Friday, April 29, 2011

श्रीमंतीचा अर्धवट 'गेटवे' ...!


"कालानुरूप बदलत गेलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात अधिक संपत्तीसंचय करणाऱ्या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण या पुस्तकात असल्याचा दावा क्रॉसेन यांनी केला आहे। मात्र त्यांनी जगातल्या श्रीमंतांच्या इतिहासाचा श्रीगणेशा गझनीच्या महमूदापासूनच का सुरू केला, याचे उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही."

माणूस भटक्याप्रमाणं जगणं सोडून एका जागी स्थिर झाला, तेव्हा त्याच्या कळपाचं रूपांतर समाजात झालं. या समाजातील प्रत्येक व्यक्तीला इच्छा असो अथवा नसो, जगण्याच्या लढाईत अस्तित्व टिकवून ठेवण्याकरता इतरांशी संबंध ठेवण्यावाचून पर्यायच नव्हता. माणूस म्हणून लागणा-या गरजा भागवण्यासाठी ते आवश्यकच होतं. उत्पादनाच्या प्रक्रियेतील या अपरिहार्य संबंधांतूनच प्राथमिक स्तरावरची तत्कालीन अर्थव्यवस्था आकाराला आली. त्यानंतर या अर्थव्यवस्थेला आधार म्हणून समाजाचे कायदेकानून अस्तित्वात आले. उत्पादनाची साधने जसजशी बदलत गेली, तसतसं अर्थव्यवस्थेचं स्वरूपही बदलत गेलं. या अर्थव्यवस्थेमागील कार्यकारण भाव समजून घेत तिने निर्माण केलेल्या संधींचा लाभ उठवण्याचं कौशल्य दाखवणारी व्यक्तिमत्त्वं त्या- त्या काळातल्या धनाढय़ांच्या यादीत जाऊन बसली.

प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातल्या अनेक व्यक्ती त्यांच्या डोळे दिपवणाऱ्या संपत्तीच्या वर्णनानं समाजात दंतकथा होऊन बसल्या आहेत. आतादेखील मुकेश अंबानी यांच्या अँटिलियानामक प्रासादतुल्य घराच्या किमतीचा खर्च वृत्तपत्रात वाचून आणि बिल गेट्स नि वॉरन बफे यांच्या संपत्तीचे वाढते आकडे ऐकून आपल्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण होतं. एवढी अमाप संपत्ती त्यांनी कशी मिळवली असावी, याचा शोध त्या कुतुहलापोटीच घेतला जातो.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या विख्यात पत्रकार सिंथिया क्रॉसेन यांना बहुधा आपल्या द रिच अँड हाऊ दे गॉट दॅट वेमधून हेच मांडायचं असावं. पण, खुद्द युरोपाशी संबंधित ऐतिहासिक दस्तावेजांच्या विपुलतेमुळे म्हणा अथवा भारत-चीनच्या इतिहासाकडे नजर न गेल्यामुळे म्हणा, त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक इतिहासाचा समग्र आढावा घेत नाही अथवा युरोपचाच इतिहास फार जोरकसपणे मांडतं, असं हे पुस्तक वाचताना राहून- राहून वाटतं.

लालित्यपूर्ण लिखाण हे सत्यान्वेषी आणि नि:संदिग्ध मांडणीला पर्याय ठरू शकत नाही. सिंथिया क्रॉसेन यांनी शाब्दिक चमत्कृतींची ढाल पुढं केली आणि बखरवाङ्मयातील उता-यांचा वाचकांवर मारा केला असला, तरी त्यांच्या लिखाणातली अपूर्णता लपत नाही. ते प्रवाही आहे, पण, तरीही दोन- अडीच हजार वर्षाचा कालपट सलगपणे उलगडून दाखवणारं नाही. म्हणूनच ते वाचनीय आहे, पण अभ्यासनीय नाही. वॉल स्ट्रीटवरच्या घडामोडींचा बारकाईनं अन्वयार्थ लावून वार्ताकनाच्या क्षेत्रात मानदंड प्रस्थापित करणा-या क्रॉसेन यांच्यातल्या पत्रकारानं लेखिका म्हणून असं सुमार दर्जाचं पुस्तक का लिहावं, हे समजत नाही. सहजासहजी उपलब्ध झालेल्या दस्तावेजांच्या आधारानंच आपल्याला काय म्हणायचंय, याची मांडणी केल्यानं क्रॉसेन यांना पुस्तक लिहिण्यास कमी श्रम पडले असतील. पण, युरोपाशिवाय जगाच्या पाठीवर नांदणा-या इतर समृद्ध संस्कृतींकडेही त्यांनी लक्ष दिलं असतं, तरी या पुस्तकाला अभ्यासग्रंथ म्हणून आकार आला असता.

भारतावर सतरा वेळा स्वा-या करून अमाप लूट मायदेशी नेणाऱ्या गझनीच्या महमूदापासून क्रॉसेन यांचा पुस्तकाचा प्रवास सुरू होतो, तो बिल गेट्सपर्यंत जाऊन संपतो. कालानुरूप बदलत गेलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात अधिक संपत्तीसंचय करणा-या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण या पुस्तकात असल्याचा दावा क्रॉसेन यांनी केला आहे. मात्र त्यांनी जगातल्या श्रीमंतांच्या इतिहासाचा श्रीगणेशा गझनीच्या महमूदापासूनच का सुरू केला, याचे उत्तर देण्याची तसदी घेतलेली नाही. सांस्कृतिक अभिनिवेशाची झूल न पांघरताही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हेच दिसतं की, क्रॉसेन यांनी महमूदपूर्व काळातला इतिहास मांडण्यात कुचराई केली. अथवा, युरोपातल्या डार्क एजमुळे तिथं शतकानुशतके वास करत आलेलं आर्थिक- सांस्कृतिक दरिद्रीपण आणि सुदूर पूर्वेचा चीन वा भारत यांच्याबाबत असलेलं अज्ञान, या दोहोंतला मध्यममार्ग म्हणून गझनीच्या महमूदाला आपल्या पुस्तकात अग्रक्रम दिला असावा.

महमूदानं सतरा वेळा भारतावर स्वारी केली, हा इतिहास सांगूनच त्या थांबल्या आहेत. त्या काळातला अतिश्रीमंत प्रदेश म्हणून भारताविषयी परकीयांमध्ये आकर्षण होतं, हे सांगताना भारतात ही श्रीमंती कुठून निर्माण झाली असावी, याची कारणं तपासण्याची जरुरी क्रॉसेन यांच्यासारख्या शोधक नजरेच्या पत्रकाराला भासली नाही. जगातील इतर प्रांतांतील मानवसमुदायांना जगण्याची भ्रांत पडलेली असताना भारतात त्या काळी सरप्लसनिर्माण करणारी एक प्रगत अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. त्याकडे मात्र या पुस्तकात पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं.

क्रॉसेन यांचं हे पुस्तक पावणेतीनशेच्यावर पानांचं आहे. त्यापैकी सुमारे दीडशे पानं त्यांनी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील श्रीमंतांच्या वर्णनात घालवली आहेत. त्या काळातल्या नवकोट नारायणांमध्ये गझनीचा महमूद, तलवारीच्या धाकावर युरेशिया जिंकणारा चंगीझ खान, आशियाई, अरबी आणि युरोपीय व्यापा-यांना संरक्षण पुरवून त्यांच्याकडून दलाली वसूल करणारा आफ्रिकेचा मनसा मुसा, स्वत:च धार्मिक कायदे पायदळी तुडवून आणि चर्चचा धाक दाखवून कॅथॉलिक जनतेकडून संपत्ती उकळणारा पोप अलेक्झांडर सहावा, पंधराव्या शतकातील जर्मन बँकर जॅकोब फुगर आणि जॉन लॉ यांचा समावेश आहे. ही माणसं अतिधनाढय़ होती, यात दुमत असण्याचं कारण नाही.

पैशाच्या परिभाषेत मोजदाद करता येईल, असं स्वरूप तोपर्यंत आर्थिक व्यवहारांना आलं नव्हतं. त्यामुळं या व्यक्तींच्या श्रीमंतीचं चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर लख्ख उभं करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी शब्दांची पैशापेक्षाही अमाप उधळण केली आहे. परंतु, या व्यक्तिमत्त्वांच्या समकालिनांचा धांडोळा घेण्यात मात्र आळस केला, असं नमूद करावसं वाटतं. उदाहरणार्थ, त्यांनी उल्लेख केलेल्या जॉन लॉ आणि फुगरच्या काळात (सतराव्या शतकाच्या आगे-मागे) भारतामध्ये मुगल साम्राज्यालादेखील कर्ज देणारे वीरजी व्होरा आणि जगतशेटसारखे व्यापारी अथवा बँकर अस्तित्वात होते. इतकी श्रीमंती केवळ दोघांकडेच आणि भारतातच असेल, असं समजण्याचं कारण नाही. चीनमध्येही तसे श्रीमंत असतील. क्रॉसेन यांना स्थावर- जंगम मालमत्ता लक्षात घेऊनच तत्कालीन व्यक्तींची संपत्ती आणि त्यांच्या यशाचं गमक सांगायचं होतं, तर भारतात आणि चीनमध्ये तेवढी श्रीमंती नक्कीच होती.

मुद्दा हा आहे की, क्रॉसेन यांनी स्वत:ला समजलेला आणि सांगायला सोप्पा जाईल, असाच इतिहास या पुस्तकातून मांडला आहे. एखादं गृहितक अगोदर मांडायचं आणि त्याप्रमाणे प्रमेयांची मांडणी करायची. मग त्यातील एकांगी निष्कर्षानाच सिद्धांताचं रूप द्यायचं, असा हा प्रकार एकंदर प्रकार आहे.

मध्ययुगीन इतिहासाशी खेळताना उडालेली लेखिकेची भंबेरी अचानक थांबते, ती जॅकोब फुगर आणि रिचर्ड आर्कराईटवर लिहिलेल्या प्रकरणांपासून! पंधराव्या शतकात युरोपात आलेलं प्रबोधनाचं युग या काळात अगदी समेवर पोहोचलं होतं. भरपूर लिहिलं जात होतं. त्यामुळं फुगर-आर्कराईटच्या काळातले संदर्भ मिळवताना क्रॉसेन यांना फारशी तोशीस पडलेली दिसत नाही. आर्कराईटवरील प्रकरणातून त्यांनी औद्योगिक क्रांतीतून युरोपात उदयाला आलेली भांडवलशाही व्यवस्था आणि त्यातून नवउद्योजकांना निर्माण झालेल्या संधी यांचा अगदी नेमक्या शब्दांत ऊहापोह केला आहे. तर, कल्पनेच्या बळावर उद्योजकीय भरारी घेऊन जगावर अधिराज्य प्रस्थापित करता येते, हे बिल गेट्सनं दाखवून दिल्याचा मुद्दा मांडत आता श्रीमंत होण्यासाठी या संगणकतज्ज्ञाच्या पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमणा करणे उपयुक्त ठरेल, असा त्यांनी पुस्तकाचा समारोप केला आहे.

थोडक्यात, संकलित केलेल्या माहितीला पुस्तकरूप देण्यासाठी केवळ सोय म्हणून त्यांनी जगातल्या श्रीमंतांचा इतिहास लिहिण्यास दहावं शतक प्रमाण मानलं असावं. युरोपीय इतिहासतज्ज्ञांनी लिहिलेला भारताचा इतिहास त्यांनी अभ्यासला असता, तर सम्राट अशोकाच्या काळात भारतात प्रचंड समृद्धी नांदल्याचे त्यांना दिसले असते किंवा गुप्तकाळावर नजर टाकली असती, तर त्याला भारताचे सुवर्णयुग म्हटले गेल्याचीही त्यांना कल्पना आली असती. जेणेकरून, तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब त्यांच्या लिखाणात उमटले असते व हे पुस्तक सर्वसमावेशक झाले असते.

प्रहार - १० जानेवारी २०११

No comments:

Post a Comment