Thursday, June 23, 2011

चिन्हांचे ठायी.. अर्थांच्या नाना परी !


द लॉस्ट सिंबॉलही डॅन ब्राऊनची सध्या जगभर गाजत असलेली कादंबरी! प्राचीन रहस्यं आणि त्यातून सूचित होणाऱ्या अर्थाच्या आधाराने सुरू झालेला अंतिम सत्याचा शोध, अशा दणकट पायावर उभी राहिलेली ही कादंबरी वाचकाला पूर्णपणे कवेत घेते. १५ सप्टेंबर २००९ रोजी बाजारात आलेल्या या कादंबरीने खपाचा उच्चांक मांडला. सुरुवातीच्या पंधरा दिवसांतच ६५ लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली. सहा वर्षाची विश्रांती घेऊन ब्राऊननं पुन्हा जागतिक साहित्य वर्तुळात धडाक्यानं पुनरागमन केलंय.
     आपण जगत असलेलं पोस्टमॉडर्न युग कसं आहे? तीव्र गळेकापू स्पर्धा असलेलं आणि भौतिक सुखासाठी कमालीचं आसुसलेलं! जगातल्या सर्व सुखांनी आपल्या पायांशी लोळण घ्यावी, यासाठी प्रयत्न करत असतानाच आयुष्यातली अर्थपूर्णता नेमकी कशात आहे, ते शोधणारं! आधुनिक म्हणवल्या जाणा-या या युगात देवाच्या बरोबरीनं डेमी गॉड झालेल्या बाबा-बुवांच्या संप्रदायांत वाढ होत आहे, ती काही उगीच नाही. अंधश्रद्ध रेम्याडोक्यांची जगात कधीच कमतरता नव्हती. पण त्यांच्याही काही परी आहेत. पुराणांत जागोजागी घुसडलेल्या चमत्कारांच्या कथा फोल आहेत, हे त्यापैकी अनेकांना कळतं. देव ही गोष्ट नेमकी काय आहे, हे आपल्या नजरेच्या आणि बुद्धीच्या टप्प्यात येणार नाही, याची त्यांना पुरेपूर जाणीव असते. ते एकदा मान्य केल्यानंतर, ते जवळच्या पर्यायाचा शोध सुरू करतात. देव नाही, तर देवासारखा दुसरा कोण? स्वयंघोषित अवतारी बाबा. देवाऐवजी आपल्यासारखाच हाडामांसाचा एक माणूस आयुष्य उलगडून सांगत आहे, हे त्यांच्या बुद्धीला पटणारं असतं. त्यांच्यासमोर तुमचे प्रश्न मांडा. ते तुम्हाला मार्ग सांगतील. त्या मार्गाने तुम्ही गेलात, तर तुम्हाला देवत्व प्राप्त होईल. देव आणि देवत्व प्राप्त झालेला माणूस, यांच्यात नेमका काय फरक असतो? देवाच्या ठायी ज्या अचाट शक्ती असतात, त्या देवत्व प्राप्त झालेल्या मनुष्याच्या अंगी येतात काय? स्वत:च्या बुद्धीला ताण न देता त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालत रहा. आयुष्य संपेल. मार्ग संपणार नाही. उत्तरं तर अजिबातच सापडणार नाहीत. देव म्हणा किंवा देवत्व म्हणा, या दोन शब्दांचा खरा अर्थ कधीच कळत नाही. पण, प्राचीन काळापासून जगाच्या पाठीवर ज्या वेग-वेगळ्या संस्कृती नांदत आहेत, त्यांच्यातील काहींना तो समजला होता. टोळी आणि झुंडीतून सुसंस्कृत समाजाकडे वाटचाल करताना धर्माने जगण्याची आचारसंहिता ठरवली. मनुष्याला पडणा-या प्रश्नांची उत्तरे धर्म आणि अध्यात्माने दिली. पण धर्मात देव नावाची अतिमानवी आणि प्रतिभाशाली संकल्पना घुसवल्यानंतर मनुष्याच्या ठायी असलेली कार्य-कारणभाव प्रवृत्ती नष्ट झाली. त्याला पडणा-या प्रत्येक प्रश्नाच्या समाधानासाठी तो देवाकडे पाहू लागला. त्यामुळे संस्कृतीच्या विकासात खंड पडला. इतकं अंधारमय वातावरण झालं असं असतानाही काही जणांनी आयुष्याची अर्थपूर्णता नेमकी कशात आहे, याचा शोध घेतला. अंतिम सत्य, म्हणजे नेमकं काय असावं, याचा ते धांडोळा घेत राहिले. शेवटी त्यांना अंतिम सत्याचे प्रकाशकण गवसले. म्हणूनच त्यांना एनलायटन्ड सोल म्हटलं गेलं.
     डॅन ब्राऊनची द लॉस्ट सिंबॉल ही सध्या गाजत असलेली कादंबरीदेखील हाच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवते. देव ही अजिबात अप्राप्य गोष्ट नाही. प्रत्येक मनुष्यात देवत्व प्राप्त करण्याची क्षमता आहे, असं वेगवेगळ्या काळातल्या तत्त्वचिंतकांनी सांगून ठेवलंय. शिवाय, सत्य सांगितल्याबद्दल त्यांना समाजाचा रोषही पत्करावा लागला. पण आताच्या धावपळीच्या काळात या दार्शनिकांचा अभ्यास करण्याची फुरसत कोणाकडेच नाही. जे करतात, त्यांच्यापैकी बहुतेक विचारांची सखोलता आणि विचक्षण बुद्धीची वानवा असणारे असतात. मग मूळ अर्थाची मोडतोड होते आणि उरतात फक्त पढीक पांडित्य मिरवणारे धर्मभाट! मध्ययुगातली धार्मिक सेन्सॉरशिप आता नाही. त्यामुळे ती भिती ब्राऊनला नाही. दा व्हिन्सी कोड लिहून आणि गाजवून ही बाब त्यानं सिद्धही केलीय. आपलं पुस्तक दणकून खपावं, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असतेच. ब्राऊन तर अजिबात स्वान्तसुखाय लेखन करणा-या लेखकांपैकी नाही. त्यामुळेच ब्राऊनची खासियत असलेला प्राचीन रहस्यांचा मालमसाला याही कादंबरीत ठासून भरला आहे. वाचकांना खिळवून ठेवणारा तपशील, हेच कुठल्याही कादंबरीचं बलस्थान असतं. पण असं असलं तरी कलाकृतीचं व्यावसायिक मूल्य ही एक वेगळी गोष्ट आहे. त्या कलाकृतीतला अंगभूत संदेश, ही त्यापेक्षा वेगळी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
     ब्राऊनलादेखील तेच सांगायचं असावं. जगभर अस्तित्वात असलेल्या फ्री मॅसनरी (पंथ म्हणा किंवा संघटना!) या संस्थेने मध्ययुगीन काळापासून जपलेल्या रहस्यांची उकल ब्राऊन कादंबरीतून करतो. हार्वर्ड विद्यापीठातला रॉबर्ट लँग्डन नावाचा प्राध्यापक आपला मित्र पीटर सॉलोमन याच्या आमंत्रणावरून वॉशिंग्टनमध्ये व्याख्यान देण्यासाठी येतो. सॉलोमन हा जगातल्या अतिविशाल स्मिथ्सोनियन वास्तुसंग्रहालयाचा प्रमुख आहे. अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांचं कामकाज जिथून चालतं, त्या कॅपिटॉलमध्ये हे व्याख्यान होणार असतं. पण, त्याला तिथं सापडतो केवळ आपल्या मित्राचा तुटलेला उजवा हात! तिथून ही ५०९ पानांची कादंबरी सुरु होते. प्राचीन काळातील गोंदण रेखाटलेला तो हात म्हणजे निमंत्रण असतं, लँग्डनला जुन्या काळातली रहस्यं उलगडण्यासाठी दिलेलं. हँड ऑफ मिस्टरीज. पीटरचा जीव वाचवायचा असेल, तर ही रहस्यं तुला शोधावी लागतील, अशी धमकीवजा विनंती लँग्डनला पीटरच्या अपहरणकर्त्यांकडून मिळते. या शोधात मग कॅपिटॉलसह लायब्ररी ऑफ काँग्रेस, जॉर्ज वॉशिंग्टनचं स्मारक, फ्रीडम प्लाझा, नॅशनल कॅथ्रेडल अशा इमारती त्यांच्या मध्ययुगीन इतिहासासह सामील होतात. कादंबरीची खुमारी वाढावी, म्हणून जगातली अतिबलिष्ठ गुप्तचर संघटना सीआयए आहेच! पाठशिवणीचा हा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो. ब्राऊन अशा खेळांचे प्लॉट आखण्यात वाकबगार आहे. प्राचीन रहस्याचा शोध लागतोच. पण या प्रवासात इतरही काही भयंकर रहस्यांचा गौप्यस्फोट होतो. कादंबरीकार म्हणून ब्राऊनची महती ओळखायची असेल, तर ही कादंबरी वाचण्याशिवाय पर्याय नाही. अपहरणकर्ता पीटरचा सख्खा मुलगा असतो. आपल्या आयुष्याच्या मुळावर उठलेला स्वत:चाच मुलगा झॅकॅरी आहे, हे पीटरला अगदी शेवटच्या टप्प्यात कळतं. इतका त्याच्या मुलाचा अवतार अंतर्बाह्य बदललेला असतो. पण त्याने इतका माथेफिरूपणा कशासाठी केला? कुठलं अंतिम सत्य तो शोधत असतो? ते अंतिम सत्य जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो कसा आतून हादरतो? उत्पत्ती, विकास आणि व्यय, या मानवी आयुष्याला न चुकलेल्या अवस्था आहेत. बाकीचा सारा भौतिक तपशील त्या कोऱ्या आयुष्यात केवळ रंग भरण्यासाठी असतो. त्या पलीकडचंही असं कोणतं सत्य असतं, जे शाश्वत आहे. ते अंतिम सत्य शोधण्यासाठी कादंबरी हातात घ्यावीच लागेल. शेवटी आपणही त्याच गोष्टीच्या शोधात असतो, जिथे सगळ्या शोधांना पूर्णविराम मिळतो.
..........
बुकमार्क- प्रहार 
जानेवारी २०१०

2 comments:

  1. खरोखर अप्रतिम पुस्तक आहे हे. अक्षरशः हातातून ठेववत नाही. पण शेवट अतिशय सामान्य आहे. मला मुळीच आवडला नाही.

    अजून एक गोष्ट. या परीक्षणात तुम्ही काही काही महत्वाची रहस्यं फोडली आहेत. सुरुवातीला निदान 'कंटेन्स स्पॉयलर्स' अशी टीप तरी द्यायाचीत ना !!

    ReplyDelete
  2. हेरंब! कशाला उगीच गुपितं राखून ठेवायची....

    ReplyDelete