Monday, May 24, 2010

साम्राज्यवादी अहंगंडाची उद्ध्वस्त धर्मशाळा


जे. जी. फॅरेलचं चाळीस वर्षापूर्वीचं ट्रबल्सपुस्तक मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित आणि नव्या- प्रशस्त चकचकीत दुकानांमध्ये सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आत्ताच पुस्तकावर थेट मत व्यक्त करणं वा त्याच्या निवडक भागाचा अनुवाद वाचकांसाठी देणं अशक्य आहे. मात्र पुस्तकाची ओळख करून घ्यायला विलंब नको, यासाठी ख्यातकीर्त अमेरिकन समीक्षक मेरी व्हिपल यांनी ट्रबल्सबद्दल 2003मध्ये लिहिलेल्या समीक्षालेखाचा हा मराठी अनुवाद!

साम्राज्यवादी अहंगंडाची उद्ध्वस्त धर्मशाळा

पहिल्या महायुद्धापर्यंत जगातील एकमेव आर्थिक आणि लष्करी महासत्ता असलेल्या इंग्लंडच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणा-या आयरिश जनतेच्या लढ्यावर हे पुस्तक आधारलेलं आहे. आर्यलडच्या या लढ्याला 1922नंतर फारच धार आली. आयरिश जनतेचा मुक्तिलढा जसा तीव्र झाला, तसे इंग्लंडचे राक्षसी अत्याचारही! इंग्रजांची गुर्मी आणि आयरिश स्वातंत्र्यलढ्याविषयीची बेफिकिरी यामुळे ही क्रांती अटळ ठरली. आर्यलड- इंग्लंडमध्ये चाललेल्या लढ्यातून सर्वसामान्य जनता बेघर होत गेली. जे. जी. फॅरेल यांनी ट्रबल्समधून हाच विषय हाताळला आहे.

आर्यलडमधल्या वेक्सफोर्ड परगण्यातले 300 खोल्यांचे हॉटेल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ट्रबल्सफुलत राहते. या हॉटेलचा मालक एडवर्ड स्पेन्सर नामक गृहस्थ कट्टर प्रॉटेस्टंटपंथी आणि परंपरावादी मतांचा पगडा असलेला आहे. आपण फारच दयाळू आहोत, असा स्पेन्सरचा समज आहे. स्पेन्सर आपल्या हॉटेलमध्ये भाडय़ाने खोल्या घेऊन राहणा-या व्यक्तींकडून त्यांची इंग्लंडच्या राजाप्रती श्रद्धा आणि निष्ठा असल्याचं शपथपत्र लिहून घेऊ इच्छित असतो! पण या भाडेकरूंकडून त्याला साफ नकार मिळतो. पहिल्या महायुद्धाच्या जखमा हॉटेलच्या वास्तूमध्ये ठायीठायी, तसंच तिथल्या माणसांमध्येही जाणवत असतात. युद्धकाळात आणि युद्धाची धामधूम संपल्यानंतर हॉटेलच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्याची इतकी परवड झालेली आहे की, ते आता देखभालीच्याही पलीकडे गेले आहे. ‘आयरिश क्रांतीची सुरुवात झाल्यामुळे ब्रिटिश पर्यटकांनीही आर्यलडकडे पाठ फिरवली आहे. पर्यटकांचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष, या दोन गोष्टींमुळे हॉटेलला उद्ध्वस्त धर्मशाळेचे स्वरूप आले आहे. कुणीही राहायला तयार नसलेल्या या हॉटेलात काही माणसं मात्र विनातक्रार राहतायत. भाडं भरण्याची क्षमता नसलेल्या वयोवृद्धांचा त्यात समावेश आहे. आयरिश क्रांतीचे नेतृत्व असलेल्या शिन फेनपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलच्या परिसरात हल्ले होताहेत. पण किरकोळ दंगलींपेक्षा त्यांचे स्वरूप मोठे नाही. या ऐकिव बातम्या हॉटेलमध्ये राहणा-यांच्या कानांवर पडतात. पण त्यांना कुणीही क्रांतिकारक दिसत मात्र नाही.

अशा वातावरणात मेजर ब्रँडन आर्चर हॉटेलमध्ये येतो. युद्धात सहभागी झालेल्या या लष्करी अधिका-याच्या मनात अनेक भावनिक कल्लोळ उठलेले असतात. रुग्णालयात उपचार घेऊन बाहेर पडलेला आर्चर हे भावनिक धक्के अद्यापही पचवण्याचा प्रयत्न करत आयुष्य जगत असतो. ‘मॅजेस्टिकनावाच्या या हॉटेलात तो आपल्या प्रेयसीच्या शोधात आलेला असतो. पण ती किंवा तिचे कुटुंबीय, यांच्यापैकी त्याचं स्वागत करायला तिथं कुणीच उपस्थित नसतं. आर्चर क्लॉस्ट्रोफोबियानं ( बंद असलेल्या ठिकाणाबद्दल वाटणारी भीती) पछाडलेला असतो. त्याही परिस्थितीत तिच्या शोधात तो तीन वर्ष तिथं राहतो. या तीन वर्षातली रणधुमाळी हा ट्रबल्सचा मुख्य कथाविषय आहे.

फॅरेलनं मॅजेस्टिकहॉटेलचे रूपक हे ब्रिटनच्या राणीच्या- ‘हर मॅजेस्टी क्वीन ऑफ इंग्लंडच्या आर्यलडवरील अनिर्बंध सत्तेसाठी वापरलं आहे. वाचकांना हॉटेलचे वर्णन वाचताना ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आर्यलडच्या आग्नेय दिशेला असलेले हे हॉटेल इंग्लंड आणि वेल्सला अगदी सामोरं असं उभं राहिलं आहे. आयरिश समुद्रावरून येणारं वारं, वादळ आणि लाटांनी या हॉटेलच्या वास्तूला प्रचंड धक्के बसत आहेत. तुटलेल्या खिडक्या, गळकं छप्पर आणि भिंतींमधून वाढलेला झाडोरा, अशी या हॉटेलची अवस्था झाली आहे. हॉटेलमधल्या एकमेव बारचं नावही इम्पिरियलअसं आहे. त्यात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. या वर्णनातून ब्रिटिश साम्राज्याला लागलेली घरघर उभी करण्याचा प्रयत्न फॅरेलनं केला आहे. हॉटेलची ही अवस्था त्यानं अतिशय खोचक आणि विनोदी ढंगात सादर केली आहे. आर्चरची खोली बदलण्याची धडपड, एडवर्डचं वागणं, हॉटेलमध्ये उंदरांचा झालेला सुळसुळाट, या सा-या रूपकात्मक गोष्टी फॅरेलनं ब्रिटिश साम्राज्यवादाचं वर्णन करण्यासाठी आणि त्यावर कोरडे ओढण्यासाठी अतिशय चपखलपणे वापरल्या आहेत. असल्या वर्चस्ववादी शक्तींच्या रेट्यामुळे स्वत:चंच घर राहण्यासाठी कसं अयोग्य होत जातं, याचं विषण्ण करणारं वर्णन ट्रबल्समध्ये आहे.

हा लढा म्हणजे संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत जगणा-या गावंढळ आयरिशांना सुसंस्कृत करणं, ही सुधारलेल्या ब्रिटिशांची नैतिक जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. (हाच तो व्हाइट मॅन्स बर्डनचा अहंगंड!) तसं समजणा-या हॉटेलमधल्या काही भाडेकरूंविषयीचा प्रसंग रंगवताना फॅरेलच्या लिखाणाला धार चढते. पुस्तकाचा मोठा प्लॉट छोट्या छोट्या उपकथांमधून उलगडत जाताना तो जागतिक परिप्रेक्ष्यात घडणा-या घटनांचा उल्लेख करत राहतो. पहिल्या महायुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळालेले बळ, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचा संघर्ष, रशियातील बोल्शेव्हिकांचा हल्ला, शिकागोतल्या दंगलींचा संबंध आयरिश क्रांतीशी जोडताना त्याच्या प्रतिभेचा आविष्कार दिसतो. त्याच्या सीज ऑफ कृष्णापूरला जरी 1973मध्ये बुकर मिळालं असलं, तरी ट्रबल्सही त्याची सर्वोत्तम साहित्यकृती आहे. आयरिश स्वातंत्र्य चळवळीमागील भावनिक मुद्दे पूर्णपणे बाजूला सारत वाचकाला तो ब्रिटिश आणि आयरिश या दोघांच्याही बाजू कुठलाही पक्षपात करता दाखवतो, हेच त्याचे लेखक म्हणून यश आहे।

हरवलेलं बक्षीस..

सन 1971 पासून अतिप्रतिष्ठित बुकरपुरस्कारांसाठीच्या नियमांत बदल झाले. नव्या नियमांनुसार, चालू वर्षात जी पुस्तके प्रकाशित होतील, त्यांच्यापैकीच एक पुस्तक बुकरमिळण्यास पात्र ठरले. त्यामुळे 1970मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आपोआप पारितोषिकांसाठी अपात्र ठरली. जे. जी. फॅरेलचं ट्रबल्सही त्यातलंच. 1973मध्ये त्याला सीज ऑफ कृष्णपूरसाठी बुकर मिळालं. पण पुढली 40 वर्ष ट्रबल्समात्र पारितोषिकापासून वंचित राहिलं. सत्तरीतला हा अन्याय दूर करण्याचे ठरवीत बुकर समितीने 1970मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी एक सर्वोत्तम पुस्तक निवडून त्याला लॉस्ट मॅन बुकर प्राइझद्यायचं ठरवलं. 1070मधल्या सहा पुस्तकांतून फॅरेलच्या ट्रबल्सनं आजच्या वाचकांची सर्वाधिक पसंती मिळवली.

अवघ्या 44 वर्षाच्या आयुष्यात (जन्म : 25 जानेवारी 1935, मृत्यू : 11 ऑगस्ट 1979) जे. जी. फॅरेल यांनी साम्राज्यवादाचा अस्त कसा अटळच होता, हे सांगणा-या तीन कादंब-या लिहिल्या. या त्रयीपैकी ट्रबल्सही फॅरेल यांच्या थेट अनुभवांशी अधिक जवळची, त्यामुळे अधिक अस्सल होती. फॅरेल हेही आयरिश होते.

चाळीस वर्षापूर्वीचं हे पुस्तक मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित आणि नव्या- प्रशस्त चकचकीत दुकानांमध्ये सध्या उपलब्ध नाही. ‘मागवूअसे वायदेच सर्व पुस्तकविक्रेत्यांकडून प्रहार-बुकमार्कला ऐकावे लागले. त्यामुळे आत्ताच पुस्तकावर थेट मत व्यक्त करणं वा त्याच्या निवडक भागाचा अनुवाद वाचकांसाठी देणं अशक्य आहे. मात्र पुस्तकाची ओळख करून घ्यायला विलंब नको, यासाठी ख्यातकीर्त अमेरिकन समीक्षक मेरी व्हिपल यांनी ट्रबल्सबद्दल 2003मध्ये लिहिलेल्या समीक्षालेखाचा हा मराठी अनुवाद!

No comments:

Post a Comment