Friday, April 29, 2011

भांडवलवाद ‘कल्याणकारी’?


" गरिबीचं दुष्टचक्र भेदणारा आणि भांडवलाद फक्त नफेखोरीभोवती फिरू नये, हेही बजावणारा विचार बांग्लादेशातील ‘ग्रामीण बँके’चे जनक आणि नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनुस यांनी ‘बिल्डिंग सोशल बिझनेस’ या नव्या पुस्तकात मांडला आहे...."



स्वार्थी आणि आत्मकेंद्री वृत्ती हा मानवी स्थायीभाव असतो आणि तरीही परस्परांविषयीचा स्नेहभावही त्यात अनुस्यूत असतोच. पण, स्वार्थ हाच मानवी अस्तित्वाचा पाया मानून भांडवलवादाने इतर पैलूंकडे दुर्लक्ष केले आहे. माणसाला केवळ पैसे छापणारा यंत्रमानव गृहीत धरून भांडवलवादाने आपल्या नफेखोरीची उभारणी केली आहे. साहजिकच ती एकांगी आणि अपूर्ण आहे. कुणाचेही व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक, पर्यावरणीय आदी व्यामिश्र गुंतागुंतीचा परिपाक असतो. पण, भांडवलवाद हे सगळं नाकारून केवळ आर्थिक बाजूवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे यातून उभं राहिलेलं भांडवलवादाचं व्यक्तीविषयीचं आकलन अतिशय मर्यादित आहे. सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्टसारखं अघोरी तत्त्वज्ञान त्याचा पाया आहे. त्यामुळे अगोदरपासूनच आर्थिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या बलिष्ठ असलेले अधिकाधिक संपत्ती कमवताना दिसताहेत. तर, गरीब नुसतेच उपेक्षेचे धनी ठरताहेत. मग ठराविक वर्गाचेच हितसंबंध जपणारा भांडवलवाद व्यापक आणि मानवतावादी कसा करता येईल? प्रचलित विचारांच्याच चौकटीत काम करून तिला कल्याणकारी अधिष्ठान कसे प्राप्त करून देता येईल? बांग्लादेशातील ग्रामीण बँकेचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांनी त्यासंबंधीचे आपले विचार बिल्डिंग सोशल बिझनेसया पुस्तकातून व्यक्त केले आहेत.

या पुस्तकात त्यांनी मार्क्‍सवादाइतक्याच आदर्श संकल्पना रेखाटल्या असल्या, तरी त्यांच्या प्रत्येक विचाराला वास्तवाचा भरभक्कम पुरावा आहे. गरिबी ही वंचितांनी निर्माण केलेली कीड नाही. त्यासाठी सभोवतालचे विविध घटक कारणीभूत असतात. भांडवलवादी विचारांच्या एकांगी पायावर उभ्या राहिलेल्या आर्थिक संस्थांचा त्यात मोठा वाटा आहे. स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच समाजाच्या विकासात योगदान देण्याइतकी क्षमता प्रत्येक मनुष्यातच असते. फक्त सध्या ज्या वातावरणात आपण राहतो आहोत, त्या वातावरणात अशा क्षमतांचा विकास करण्याची संधी काहींनाच मिळते. बहुतेकांना मिळत नाही. गरिबी ही भांडवलवादात असलेल्या त्रुटींचे अपत्य आहे. या त्रुटी दूर करून आर्थिक संस्थांची उभारणी केली, तर गरिबीचे निश्चितच निर्मूलन होऊ शकते. बांग्लादेशातील गरीब महिलांसाठी ग्रामीण बँक सुरू करून त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी जवळपास चार दशकं युनुस यांनी यशस्वी धडपड केली. गरिबी ही कृत्रिम गोष्ट आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भांडवलशाही व्यवस्थेची पुनर्रचना करून गरिबी नष्ट करता येऊ शकते, हा विचार युनुस यांच्या मनात बळकट झाला. बँकांनी कर्ज देण्याचे जे निकष ठरवलेत, त्या निकषांच्या आधारावर जगातली दोन तृतीयांश लोकसंख्या कर्ज घेण्यास नालायक ठरते. ज्यांना कर्जाची गरज इतरांपेक्षा जास्त असते, त्यांनाच बँकेचे दरवाजे बंद होतात. मग सावकार चक्रवाढ व्याजाने त्यांना कर्ज देतो. व्याज फिटतच नाही आणि मुद्दल जिथल्या तिथे राहते. गरिबीचे हे दुष्टचक्र पिढ्यान्पिढ्या सुरूच असते.

युनुस यांनी ग्रामीण बँकेची 1978मध्ये सुरुवात केली. गरिबांना कर्ज देण्याची हिंमत दाखवून त्यांनी हा प्रयोग यशस्वीही करून दाखवला. त्यामुळेच आता जगभरातल्या आर्थिक संस्थांनी मायक्रोक्रेडिटला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. 2008च्या जागतिक मंदीने प्रचलित भांडवलशाही व्यवस्थांमधील अपयश अधोरेखितच केले. सिटीबँक, लीमन ब्रदर्स अशा धनाढ्य संस्थांचे दिवाळे निघण्यास सुरुवात झाली होती, तेव्हा मायक्रोक्रेडिटवर आधारलेल्या संस्था केवळ तगच धरून राहिल्या नव्हत्या. त्या जोमाने वाढतही होत्या. या पार्श्वभूमीवर जागतिक मंदी ही संधी मानून रूढ व्यवस्थेत बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे, असं युनुस यांचं म्हणणं आहे. भांडवलवादावरील विश्वास उडालेल्या वातावरणात नवे उपाय सांगणारं हे पुस्तक गरिबी दूर करण्यासाठी वास्तववादी विचारांचा पाठपुरावा करतं. आतापर्यंत केलेल्या प्रयोगांचे सकारात्मक परिणाम पाहूनच युनुस सोशल बिझनेसच्या संकल्पनेचा आग्रह धरतात.

सोशल बिझनेसया संकल्पनेत गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक फायद्याला महत्त्व न देता इतरांचे हित साधण्याचा आग्रह असतो. पण, त्यातही कठोर व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली..टाइप विचारांना त्यात अजिबात थारा नाही. एखाद्या व्यवसायात केलेली भांडवली गुंतवणूक भरून निघावी, इतपत उत्पन्न त्यातून अपेक्षित असतेच. शिवाय, त्यातून होणारा नफा पुन्हा सोशल बिझनेसमध्येच गुंतवला जातो. पैसा मिळवल्याचं नाही, पण आपण मानवतावादी भूमिकेतून हे सारं करत आहोत, एवढंच समाधान त्यातून मिळतं. कुठल्याही आर्थिक प्राप्तीची अपेक्षा ठेवायची नाही. सेवाभावी वृत्ती मनुष्यात असतेच, या गृहितकावर युनुस यांनी सोशल बिझनेसच्या संकल्पनेचा डोलारा उभा केला आहे. आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, रोजगार निर्मिती या क्षेत्रांत युनुस यांनी उभ्या केलेल्या कंपन्यांचे काम जोरात सुरू आहे. अनेक नामवंत कंपन्या त्यांच्या उपक्रमात आपले योगदान देत आहेत. ही चळवळ आणखी व्यापक झाली, तर जगभरातली गरिबी काही वर्षातच नष्ट होईल, अशी युनुस यांना आशा आहे. सोशल बिझनेससुरू करण्यासाठी लागणारा पैसा अशाच कंपन्यांकडून किंवा बिल गेट्स- वॉरन बफे यांच्यासारख्या जगातल्या धनाढ्य देणगीदारांकडून मिळवायचा, असा त्यांचा साधासरळ हिशेब आहे.

आर्थिक, सामाजिक, शेतीविषयक, आरोग्यविषयक, पर्यावरणविषयक असे सारेच प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात सोशल बिझनेसला वाव आहे. युनुस यांच्या म्हणण्याप्रमाणे या संकल्पनेचा सर्वात जास्त फायदा सरकारला होईल. शेवटी, शासननिर्मिती ही प्रजेचे हित साधण्याकरता झालेली आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सोशल बिझनेससरकारची मदत करू शकतात. युनुस यांच्या बांग्लादेशातील प्रकल्पांनी ते करून दाखवलंय. बांग्लादेशातील गरिबीचा दर 1991मध्ये तब्बल 57 टक्के होता. तो आता 40 टक्क्यांवर आला आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत तो जरी जास्त असला, तरी दरवर्षी दोन टक्के या वेगानं तो कमी होतोय. किमान, हे यश लक्षात घेऊन तरी जगभरातील सरकारांनी आपल्या आर्थिक धोरणांत बदल करावेत, असा युनुस यांचा आग्रह आहे. स्वप्नाळू समाजवादाप्रमाणेच सोशल बिझनेसची संकल्पनाही स्वप्नवत असल्याचे ते कबूल करतात. पण, स्वप्न पाहणा-यांनीच जगाचा चेहरामोहरा बदलला आहे. अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. त्यामुळे आमचे विचार स्वप्नाळू वाटत असतील. पण, जग गरिबीमुक्त करण्याची ताकद याच विचारांत आहे, असं सांगून युनुस यांनी पुस्तकाचा समारोप केलाय. केवळ नफाप्राप्तीचे उद्दिष्ट ठेवणा-या लोकांकडून सोशल बिझनेससंकल्पनेची मोडतोड होऊ शकण्याची भीती ते वर्तवतात. तसं होऊ नये, यासाठी या मानवतावादी उपक्रमात सहभागी होणा-यानी वॉचडॉगची भूमिका निभावण्याची गरज असल्याचे सांगतात. या धोक्यापासून तर समाजवाद आणि मार्क्‍सवादही स्वत:ला वाचवू शकलेले नाहीत. त्यामुळे भांडवलशाहीचा हा नवा अवतार त्याचं आदर्शवादी अधिष्ठान कुठपर्यंत जपू शकेल, ते येणारा काळच सांगेल!





No comments:

Post a Comment