Monday, June 13, 2011

... खळांची व्यंकटी सांडो !

       गोष्टीचा संदर्भ थेट जगण्याशीच असेल, तर तीत उसना अभिनिवेश आणावा लागत  नाही. लक्ष वेधण्यासाठी आवश्यक असलेली रंजनमूल्ये वजा करूनही ती गोष्ट थेट हृदयाची पकड घेण्यात यशस्वी ठरते. जे डेंच्या स्टो-याही तशाच असायच्या. कुणी मसाला म्हणून त्या चवीनं वाचत असतीलही. अनेकांना ह्या बातम्या वाचताना आपण भडक आणि रंगीत नाट्यपटाचा आनंद लुटतो आहोत, असा भास होत असेल. पण, त्या रुग्णशय्येवर निपचित  पहुडलेल्या समाजव्यवस्थेच्या जर्जरतेच्या निदर्शक होत्या. 
         आता बहुतांश जणांना बातमीत वेधकता आणण्यासाठी कमी-अधिक प्रमाणात कल्पकता आणि शैलीचा आधार घ्यावा लागतो. छापण्यापूर्वी अथवा बोलण्याअगोदर अनुभवाच्या पातळीवरच उतरणं गरजेचं आहे, ही बातमीदारीची पूर्वअट इतिहासजमा झाली असं वाटण्याजोगा हा काळ आहे. कारण, दळणवळणाची साधनं त्यांची कमाल दाखवताहेत. सारं जग आपल्या खिशात आहे, असं त्यात ठेवलेल्या हाय एन्ड मोबाईलमुळं आपण वाटून घेतो आहोत. आख्खी मुंबई पाण्यात बुडाली, हे सहजगत्या सांगताना आता आम्हाला पुराव्यादाखल केवळ हिंदमाता अथवा मिलन सबवेत गोळा झालेला गुडघाभर पाऊस पुरेसा ठरतो. ओलेत्या मान्सूनच्या ड्राय बातम्या, हा त्याचा परिणाम. पण, या बाबतीत ऑड मॅन आऊट असल्याप्रमाणं डे कायमच कळपाबाहेरचे भासत आले. 'मिड डे'मधल्या त्यांच्या खणखणीत स्टो-या वाचून हे जाणवायचं. पत्रकारितेच्या जगतात दुर्मीळ झालेल्या जमातीचे ते प्रतिनिधी होते. अनुभवांचं अवगुंठण लाभलं की, निर्जीव शब्द दाहक बनतात. डेंचं लिखाण तसं होतं. ते क्राईम बीटचे एक्का होते, या गोष्टीचा विसर त्यांच्या बातम्या कधीच पडू द्यायच्या नाहीत. एरवी टॅब्लॉईडमधल्या बातम्या  चवदार पदार्थ मिटक्या मारत चाखावा, तशा वाचल्या जातात. पेपर खपवण्यासाठी  त्यांना ट्रीटमेंटही तशीच दिलेली असते. पण, बातमी म्हणून असलेलं एखाद्या घटनेचं मूल्य केवळ पेपराच्या फॉर्ममुळं कसं काय कमी होऊ शकेल ? डे यांचं लिखाणदेखील अंडरवर्ल्डच्या तळाचा ठाव घेऊन जिवाच्या करारानं स्वतःला पृष्ठभागावर तरंगत ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचं जाणवायचं.
            समाजव्यवस्थेची निकोपता तपासायची असेल, तर क्राईमच्या बातम्यांशिवाय दुसरी भरवशाची फूटपट्टी कुठली ? त्या लिटमस पेपरसारखं काम करतात. डेंच्या बातम्यांसारखं. लोकशाही व्यवस्थेत ज्या मोठ्या सामाजिक प्रतलाचा एक हिस्सा पत्रकारितेनं व्यापला आहे, त्याचा सर्वात दुर्लक्षित भाग म्हणजे क्राईम रिपोर्टिंग. खून आणि बलात्कार, तस्करी आणि मारामारी, भुरट्या चो-या आणि घरफोड्या, गँगवॉर आणि पोलीस डायरी... यांच्या ठोकळेबाज नोंदी म्हणजे क्राईम रिपोर्टिंग नव्हे. डे यांची वार्तांकनं घटनेचे सारे तपशील गोळा करून ती एका सूत्रात समेटणारी वाटायची. ते सूत्र समाजाच्या घसरत्या मूल्यव्यवस्थेप्रती नातं जोडू पहायचं. 'गुड मॉर्निंग जर्नालिझम'च्या  नावाखाली सटरफटर बातम्यांचं पीक गाजरगवताप्रमाणं फोफावलेलं असताना डेंचं रिपोर्टिंग रात्रीच्या अंधारात गूढ आणि भयप्रद भासणा-या अक्राळविक्राळ पिंपळवृक्षाप्रमाणे अंगावर यायचं. त्या झाडाच्या डेरेदार घे-यानं अनेक पत्रकारांना प्रभावित केलं आहे. पण, त्याची काळीकभिन्न सावली आपल्याला गिळून टाकील की काय, अशांचं प्रमाण अधिक. मुंबईच्या बदनाम गल्ल्यांच्या, खौफनाक़ मोहल्ल्यांच्या, गुन्हेगारी विश्वाच्या बाजिंद्या म्होरक्यांच्या, मुजोर पोलिसी खाक्याच्या, बेबंद सामाजिक  अनाचाराच्या... समाजाची एकही काळी बाजू अशी नव्हती की, जिला डेंनी आपल्या लेखणीतून स्पर्श केला नाही.              

      इन्व्हेस्टीगेटीव्ह रिपोर्टिंग ही बातमीदाराची वैयक्तिक खाज असते आणि तो कंड शमवू  इच्छिणा-या 'खतरों के खिलाडीं'चा एंड रिझल्ट ब-याचदा ठरलेला असतो, असा महामूर्ख दावा करणारे तर्कदुष्ट महाभाग आपल्याकडे आहेतच. त्यांचे तर्क त्यांना लखलाभ होवोत. पण, राज्यघटनेच्या सरनाम्यापासून ते संविधानाच्या तिस-या भागातल्या एकविसाव्या आर्टिकलनुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जीवितरक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. तो अधिकार प्रत्येकाला बजावता येईल, याची व्यवस्था करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेवर आहे. मग, चेहरा टोपीत दडवून कायम सावधपणे वावरावं लागलेल्या आणि तरीही गुंडांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या डेंच्या मृत्यूचं उत्तरदायित्व कोण शिरावर घेणार आहे ? पत्रकार म्हणून असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून नव्हे, तर या देशाचे सर्वसामान्य नागरिक म्हणून असलेल्या घटनादत्त अधिकारांवर बोट ठेवून आम्ही उत्तराची अपेक्षा करतो आहोत.

5 comments:

  1. धन्यवाद हेरंब.. आजच्या अवघड जमान्यातला जे हा खराखुरा पत्रकार होता.

    ReplyDelete
  2. अज्या खूप छान लिहिलंयस रे! खूप दिवसांनी मनापासून काहीतरी वाचायला मिळाल्याचा आनंद मिळतो. सलग आलेले कठीण शब्दही वास्तवातलं सत्य सांगू शकतात हे वाचताना जाणवतं...

    ReplyDelete