Friday, May 27, 2011

यार गुलजार !




आजचा दिवस स्वतःसोबत विलक्षण ताजेपणा घेऊन आला होता. जाहिरातीत ताजमहालाच्या बॅकड्रॉपवर चहाचा कडक घोट घशाखाली उतरल्यानंतर तबल्यावर कडकडणारा झाकीर हुसेन ऐकून कसलीशी जादू व्हावी अन् अंगांगात आतूनच एक मोहोरून- फुलून- डवरून आल्याची भावना निर्माण होते ना तसं. आज वाटणारा ताजेपणा त्या कॅटेगरीतला आहे. एरवी ताजमहाल हे अतिशय उदास प्रकरण आहे. शहाजहाननं निरतिशय प्रेम केलेल्या पत्नीची ही मूर्त आठवण वास्तुशास्त्रीयदृष्ट्या कितीही भव्य असली, तरी शेवटी ते थडगंच. शहाजहान बोलूनचालून शहेनशहा ए हिंदोस्ताँ. जगातल्या अतिबलाढ्य राजसत्तांपैकी एक अशा मुघल सल्तनतीचा महामहीम कारभारी. साहजिकच त्याच्या दुःखाचा आविष्कारही तितकाच तोलामोलाचा. पातशाहीला साजेसा. आग्र्याच्या किल्ल्यात पोरानं बंदिवासात ठेवल्यानंतर तो किल्ल्याच्या गवाक्षातनं ( खिडकी म्हंटलं असतं, पण शहाजहानच्या स्थावर जंगम मालमत्तेला असं सर्वसामान्य पातळीवर आणून या प्रेमवीराची मरणोत्तरसुद्धा तौहीन करायची जुर्रत मी करणार नाहीए. धन्य धन्य ते प्रेम! बाय द वे, शहाजहानच्या जनानखान्यात फक्त दोन हजार बायका होत्या म्हणे.) ताजमहालाकडं एकटक पाहत बसायचा. प्या-या बेगमेच्या आठवणींनी विरहव्याकुळ अवस्थेत दिवस कंठले. आयुष्यातली शेवटची आठ वर्षं त्यानं आपलं हे दुःख साजरं केलं आणि शेवटी जन्नत पधारली. असा ह्या वास्तूचा अश्रुपाती इतिहास.
दुःखाचं आविष्करण कितीही भरजरी असलं, तरी ते खुपतंच. तसंही आपण संवेदनशील माणसं. ताजमहालाच्या संगमरवरी पायरीशी चार फुलं वाहून शहाजहानच्या दुःखात आपल्या सहवेदना प्रगट कराव्यात आणि त्यानंतर मागं वळूनही न पाहता तोंडात पेठा घोळवत चालू पडावं. का कोण जाणे, ताजमहाल पहायला आलेल्या अनेक नव्हाळीतल्या जोडप्यांपैकी अनेक तरुणांच्या चेह-यांवर फारच करूण भाव दिसतात. त्यामागचा कार्यकारणभाव लक्षातही येतो लगेच. अशांचे खिसे बायकोच्या शॉपिंगमध्ये कुर्बान झालेले असतात. कुठलीही शाही खिदमत खजिन्यावर ताण आणणारच. मग तो कुण्या शहाजहाननं कुण्या मुमताजला नजर केलेला पर्शियन मोत्यांचा बेशकिंमती कंठा असो अथवा कुणा संदीपच्या कुणा तेजश्रीच्या गळ्याशी सलगी करणारं नाजूकसं पेन्डन्ट. लाडेलाडे, प्रसंगी कृतककोपानं बायकोकडनं वसूलण्यात येणा-या या जिझिया कराची सक्ती कुणाला चुकलीय. तरीही, बायकोचे हट्ट न पुरवणारा नवरा नामकूल नाकाराच म्हणावा लागेल. पण, बायकांची उधळपट्टी नि त्यामुळं नव-यांची होणारी ससेहोलपट पाहिली की, ' प्रेमात मोठी किंमत चुकवावी लागते', हे दार्शनिकदृष्ट्याच काय, पण वाच्यार्थानंसुद्धा तितक्याच गांभिर्यानं घेण्याचं वाक्य आहे, हे खरोखरच पटून जातं. त्यामुळंच 'मुमताज बायको व्हावी, पण ती दुस-याची' असं त्या तरूणमंडळींचे चेहरे एकजातपणे सांगताहेत की काय, असं वाटतं.

बाय द वे ! ( हे 'बाय द वे' दुस-यांदा नि या लेखातलं शेवटचं) कुणीतरी हिंदुत्ववादी लेखक आहेत. आडनाव आठवत नाहिए. त्यांनी 'ताजमहाल नव्हे, तेजोमहाल' नामक पुस्तक लिहिलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वास्तूची निर्मिती मुळातच हिंदू राजाची आहे. तिचं क्रेडिट या 'उपटसुंभ' शहाजहाननं घेतलंय. असो. तो ताजमहाल की तेजोमहाल, याची पुरातत्त्वीय थडगी उकरण्यात रस असण्याचं मला मुळीसुद्धा कारण नाहिए. पहिली गोष्ट म्हणजे, आपण सौंदर्याचे भोक्ते आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे, परिक्षेत विचारलेल्या प्रश्नाला आज्ञाधारक मुलानं सिलॅबसमधलंच उत्तर लिहावं, असा सर्वमान्य शिरस्ता आहे. त्याच न्यायानं ताजमहालचं कर्तेपण शहाजहानकडं आणि करवितेपण मुमताजकडं देण्याचा अगोचरपणा करण्यास मी धजावलो आहे. (काळ मोठा विपरीत प्राप्त जाहला. कुसळ म्हणता मुसळ बोलिताती. जाबसाल करून समेट घडवावा, तो पुंडाई माजवून डोचकी उडविताती. ये समयी कुणाचा भरवसा धरावा ? असो. आपुले आपण हिंमत राखोन असावे. )

हे आग्रा म्हंटलं की, मला ताजमहालच्याही अगोदर तिथली मिठाईच आठवते. आपोआप अर्धपारदर्शक पेठ्याची मोठ्ठीच्या मोठ्ठी चळत नजरेसमोर तरळते. जीभ चळू लागते. तो गोडमिट्ट वास नाकपुड्यांतून आत शिरतो. मनात माशा घोंघावू लागतात. तशी शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटकादेखील आठवते. पण, अगोदर पेठाच. शिवरायांनीही दुस-या कशाच्या नाही, तर मिठाईच्याच ( मोअर स्पेसिफिकली, पेठ्याच्या) पेटा-यातूनच औरंगजेबाला गुंगारा दिला होता. त्यामुळं मुघलांच्या नव्हे, मराठ्यांच्या नव्हे, तर मिठाईच्या इतिहासापासून माझं आग्राप्रेम सुरू होतं, हे एव्हाना कळलंच असेल आपल्याला.
ह्या मिठाईच्या वासानं मेंदूचा कब्जा घेतला की, इतर गोष्टींचा मला तसा विसर पडतो. पण, जगातल्या सातव्या आश्चर्याच्या बाबतीत असं व्हावं, हे आणखी मोठं आश्चर्य आहे. प्रेमाचं अत्त्युच्च प्रतीक आणि मी मारतो आहे मिठाई नि पेठ्याच्या गप्पा... क्षमस्व. त्रिवार क्षमस्व.
पण, त्या जाहिरातीत झाकीरजींच्या तबल्यातून थिरकत उठणारी कंपनं ताजमहालाचा चिरा न् चिरा व्यापून राहिलेल्या मुमताजला जिवंत करतात आणि शहाजहानच्या दुःखाची खपली भरून काढतात, हे माझं मत दिवस संपतानाही कायम आहे.

आजचा दिवस इतका तरोताजा अनुभव देणारा कसा काय होता ? तर गुलजारची एक छोटी कविता वाचण्यात आली सकाळी सकाळी. हा आजचा मावळून गेलेला दिवस त्या कवितेनं भेट म्हणून दिलाय. या दिवसातला प्रत्येक क्षण अगदी उत्फुल्लतेचा अनुभव देणारा. मूळ कविता हिंदीत आहे. तिचा हा मराठी अनुवाद तुमच्यासाठी....
रिकामा डबा आहे फक्त, चेपलेला नि उघडावाघडा
उगीचच भिंतींशी भिडतो आहे टक्कर देत

विनाकारण सडकेवर सांडल्यासारखा, पसरल्यासारखा
येणा
-या-जाणा-यांच्या ठोकरा खात लुढकून पडल्यासारखा



तसा येतोच कधी तरी एखादा रिकामा बेकार दिवस

बेरंगी, बेईमान नि बेवारशी असा दिवस...

कविता वाचली अन् सुट्टी असली तरी, आपण असं रिकाम्या डब्यासारखं काय बसलोय, असं वाटलं. म्हणून हा लेखप्रपंच.

6 comments:

  1. atishay sundar lihile ahes ajit... tujhi writing style khupch awadali ani tajmahal bhavoticha tujhya vicharancha pravas hi....mastch mast!!!!...guljar tar superb!!!

    ReplyDelete
  2. वा. मनात माशा घोंघावू लागतात, या वाक्यानं खाऊन टाकलंस... माशा अल्ला... गुलजार म्हणतात असेच दिवस आय़ुष्यात जास्त आहेत, असं वाटत राहतं खरं...

    ReplyDelete
  3. थँक्स अमोल!असले दिवस आहेत, हे खरंच!पण, नसते तर आयुष्यात काय मजा होती ?

    ReplyDelete
  4. खाली डिब्बा है फ़क़त, खोला हुआ चीरा हुआ...
    यूँ ही दीवारों से भिड़ता हुआ, टकराता हुआ...
    बेवजह सड़कों पे बिखरा हुआ, फैलाया हुआ
    ठोकरें खाता हुआ खाली लुढ़कता डिब्बा...

    यूँ भी होता है कोई खाली-सा- बेकार-सा दिन
    ऐसा बेरंग-सा बेमानी-सा बेनाम-सा दिन...

    ReplyDelete
  5. yeah... that one.. Thanks Bhakti!

    ReplyDelete