Tuesday, May 25, 2010

वाचाळ तर वाचाळ!



" आयुष्यभर जमा केलेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे आत्मचरित्रं! वलयांकित माणसांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची इतरांना असलेली तीव्र इच्छा बहुधा त्यांना आत्मकथनं लिहायला भाग पाडत असावी."

आयुष्यभर जमा केलेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे आत्मचरित्रं! वलयांकित माणसांच्या खाजगी आयुष्यात डोकावून पाहण्याची इतरांना असलेली तीव्र इच्छा बहुधा त्यांना आत्मकथनं लिहायला भाग पाडत असावी. मग ती मर्लिन मन्रोच्या रंगेल आयुष्यातील ‘रोमॅन्टिक एन्काउंटर्स’ असोत किंवा आपला ‘एकटा जीव’ दादा कोंडकेची लफडी असोत. त्यांच्या आयुष्यातल्या मसालेदार घटनांमुळं लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा मोह अनावर होतोच. पण भारतीय उपखंडातील राजकारणी जेव्हा आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखणी हाती घेतात, तेव्हा त्या पुस्तकातील मजकुराच्या विश्वासार्हतेबद्दल ब-याचदा शंका घेतली जाते. तसं त्यांचंही आयुष्य मसालेदारच असतं. कारण राजकारणाच्या पटात सोंगट्यांची मांडामांड करताना ‘नैतिक’ म्हणता येणार नाहीत, अशा ब-याच लांड्या-लबाड्या आणि लटपटी-खटपटी त्यांनी केलेल्या असतात. आपण घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांचं समर्थन आणि स्वत:ची ‘इमेज बिल्डिंग’ या हेतूनंच भारतीय उपखंडातील राजकारणी आत्मचरित्र लिहिण्याचा खटाटोप करतात. त्यामुळं त्यांच्या लिहिण्याला साहित्यमूल्य तर नसतंच, पण ‘क्रेडिबिलिटी’ नावाची गोष्ट औषधालाही सापडत नाही. ‘स्व-अनुनय’ करणारी अशी पुस्तके राजकारण्यांनी प्रसिद्ध केली की, वाद-प्रतिवादांचा धुरळा उडतोच. भारतीय साहित्यविश्वात तशी काही उदाहरणे आहेत. नरसिंह राव यांच्या ‘इनसायडर’मध्ये बाबरी मशिदीचं प्रकरण सोडलं, तर या पुस्तकाच्या खरेपणाबद्दल फारशा शंका घेतल्या गेल्या नाहीत. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री राहिलेले जसवंतसिंग यांच्या ‘कॉल टू ऑनर’मुळे राजकारण्यांच्या पुस्तक लेखनाबद्दल वाचकांच्या मनात असलेली उरलीसुरली विश्वासार्हताही संपली. आता तो केवळ प्रसिद्धीमाध्यमांनी चघळण्याचा विषय बनला आहे. आत्मचरित्र लिहिणं हा स्वत:च्या चुका सार्वजनिकरीत्या कबूल करण्याचा भाग आहे, असं मानण्याचे दिवस इतिहासजमा झालेत. पुस्तकाचा ‘प्लॉट’ आता राजकीय गणितं सोडवण्यासाठी वापरला जाऊ लागलाय. सुरुवात नरसिंह रावांच्या ‘इनसायडर’पासूनच करू. काँग्रेसला उतरती कळा लागली होती, तेव्हा ते पंतप्रधान बनले. अल्पमतातलं सरकार चालवण्याची कसरत करणारा संसदीय विधिमंडळातील पहिला काँग्रेसी नेता, अशी ओळख त्यांना मिळाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांना देशाचा गाडा हाकावा लागला. बाबरी मशीद पडली, ती त्यांच्याच काळात. राव यांनी मनात आणलं असतं, तर मशीद पडण्यावाचून वाचली असती, असा आरोप त्यांच्यावर होत होता. या एका प्रकरणावरून त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. इतकी की, त्यांची तोपर्यंतची कारकीर्द मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली. पंतप्रधानपद उपभोगून पायउतार झाल्यानंतर त्यांनी बाबरी मशीद प्रकरणावरून आपल्या कपडय़ांना लागलेली धूळ झटकायचं ठरवलं. ‘इनसायडर’ लिहिण्यापाठीमागचा उद्देशही तोच असावा. कारण या पुस्तकातील बरीचशी पानं या प्रकरणाला वाहिली आहेत. पण या प्रकरणाच्या झळा त्यांना इतक्या बसल्या की, त्यांना ‘अयोध्या’ नावाचं स्वतंत्र पुस्तक लिहावं लागलं. ही मशीद आपण का वाचवू शकलो नाही, याची केविलवाणी कारणं त्यांनी या तीनशे पानी पुस्तकात दिली आहेत. १९९३मध्ये त्यांच्या सरकारला संसदेत बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, या आरोपाला त्यांनी ‘इनसायडर’मधून उत्तर दिले खरे! पण न्यायालयाने या प्रकरणी त्यांच्यावर ताशेरे ओढलेच. इकडे राव यांनी बाबरीपतनाच्या परिणामांची जबाबदारी घ्यायला नकार दिला, तर लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या ‘माय कंट्री, माय लाइफ’ या पुस्तकात याच गोष्टीवरून नक्राश्रू ढाळले आहेत. ‘ज्या दिवशी मशीद पडली, तो आपल्या आयुष्यातील सर्वात दु:खदायक दिवस होता,’ असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय. रथयात्रा काढून हिंदुत्वाचा नारा देत फिरणा-या अडवाणींना अशी प्रांजळ (?) कबुली देताना पाहून भलेभले राजकीय विश्लेषक चाट पडले. या पुस्तकातून त्यांनी एकीकडे हिंदुत्ववाद्यांना चुचकारताना बाबरी मशीद पडल्याबद्दल तीव्र दु:खही व्यक्त केले आहे. पण हे दु:ख केवळ वरवरचेच आहे, हे त्यांच्या पुस्तकातील पुढील परिच्छेद वाचताना लक्षात येतं. त्यात अडवाणी म्हणतात, ‘सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढल्यामुळे लोकांच्या रक्तात धर्मभावना किती तीव्र प्रमाणात रूजली आहे, हे माझ्या लक्षात आलं. माझ्या या चळवळीमुळं लोकांनी काँग्रेस-कम्युनिस्टांसारख्या दांभिक धर्मनिरपेक्षतावाद्यांना नाकारलं. भाजप हाच खराखुरा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, याची त्यांना जाणीव झाली.’ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सहा महिने अगोदरच बरखास्त करून २००४ मध्ये निवडणुका घेऊन पुन्हा सत्तेत यायचा त्यांचा प्रयत्न फसला. ‘इंडिया शायनिंग’चा चकचकितपणा शेवटी बेगडीच ठरला, हे मात्र त्यांनी आत्मचरित्रात मान्य केलंय. अगदी अलीकडच्या काळात दोन आत्मचरित्रांनी जाणकार वाचक आणि राजकीय विश्लेषकांची फार करमणूक केली. ती म्हणजे परवेझ मुशर्रफ यांचं ‘इन द लाइन ऑफ फायर’ आणि माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांचं ‘ए कॉल टू ऑनर’! मुशर्रफसाहेबांनी त्यांच्या पुस्तकात तर फारच धमाल उडवून दिलीय. वास्तववादी आत्मकथन कुठे संपतं आणि काल्पनिक ललित लेखन कुठं सुरू होतं, यांच्यातील धूसर सीमारेषा मुशर्रफ यांचं पुस्तक वाचताना आणखीनच अस्पष्ट होत जाते. भारतीय लष्कराने ताबारेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात प्रवेश केला, म्हणून १९९९मध्ये कारगिल युद्ध घडलं, असा तद्दन खोटारडेपणाचा आरोप त्यांनी या पुस्तकातून केला आहे. हा एक प्रसंग उदाहरणादाखल इथे नमूद केला असला, तरी त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावे देणारे अनेक प्रसंग त्यांनी या सव्वातीनशे पानांमधून रंगवले आहेत. अपवाद फक्त त्यांच्या प्रेम-प्रकरणांचा असू शकेल. जसवंत सिंग यांनी ‘ए कॉल टू ऑनर’ हे पुस्तक लिहून भाजपलाच घायाळ केलं. कंदाहार प्रकरण असो, कारगिल युद्ध असो वा गुजरात दंगली असोत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच लक्ष्य बनवून त्यांनी शरसंधान केलं. सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना वाजपेयी यांच्या कार्यकाळात झालेल्या महत्त्वाच्या घटनांच्या जबाबदारीपासून स्वत:ला नामानिराळं ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या आत्मचरित्रात स्पष्टपणे जाणवतो. ही शाब्दिक कसरत साधताना जसवंतजी सपशेल आडवे पडलेले दिसतात. भारताचं परराष्ट्र धोरण आखताना भाजपचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ त्यांनी केंद्रस्थानी ठेवला होता, याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी पुस्तकातूनच दिली आहे. बाबरी मशिदीचे पतन आणि गुजरात दंगलींबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली असली, तरी त्यांची धार्मिक कट्टरता त्यांच्या शब्दांतून प्रतीत होतेच. ‘भारतात फक्त एकच संस्कृती नांदते, ती म्हणजे हिंदू अथवा भारतीय! या दोन नावांपैकी तिला जे पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता,’ असं त्यांनी ‘ए कॉल टू ऑनर’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. सक्रिय राजकारणात असणाऱ्यांना सत्य सांगण्याची जोखीम पत्करणे अवघड असते. सत्यकथन त्यांच्या कारकीर्दीच्या मुळावर येऊ शकतं. त्यामुळे जर काही लिहायचंच झालं तर ते मखलाशी करूनच! तशीही आज राजकारण्यांची परिस्थिती ‘वाचाळ बहु बडबडला’ अशीच आहे. शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने फारच स्वस्त गोष्ट! पुस्तक खपण्यासाठी काही तरी सनसनाटी लिहायचं, झालंच तर तेही साहित्यिक ऊर्मीतून नव्हे, तर ‘सेल्फ ग्लोरिफिकेशन’साठी! याचीच खूणगाठ मनाशी बांधत राजकारणी स्वत:बद्दल लिहायला बसतात. त्यांचा संघर्षमयी जीवनप्रवास इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरेलही. पण प्रश्न विश्वासार्हतेचा आहे.

No comments:

Post a Comment