Friday, April 29, 2011

लिहिता सर्जन...!



नेचरअथवा लॅन्सेटसारख्या एका विशिष्ट वर्तुळात फिरणा-या मासिकांना फारसा वाचकवर्ग नसतो. कारण, त्यातलं लिखाण जितकं अभ्यासनीयअसतं, तितकं ते वाचनीयठरेलच, याची खात्री देता येत नाही. कारण, या माहितीपर लेखांची क्लिष्ट आणि बोजड परिभाषा. अ‍ॅरिस्टॉटलच्या सौंदर्यशास्त्राशी उभा दावा मांडून लिहिण्यात आलेले हे लेख सर्वसामान्य वाचकांच्या नजरेत निर्जीव आणि शुष्क ठरतात. म्हणूनच वाचकांनी डॉक्टरमंडळींकडून उच्च अभिरुचीच्या साहित्याची अपेक्षा करणं, म्हणजे त्यांनी खरडलेलं प्रिस्क्रीप्शन आपल्याला समजावं, अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. त्यामुळंच द एम्परर ऑफ ऑल मालडीज् : अ बायोग्राफी ऑफ कॅन्सरला नॉन फिक्शन गटात मिळालेलं पुलित्झर आश्चर्याचा सुखद धक्का देतं नि सिद्धार्थ मुखर्जीच्या साहित्यिक कर्तृत्वावर शिक्कामोर्तबही करतं. मुखर्जी यांचं वैद्यकशास्त्रातील कौशल्य आणि उत्कृष्ट लेखनकलेच्या बाबतीतलं सव्यसाची सर्जन अगदी लखलखीतपणे दाखवून देणारं हे पहिलंच पुस्तक आहे.

या पुस्तकाच्या स्पर्धेत निकोलस कार यांचं द शॅलोज् : व्हॉट द इंटरनेट इज डूइंग टू अवर ब्रेनआणि एस. सी. ग्वायनी यांचं एम्पायर ऑफ द समर मूनही पुस्तकं होती. परंतु, मायकेल स्कूब, अर्नोल्ड इसाक्स आणि रॉबर्ट ली हॉत्झ यांच्या ज्युरीमंडळानं द एम्परर ऑफ मालडीज्ला सरस ठरवत त्यावरच पुलित्झरसाठी शिक्कामोर्तब केलं. हे पुस्तक केवळ केस स्टडीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. कारण, ते कॅन्सरला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक दस्तऐवजांनिशी प्रवास सुरू करत तत्कालीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा धांडोळा घेत समकालीन वास्तवाच्या विश्वाची सफर घडवून आणतं. मानवजातीचा प्रदीर्घ काळापासून कॅन्सरशी लढा सुरू आहे. या आजाराचं उच्चाटन करण्यासाठी वैद्यकशास्त्रानं जे प्रयत्न केले, त्या प्रत्येक टप्प्यावरचं चित्रण या पुस्तकात आहे. डॉक्टरांच्या चित्रविचित्र प्रयोगात स्वखुशीनं गिनी पिगबनलेल्या कॅन्सरग्रस्तांची हृदयद्रावक कहाणी आहे. अठराव्या शतकाच्या शेवटी कॅन्सरवर केवळ शल्यक्रिया हाच पर्याय असल्याचा ठाम समज असलेलं वैद्यकशास्त्र केमोथेरपीचा वापर करायला शिकलं. आता केमोथेरपीसह विविध आयुधांचा गरजेनुसार एकत्रित वा वेगवेगळा वापर होतो आहे.

कॅन्सरला अद्यापही वाघाची गुहा समजलं जातं. तीत प्रवेश करणा-याला पुन्हा परतीची वाट नसते, हा गैरसमज मोठय़ा प्रमाणावर प्रचलित आहे. पण, नवनव्या उपचारांमुळे बरे होण्याचे अथवा जीव वाचण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुखर्जी यांच्या पुस्तकाचा रोखही तोच आहे. कुठली तरी गोष्ट अगदी आतून शरीर पोखरून टाकत चालल्याची किंवा आजारी पडल्याची भावना वाटत असूनही आपल्याला नेमकं काय होतंय, याचा अंदाज रुग्ण बांधू शकत नाही. कॅन्सरभोवती असलेलं हे गूढ भयग्रस्ततेचं वलय हटवणं, हा आपल्या पुस्तकलेखनाचा उद्देश होता, असं मुखर्जी यांनी एका मुलाखतीत यापूर्वीच सांगितलंय. कॅन्सरवर उपचार करणारी तज्ज्ञमंडळी ज्या गोष्टींमुळे टेकीस येत, त्याच वातावरणात मुखर्जीही काम करत होते. अजूनही करतात. पण, या आजारावर विजय मिळवण्याचं स्वप्न ते कायमच पाहत आलेत. ज्या डॉ. डेव्हिड स्कॅडन यांच्या मार्गदर्शनाखाली मुखर्जी यांनी हार्वर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं, त्या स्कॅडन यांनी विद्यार्थीदशेतल्या मुखर्जी यांच्या पुलित्झरच्या निमित्तानं आठवणी जागवताना भविष्याचं आशादायी स्वप्न रंगवणारा मनुष्य,’ असंच वर्णन मुखर्जीचं वर्णन केलं!

सध्या अमेरिकेत कॅन्सरचे सुमारे 15 लाख रुग्ण आहेत. भारतातही ही संख्या जवळपास दुप्पट आहे. त्यात वर्षागणिक दहा हजार रुग्णांची भर पडते आहे. कॅन्सरभोवती असलेलं अनावश्यक फोबियाचं वलय झुगारून देऊन त्या आजाराला सामोरं कसं जायचं, याच्या प्राथमिक तयारीसाठी मदतीला येणारं आणि कॅन्सरशी झुंज द्यायला सज्ज करणारं हे पुस्तक मुळातूनच वाचणं गरजेचं आहे. अमेरिकन वाचकांनी तशी पसंतीची मोहोरही या पुस्तकावर उमटवली आहे. म्हणूनच टाइम’, ‘न्यूयॉर्क टाइम्सआणि ऑफ्रा मॅगझीनच्या 2010च्या बेस्टसेलरच्या यादीत या पुस्तकाचा समावेश होता.

चाळिशीत असलेल्या मुखर्जी यांचा जन्म दिल्लीत झाला. प्राथमिक शिक्षण तिथेच घेतल्यानंतर पदवी मिळवण्यासाठी ते स्टॅनफर्ड विद्यापीठात दाखल झाले. स्टॅनफर्डविषयी त्यांना लहानपणापासूनच अतीव आकर्षण होतं. दहावीत असताना त्यांचे वडील शिबेश्वर आपल्या मुलाला घेऊन स्टॅनफर्ड आणि हार्वर्ड दाखवण्यासाठी घेऊन गेले होते. त्या वेळी स्टॅनफर्डमध्ये एकापेक्षा एक विद्वान मंडळी शिकवत. नोबेल पारितोषिक मिळवणा-या प्राध्यापक मंडळींना तिथं तोटा नव्हता. त्यांना पाहून प्रभावित झालेल्या सिद्धार्थनं हार्वर्डऐवजी स्टॅनफर्डलाच पसंती दिली. स्कॉलरमंडळी ज्या शिष्यवृत्तीसाठी अक्षरश: जीव टाकतात, ती ऑक्सफर्ड विद्यापीठाची -होड्स स्कॉलरशिपही त्यांनी पटकावली. हार्वर्डमधून पीएच. डी. मिळवल्यानंतर ते अमेरिकेतच स्थायिक झाले. सध्या ते कोलंबिया विद्यापीठामध्ये वैद्यकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. याच विद्यापीठाच्या हर्बर्ट आयर्विग कॉम्प्रेहेन्सिव सेंटरमध्ये त्यांचं कॅन्सरपेशींवर मूलभूत संशोधन सुरू आहे. कॅन्सरविषयक त्यांच्या संशोधनाबद्दल टाइमनं त्यांचा जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश केला होता.

कॅन्सरविषयीचा भयगंड दूर करण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास लांब पल्ल्याचा आहे. त्याचे काही टप्पे वैद्यकशास्त्रानं यशस्वीरित्या पार केले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत परिस्थिती बरी आहे. कॅन्सरच्या काही प्रकारांवर पूर्णाशानं नसलं, तरी बहुतांशी नियंत्रण मिळवण्यात वैद्यकशास्त्र यशस्वी ठरत आहे. शत्रू कोण आहे, हे एकदा हुडकून काढलं म्हणजे त्याच्याविरुद्ध रणनिती आखायला सोपं जातं. व्यूहरचनेबरहुकूम शत्रूचा नि:पात करता येतो. पण, कॅन्सरच्या समूळ नाशाची रणनिती अद्यापपावेतो ठरवताच आली नव्हती. पण, कॅन्सरपेशींवर सुरू असलेले संशोधन ही रणनीती सिद्ध करण्यास यशस्वी ठरेल, असा संशोधकांना विश्वास वाटतो आहे. त्यामुळे सकारात्मक भविष्याची आशा करत हा लढा सुफळ संपूर्ण केल्याशिवाय मानवजात राहणार नाही.

No comments:

Post a Comment