Thursday, July 28, 2011

झापडबंद महानगरी जाणिवा


     महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीत ग्रामीण साहित्याला सुगीचे दिवस आले असताना दुसरीकडे महानगरी संवेदनांचे लेखक हरवले असावेत की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात झोकून देत मुक्त अर्थव्यवस्थेचा अवलंब केल्यानंतर बदललेल्या आर्थिक हितसंबंधांनी शेतकरीवर्गाची उत्तरोत्तर परवड कशी होत गेली, त्याचे प्रभावी रेखाटन अलीकडील काळात सदानंद देशमुखांपासून आसाराम लोमटे- आनंद विंगकरांपर्यंतच्या लेखकांनी कमालीच्या संवेदनशीलतेने केले आहे. गावगाड्याच्या परिघात कष्टी होत चाललेले सामान्य माणसाचे जिणे त्यांच्या कथा-कादंब-यांचा आस्थेचा विषय बनताना दुसरीकडे महानगरी वाचकवर्ग त्याच्या जगण्याशी सम साधेल अशा साहित्यापासून अद्यापही वंचित आहे. महानगरी जाणिवेच्या सकस साहित्याची निर्मिती थंडावल्याने होणारी बौद्धिक उपासमार कशाने भरून काढायची, हा या वाचकांसमोर पडलेला मोठाच प्रश्न आहे.

        महानगरी साहित्यात प्रकट झालेले व्यक्तिगत अनुभव समूहाची अभिव्यक्ती प्रकट व्यक्त करण्यात कमी पडतात, इतक्या पराकोटीच्या आत्मकेंद्रिततेचा अनुभव हे साहित्य वाचताना येतो. १९९३मध्ये मुंबईत बाँबस्फोट झाले. पाठोपाठ उसळलेल्या जातीय दंगलींनी मुंबई शहर भाजून निघाले. २००३ मध्ये पुन्हा मुंबईने बॉम्बस्फोट अनुभवले. २००५मध्ये मिठी नदीला आलेल्या पुराने मुंबई जलमय झाली. २००६मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटांनी मुंबई हादरली. २००८च्या दहशतवादी हल्ल्याने केवळ मुंबईच नव्हे, अवघा देश हादरून गेला. काही अंशी अस्मानी आणि काही ब-याचशा सुलतानी अशा या संकटामुळे समाजमन अक्षरश: ढवळून निघाले. बॉम्बस्फोट असोत अथवा अतिवृष्टी असो, संकटे मानवनिर्मित असोत वा नैसर्गिक... कवितेचा अपवाद वगळला तर यापैकी एकही घटना कथा-कादंबरीचा विषय होऊ शकलेली नाही.

         ९३च्या बॉम्बस्फोटांना तर तब्बल १८ वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा एकाच वेळी दिसलेले माणसाचे रौद्रभीषण आणि कमालीचे केविलवाणे   रूप हा कादंबरीविषय का बनू शकत नाही? त्या वेळचा मनुष्यसंहार आणि मानवतेचे दर्शन हा कादंबरीकाराच्या आस्थेचा विषय का बनू शकत नाही? इतकी झापडबंद आत्मकेंद्रितता या साहित्यिकांमध्ये कशामुळे आली असावी? की वेगवान जगामुळे आसपास घटणा-या घटना-प्रसंगांचे आकलन होण्यास आपले साहित्यिक कमी पडताहेतखरे तर जागतिकीकरणाने पुरस्कार केलेल्या अवाजवी व्यक्तिस्तोमातून ते उद्भवलेले आहे. स्वत:ला रोमँटिक म्हणवून घेणारे नवे महानगरी जाणिवांचे साहित्यिक येथील समाजव्यवहारांपासून कमालीचे फटकून असल्याचेही जाणवत आहे. कलेतील प्रयोगशीलता जपण्याच्या नावाखाली समष्टीशी बांधिलकी तोडून टाकण्याचा प्रकार त्यांच्याकडून होतो आहे.

     महानगरांचा पोत बहुरंगी-बहुढंगी असतो. एकाच प्रतलात अनेक सामाजिक वास्तवं इथे नांदत असतात. अशा महानगरी जीवनवास्तवाचे लख्ख प्रतिबिंब कादंबरीच्या कॅन्व्हासवर उमटायचे झाल्यास लेखकाने येथील सर्वसामान्यांच्या जीवनव्यवहारांविषयी कळकळ दाखवणे आणि सजग असणेही गरजेचे आहे. येथील बहुसांस्कृतिकतेच्या मखमली आवरणाखालून वाहणा-या बहुआयामी आणि तितक्याच गुंतागुंतीच्या सामाजिक प्रवाहांचा आणि अंतर्विरोधांचा शोध घेणे व त्यांची संगती लावणे, हे मोठेच जिकिरीचे काम आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु, साहित्यिक म्हणून हे आव्हान यांच्यापैकी कुणीतरी पेलायला नको का, हाच खरा प्रश्न आहे.

एकीकडे महानगरांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण होत नाही, अशी ओरड करताना दुसरीकडे वाचक म्हणून आपली संवेदनशीलता कमी तर होत नाही ना, याचादेखील अंतर्मुख होऊन विचार या क्षणी झाला पाहिजे. कारण, आधुनिकतेचे पुरस्कर्ते असणारे आपण महानगरी वाचक अभिव्यक्तीसाठी मराठीचा किती प्रमाणात वापर करतो, याचादेखील विचार केला पाहिजे. केवळ सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून सार्वजनिक व्यवहारांत आपण इंग्लिश बोलणार असू, तर साहित्यिकांकडून सकस लेखननिर्मितीची अपेक्षा कुठल्या तोंडाने करणार? कारण, साहित्यिकसुद्धा त्याच समाजव्यवस्थेतून तयार होत असतात.

ख्रिस्तोफर कॉडवेलने आपल्या इल्युजन अँड रिअ‍ॅलिटीया जगप्रसिद्घ ग्रंथात म्हंटले आहे की, ‘मीम्हणून वावरणा-या कलावंतामध्ये सामाजिक विश्वाने घडवलेली एक विशिष्ट जाणीव असते. कलावंत म्हणून त्या मीला कलात्मक जाणिवेचे महत्त्व वाटते. त्या जाणिवेमध्ये मला जाणवलेल्या माझ्यावर परिणाम करणा-या सर्व कलांचे भान असते. त्याच भावनिक व्यवस्थेतून माझ्यापुढे एक जागरूक विषय उभा राहतो.माझे अनुभव मात्र त्या जाणिवेस विसंवादी असतात. म्हणजेच साहित्याच्या सामाजिक विश्वात न लाभलेला असा एक नवा व्यक्तिगत अनुभव मला येतो. म्हणून मला आत्मप्रकटीकरण करावेसे वाटते. त्यात माझा खासगी अनुभव अशा पद्धतीने व्यक्त होतो की, तो कलेच्या सामाजिक विश्वात अंतर्भूत होऊन त्याला कलाकृतीचे स्वरूप प्राप्त होते. अस्तित्वात असलेले कलेचे जग आणि जीवनव्यवहारातील माझा अनुभव यांच्या समन्वयातून ही गोष्ट साकारते.

        आताच्या महानगरी साहित्यावर नजर फिरवली असता लेखकांचे व्यक्तिगत अनुभव हे इतके व्यक्तिगत असतात की, वाचक म्हणून आपण त्या लेखकाच्या अनुभवांशी जोडूनच घेऊ शकत नाही. इतके ते दूरचे आणि परके वाटतात. मराठी साहित्यातील म्हटल्या तर या उणिवा. त्याची दखल आता नाही तर कधी घ्यायची?
...
'दिव्य मराठी'च्या रविवार पुरवणी 'रसिक'मधील लेख 

7 comments:

  1. पहिल्यांदा तुझ्या या निरीक्षणाला दाद देतो आणि ज्या ओघवत्या शैलीतून तू हे निरीक्षण नोंदवले आहे ते देखील अप्रतीम आहे. यापूर्वीचे तीन लेखही मी वाचले त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. मात्र त्या प्रदर्शीत झाल्या नाहीत याचा खेद वाटतोय...असो..तू मात्र लिहित राहा...मी वाचत राहतो..

    ReplyDelete
  2. changla zalay lekh

    ReplyDelete
  3. Thanks Alok, Vinod and Mukund sir!

    ReplyDelete
  4. yala mhanatat bashkal badabadivar sansanit uttar.....I like ur unbiased view..balanced approach... liberal one

    ReplyDelete