Friday, April 15, 2011

बांधाबांध...

" म्युलर यांचा काळ नाझीवादाला चेचून काढल्यानंतरचा आणि रशियाच्या पंजाखालील साम्यवादी वरवंटय़ाचा. हुकूमशाहीबद्दलची तिडीक कमालीच्या थंड शब्दांतून व्यक्त करणारी लेखनशैली, हे त्यांच्या कादंब-यांचं वैशिष्टय़! अशा व्यवस्थेबद्दलची चीड उपरोधिक नव्हे, तर अगदी साध्या शब्दांतून त्यांनी मांडलीय."

हुकूमशाहीच्या विरोधात लेखणी चालवणा-या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणा-या कुठल्याही समाजव्यवस्थेच्या विरोधात उभ्या राहणा-या जागतिक पातळीवरील साहित्यिकांपैकी एक हेर्टा म्युलर! त्यांना साहित्यासाठी यंदाचं नोबेल देऊन गौरवण्यात आलं. म्युलर यांचा काळ नाझीवादाला चेचून काढल्यानंतरचा आणि रशियाच्या पंजाखालील साम्यवादी वरवंटय़ाचा. हुकूमशाहीबद्दलची तिडीक कमालीच्या थंड शब्दांतून व्यक्त करणारी लेखनशैली, हे त्यांच्या कादंब-यांचं वैशिष्टय़! अशा व्यवस्थेबद्दलची चीड उपरोधिक नव्हे, तर अगदी साध्या शब्दांतून त्यांनी मांडलीय. पण त्या शब्दांत गर्भित असणारा वक्रोक्तीपूर्ण उपहास आणि तिरस्कार वाचकाच्या काळजाला पोखरल्याशिवाय राहत नाही. या लेखिकेची आटेम्षॉकेल ही जर्मन कादंबरी (इंग्रजी प्रस्तावित अनुवाद : रेस्पिरेटरी विंग) नुकतीच प्रकाशित झाली. सोव्हिएत काळात रोमानियातील अल्पसंख्य जर्मनांचे रशियात कामासाठी करण्यात आलेले सक्तीचे विस्थापन, हे या कादंबरीचे आशयसूत्र आहे. या मूळच्या जर्मन कादंबरीतून वर्डस् विदाउट बॉर्डर या मासिकाने इंग्रजीत आणलेल्या एका भागाचे हे स्वैर भाषांतर..

माझ्याजवळ जे आहे, ते मी नेत आहे.

अथवा, जे माझं आहे, तेच मी नेत आहे.

माझं म्हणून जे काही होतं, ते मी नेत होतो.

पण, खरं म्हणजे ते माझं नव्हतं. बाबांनी दिलेलं जॅकेट, आजोबांकडून मिळालेला गळाबंद कोट, एडविन काकाकडून मिळालेल्या विजारी, शेजा-यांनी दिलेली चामडी पिशवी, काकूचे हातमोजे असं आणि बरंच काहीबाही!

१९४५च्या जानेवारीपर्यंत दुसरं महायुद्ध सुरूच होतं. पण, तरीही रशियन पोलिस आम्हाला पकडून कुठे तरी नेत होते, ही गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक होती. स्थलांतरासाठी निवडण्यात आलेल्या माणसांच्या यादीत माझं नाव होतं. त्यामुळे मला उपयोगी पडेल, अशा काही वस्तू ओळखीचे आणि शेजारी-पाजारी देत होते. पण रशियन मला नेतायत, याचं मला फारसं काही वाटलं नव्हतं. मी १७ वर्षाचा होतो आणि घरातून बाहेर पडण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असंच मला वाटत होतं. दगडांनाही डोळे असणाऱ्या या गावापासून मला दूर जायचं होतं. त्यामुळे मला रशियनांची भीती वाटण्यापेक्षा मी त्यांच्याबरोबर जायला उतावीळ झालो होतो. घरापासून लांब जायला मिळतंय, याच गोष्टीमुळं मी या बाबतीत सहनशील झालो असावा. पण नातेवाईकांमध्ये मात्र घबराट पसरली होती. दुस-या देशात माझं काही बरं-वाईट होईल, अशी शंका त्यांच्या काळजाला डाचत होती.

पण जे घडायचं, ते घडून गेलं होतं. जरी ते विचित्र, घाणेरडं, निंदनीय आणि नितांतसुंदर असलं तरी! टेकडीजवळच्या आल्डर वृक्षांच्या बागेतच तर हे घडलं होतं. त्या बागेच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार पॅव्हेलियनमध्ये मी जाऊन बसायचो. तिथं सुट्टीच्या दिवशी ऑर्केस्ट्रा असायचा. काही निवांत क्षण तिथं अनुभवता यायचे. माझ्यासारखेच अनेकजण तिथं यायचे. तिथलं लाकडी नक्षीकाम सूर्याच्या प्रकाशात चमचम चमकायचं. त्याही वेळी निर्मनुष्य बागा आणि ओस पडलेल्या चौकांमध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं आहे, असं वाटत रहायचं. आईच्या चेह-यावर तर ती साफ दिसायचीच. मग मीदेखील या बागेत पुन्हा पाऊल टाकायचं नाही, असं ठरवायचो. पण जितकं मी माझ्या मनाला बागेच्या विचारांपासून परावृत्त करू पहायचो, तितकंच ते तिच्याकडे ओढ घ्यायचं. मला आठवतंय, मी बागेत पाय न टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोनच दिवसांत आल्डर वृक्षाच्या सावलीत बसायला गेलो होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते. बागेची हिरवी भिंत मोग-याच्या फुलांनी बहरून गेली होती. बर्च वृक्षांची खोडं पांढरीफटक पडली होती. पानं गळाल्यामुळं झाडं भुंडी दिसत होती. आम्ही काही जण तिथं भेटायचोच. रशियनांनी कामासाठी छावण्यांमध्ये नेण्याअगोदरच तर आम्ही शेवटचे एकत्र भेटलो होतो. १९६८मध्ये मी रोमानिया सोडलं. त्यावेळी अशा भेटीगाठी घेणा-यांची रवानगी रशियाधार्जिणं सरकार थेट तुरुंगातच करायचं. बागेपासून जवळच असलेल्या चर्चमध्ये मी जात असतानाच मला पोलिस दिसले. मी तेव्हा आणि त्यानंतरची २५ र्वष माझे कुटुंबीय आणि सरकार यांना घाबरतच काढले. सरकार गुन्हेगार म्हणून गजाआड करील आणि त्यामुळे घरचे बेअब्रूच्या धास्तीपोटी बेदखल करतील, अशीच भीती मनाला चाटायची.

माझे वडील कलाशिक्षक होते. पण मी रंगांचं नाव काढल्याबरोबर ते मला ओरडायचे. खेडय़ातल्या इतर जर्मनांसारखेच आई-वडीलही सोनेरी केसांचा आणि निळ्या डोळ्यांचा अभिमान बाळगायचे. शेवटी ट्रान्सिल्व्हानियन सॅक्सन का होईना, आम्हीही शुद्ध आर्यवंशीयच होतो. पण माझी शारिरीक ठेवण त्यांच्यासारखी नव्हती, तर रोमानियन माणसांप्रमाणे होती. उन्हाळ्याच्या शेवटी रशियन पोलिस मला घ्यायला आलेच. मी माझं सामान भरायला घेतलं.

ब-याच जणांना वाटतं की, सामान भरणं ही प्रयत्नांनी जमण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही ती आपोआप शिकता. जसं आपण गाणं गातो किंवा प्रार्थना म्हणतो. पोलिसांनी माझ्याबरोबरच गोळा केलेल्या इतरांनाही याची सवय नव्हती. माझे वडील रोमानियाच्या सैन्यात होते. त्यांना जेव्हा लढाईवर जावं लागायचं, तेव्हा त्यांच्याकडे सामान भरण्यासारखं काहीच नसायचं. कारण सैनिकांना आवश्यक असणारं सामान हा त्यांच्या गणवेशाचाच एक भाग होता. त्यामुळे त्यांना जसं सामान भरण्यासंदर्भातलं काही माहित नसायचं, तसं आम्हीही अडाणीच होतो. आपल्याला दूर जायचंय आणि तिथे कडाक्याची थंडी असते, याची कल्पना होती. त्यामुळं सामान नेमकं काय घ्यायचं याचा विचार करण्याऐवजी घरच्यांकडून जे मिळालं, तेवढंच मी घेतलं.

तुमच्याकडे आवश्यक त्या गोष्टी कधीच नसतात.

त्यामुळे ज्या तुमच्याकडे आहेत. त्याच आवश्यक बनतात.

त्यावेळीही स्त्रिया आणि पुरूष, तरूण आणि वृद्ध सामान डोक्यावर घेऊन कॅम्पची वाट तुडवत रेल्वेतून निघाले होते. कुणी बोलत होतं, तर कुणी अगदीच गप्प-गप्प! प्रवास फारच लांबचा असावा. पण अशा दूरच्या प्रवासाची सवय अंगवळणी पडल्यासारखंच सर्वाचं वागणं दिसत होतं. एका डोळ्याने आम्ही स्वत:ला न्याहाळत होतो आणि दुस-या डोळ्याने नजर जाईल तिथपर्यंत पाहत होतो.

आमचा प्रवास सुरू झाला होता.

No comments:

Post a Comment