Saturday, April 30, 2011

ढगभर शब्द..!


"जपान-ऑस्ट्रेलियात बालपण घालवलेला ‘लंडन ऑब्झव्‍‌र्हर’चा ट्रॅव्हल करस्पॉन्डन्ट अलेक्झांडर फ्रेटरला भारतातील मान्सूनचं ष्टद्धr(7०)तुचक्र समजावून घेण्याची जबरदस्त जिज्ञासा। या जिज्ञासेतून तो भारतात आला आणि त्याने मान्सूनचा केरळपासून चेरापुंजीपर्यंत पाठलाग केला। हा प्रवास ‘चेसिंग द मान्सून’च्या रूपानं शब्दबध्द झाला आहे."



मान्सून आलाय! पण नेहमीसारखा गर्जत आणि वाजत-गाजत नाही. खुरडत-खुरडत तो मोठ्या कष्टाने पावलं टाकतोय. लोकांना त्याचं दर्शन व्हायला लागलंय. पाणीकपातीनं धास्तावलेला शहरातला माणूस धरणं कधी भरणार, याची वाट पाहतोय. तर चार महिने कोरडी पडलेली माती वापसा कधी धरणार, याचा घोर शेतक-याला जाळतो आहे. नुसत्याच दाटून येणा-या काळ्याशार ढगांनी भरभरून रीतं व्हावं, यासाठी महादेवाला साकडं घातलं जातंय. इतकं आपलं आणि त्याचं जिवा-शिवाचं नातं! पाच हजार वर्षाची आपली भारतीय संस्कृती घडवण्यात मान्सूनइतका दुसरा कशाचा संबंध नसेल. प्रत्येक परंपरागत विधीतून तो डोकावतोच. हे अद्भुत ऋतुचक्र समजावून घेण्यास प्रत्येक जिज्ञासू उत्सुक असतो. ‘लंडन ऑब्झव्‍‌र्हर’चा ट्रॅव्हल करस्पॉन्डन्ट अलेक्झांडर फ्रेटर त्याच उत्सुकतेनं भारलेला! बालपणीचा बराचसा काळ जपान-ऑस्ट्रेलियात घालवलेल्या फ्रेटरने आपल्या वडिलांप्रमाणेच चेरापुंजीचा पाऊस अनुभवण्याचं स्वप्न पाहिलेलं असतं. त्याचं हे स्वप्नच ‘चेसिंग द मान्सून’च्या रूपानं शब्दबध्द झालंय. अंदमानात मान्सून जन्म घेतो. केरळमध्ये भारतीय भूमीवरचं पहिलं पाऊल टाकतो. मग कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राला भिजवत उत्तर भारतात प्रवेश करतो. त्याअगोदर गुजरात, राजस्थानचं वाळवंट पावसानं न्हाऊन निघतं. मग तो भारतभर पसरतो. तिथून मुसंडी मारत तो थेट ईशान्येच्या चिंचोळ्या राज्यांत घुसतो. आपल्यासोबत आणलेलं ढगांचं भारंभार ओझं मेघालयातल्या चेरापुंजीवर आदळतो. इथं या नैऋत्य मोसमी वा-यांचा ‘क्लायमॅक्स’ अनुभवायला मिळतो. इतका की, जगात इतरत्र कुठेही एवढा धो-धो पाऊस बरसत नाही. फ्रेटर महाशय केरळपासून चेरापुंजीपर्यंतचा प्रवास करायचा ठरवतात, तोही मान्सूनबरोबरच! पण या प्रवासात साथ करायला त्याचं शरीर अजिबात तयार नव्हतं. कारण या सफरीचा निर्णय घेण्यापूर्वीच अगोदरच्या आठवड्यात तो भारताच्या उंब-याला पाय लावून परत पाठीमागे इंग्लंडला फिरलेला असतो. मध्ययुगातला ‘सिल्क रूट’ पाहण्याच्या अनिवार इच्छेने तो पाकव्याप्त काश्मिरात भटक-भटक भटकला. मानेची आणि पाठीच्या कण्याची वाट लावून घेतली. सूर्यप्रकाशात चमचमणा-या हिमालयाच्या राकापोशी पर्वतरांगा पाहून पलीकडल्या भारतात जाऊनच यावं, ही इच्छा त्याच्या मनात परत बळ धरते. सारं दुखणं विसरायला लावते. तिथून भारतात परतण्याचा बेत आखत असताना पाठीच्या दुखण्यानं आपली पाठ धरली असल्याचं त्याला जाणवतं. आपल्याला ‘मल्टीपल स्क्लेरॉसिस’ झालाय की काय, या भीतीपोटी लंडनच्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये तो दाखल होतो. रुग्णालयात विश्रांती घेत असतानाच त्याला एक भारतीय जोडपं भेटतं. त्यांच्या गप्पांतून निघालेला ‘मान्सून राग’ त्याचं भारताविषयीचं आकर्षण पुन्हा जागृत करतो. दुखणं बरं झालेलं नसतानाही चंबुगबाळं आवरून भारताची वाट धरतो. केरळात पोहोचतो. भारतात आल्यानंतरचं आणि मान्सूनच्या आगमनापूर्वीचं चित्र तो पुस्तकातून उभं करतो, ते थेट एका अस्सल भारतीयाच्या नजरेतून! मान्सूनचा अंदाज वर्तवणा-या सतराशे साठ परंपरा त्याच्या पुस्तकातून ओसंडताना दिसतात. वातावरणात होत असलेले बदल तेथील बारीक-सारीक सांस्कृतिक संदर्भासह तो पुस्तकात उभे करतो. मान्सूनची वेळ चुकते, तसा मल्याळी लोकांच्या काळजाचा ठोकाही! स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मान्सूनच्या प्रगतीबद्दल येणारी वर्णनं त्याच्या पुस्तकातून ठासून भरली आहेत. पण तो केवळ पुस्तकासाठी पूरक तपशील म्हणूनच या कात्रणांचा वापर करत नाही. येथील लोकांची परिस्थिती आणि मन:स्थिती याचं सही सही विश्लेषण या कात्रणांवरील त्याच्या टीका-टिप्पणीतून दिसतं. मान्सूनच्या विलंबाकडे तो नुसत्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत नाही. जर असे झाले असते, तर या दृष्टीमुळे लेखनात येणारा रखरखीतपणा त्याच्या पुस्तकातून खटकला असता. पण शतकानुशतके चालत आलेल्या आणि गावच्या पारांवर चवीनं चघळल्या जाणा-या मान्सूनविषयीच्या दंतकथांचं तो ‘चेसिंग द मान्सून’मधून दर्शन घडवतो. मग ते पुस्तक केवळ माहितीपर अगर प्रवासवर्णनपर न राहता त्याला नर्मविनोदी बाजानं सजवलेल्या ललितलेखनाचं रूपडं मिळतं. ब्रिटिश विनोदाला असलेला शिष्टपणाचा बाज आणि त्याने वापरलेल्या अघळपघळ भारतीय कथांतून सहजतेनं येणारी रंजकता, यांच्या मिश्रणातून पुस्तकातील निवेदन एका लयबद्ध तालात पुढं सरकत राहतं. बंगळूरुनजीकच्या एका गावात वरुणराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुरोहितांच्या सल्ल्यानुसार यज्ञ आयोजित केला जातो. त्यांच्यावर दक्षिणेचा भरभरून पाऊस पाडण्यात येतो. या यज्ञात भरमसाट तूप, खंडीभर कापूर, बराचसा सुकामेवा, असा बराच जंगी बार उडवून दिला जातो. या महागड्या पूजेने वरुण प्रसन्न होतो. पाऊस पडतो, पण तिथून काहीशे मैल अंतर असलेल्या दूरवरच्या खेडेगावात! खर्च केलेल्यांचे खिसे रिकामे होतात आणि गावही कोरडं राहतं. अशा प्रकारची वर्णनं करताना फ्रेटरच्या टिप्पणीतून आपल्या अनावश्यक प्रथांविरोधात व्यक्त होणारी उपरोधाची धार भारतीय वाचकाला बोचत राहते. पण सगळेच मार्ग खुंटल्यावर स्वत:ला तारून नेण्यासाठी सर्वशक्तिमान ईश्वरी शक्तीलाच शरण जाण्याचा रस्ता श्रद्धाळू निवडतात. तो नुसता अंधविश्वास असत नाही किंवा पूर्णाशाने श्रद्धाही! याहून जास्त तो अगतिकतेचा भाग असतो, हे फ्रेटर इथे विसरतो. ज्यांची शेती आणि पर्यायाने जीवन पावसावरच अवलंबून आहे, ते देवाची प्रार्थना करण्याशिवाय आणखी काय करू शकतात? पावसाने हजेरी लावल्यानंतर फ्रेटरचा चेरापुंजीसाठी प्रवास सुरू होतो. या सफरीची पुस्तकात येणारी वर्णनं त्याने केवळ मैलाचे दगड मोजण्याइतकी आणि इतिहास-भूगोल सांगण्यापर्यंत मर्यादित ठेवलेली नाहीत. पाऊस तर आला. पण दरवर्षी बिघडत चाललेल्या मान्सूनचं घड्याळ पुन्हा ताळ्यावर कसं आणायचं, त्याच्यासाठी भारतीयांकडून काय प्रयत्न केले जाताहेत, याचाही तो शोधक नजरेनं वेध घेतो. या बाबतीत सरकारी पातळीवरची अनास्था पाहून तो चरकतो. पण कवयित्री कमला दास आणि त्यांच्यासारखेच इतर बरेच जण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी झटताहेत, हे पाहून त्याला जरा बरंही वाटतं. पण तो तिथं एका पानापलीकडे जास्त रेंगाळत नाही. हौशी मुसाफिराचा पिंड असलेला फ्रेटर नंतर पुन्हा प्रवासाच्या रंगीत-संगीत आठवणींत मश्गुल होतो. कन्याकुमारी, कोवालम, गोवा, मुंबई, दिल्ली आणि शेवटी चेरापुंजी या प्रवासादरम्यान त्याला भेटलेली असंख्य लहान-मोठी ठिकाणं आणि तिथल्या माणसांच्या आठवणी भारतभर पसरत चाललेल्या मान्सूनप्रमाणेच वाचकाची सोबत करतात. लहानपणापासून उराशी बाळगलेलं चेरापुंजीच्या पावसात भिजायचं फ्रेटरचं स्वप्न पूर्ण होतं. मान्सूनविषयीचं अपार आकर्षण त्याला असा प्रवास करण्यास भाग पाडतं. त्याच्या दृष्टीने मान्सून हा अब्जाधीश आहे, तर युरोपचं हवामान एखाद्या भिका-याचं पोर! युरोपातल्या हवामानाचा दिनक्रम एखाद्या मध्यमवर्गीय कारकुनासारखा असतो, त्याचं सगळं काही विशिष्ट वेळेत आणि ठराविक चाकोरीतच! पण मान्सूनचं तसं नाही. तो त्याच्या मनाचा राजा आहे, एखाद्या लक्ष्मीपुत्रासारखा! लहर आली, तर पॅरिसमधला मुक्काम हलवून थेट विमानात जाऊन बसेल ते लंडनमध्ये दुपारचं जेवण करण्यासाठी!!

2 comments:

  1. क्या बात है.. हे पुस्तक वाचलेल्यांना हा लेख वाचायला मजा येईल आणि हा लेख वाचून मूळ पुस्तक वाचण्याची इच्छा प्रबळ झालीय. मस्त रे. यंदाच्या पावसाळ्यात चेरापुंजींला जाण्याची इच्छा प्रबळ झालीय.

    ReplyDelete