Friday, April 29, 2011

द्रौपदीचे महाभारत


" महाभारतानं द्रौपदीला ठरवून दिलेल्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचा आवेश बॅनर्जींनी द्रौपदीच्या तोंडी घातलेल्या निवेदनात नाही। पण, परिस्थितीच्या हातचं खेळणं बनल्याची हताशा मात्र जरूर आहे. ही परिस्थितीच द्रौपदीच्या व्यक्तित्वाविषयी गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्ववादी व्यवस्थेनं विद्ध केलेल्या या असामान्य चरित्रनायिकेची वाचकांना नवी ओळख करून देणं आवश्यक होतं. ‘पॅलेस ऑफ इल्युजन्स’नं हे काम अगदी चोख बजावलं आहे."


महाभारत कुणामुळं घडलं? द्रौपदीमुळं! रामायण कुणामुळं घडलं? सीतेमुळं! भारतीय व्यावहारिक संकेतांमध्ये कार्यकारणभावाची ही सरळधोपट मीमांसा शतकानुशतकं प्रचलित आहे. गप्पाटप्पांत, भांडणतंटय़ात हे दोन्हीही दाखले अगदी सहज तोंडावर फेकले जातात. कथा-पुराणांकडं बोट दाखवत स्त्रीवर दोष टाकला, म्हणजे आपल्याही घरातलं महाभारत-रामायण सुफळ संपूर्ण झाल्यासारखं वाटत असावं बहुधा आपल्याला! सीतेला तरी पतिव्रता म्हणून पुजलं जातं. पण, द्रौपदीच्या नशिबी तेही भाग्य नाही. एक अहंमन्य रुपगर्विता की समंजस राजकन्या? सुलक्षणा पतिव्रता की पाच पुरुषांची केवळ शय्यासोबतीण? इंद्रप्रस्थातल्या राजवैभवाने तृप्त झालेली सम्राज्ञी की हस्तिनापूरची धूळधाण करू पाहणारी महत्त्वाकांक्षिणी? कालौघात फडफडून गेलेलं नुसतंच दुबळं पान की खरंच इतिहास घडवणारं तेजस्वी आख्यान? कोण? द्रौपदी नक्की कोण?

महाभारतासारख्या लाखभर ओव्यांच्या महाकाव्याचे नायक आणि खलनायक भारतीय संस्कृतीच्या अव्याहत प्रवाहात आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या गाभ्यापर्यंत वाहत आलेत. पण, द्रौपदीची ओळख मात्र आपल्या लेखी अजूनही धूसरच आहे. कृष्ण, अर्जुन, कर्ण, भीष्म.. हे अनेक कादंबरीकारांचे कथाविषय झालेत. पण, द्रौपदीला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून कादंबरीच्या रूपानं महाभारताचं पुनर्लेखन फार कमी वेळा झालंय. किंबहुना, जवळजवळ नाहीच. चित्रा बॅनर्जीसारख्या लेखिकेनं मात्र द्रौपदीला आवाजमिळवून दिलाय. बॅनर्जींनी उभ्या केलेल्या पॅलेस ऑफ इल्युजन्समधून ती आपल्याशी बोलते.

या पुस्तकातनं द्रौपदी जे बोलते, ते वकिली थाटाचं अजिबात नाही. इतर पात्रांप्रमाणं महाभारतकारांनी तिलाही एक भूमिका ठरवून दिली होती. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था लोप पावत चालल्याचा तो काळ होता. त्यामुळं महाभारतातली सारी स्त्रीपात्रं आपापल्या भूमिकेच्या ओझ्याखाली घुसमटल्यासारखी वाटतात. कुणीतरी जिवाच्या आकांतानं कानात ओरडून आपल्या व्यथा सांगाव्यात आणि नेमकं त्याच वेळी आपण बहिऱ्याचं सोंग घ्यावं.. स्त्रियांच्या बाबतीत महाभारताच्या कर्त्यांचं असं धोरण आहे. द्रौपदीला तर व्यास आणि तत्सम ऋषींनी या महाकाव्यात लीड रोलच बहाल केला होता. पण, तिचं व्यक्त होणं, हे आपल्याला महाभारतातील इतर पुरुषपात्रांकडून समजावून घ्यावं लागतं. कारण या नायिकेला मुक्यानं वावरावं लागेल, अशी व्यवस्था संपूर्ण महाभारतभर करून ठेवण्यात आली होती. मग तिच्या घुसमटीची दाहकता किती पराकोटीची तीव्र असेल?

द्रौपदीच्या आविष्कारस्वातंत्र्याला वाव देत बॅनर्जींनी तिची ही घुसमट संपवलीय. महाभारताच्या पटलावर द्रौपदीचं व्यक्तित्व आकार धारण करायला सुरुवात करतं ते तिच्या स्वयंवरापासून. स्त्रियांसाठी नवरानिवडीचं स्वातंत्र्य तेव्हा जवळपास संपल्यात जमा होतं. द्रुपदराजानं आपल्या मुलीसाठी तोलामोलाचा नवरा निवडण्यासाठी मोठीच कठीण परीक्षाच ठेवली होती. द्रौपदीला मिळवू पाहणाऱ्याने हवेत चक्राकार फिरणा-या माशाच्या डोळ्याचा खाली पाण्यात पाहत धनुष्याने लक्ष्यभेद करायचा होता. हे अवघड काम करू शकणारे कर्ण आणि अर्जुन असे दोनच धनुर्धारी. पण, कर्णाची जात आडवी आली. त्यामुळे क्षत्रियत्वाचा तोरा मिरवणाऱ्या द्रुपदाला तो नकोसा होता. द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने धनुष्य उचलू पाहणा-या कर्णाला मोडता घातला. त्यामुळं खवळलेल्या कर्णानं सरळ युद्धाचाच पवित्रा घेतला. तोपर्यंत अज्ञातवासात असलेले पांडव वारणावतातील लाक्षागृहात जळून खाक झाले होते, ही अफवा सर्वजण खरी मानून चालत होते. मग कर्णासारख्या महारथीसमोर धृष्टद्युम्न आणि इतर राजांचा काय निभाव लागणार? कौरवांसोबत असला, तरी कर्ण सुसंस्कृत आणि धर्मप्रिय व्यक्ती म्हणून ओळखला जात होता. समाजाचे कायदेकानून सांभाळत होता. मग आपल्या भावाचं मरण टाळायचं असेल, तर कर्णाला कसं थोपवावं, हा विचार द्रौपदीनं करणं साहजिक आहे. ‘‘मी सूतपुत्राला वरणार नाही..’’ इति द्रौपदी. युद्धानं जे झालं नसतं, ते द्रौपदीच्या या एका वाक्यानं केलं. प्रचलित धर्म सांभाळण्याबाबत ख्याती असलेल्या कर्णाच्या बरोब्बर बाण वर्मी लागला. तेजोभंग झालेला हा योद्धा हात चोळत जागेवर जाऊन बसला. भावाचे प्राण वाचवणारी द्रौपदी मात्र एक अहंमन्य राजकन्या म्हणून इतिहासात बदनाम झाली.

दुसरा प्रसंग द्रौपदीच्या नव-यांच्या बाबतीतला. दुर्योधनाचं द्यूत खेळण्याचं निमंत्रण धर्मराज युधिष्ठिरानं स्वीकारलं. अट्टल जुगारी शकुनीच्या फाशांत अडकून राज्यासकट सर्वच गमावलं. स्वत:बरोबर भाऊदेखील पणाला लावले. हरला आणि कौरवांचा गुलाम होऊन बसला. गुलामांचा कशावरच हक्क नसतो. त्यामुळं द्रौपदी आता स्वतंत्र स्त्री होती. तरीही, युधिष्ठिरानं तिलादेखील पणाला लावली. हा शेवटचा डावही तो हरला. द्रौपदी कौरवांची दासी बनली. भरसभेत तिला विवस्त्र करण्याची आज्ञा दुर्योधनानं दु:शासनाला दिली. होऊ घातलेली विटंबना टाळण्यासाठी ती सभेतल्या सर्वाकडं साकडं घालत फिरली. पण, तिच्या मदतीला कुणीही धावलं नाही. मोठ्या आशेनं भीष्माच्या पुढय़ात जाऊन उभी राहिली. काकुळतीनं त्याला विनवलं,‘‘पती गुलाम झाल्यानंतर तो पत्नीला पणाला लावू शकतो काय? याला धर्म म्हणायचा काय ते सांगा?’’ खांदे पाडत भीष्म उत्तरतो,‘‘बाई! धर्म जरी असला, तरी तो बलवानांचाच असतो.’’ पितामह म्हणवणा-या आणि समस्त कुरुवंशाच्या आदराचं प्रतीक असलेल्या भीष्मानंच असं झटकल्यावर धर्माची व्याख्या कुणाकडनं समजावून घ्यायची तिनं?

स्त्रीला विषमतेची वागणूक देणाऱ्या तत्कालीन व्यवस्थेनं आपला पुरुषी व्यवहारवादाचा खुंटा या प्रसंगातून हलवून बळकट केलेला आढळतो. तत्कालीन संस्कृती आणि लोकव्यवहाराच्या चलनवलनाबद्दल द्रौपदीनं मोठंच प्रश्नचिन्ह उभं केलं. या प्रश्नानं सभेतले सारे विद्वतजन हबकले. गोंधळून मोठय़ा आवाजात धर्मशास्त्राबद्दल चर्चा करू लागले. बुभुक्षित लांडग्यांनी वेढलेल्या एका विचारप्रवण विदुषीची आर्त हाक त्या कोलाहलात विरून गेली. पत्नीला जुगारात लावूनही धर्मशील म्हणवल्या जाणाऱ्यांचा हा बुळगट पांडवप्रताप’! हा सारा प्रसंग महाभारताच्या सभापर्वात येतो. त्याचं वर्णन करताना बॅनर्जी यांच्या लेखणीनं अचानक लख्ख तळपणाऱ्या तलवारीचं रूप घेतलं असावं, असंच वाटतं. त्या तलवारीची धार एवढी तेजतर्रार, की आपण कापले गेलोय, हे मानेलाही कळू नये.

भारतीय संस्कृती कर्मठतेच्या समेवर पोहोचली होती, हे दाखवणारे सारे दाखले द्रौपदीच्या बाबतीत ठळकपणे आढळतात. सत्यवती, कुंती आणि द्रौपदी.. महाभारतातली ही तिन्ही महत्त्वाची स्त्री पात्रं समाजव्यवस्था पुरुषकेंद्री आणि प्रतिगामी कशी होत चालली होती, हे दाखवतात. सत्यवतीचा औरस मुलगा विचित्रवीर्य आणि लग्नाआधीचा व्यास. पण, व्यासमुनींना कौरव-पांडव पितामह म्हणत. तसेच, सत्यवतीदेखील आपल्या या अनौरस मुलाला अभिमानानं मिरवत असे. सत्यवतीची नातसून कुंती. म्हणजे दोघींमध्येही साधारण दीड-दोन पिढय़ांचा फरक. पण, कर्णाला मुलगा म्हणून कवटाळण्याचं धैर्य काही कुंतीला होऊ शकलं नाही. तेव्हा नियोगाच्या पद्धतीला मान्यता असल्यानं इतर मुलांच्या बाबतीत कुंतीकडं कुणी बोट दाखवू शकलं नाही, हे बरंच म्हणायचं! द्रौपदीचं तर असं काहीच नव्हतं. पण, तरीही पाच पांडवांची बायको म्हणून ती हेटाळणीचा विषय ठरली. खुल्या असलेल्या भारतीय समाजात महाभारत काळात झपाटय़ाने लोकव्यवहाराचे निकष कसे बदलत गेले, हे दाखवणारा महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज म्हणजे महाभारत!

पाच पती असूनही हस्तिनापूरच्या दरबारात त्यांचा पुरुषार्थ आपल्या लज्जारक्षणासाठी पुरा पडला नाही, ही खंत पांचालीला जन्मभर सतावत राहिली असणार. सामायिक मालकी असलेल्या वस्तू जरा निष्काळजीपणेच हाताळल्या जातात. बसगाडय़ा नाही तर रेल्वेची अवस्था पाहिल्यावर हे पटतं. पण, त्यांना निषेधाच्या प्रतिक्रिया नोंदवता येत नाहीत. इथे तर जिवंत भाव-भावना असलेली पांचालीसारखी मानी स्त्री होती. राग मुकाटय़ानं गिळून ती पुनश्च पतिसेवेत रत झाली, तरी अपमानाची डागणी धुवून निघाली नसणार. पहिला पांडव असलेल्या कर्णाविषयीचं तिचं आकर्षण यातूनच उफाळून आलं असावं. बॅनर्जींनी कादंबरीतले कर्णाविषयीचे तिचे विचार स्पष्टपणे ह्या आकर्षणाचं सूतोवाच करतात. ती कृष्णाला पाठिराखा मानते, तसा राजकीय मुत्सद्दीपणा शिकवणारा गुरुदेखील. रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्यानं द्रौपदीची सर्वच्या सर्व मुलं कापून काढली. संतापाच्या आगीत पेटून उठलेल्या द्रौपदीचा अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी काढेपर्यंतचा आकांत अंगावर शहारे आणतो. सुडाची भावना संपली. पण पुत्रविरहाचं दु:ख मरेपर्यंत सोबत करणार, हे सत्य उमगल्यानंतर ती कोसळून पडते. बॅनर्जींनी सारेच क्षण जिवंत केले आहेत.

महाभारताची इतिश्री करणारा शेवटचा प्रसंग पांचालीवर सर्वात जास्त अन्याय करणारा आहे. ती आणि पाच पांडव स्वर्गाची वाट चढत असतात. क्रमाक्रमाने ती आणि इतर चार पांडव मरून पडतात. एकटा युधिष्ठिर सदेह स्वर्गारोहण करतो. सर्वात आधी द्रौपदी मरते. तिच्या अगोदर मरण्याचं कारण अथवा तिनं गृहस्थाश्रमात केलेलं पाप कोणतं, तर पाच पांडवांमध्ये तिचा ओढा अर्जुनाकडं सर्वाधिक होता. (जरी तिनं व्यासमुनीनं आखून दिलेल्या गृहस्थाश्रमाचं काटेकोरपणे पालन केलं असलं तरी. केवळ मनातच ठेवलेल्या या अधिकच्या प्रेमभावनेबद्दल तिला सर्वात अगोदर मरण्याची शिक्षा!)

महाभारतानं द्रौपदीला ठरवून दिलेल्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचा आवेश बॅनर्जींनी द्रौपदीच्या तोंडी घातलेल्या निवेदनात अजिबात नाही. पण, परिस्थितीच्या हातचं खेळणं बनल्याची हताशा मात्र जरूर आहे. त्यामुळं पुरुषसत्ताक वर्चस्ववादी व्यवस्थेनं विद्ध केलेल्या या असामान्य चरित्रनायिकेची वाचकांना ओळख करून देणं आवश्यक होतं. पॅलेस ऑफ इल्युजन्सनं हे काम अगदी चोख बजावलं आहे.

No comments:

Post a Comment