Sunday, July 17, 2011

चाल चवचाल ?

 
जुलैच्या अखेरच्या पंधरवड्यात भारतातल्या मुंबई आणि दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरांतल्या रस्त्यांना न भूतो असा स्लटवॉकपाहायला मिळणार आहे. अर्थात, विथ इट्स ओन देसी व्हर्जन. संपूर्णत: पाश्चात्त्य स्त्रीवादी चळवळीचं अपत्य असलेल्या स्लटवॉकचं मुंबईतलं नाव असेल सिटी बजाओ’, तर दिल्लीतलं बेशरमी मोर्चा’. ‘स्लटवॉकच्या आयोजनकर्त्यांना त्याचं असं देशीकरण करायची पश्चातबुद्धी झाली, हे आपल्या देशातल्या सामाजिक चळवळींचं सुदैवच म्हणायला हवं. 

ढोबळमानाने विचार केला तर जगातल्या स्त्रीजातीला छळणारे प्रश्न सारखेच असल्याचे दिसतील; पण खोलात गेल्यास, भारतीय जात-वर्गव्यवस्थेच्या उतरंडीत पिचलेल्या स्त्रीच्या अडचणी उर्वरित जागतिक स्त्रीसमाजाच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळ्या आहेत. भारतात होत असलेल्या स्लटवॉकमधील पदयात्रेत पावले टाकण्याची संधी त्या स्त्रीला दुरान्वयानेही मिळणार नाही, हा भाग अलाहिदा. पण, आर्थिक प्रगतीतून उच्च सामाजिक स्तर प्राप्त केलेल्या आणि स्वत:च्या अस्तित्वभानाविषयी जागृत झालेल्या महानगरी स्त्रीवर्गाने पुढारपण घेत पुरुषप्रधान मानसिकतेविरुद्ध बिगुल फुंकून लढाईची सुरुवात केली, ही आनंदाची बाब आहे.

स्लटवॉकच्या माध्यमातून पुरुषी मानसिकतेविरुद्ध उघड बंडखोरीचा पवित्रा आपण का घेतला आहे, हे भारतीय समाजमनाला समजावून द्यायचे असेल, तर त्या आंदोलनाच्या नावाचे भारतीयीकरण आवश्यक होते. एक तर, ‘स्लटहा शब्द एका फारच मर्यादित अशा सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळात वापरण्यात येतो. शहरी उच्चभ्रू असा तो वर्ग आहे. तसेच, त्या शब्दाचा आविष्कारच मुळातून अमेरिकन सांस्कृतिक अभिसरणाचा परिपाक आहे. तो जसाच्या तसा भारतीय संदर्भात वापरणे कसे शक्य आहे? त्याउलट स्लटसाठी भारतीय प्रतिशब्द वापरला, तर समाजातील मोठय़ा लोकसंख्येला आंदोलनाचा उद्देश लक्षात येईल आणि आंदोलनाचे इप्सित साध्य होईल, हा विचार आयोजकांनी केला असावा. मग त्याचं नाव माल चालमोर्चा असं करण्याचं ठरलं. आपल्याकडे मालहा शब्द स्त्रीच्या बाबतीत निंदाव्यंजक अर्थानं वापरला जातो. तसेच, त्या शब्दाने स्त्रीचा थेट संबंध क्रयवस्तूशी जोडला जातो. या कारणामुळे त्याही नावापुढे फुली मारण्यात आली. शेवटी मुंबईत सिटी बजाओआणि दिल्लीत बेशरमी मोर्चाया नावानं हे मोर्चे काढण्याचं संमत झालं. आपल्याकडे शिटी हा खास पुरुषी कर्तृत्वाचा भाग मानला जातो. या महिनाअखेरीस त्या मुंबईतल्या स्त्रियांच्या तोंडून निघतील. या शिट्यांतून निघणार्‍या आवाजाच्या कंपनांनी पुरुषी मेंदूंमध्ये किमान प्रमाणात तरी संवेदनालहरी निर्माण व्हाव्यात.

या आंदोलनाकडे केवळ एका विशिष्ट सुस्थित आणि सुसंपन्न वर्गातील महिलांचं आंदोलन म्हणून पाहिले जात असले, तरी त्यादेखील सर्वसमावेशक समाजाचाच एक भाग आहेत, हे नाकारून कसे चालेल? स्त्रियांनी घातलेल्या मिनी स्कर्टवरून त्यांची तसली’ (‘तसलीम्हणजे स्लट’. ‘स्लटया शब्दाचा प्रचलित अर्थ वेश्या म्हणून घेतला जात असला, तरी त्याचा मूळ अर्थ अनेक पुरुष जोडीदार असणारी स्त्री अथवा अव्यवस्थित राहणारीअसा आहे. त्यात तिची इच्छा हा घटक महत्त्वाचा मानला जातो.) म्हणून संभावना करणार्‍या आणि त्यांच्या उघड्या मांड्या आपल्यासाठी खुलं निमंत्रण असल्याचं समजणार्‍यांमध्ये शहरी जडणघडणीतल्या पुरुषांचंच प्रमाण लक्षणीय आहे. इतरांची तर बातच सोडून द्या. केवळ अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घातल्याने स्त्रियांवर बलात्कार होतात, या कुणा कॅनेडियन पोलिस अधिकार्‍याच्या वक्तव्यामुळे जगभरात स्लटवॉकची चळवळ सुरू झाली आहे. त्याचे हे ढोबळ विधान विकृत पुरुषी मानसिकतेने लडबडलेले आणि तितकेच मूर्खपणाचेही आहे. दुर्दैवाने, बहुतांश भारतीय पुरुष या बाबतीत त्या पोलिस अधिकार्‍याचेच भाऊबंद आहेत. चार वर्षांची चिमुरडी असो अथवा पन्नाशीची पोक्त महिला.. बलात्कार करणारे त्यांचे कपडे कसे आहेत, ते पाहत नाहीत. बळजबरीपूर्वक हस्तगत केल्या जाणार्‍या कुठल्याही गोष्टीबाबत वरचढपणा अथवा सत्तेचा दर्प जाणवतो. बलात्कारांचेही तसेच असते. लैंगिक व्यवहारांबाबत काय नैतिक आणि काय अनैतिक, याची चर्चा करण्याची ही जागा नाही. पण, असे व्यवहार करताना परस्परसहमती हा घटक त्यात अनुस्यूत असावा की नाही? की एरवी अप्राप्य वाटणार्‍या गोष्टी थेट बलपूर्वक हस्तगत करायच्या? लैंगिक भावना ही मानवप्राण्याच्या सहजप्रेरणांपैकी एक आहे. त्यामुळे निकोप लैंगिक संबंधांचा पुरस्कार करण्याऐवजी आणि स्त्रीला समतेची वागणूक देण्याची भाषा बोलण्याऐवजी हे कर्मठ आणि सनातनी वृत्तीचे पाखंड बायकांच्या कपड्यांवर का बंधने घालत आहेत? तंग कपड्यांतल्या स्त्रियांनी आत्मप्रतिष्ठा गहाण टाकलेली असते, हा प्रचार कोण करतं आहे? अमुक कपड्यांनी तुमचा गळा जरा जास्तच दिसतो, असा आक्षेप स्त्रियांवर घेणार्‍या मंडळींच्या नजरेला वरची चार बटनं व्हीआकारात उघडी टाकून आपल्या मस्क्युलॅनिटीचं प्रदर्शन करणारा पुरुष कसा खटकत नाही? नखशिखांत साडीत लपेटलेली आणि पेपेची लो-वेस्ट जीन्स घातलेली, या दोहोंमध्ये सेक्स अपीलकुणाचं हे कसं आणि कुठल्या निकषांवर ठरवलं जातं ? ते कोण ठरवतं ? या प्रश्नांची उत्तरं पुरुषी वर्चस्ववादी मानसिकतेत दडलेली आहेत.
..........

4 comments:

  1. या ब्लॉगवर बराच वेळ कोणीही मतप्रदर्शन केलेले नाही, त्यामुळे सर्वजन अंतर्मुख झाले का...

    ReplyDelete
  2. @anonymous! titke zale tari purese aahe...

    ReplyDelete
  3. ब्लॉग छान आहे...फक्त चॉकलेटी बॅकड्रॉपला काळं अक्षर वाचताना खूप
    त्रास होतोय. शक्य असल्यासं बॅकड्रॉप बदलाल का? - ABHIJIT

    ReplyDelete
  4. Hi sir! Sorry, ते माझ्या लक्षातच आलं नाही. पण, बॅकड्रॉप बदलण्याऐवजी अक्षरं पांढरी केलीयत...

    ReplyDelete