Thursday, June 2, 2011

पहाटेच्या भू(भू)पाळ्या !


    झोपेचं बोट धरून स्वप्नांच्या जगात प्रवेश करत असतानाच जाग आली. कुत्र्यांनी निषेधसभा आरंभली होती. प्रत्येकाचा सूर टिपेचा. काहीच पसंत नसल्यासारखा आणि संपूर्ण बदलाची मागणी करणारा. त्यांच्या आलापी एकाच वेळी करूण आणि धारदार होत्या. मध्येच एखादं कुत्रं कान पाडून सामोपचाराचा सूर लावे. साराच गोंधळ. गलक्याचा म्हणून जो एक सामूहिक आवाज असतो, तसा तो नव्हता. गलक्यामध्ये वेगवेगळ्या आवाजांची सरमिसळ असते. त्या आवाजाच्या पट्ट्यांमध्ये चढउतार होऊ शकतात. पण, मतैक्याची एक मध्यम लय सर्वांनीच अंगभूत समजूतदारपणानं साधलेली असते. पण, या कुत्र्यांना आपल्याला नेमकं हवंय काय, हेच ठरवता आलेलं नसावं. त्यामुळंच त्यांचे आवाज असे चहू दिशांना फाटलेले. ऐकणा-यांच्या मनात गोंधळ निर्माण करणारे. मरगळल्यागत काही अंतर चालून जाऊन शरणागताप्रमाणं हवेमध्ये विरणारे. आंदोलनादरम्यान नाही का, घसा फाटेपर्यंत सरकारविरूद्ध मुर्दाबादच्या घोषणा देऊन-देऊन थकलं की, काही काळ मोर्चेकरी शांत बसतात. थोडं हुशारल्यासारखं वाटलं की, पुन्हा जोरदार हाळ्या टाकतात. पण, पहिल्या वेळच्या तुलनेत नंतरच्या आवाजाचा जोर कमीच असतो. घोषणांची आवर्तनं हळूहळू आक्रसत जातात. एकच चहा पावडर चार वेळा वापरल्यानंतर चहाचा रंग फिका पडू लागतो, तसा सुरुवातीचा आवाजाचा कडक पोत नंतर विसविशीत बनून जातो. बेंबीच्या देठापासून ओरडलो... आतडी पिळवटून शंख केला... पण, सारं व्यर्थ ! कुणीच दखल घेत नसल्याची निराशा पायांमध्ये दाटून येते. माघारी फिरणारी पावलं एकदम जडजड पडायला लागतात. या व्यवस्थेनं देऊ केलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही वापरलं. पण, आवाजाचे तरंग लोखंडी पडद्याच्या कानांवरच जाऊन पडणार असतील, तर असल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग काय ?

     छ्या ! कुत्री असले विचार नक्कीच करत नसावेत. आमच्या इथली कुत्री त्यांचं तारस्वरातलं समूहगान ऐकण्याचा बहुमान मला नेहमीच देतात. घड्याळात पाहिलं. अडीच वाजले होते. पहाटे तीनच्या सुमारास दररोज पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन सोसायटीसमोरच्या रस्त्यावरून चक्कर मारून जाते, तेव्हा कुत्री पांगतात. पण, तिला यायला अजून अर्धा तास वेळ होता. कुत्र्यांनीही तोच मोका साधून कल्लोळ उठवला होता. नाही तर, पोलिसांसमोर ओरडण्याची त्यांची काय बिशाद ?
पण, कुत्र्यांचा हा कर्णकर्कश्श भोंगा आणखी अर्धा तास ऐकावा लागणार, या कल्पनेनंच जीव कासावीस झाला. आता ती सारी एका समेवर शोकगीत गात असल्यासारखी ओरडत होती.  फार वाईट असतो तो आवाज. एका जित्याजागत्या- हसत्याखेळत्या वस्तीत सामूहिक मयती व्हाव्यात नि अंतराळभर लटकलेल्या त्या दुःखाच्या सुतकी पताकांच्या टोकांतून थेंब थेंब रक्त ठिबकावं नि ते नेमकं कुठून टपकतंय, याच्या शोधात भिरभिरल्याप्रमाणं असतं हे भांबावतं मलूल रडणं. त्यात स्वदुःखाची कैफियत असतेच. पण, भवतालाविषयीचा उपहास जास्त तीव्र असतो. कुत्री नुसतीच भुंकली, तर एकवेळ ठीक आहे. त्यानं डोक्यात चिरड सणकते. कुत्र्यांविषयी फारसं काही वाटून घ्यायला आपण बांधील राहत नाही. पण, त्यांचं रडणं-विव्हळणं ?  ते अस्वस्थ करतं.  मन कुरतडतं. सिग्नलवर भीक मागणा-या काळ्याबिद्र्या पोराला घरीही घेऊन जाऊ शकत नाही नि दोन रुपयांच्यावर हातात जास्त पैसे टेकवण्यास धजावतही नाही, यादरम्यानच्या काळात मनाची जी अवस्था असते, तिचाच पुनःप्रत्यय कुत्र्यांचं रडणं ऐकताना येतो. कधी कधी वाटतं, ही कुत्री परिस्थितीशरण माणसांप्रमाणंच वागतायत. माणूस माणसाळला. त्यानं कुत्र्यांनाही माणसळवलं. अरे पण, माणसाळले, म्हणून काय झालं ? शेवटी आहेत प्राणीच ना ! मग सुळे विचकून दुःखाच्या नरड्याचा घोट का नाही घेत ? पंजे परजून का नाही चाल करून जात दुःख जन्माला घालणा-या परिस्थितीवर ? माणसांबरोबर राहून यांनाही नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचा विसर पडला की काय ?  
पहाटेच्या वेळी सारं जग कसं शांत पहुडलंय. टॉवर्स झोपलेत. चाळी निजल्यात. आणखी पंधरा- वीस मिनिटांनी शेजारच्या स्टेशनातनं शंटिंगचा विशिष्ट आवाज करत नेहमीचं इंजिन कानांना वर्दी देऊन जाईल. पण, झोपेचा कोश त्याच्यानंतरही आणखी काही काळ मोडला जाणार नाही. कुत्र्यांचं काय घेऊन बसलात ? कुत्रीच ती. ओरडतील- ओरडतील नि शेपूट घालून शांत बसतील.
दहा तास अगोदर इथं समोरच्या चाळीची जागा जबरदस्तीनं खाली करायला लावणा-या बिल्डरविरोधात रहिवाश्यांनी आंदोलन केलंय. ऑब्वियसली, सुरुवातीच्या निवेदनांना दाद दिली नाही म्हणूनच. पण, आंदोलनात कुणी तरी दगड फेकल्याचं निमित्त पुढं करून पोलिसांनी त्यांची ढोपरं फोडलीयत. ढुंगणं सुजवलीयत. फार काही झालं नाही. इतर कुणी सरकारी कामात हस्तक्षेप केला नाही. जे दिसलं, ते फक्त डोळे भरून पाहिलं आणि मग सारे झोपायला गेले. त्या वस्तीतल्या घरांच्या दिशेनं गेलेल्या जखमी जडशीळ पराभूत पावलांच्या वेड्यावाकड्या खुणा पटांगणातल्या मातीत अजूनही आपलं अस्तित्व शोधताना दिसतील. दुरूनच आणखी थोडासा कानोसा घेतला, तर विव्हळणंही फारच ओळखीचं वाटलं. नेमकं पहाटस्वप्नांच्या वेळीच जागं करणारं.
या शहरात असल्या वस्त्याही अमाप आहेत नि आडदांड बिल्डरही. कानात इयरप्लग घालून झोपायचं की थेट नख्याच वाढवायच्या... फैसला करायलाच पाहिजे! 

6 comments:

  1. ajit great.Ekachveli prakhar bochara ani kavyatmakhi.lekhatil prateekatmkata tar solidach. asach lihita raha

    ReplyDelete
  2. अजित, छान आणि सोपं लिहितोयस. तुझे ब्लॉग वाचून तुझ्याविषयीचा आदर वाढत चाललाय.

    ReplyDelete
  3. Great... mastach... keep it up. asech lihi.. aapan pustak kadhu...

    ReplyDelete