Thursday, April 28, 2011

बिनचेह-यांची आत्मकथा



तब्बल शंभर वर्षाचं आयुष्य जगलेल्या उल्रिकसारख्या सर्वसाधारण माणसाची आत्मकथा राणा दासगुप्तानं ‘सोलो’तून चितारली आहे. कर्तृत्वसंपन्न आयुष्य जगण्याची त्याची महत्त्वाकांक्षा परिस्थिती कशी थिजवून टाकते, हे त्यानं पुस्तकातून मांडलंय. सातत्याने बदलणा-या परिस्थितीच्या आवर्तनांमध्ये गुरफटलेला उल्रिक वाचकांना खिन्न करतो. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध स्फोटक होता. त्यात दोन महायुद्धं लढली गेली. लाखो माणसं मेली. एक क्रांतिकारी विचारधारा उदयाला आली. महायुद्धांत मेलेल्यांइतकेच बळी देऊन तिचं स्वागत करावं लागलं. या सगळ्या स्थित्यंतरांमधून नागमोडी वळणं घेत उल्रिकचं आयुष्य सुरू राहिलं. तो दीर्घ आयुष्य जगला. पण पाहिजे ते नाही बनू शकला!!

मनुष्य बली होत नहीं
समय होत बलवान!
भिल्लन लुटै गोपिका
वहीं अर्जुन, वहीं बाण!!

परिस्थितीचं सामर्थ्य इतक्या चपखल शब्दांत आणि चार ओळींत कबिरानं सांगून टाकलंय. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने खेचलेल्या गांडीव धनुष्याच्या प्रत्यंचेचा नुसता टणत्कार ऐकून मी-मी म्हणणा-या अतिरथींनी शस्त्रं टाकली. युद्ध संपल्यानंतर त्याच अर्जुनावर श्रीकृष्णाने गोपिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवीत, त्यांना द्वारकेत पोहोचवायला सांगितलं होतं. पण रानटी भिल्लांच्या हल्ल्यापुढे अर्जुनाचं क्षात्रतेज गळून पडलं. त्याच्या डोळ्यांदेखत भिल्लांनी गोपिकांचं हरण केलं. द्रोणाकडून धनुर्विद्या शिकलेला, इंद्राचा आशीर्वाद लाभलेला आणि शंकराकडून पाशुपातास्त्र मिळवलेला हा अर्जुन त्या वेळी एवढा गलितगात्र का झाला असावा? त्याचं देवत्व एका क्षणापुरतं मान्य करूनही त्याला परिस्थितीनं कसं हतबल बनवलं, हा प्रश्न डोकं पोखरणारा आहे. ज्याने कौरवांच्या अठरा अक्षौहिणी सैन्याचा नाश केला, त्या अर्जुनाने भिल्लांवर सोडलेले बाण निष्प्रभ कसे ठरले असावेत? त्याचं अवतारकार्य संपुष्टात आलं होतं, असं ‘टिपिकल मायथॉलॉजिकल’ उत्तर मानून हा प्रश्न सोडून देण्यासारखा नाही. ‘परिस्थिती’ हाच विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिणा-या लेखकांची संख्या फार कमी आहे. पण भारतीय वंशाच्या आणि इंग्लंडमध्ये वाढलेल्या (आता दिल्लीत स्थायिक) राणा दासगुप्ताने ‘परिस्थिती’ या विषयाच्या अनुषंगाने ‘यूँ होता, तो क्या होता’ अशा पठडीतली अप्रतिम कादंबरी लिहिलीय. ‘सोलो’ असं शीर्षक असणारी ही कादंबरी प्रस्थापित समाजव्यवस्थेत होणाऱ्या व्यक्तिगत आकांक्षांचा कोंडमारा दाखवते. वाचकाला उदास मनस्थितीत ढकलते. उल्रिक नावाचं पात्र कादंबरीचा नायक आहे. युरोपात घरघर लागलेली सरंजामदारी व्यवस्था, तिचं पतन, पहिलं महायुद्ध, साम्यवादाचा उदय, हिटलरची रक्तरंजित कारकीर्द, दुसरं महायुद्ध, या युद्धानंतर ‘सुपरपॉवर’ झालेल्या रशियाने गलितगात्र बाल्कन राष्ट्रांच्या गळ्यात घातलेला साम्यवादाचा फास, मार्क्‍सच्या तत्त्वज्ञानाची पूर्व युरोपातून झालेली पीछेहाट आणि लोकशाहीपाठोपाठ आलेली मुक्त अर्थव्यवस्था..इतका दमवणारा कथापट राणा दासगुप्तानं ‘सोलो’तून उभा केलाय. एवढ्या सामाजिक स्थित्यंतरांचे ताणे-बाणे अनुभवणा-या उल्रिकला म्हणूनच त्यानं शंभर वर्षाचं आयुष्य बहाल केलंय. जगाच्या पाठीवर किमान तीनशे पन्नास कोटी लोक राहत असतील, तर उल्रिकदेखील त्यांच्यापैकीच एक! समाजाच्या लेखी कर्तृत्ववान आयुष्य जगून पुरुषार्थ सार्थकी लावावा, अशी इतरांप्रमाणेच त्याचीसुद्धा इच्छा आहे. पण परिस्थितीमुळे सपक आयुष्य त्याला जगावं लागतं. ते का जगावं लागलं, याची तर्कशुद्ध कारणमीमांसा पुस्तकातून होते. लोकशाही आणि साम्यवादी व्यवस्थेतल्या परिस्थितीमध्ये प्रचंड फरक आहे. व्यष्टीपेक्षा समष्टी महत्त्वाची, हा विचार साम्यवादाच्या केंद्रस्थानी आहे. तुम्हाला मोठेपणी काय बनायचंय हो? अशी वास्तपुस्त या व्यवस्थेत कोणी करत बसत नाही. ‘स्व’ला तिलांजली देऊन समाजहिताला प्राधान्य देत कल्याणकारी लोकराज्याची निर्मिती करावी, असं स्वप्न पाहत युरोपात साम्यवादाचा प्रयोग राबवण्यात आला. या प्रयोगातून कुणीच सुटलं नाही. साम्यवादी जोखडाखाली घुसमटून गेलेल्या शास्त्रज्ञांना कारखान्यात मजूर म्हणून काम करायला लागलं आणि बुद्धिवाद्यांनी आपापली प्रतिभा छळछावण्यांमध्ये शेवटचे आचके घेताना पाहिली. उल्रिकनं आपलं उमेदीचं आयुष्य एका साम्यवादी व्यवस्थेत घालवलं, हे इथं लक्षात घ्या. या व्यवस्थेच्या उदात्त सामाजिक हेतूंबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच व्यवस्थेनं उल्रिकच्या महत्त्वाकांक्षेचा गळा घोटला. साम्यवादाच्या राबवणुकीतून उद्भवलेली ‘परिस्थिती’ इतकी बलिष्ठ बनली की, उल्रिक आणि त्याच्यासारख्या कित्येकांना या ‘परिस्थिती’शी जुळवून घ्यावं लागलं. मोर्चे, उपोषणं आणि निवेदनं असले लोकशाही मार्ग येथे निषेधासाठी उपलब्धच नव्हते. बीटल्सची एखादी ध्वनिमुद्रिका जरी कुणाच्या घरात सापडली, तरी सैबेरियाच्या थंडीत कुडकुडून मरण्यासाठी त्याची रवानगी व्हायची. परिस्थितीची प्रतिकूलता साम्यवादी व्यवस्थेतून धारदारपणे रेखाटता येईल, याच हेतूपोटी बहुधा लेखकाने कादंबरीत उल्रिकचं कर्मभूमी म्हणून बल्गेरियाची निवड केली असावी. अशी परिस्थिती साऱ्या पूर्व युरोपातच त्या वेळी निर्माण झाली होती. त्यामुळे उल्रिकसारखं बिनचेह-याचं आयुष्य जगलेल्या, साम्यवादाच्या वरवंट्याखाली चेचून गेलेल्या आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी न मिळालेल्या हजारो जणांची ती आत्मकथा बनली आहे. परिस्थिती पालटवून यश मिळवल्याचा दावा अनेक जण करतात. यशासाठी बदललेल्या ‘परिस्थिती’ला ‘क्रेडिट’ जसं आपण देतो, तसं अपयशाचं पितृत्वदेखील ‘परिस्थिती’लाच स्वीकारायला लावावं. कारण यश-अपयश परिस्थितीजन्यच असतं, असा विचार लेखकानं या पुस्तकातून मांडलाय. त्याला पलायनवादी वृत्तीचा म्हणून हिणवण्यात काही अर्थ नाही. याही विचारावर विचार व्हावा, एवढीच लेखकाची अपेक्षा असावी. अमुक-अमुक शंभरीपार जगले किंवा जगतायत, याची गिनीज बुकात नोंद होते. बेभरवशाचं आयुष्य झालेल्या या जगात इतकी र्वष जगणा-या माणसांचं कौतुक होणं, ही गोष्ट स्वाभाविकच मानली पाहिजे. रोजचा व्यायाम कधी चुकवला नाही, इतकं सोडलं तर त्यांच्याबद्दल आणखी काही कळायला मार्ग नसतो. वय वगळता त्यांच्याबद्दलच्या बाकीच्या गोष्टींना या बुकात जागा नसते. इतरांनाही केवळ त्यांच्या दीर्घायुष्याचंच अप्रूप असतं. ही माणसं काही आत्मचरित्र लिहायच्या फंदात पडत नाहीत. कारण सामान्यांच्या आत्मकथांना वाचक नसतो. समाजही आदर्श व्यक्तिमत्त्वांच्याच शोधात असतो. कारण भविष्याची उत्तुंग स्वप्नं सजवण्यासाठी त्याला प्रेरणेची गरज असते. हे तथाकथित आदर्शदेखील आपल्या यशाचं ‘मार्केटिंग’ करण्यात तरबेज असतातच. ‘सॉलिड रिटर्न्‍स’ मिळवून देणा-या विम्याच्या ‘पॉलिसी’ची जाहिरात आपण टीव्हीवर पाहतो. त्याच वेळी मुंग्यांएवढ्या अक्षरांत धोक्याची सूचना देणारी ओळ चटकन नजरेसमोरून सरकून जाते. आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या आत्मकथांमध्येदेखील अशा धोक्याच्या ओळी गाळलेल्या असतात. यशाचं ‘पावित्र्य’ कमी करणं त्यांना परवडणारं नसतं. त्यांनी ठरवलेल्या या ‘उंची’ फूटपट्ट्या लावल्या, की इतरांनी त्यांच्या परीने आयुष्याशी केलेला झगडा आपोआपच बिनमहत्त्वाचा ठरतो. यशाचं परिस्थितीजन्य मूल्यमापन अधोरेखित करण्याचा लेखकाचा उद्देश या कादंबरीतल्या आईनस्टाईनच्या कथेनंतर पूर्ण होतो. पण ‘ साठा उत्तराची कहाणी सुफळ’ करणारा कादंबरीचा शेवट वाचताना असं वाटतं की, लेखकानं स्वत:च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन ही कादंबरी अजिबात न पटणा-या ‘मेलोड्रॅमॅटिक’ पद्धतीनं संपवली आहे. बहुधा तोच आपण निर्माण केलेल्या या पात्राच्या इतक्या प्रेमात पडला की, सहानुभूतीचा फायदा देऊन उल्रिकला आपल्या आयुष्याचा शेवट गोड करण्याची मुभा त्याने दिली असावी, अशी शंका घ्यायला जागा आहे. -
‘कुणी नाही’ची आईनस्टाईनशी भेट

उल्रिकचा जन्म पहिल्या महायुद्धाच्या थोडासा अगोदर झालाय! आई आणि वडील बल्गेरियातल्या एका खेडय़ात लहानाचे मोठे झालेले. त्यांच्या पिढीत शिकणारे ते पहिलेच. हे त्रिकोणी कुटुंब सोफिया या राजधानीच्या शहरात राहतंय. रेल्वे कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करणा-या त्याच्या वडिलांना जर्मनीच्या प्रगतीचं फार अप्रूप आहे. जे जे जर्मन म्हणून काही आहे, त्या सर्व गोष्टींच्या ते प्रेमात आहेत. आपल्या पोराचं ‘उल्रिक’ हे जर्मन नाव त्यांनी याच भावनेतून ठेवलंय. बर्लिनहून बगदादला जाणारा रेल्वेमार्ग तयार करण्याचं काम त्यांची कंपनी करीत आहे. उल्रिकचे वडील महत्त्वाकांक्षी आणि विज्ञानप्रेमी! विज्ञानाच्या साहाय्यानं प्रस्थापित व्यवस्थेत सुधारणा करीत राहण्याचं आपलं काम आहे, या भावनेनं वागणारे! पहिलं महायुद्ध सुरू होतं. जर्मनीचा अपमानजनक पराभव होतो. जगभर मानखंडना व्हावी, अशा अपमानजनक अटी व्हर्सायच्या तहानं जर्मनीवर लादल्या जातात. या संपन्न राष्ट्राचं वैभव लयाला जातं. रेल्वे सुरू करून मध्य आशियात प्रभाव निर्माण करण्याची जर्मन महत्त्वाकांक्षा खच्ची होते. वडिलांचं कामही जातं. तिथपर्यंत सुबत्तेत जगलेल्या उल्रिकच्या कुटुंबाला आर्थिक चटके बसू लागतात. त्यातून संगीतात ‘करिअर’ घडवण्याचं स्वप्न पाहणारा उल्रिक ‘पर्याय’ म्हणून रसायनशास्त्रात आवड ‘उत्पन्न’ करतो. जिवाभावाचा मित्र बोरिस ह्याला मात्र मनसोक्त आयुष्य जगताना तो पाहत असतो. बोरिसच्या संगीतप्रेमानं तो कधी जळफळतोही आणि मित्र आपली आवड पुढे नेत असल्याबद्दल समाधानही पावतो. बल्गेरियन सरकारविरुद्ध बंड पुकारल्याबद्दल विशीतल्या बोरिसला गोळ्या घातल्या जातात. एव्हाना घरची परिस्थिती फारच बिकट बनलेली असते. बर्लिनमधलं रसायनशास्त्राचं शिक्षण आणि ज्यू युवतीवरचं प्रेम अध्र्यावर सोडून सोफियात परतलेला उल्रिक लग्नाच्या बंधनात अडकतो. पण ते अपयशी ठरतं. सगळी भौतिक सुखं आपल्या पायाशी असावीत, अशी त्याच्या बायकोची इच्छा! नोकरी सोडण्याचं टुमणं ती त्याच्यापाठीमागे लावते. परिस्थितीनं हतबल झालेला उल्रिक नोकरी सोडू शकत नाही.. मग बायको नव-यालाच सोडते. एका धर्मगुरूबरोबर पाट लावून अमेरिकेत दुसरं आयुष्य सुरू करायला निघून जाते. दोन वर्षाचं पोरगंही तिच्याबरोबरच नेते. उल्रिक एकटा पडतो. आयुष्य एकसुरी बनतं. दुस-या महायुद्धापर्यंतचं ‘सोलो’चं कथानक तुफान वेगानं पुढं सरकतं. सारं काही विसरून उल्रिक पुन्हा आयुष्य सावरायला धडपडू पाहतो. पण तोपर्यंत ती ‘परिस्थिती’ उद्भवलेली असते. रशिया बल्गेरियासकट सगळी बाल्कन राष्ट्रं पंखांखाली घेते. साम्यवाद अंमलात येतो. लेखकानं उल्रिकची परवड, ह्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असलं, तरी दुसरीकडे वाचक म्हणून बाल्कन राष्ट्रांमधील कायमचीच उफराटी सामाजिक स्थितीदेखील आपल्या मनात रूतत राहते. मध्ययुगापासूनच बाल्कन अस्मितेला आणि संस्कृतीला इतरांनी कायम सुरुंग लावलेत. या प्रदेशाला ऑस्ट्रियन साम्राज्याच्या माळेत गुंफण्यात आले. ऑटोमन तुर्कानी त्याचे लचके तोडले. जर्मनीने बोचकारले. रशियाने ओरबाडले. ‘नाटो’ने लष्करी तळ प्रस्थापित केले. या सा-यांच्या बलात्काराने गलितगात्र झालेली अनेक बाल्कन राष्ट्रं सध्यादेखील अशांतच आहेत. साम्यवाद जाऊन नावापुरती लोकशाही आली, तरी अजूनही बहुतांशी ‘परिस्थिती’ तीच आहे.. उल्रिकच्या जमान्यातली! साम्यवादी व्यवस्थेशी जुळवून घेतलेला उल्रिक नव्या उमेदीनं आयुष्यात रंग भरू पाहतो. वर्षामागून र्वष जातात. अपयशी ठरलेल्या साम्यवादाची जागा लोकशाही घेते. नव्या व्यवस्थेबरोबरच नवी ‘परिस्थिती’ जन्माला येते. लोकशाहीमध्ये सर्वाना विकासाची समान संधी मिळत असली, तरी उल्रिकचं म्हातारपण तिचं चीज करायला असमर्थ ठरतं. आयुष्याच्या उतरणीला अंधत्वाशी सोबत करणारा उल्रिक तोपर्यंतच्या सा-या घटनांची जुळवाजुळव करतो..संगती लावतो.. उत्तरं शोधतो. अपूर्ण आयुष्य जगल्याची रूखरूख आयुष्याच्या संधिकाळी त्याला खंतावत असते. आईनस्टाईनची गहाळ झालेली महत्त्वाची कागदपत्रं परत करण्याच्या निमित्तानं उल्रिक बालपणी त्याला भेटला होता. त्या वेळी ह्या थोर संशोधकानं उच्चारलेल्या ‘ आय वुड बी नथिंग विदाऊट यू’ या आशीर्वादपर शब्दांनी उल्रिकच्या कायमचं घर केलेलं आहे. ‘आपणही कुणी तरी आहोत’ हा त्याचा अहम् हे वाक्य कायम कुरवाळत राहिलं. पण तो ‘कुणी तरी’ बनलाच नाही. मग एवढ्या महान व्यक्तीचे बोल खोटे कसे ठरले, याच प्रश्नाने त्याचा पिच्छा पुरवला. बराच काळ लोटल्यानंतर आईनस्टाईनच्या वाताहात झालेल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल कळतं. कमावलेलं यश जपण्यासाठी आपण बायका-मुलांना खड्यासारखं वगळलं, याचा सल आईनस्टाईनच्या मनात सदैव होता आणि ह्या अपराधीपणाच्या भावनेतूनच हा जगद्विख्यात शास्त्रज्ञ उल्रिकजवळ ‘ते’ शब्द बोलून गेला. त्याच्या यशाची चिरेबंदी कमान ही कुटुंबीयांच्या बलिदानावर उभी राहिली होती, या एका सत्याचा उलगडा झाला. उल्रिकला पडलेल्या निम्म्या प्रश्नांची उत्तरं या सत्यानं दिली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आईनस्टाईनभोवतालची ‘परिस्थिती’ त्याचं यश वाढवत राहिली. अन्यथा, हिटलरच्या राजवटीत आईनस्टाईनच्या तोडीच्या शास्त्रज्ञांचं ज्याप्रमाणे शिरकाण झालं, तीच गत त्याचीही झाली असती. ज्या ‘परिस्थिती’नं स्वित्झर्लंडलडमध्ये काम करणा-या मामुली कारकुनाला विसाव्या शतकातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक बनवलं आणि इतरांना मृत्यूच्या दाढेत ढकललं, तीच ‘परिस्थिती’ उल्रिकच्या आयुष्याचं मातेरं करायला कारणीभूत ठरली. आता उल्रिकचे उरले-सुरले प्रश्नही निकालात निघाले.
बहुआयामी, कृतिशील लेखक..
राणा दासगुप्ता हे आजच्या घडीचे, भारतीय वंशाच्या इंग्रजी लेखकांमधले एक अग्रणी. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९७१ रोजी ब्रिटनमधील कँटरबरी येथे झाला, केम्ब्रिजमध्ये वाढलेल्या राणा यांचं महाविद्यालयीन पदवीचं शिक्षण मात्र ऑक्सफर्डच्या ‘बालिओल कॉलेज’मध्ये झालं. नंतर अमेरिकेत, विस्कॉन्सिन प्रांताची राजधानी मॅडिसन इथल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन’मध्ये ते शिकले आणि वयाची तिशी पार केल्यानंतर दिल्लीतच राहू लागले. ‘सोलो’ ही त्यांची दुसरी कादंबरी, त्याआधी २००५ मध्ये ‘टोकिओ कॅन्सल्ड’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि ब्रिटिश ललितलेखनाच्या प्रतिष्ठेच्या ‘जॉन लेवलिन ऱ्हाइस पारितोषिका’साठी ‘संभाव्य पाच’ पुस्तकांच्या यादीपर्यंत तिनं धडक मारली. याच यादीत अरविंद अडिगा यांची बुकर-विजेती ‘व्हाइट टायगर’देखील होती (आणि तीही बक्षिसापर्यंत पोहोचली नव्हती), हे विशेष. ‘एकविसाव्या शतकातले, जागतिकीकरणोत्तर काळातले इंग्रजी लेखक’ ही जशी हरी कुंझरू, अरविंद अडिगा यांची ओळख आहे, तशीच ती राणा दासगुप्ता यांचीही आहे, हे नक्की! मात्र बहुआयामी कृतिशीलतेच्या मोजपट्टीवर राणा दासगुप्ता आणखीच सरस ठरतात.. त्यांनी टिपलेली छायाचित्रं, ‘येथे घाण करू नये’ या आज्ञार्थी विधानाची खिल्ली उडवणारी त्यांच्या ब्लॉगची रचना, ‘ग्रॅण्टा’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकात दिल्लीमधल्या अतिश्रीमंतांच्या माजलेपणाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख आणि त्यामागला ‘संजीव नंदा खटल्या’चा संदर्भ.. हे सारं दासगुप्ता यांच्या प्रतिभेची बहुविधता सिद्ध करणारं आहे! सोबतची- आजच्या बल्गेरियातल्या उदास छटा टिपणारी छायाचित्रं अर्थातच राणा दासगुप्ता यांनी टिपलेली आहेत..

No comments:

Post a Comment