Saturday, April 30, 2011

कोऽहम ते सोऽहम!


पाउलो कोएलोची ‘ब्रिडा’ ‘स्व’च्या शोधात भांबावून गेलेल्या दुर्मीळ जमातीचं प्रतिनिधित्व करते. कोएलोने नव्वदच्या दशकात ‘ब्रिडा’ लिहिली. पण अजूनही ‘बेस्टसेलर’ची यादी ‘ब्रिडा’शिवाय पूर्ण होत नाही. अटळ दु:खातूनच प्रवासाचा सुखी शेवट होतो, हे सांगणा-या ‘ब्रिडा’ची ओळख.

सा-याच शंकांची अशी मागू नको तू उत्तरे
असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे!’

जगण्यातलं अर्थवाहीपण शोधण्याचा प्रयत्न करणा-या समस्त शंकासुरांना उद्देशून कविवर्य सुरेश भटांनी या ओळी लिहिल्या असाव्यात. प्रश्नांच्या वावटळीत सापडून भांबावून जायला होतं, पण शंका काही पाठ सोडत नाहीत. एखादा मार्ग निवडून मुक्कामाच्या ठिकाणी जायला निघावं, निम्मं अंतर कापून जावं, तेव्हा प्रवासातला फोलपणा लक्षात यायला सुरुवात होते. दिशाच चुकल्यानं भलत्याच गावी पोहोचल्याचं दु:ख काळीज कुरतडून टाकतं. पण म्हणून माणसानं जगण्याचा प्रवास अर्धवटच टाकून दिलाय, असं होत नाही. अनेक कोलंबस वादळात भरकटतात. त्यांची नाव अगदी नव्याको-या जगाच्या किना-याला लागते, तरीही सोन्याचा धूर ओकणारा प्रदेश न सापडल्याचा अपयशसोहळा त्यांचं मन साजरा करीत राहतं. एखाद्याच भाग्यवान मॅगेलॉनला अमेरिकेच्या रूपानं ‘नवे जग’ सापडल्याचा साक्षात्कार होतो. असे दर्यावर्दी बनायची खुमखुमी अनेकांत असते. एवढीशी नाव आणि अडीच हात लांब वल्ह्यांवर विसंबून ही मंडळी स्वत:ला अज्ञाताच्या महासागरात लोटून देतात. जगण्याचा अर्थ लावू पाहताना ‘स्व’चाही शोध घेण्याची ऊर्मी प्रबळ बनते. ती इतकी की, वल्हं तुटो अथवा नाव बुडो, ‘बेडा पार’ होईपर्यंत ते लाटा कापून पुढं जायचं थांबवीतच नाहीत. हा ‘कोऽ हम’पासून ‘सोऽहम’पर्यंतचा प्रवास करणं, हेच मुळात एक आनंदनिधान असतं. ‘मी कोण’ याचा शोध घेणा-यांना अपरिहार्यपणे येणारं एकाकीपण घाबरवून टाकतं. ‘त्यांनी’ निवडलेला रस्ता ओसाडगावाकडे जातो, असं ठरवून ‘त्यांचे’ सहप्रवासी तथाकथित राजमार्गाची निवड करतात. त्यामुळे ‘स्व’चा धांडोळा घेणारे स्वाभाविकपणे एकटे पडतात. पण ज्याला बाकीच्यांनी राजमार्ग ठरवलं, ती केवळ मेंढरांची पायवाट होती, हे समजलं की त्या एकटेपणाचा पुन्हा-पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. अशाच अनुभवांना कादंबरीचं रूप देत पाउलो कोएलो या ब्राझीलियन लेखकाने नव्वदच्या दशकात ‘ब्रिडा’ लिहिली. अजूनही ‘बेस्टसेलर’ची यादी ‘ब्रिडा’शिवाय पूर्ण होत नाही. जादुविद्या शिकण्याच्या ध्यासानं पछाडलेली ही ब्रिडा नावाची आयरिश मुलगी. जादूच्या माध्यमातून तिला दैवी ताकदींबद्दल शिकायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आयुष्य समजून घ्यायचं होतं. उपजत जिज्ञासेने तिच्या बुद्धीला तर्कशुद्धतेची कठोर धार आलेली. त्यामुळे आपोआप समवयस्कांच्या कळपापासून अलग पडलेली. आयुष्याचं ईप्सित साध्य करण्यासाठी मार्ग दाखवणारे अगदी टोकाच्या विचारसरणीचे दोन शिक्षक तिला भेटतात. मॅगस आणि विक्का नामक या दोघा शिक्षकांनी आपापल्या मार्गाने जाऊन आयुष्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं असतं. ‘स्व’च्या शोधात भांबावून गेलेल्या दुर्मीळ जमातीचं ब्रिडा प्रतिनिधित्व करतं. आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याच्या प्रक्रियेत ‘सोलमेट’ सापडणं किती आवश्यक आहे, हे विक्का तिला समजावून सांगते. ‘सोलमेट’ म्हणजे सुख-दु:खातला खरा जोडीदार! असं फक्त परिकथांमध्येच घडतं, हे मनाला बजावीत ब्रिडा विक्काला खुळचट ठरवते. माणसं ज्ञान, पैसा आणि सत्ता यापैकी एका ध्येयाच्या पाठीमागे धावत राहतात. पण ते खरंच त्यांचं उद्दिष्ट नसतं. ‘सोलमेट’ सापडला की असल्या उद्दिष्टांना अर्थ उरत नाही. जिज्ञासूपणाने आपल्या शिक्षकांचा असा उपदेश ऐकणाऱ्या ब्रिडालाही शेवटी तिचा ‘सोलमेट’ सापडतो. गमतीची किंवा दु:खाची गोष्ट ही की, हा ‘सोलमेट’ तिचा ‘बॉयफ्रेंड’ नसतो. ब्रिडाला ‘सोलमेट’ सापडण्याचा हा प्रवास कशी जीवघेणी वळणं घेत जातो, हे कादंबरी वाचूनच समजेल. स्वत:चा शोध घेण्याची आस, ही जगणा-या प्रत्येक व्यक्तीला मिळालेली दैवी देणगी असल्याचं विक्का आणि मॅगस तिला अप्रत्यक्षपणे सुचवतात, मात्र हा शोध तिने स्वत:च्याच बळावर पूर्ण करावा, अशी त्यांची इच्छा असते. पाउलोने निसर्गपूजकांच्या विस्मृतीत गेलेल्या धार्मिक परंपरांचा खुबीने वापर करून घेत हा शोध ‘ब्रिडा’मधून प्रवाहीपणे रेखाटला आहे. ब्रिडा! आयुष्य अगदी समरसून जगणारी मुलगी. नवेपणाच्या उत्साहानं अनेक अनुभवांना ती सामोरी जाते. ध्येय साध्य करण्याचे अनेक मार्ग तिला दिसत असतात. पण ती यापैकी कुठल्याही मार्गावरून चालायला कचरते. संकटांना घाबरून अजिबातच नव्हे! जर एक मार्ग निवडला तर इतर मार्ग कायमचे बंद होतील, ही भीती तिला सतावते. ब्रिडाच्या अपयशी प्रेमप्रकरणांच्या बाबतीतही हीच त-हा! त्यामुळे अपेक्षाभंगाचं दु:ख तिनं कायम सोसलेलं. पण तरीही ती नव्या अनुभवांच्या ओढीने पावलं पुढे टाकीत राहते. अटळ दु:खातूनच तिच्या प्रवासाचा सुखी शेवट होतो आणि ब्रिडा एका नव्या आयुष्यासाठी तयार होते.

No comments:

Post a Comment