Saturday, April 30, 2011

इतिहासातलं हरवलेलं पान!




image

सोळाव्या शतकात राजस्थानात घडणारी ही कहाणी. कादंबरी इतिहासात घडते, तिचा विषयही सनातनी, पण परिणाम मात्र आजचा! किरण नगरकर यांनी ‘ककल्ड’मधून दाखवलेल्या मानवी जीवनातील विसंगती वाचकाला बेचैन करून सोडतात.

रणांगणात पाठ फिरवायची नाही, हा राजपुतांचा बाणा.. राजपुतान्याची परपंरादेखील अशाच हुतात्म्यांचे पोवाडे गाणारी! शत्रूला मारता-मारता युद्धभूमीवरच प्राण सोडण्यातच नरजन्माचं सार्थक असतं, हे इतिहासानं राजपुतांच्या रोमा-रोमात भिनवलेलं! सोळाव्या शतकाचा तो काळही त्याला अपवाद नव्हता. राजपूत राज्यांच्या संघाचं नेतृत्व करणारं मेवाड हे बलिष्ठ राज्य आहे. महापराक्रमी राजा संग मेवाडचे सम्राट आहेत. हा एक असा राजा, ज्याने कुठल्याही लढाईत पराभव पाहिला नव्हता आणि अशी कुठलीही लढाई नव्हती, जी तिच्यातल्या हातघाईच्या खुणा महाराणा संगांच्या शरीरावर उमटवायला विसरली नव्हती. लढाईतल्या घावांनी ठिकठिकाणी मोडलेल्या, पण ताठ कण्यानं चालणा-या महाराणा संगांना राजस्थानी आख्यायिकांनी अजरामर केलं आहे. अशा नरपुंगवाच्या पोटी जन्म घेतलेल्या युवराजाचं काळाच्या पुढचं पाहणं! जे समजणं मेवाडच्या सेनापतींच्या आणि जनतेच्या आवाक्याबाहेरचं होतं. किरण नगरकर यांची ‘ककल्ड’ कादंबरी फक्त हाच इतिहास चिवडत बसत नाही. कारण ‘ककल्ड’ तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणारी केवळ बखर नाही. मानवी जीवनातली गुंतवळ सुटी करून तिची संगती लावण्याचा प्रयत्न नगरकरांनी पूर्वीच्या कादंब-यांतून ताकदीनं केला आहे. ‘ककल्ड’चाही तोच उद्देश आहे. महाराणांच्या गादीचा वारस आणि मेवाडचा युवराज, सतत सावलीसारखं त्याचं रक्षण करणारा मित्र मंगल, मंगलची आई आणि युवराजाची दाई कौसल्या, पतीऐवजी कृष्णावरच प्रेम करणारी युवराजाची पत्नी, महाराणा संगांच्या राणीवशातली पाताळयंत्री राणी कर्मावती, तिचा तापट डोक्याचा सत्ताकांक्षी पुत्र विक्रमादित्य, बृहन्नडा नामक कर्मावतीचा विश्वासू हिजडा सल्लागार, युवराजावर प्रेम करणारी लीलावती अशा ताकदवान व्यक्तिमत्त्वांसह अनेक लहान-मोठ्या पात्रांमध्ये नगरकरांनी ‘ककल्ड’ला गुंफलं आहे. युवराजाला केंद्रस्थानी ठेवून राजगादीसाठीचा संघर्ष, भावा-भावांतील असूया, परकीय आक्रमणांचं भय, अंतर्गत राजकारण, कौटुंबिक असमाधान आणि खुद्द युवराजाच्या प्रामाणिक हेतूंबद्दल आप्तस्वकीयांच्या मनातला संशय अशा व्यापक पटलांवर कादंबरीतल्या घटना घडत राहतात. वाचकाला पुन्हा-पुन्हा विचार करायला भाग पाडतात. ‘ककल्ड’मधून सातत्यानं अधोरेखित होत राहते, ती जीवनातली विसंगती.. irony! युवराजाच्या पत्नीनं स्वत:ला निळ्या मुरलीधराच्या पायी वाहिलेलं आहे. कृष्ण हाच तिच्या जीवनाचं सार आणि सर्वस्व आहे. ती त्यालाच आपला पती मानते, युवराजाला नाही. पती-पत्नी म्हणून दोघांमध्ये कुठलेही व्यवहार ही हिरव्या डोळ्यांची राजकुमारी त्याला करू देत नाही. परिणामी मेवाडची जनता युवराजाला षंढ म्हणून हिणवते. ज्याला स्वत:चं पौरुषत्व सिद्ध करता येत नाही, तो राज्यकारभार आणि लढाईत नेतृत्व काय करणार? म्हणून पदोपदी त्याचा पाणउतारा. अशा कंडय़ा पिकवण्यात त्याची सावत्र आई कर्मावती आणि तिचा पोरगा आघाडीवर. चेहरा निर्विकार ठेऊन युवराज आपल्यावर सोपवलेलं काम करत असतो. राजकारणाची त्याची जाण इतर कुणाहीपेक्षा जास्तच तीक्ष्ण आहे. युद्धापेक्षा शांतीचा पुरस्कर्ता असलेल्या युवराजाला राज्याची तिजोरी विनाकारण लढाईत रिकामी करण्यापेक्षा मेवाडची पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी कारणी लावायचीय. युद्ध हा कायमचा तोडगा कधीच असू शकत नाही, हे त्याला कळलंय. तो ते सांगतोय. पण त्याच्या कपाळावर बसतो, तो भ्याडपणाचा शिक्का. चारण आणि भाटांच्या अतिरंजक कथांवर पोसलेली राजपूत मनं शांतीचा मार्ग स्वीकारण्यास कधीच तयार होत नाहीत. पारंपरिक युद्धतंत्रात बदल करायची त्याची इच्छा असते. माघार घ्यायची कला तो आपल्या सैनिकांना शिकवू पाहतो. सुरुवातीला तो सेनापतींच्या हेटाळणीचं लक्ष्य बनतो. इडरच्या लढाईत त्याचा नवा युद्धप्रयोग यशस्वी होतो. राजपुतांच्या सैन्याची अजिबात हानी न होता ते घवघवीत यश संपादन करतात, तेही पूर्वीच्या पराभवाचं दामदुप्पट उट्टं काढून! त्याचे सैनिक त्याला डोक्यावर उचलून घेतात. पण गनिमी काव्याचे युद्ध पसंत न पडलेल्या मेवाडच्या जनतेकडून त्याचं स्वागत होतं, ते काळे बावटे दाखवून! गनिमी कावा म्हणजे भेकडपणा. तो राजपुतांच्या दृष्टीने लांच्छनास्पद! नगरकरांनी मेवाडचा इतिहास या कादंबरीतून छोट्या-मोठ्या तपशिलांसकट उभा केला आहे. कादंबरीला जरी ऐतिहासिक पार्श्वभूमी असली, तरी विषय मात्र सनातन आहेत. स्वार्थाने बरबटलेले व्यवहार, स्त्रीवरील मालकी हक्काची भावना, प्रेमाचं खरं स्वरूप, युद्धाची अव्यवहार्यता असे आदिम कालापासून चालत आलेले विषय या कादंबरीत मांडले गेले आहेत. यात भावून जाते जाते, ती युवराजाला आपलं राज्य परकीय शत्रूंपासून वाचवण्याची कळकळ, मेवाडला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवण्याची मनीषा, आपल्या कर्तृत्वाने पराक्रमी पूर्वजांच्या पंगतीत बसण्याची महत्त्वाकांक्षा!! पण वेळ विपरीत असते. दुर्दैवाने त्याने टाकलेले सर्व फासे उलटे पडत जातात. कादंबरी वाचताना आपण बेचैन होत राहतो, ते त्याच्या भागध्येयात हळूहळू अटळपणे येणा-या परवडीने! मीरेच्या कृष्णप्रेमाच्या कथा भारतातल्या घरा-घरात भक्तिभावाने श्रवण केल्या जातात. महाराणा संगांच्या आणि इतर पराक्रमी राजपुतांच्या शौर्यगाथा किमान राजस्थानातल्या पोरा-सोरांच्या तरी तोंडावर असतात. पण मीरेच्या नव-याचा साधा उल्लेखही इतिहासातून डोकावत नाही. मीरेचा नवरा आणि महाराणा संगांचा ज्येष्ठ पुत्र, हा इतिहासातलं हरवलेलं एक पान आहे. तेवढं एकच पान ‘ककल्ड’मधून जागोजागी अस्वस्थपणे फडफड करीत राहतं. युवराजाच्या प्रत्येक कृतीतून कृष्ण डोकावतो. कृष्णाने दाखवून दिलेल्या पाऊलवाटांवरूनच तर युवराज चाललेला असतो, जरी तो कृष्णाला प्रतिस्पर्धी समजत असला तरी! हाच कृष्ण आपल्या आणि बायकोच्या नात्यामध्ये सलणारा काटा वाटत असला तरी! ऐन रणांगणातून पळ काढणाऱ्या कृष्णाला नाही का ‘रणछोडदास’ म्हणून हिणवलं गेलं? शत्रू जर आपल्यापेक्षा शिरजोर असेल, तर निष्कारण वाघाच्या जबड्यात तोंड घालण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा बुद्धिचातुर्याने आपल्या आहे, त्या शिबंदीचा परिणामकारक वापर केला, तर विजयश्री आपल्याच गळ्यात नाही का पडणार? की प्रत्येक लढाईत राजपुतानं ‘केसरिया बाणा’ दाखवणं आवश्यकच आहे. निष्कारण स्वत:चं शीर कापून घेण्याची बिनडोक खुमखुमी कशासाठी? त्यापेक्षा गनिमी काव्यानं शत्रूला नेस्तनाबूत करणंच श्रेयस्कर नाही का? हाही पराक्रमच असतो, हे कृष्णानंच नाही का शिकवलं? बायकोला फितवणा-या कृष्णाचा द्वेष करणारा युवराज आयुष्यभर आचरण करतो ते कृष्णनीतीचं! सुष्टांचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दालन, हे त्याच्या राज्यकारभाराचं ब्रीद! पण काळ युवराजाला अनुकूल नसतो. त्याच्या नजरेचा पल्ला इतका मोठा असतो की, इतरांनी त्याला ठार आंधळाच समजावं. बाबर हिंदुस्तानच्या वेशीवर येऊन ठेपण्याअगोदरच तो महाराणा संगांना बजावतो की, आधुनिक शस्त्रं खरेदी करा. ते होत नसेल, तर किमान मुघलांची युद्धनीती समजावून त्याप्रमाणे व्यूहरचना आखा. पण त्याचं म्हणणं धुडकावून लावलं जातं. युद्धाचा निकाल बाबराच्या बाजूनं लागतो. एकाही लढाईत पराभवाचं तोंड न पाहिलेले महाराणा संग भविष्यात वाढून ठेवलेल्या मानखंडनेनं बेचैन होऊन जातात. पण तो त्यांची समजूत घालून चितोडला माघारी फिरण्यासाठी त्यांना कसंबसं राजी करतो.. तर घरभेदीच इथं घात करतात. राणी कर्मावती दरबारी मानक-यांच्या वेशात मारेकरी पाठवते. अन्नात विष कालवून महाराजांना ठार मारण्याचा बेत सफल होतो. त्यांच्या हातून मरायचं नाही, या निर्धारानं राजपूत अंतिम युद्धाच्या प्रसंगी घालतात, तो ‘केसरिया बाणा’ डोक्याला गुंडाळून युवराज कृष्णाजवळ शेवटचा हिशेब चुकता करण्यासाठी पोहोचतो. मारेकरी तिथेही येऊन पोहोचतात. अंत:काळ जवळ आलेला असताना कृष्णाशी तो संवाद साधत राहतो. इतकी र्वष ज्याच्याशी कडवट वैर जोपासलं तो श्रीकृष्ण, राजकुमारी आणि आपण एकच आहोत, हे त्याला उमगतं. तत्क्षणी कृष्ण त्याला राजकुमारीसारखंच स्वत:त सामावून घेतो. मीरेच्या मिथकांशी आणि राजपुतान्यातल्या त्या काळच्या इतिहासाशी सुसंगत अशा विसंगतींमधून ‘एपिक’ म्हणावा इतका प्रचंड मोठा कथाव्यूह नगरकर यांनी रचला आहे. इतिहासानं नोंद न घेतलेल्या, ‘हरवलेल्या’ या पानांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात ते जगण्यातला अटळपणा, योगायोग आणि विसंगती यांचे धागे. या धाग्यांचा गुंता वाचकांहाती देण्याचं काम ‘ककल्ड’नं केलं आहे.

No comments:

Post a Comment