंइतकी दुसरी योग्य व्यक्ती कोण असू शकेल?

1 comment: