Friday, April 15, 2011

‘तुमच्याकडे रुमाल आहे काय?’


'' समाजशीलतेचा गळा घोटू पाहणा-या हुकूमशाह्यांविरूद्ध लेखणी परजणा-या साहित्यिकांमध्ये हेर्टा म्युलर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा संकोच करणा-या अशा पोलादी व्यवस्थेत म्युलर यांच्या सर्जक व्यक्तिमत्त्वाला धार येत गेली. मानवी स्वातंत्र्याला या राज्यसंस्थांनी घातलेले अडथळे त्यांनी शब्दांचं बोट धरून पार केले. हुकूमशाहीविरुद्धची प्रतिक्रिया आणि प्रतिरोध म्हणजे त्यांचं लेखन! या लिखाणासाठी नुकताच त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणातील काही अंश.''

प्रत्येक सकाळी मी घराबाहेर पडण्याचा अवकाश, की गेटजवळ उभी राहिलेली माझी आई मला विचारायची, रुमाल घेतलास ना? मी तो घेतलेला नसायचाच. त्यामुळे तिनं आठवण करून दिली, की रुमाल घेण्यासाठी मी घरात शिरे. तिने मला हा प्रश्न विचारावा, म्हणूनच मी रुमाल घ्यायला विसरत असे. आई माझी काळजी करते, याचा पुरावा म्हणजे तिचा हा प्रश्न! त्यानंतर दिवसभर मला विचारायला कोणी नसे. प्रेमाचं अप्रत्यक्ष दर्शन म्हणजे रुमाल घेतलास का, हा तिचा प्रश्न. याच्यापेक्षा आणखी थेट विचारणं, म्हणजे ते जरा गोंधळात पाडणारं झालं असतं. शिवाय, शेतक-यांच्या रितीभातींना ते साजेसं नव्हतं. प्रश्नरूपात बतावणी करतं, ते दुसरं-तिसरं काही नसून निखळ प्रेम असतं. किंबहुना अशा प्रकारच्या अभिव्यक्तीचा तोच एक मार्ग असावा : थेट, वस्तुनिष्ठ आणि प्रश्नार्थी जरबेचा! तिच्या अशा विचारण्यात हळुवारपणाची छटा जाणवायची. त्यासाठीच प्रत्येक सकाळी मी रुमाल विसरून घराबाहेर पडू पाहायची आणि दुस-या खेपेला रुमालासह! त्या रुमालामुळं आईच जवळ आहे, असं वाटायचं.

वीस वर्षानंतर मी एका कारखान्यात भाषांतरकार म्हणून काम करायला सुरुवात केली. पहाटे पाचला उठायला लागायचं. काम साडेसहाला सुरू व्हायचं. दर सकाळी कारखान्यात लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत वाजवण्यात येई. दुपारच्या वेळी कामगारांना कोरसमध्ये ते म्हणावं लागे. पण तेलानं माखलेल्या हातांनिशी कामगार त्या वेळी मख्ख बसून राहत. दुपारचं जेवण ते वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून आणत. जेवायला सुरुवात करण्याअगोदर तो कागद चुरगाळून ते फेकून देत. दोन वर्ष हाच दिनक्रम होता. उद्याचा दिवस आजच्यासारखाच असे. काहीही नवं नसे.

तिस-या वर्षी या दिनक्रमात खंड पडला. माझ्या ऑफिसमध्ये आठवड्यातून तिनदा एक माणूस मला भेटण्यासाठी यायला लागला. जाडजूड देह आणि चमकते निळे डोळे. तो रोमानियाच्या कम्युनिस्ट सरकारचा पोलिस अधिकारी होता. पहिल्या भेटीत त्याने मला नुसत्या शिव्या घातल्या आणि निघून गेला.

दुस-या वेळी आला, तेव्हा अंगातला कोट काढून ठेवत खुर्चीत बसला. त्या दिवशी सकाळी मी घरून ट्युलिपची काही फुलं आणून फुलदाणी सजवली होती. ही सजावट पाहून त्यानं माझं कौतुकही केलं. त्याच्या वाजवीपेक्षा जास्त अघळपघळ शब्दांनी मी थोडीशी अस्वस्थ झाले. त्याच्याकडून सुरू असलेलं माझं कौतुक मध्येच थांबवत मी त्याला म्हटलंही, मला ट्युलिप कळतात, पण माणसं नाही. त्यावर मी तुला ट्युलिपपेक्षाही जास्त चांगलं ओळखतो. असं छद्मी उत्तर त्याच्याकडून आलं. त्यानं कोट पुन्हा अंगावर चढवला आणि चालता झाला.

तिस-यांदा आल्या-आल्या तो खुर्चीतच बसला. मी मात्र उभीच होते. कारण माझ्या खुर्चीवर त्यानं स्वत:ची ब्रीफकेस ठेवली होती. ती उचलून जमिनीवर ठेवण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मूर्ख. कामचुकार. भटकी कुत्री. वेश्या अशा शिव्यांचा वर्षाव त्याने केला. नंतर त्याने ट्युलिप असलेली फुलदाणी टेबलाच्या एका कडेला सरकवली. माझ्यासमोर कोरा कागद आणि पेन ठेवला. किंचाळतच गुरकावला, लिही! मी उभ्यानंच तो सांगत असलेला मजकूर टिपायला सुरूवात केली-माझं नाव, जन्मतारीख आणि पत्ता. मी लिहीत होते, मी कुठल्याही परिस्थितीत कुणालाही (अगदी माझ्या नातलगांनाही) सांगणार नाही की मी.. नंतर सगळ्यात भयानक शब्द आला, ‘‘ मी आपली सहकारी आहे. ( थोडक्यात, कम्युनिस्टांची गुप्तहेर आहे.) त्या क्षणी मी लिहिणं थांबवलं. पेन खाली ठेवला. खिडकीजवळ गेले. कुबड आलेल्या माणसांप्रमाणे भासणा-या घरांवरून, धूळमाखल्या, निर्जन आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून नजर फिरवली. रस्त्याचं नाव काय, तर ग्लोरी स्ट्रीट! केवढा विरोधाभास! रस्त्याकडेच्या निष्पर्ण मलबेरी वृक्षाच्या फांदीवर कानतुटकी मांजर बसली होती. कारखान्यातच भटकणारी मांजर होती ती. मी ते सगळं न्याहाळतच म्हणाले, ते माझ्या तत्त्वात बसत नाही. तत्त्व हा शब्द ऐकल्याक्षणीच पोलिसानं फेफरं भरल्यासारखं करीत कागद टरकावला. पण पुन्हा त्याने त्या कागदाच्या चिंध्या ब्रीफकेसमध्ये भरल्या. बहुधा त्याला त्याच्या बॉसला दाखवायचं असावं की, त्यानं मला हेर म्हणून नियुक्त करायचे प्रयत्न केले होते. फुलदाणी भिंतीवर आपटत त्यानं हातांच्या मुठी वळल्या. ओठांवर दात घट्ट आवळले. शांतपणे म्हणाला,याचा तुला पश्चात्ताप होईल.

दुस-या दिवसापासून आमच्यादरम्यान अघोषित युद्धाला सुरुवात झाली. त्यांना मला कारखान्याबाहेर काढायचं होतं. जसं लहानपणी आई विचारायची, रुमाल जवळ आहे ना! तसंच कारखान्याच्या डायरेक्टरनं विचारायला सुरुवात केली,तुला दुसरी नोकरी मिळाली का? मी त्याला दररोज एकच उत्तर द्यायचे, मी दुसरी नोकरी शोधत नाहीए. मला हा कारखाना आवडतो. मी निवृत्ती स्विकारेपर्यंत इथेच राहीन. एका सकाळी मी ऑफिसात आले. माझं सामान ऑफिसच्या बाहेर भिरकावल्याचं मला आढळून आलं. माझ्या जागेवर एक इंजिनीअर बसला होता. काम करायला मला जागा नसली, तरी मी घरी जाऊ शकत नव्हते. कारण माझी अनुपस्थिती, एवढं कारण त्यांना मला काढून टाकायला पुरलं असतं. मी हेर असल्याची अफवा पद्धतशीरपणे कारखान्यात पसरवण्यात आली होती. जवळच्या मैत्रिणीसह सारे सहकारी मला टाळू लागले. ऑफिसही गेलं आणि सहकारीही दुरावले. जिन्याच्या पाय-यांवर येरझा-या घालत असताना आता पुढे काय, हाच विचार माझ्या मनात घोळू लागला.

मला पुन्हा मी आईचं मूल असल्यासारखी वाटू लागले. कारण माझ्याजवळ रूमाल होता. तो रूमाल पाय-यावर अंथरून तिथंच ठाण मांडून बसले. पाय-यांवर रूमालानं व्यापलेली जागा, हेच माझं ऑफिस झालं होतं. येणा-या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी मला ठाम राहणं गरजेचं होतं. त्यांनी काढून टाकेपर्यंत असेच काही आठवडे काढले. या काळात भाषांतराचं काम सुरू होतंच. तांत्रिक शब्दांचा अर्थ डिक्शनरीत चाळताना त्यांच्यामागे किती काव्यात्म आणि सुंदर भाव दडला आहे, हे समजू लागलं, तशी मी आश्चर्यचकीत झाले. सिमेंट आणि लोखंडासारख्या दुबरेध भासणा-या शब्दांमध्ये किती अर्थगर्भ आणि हळुवार छटा मानवाने भरल्या आहेत? प्रत्येक दुबरेध शब्दामागे हळुवारपणा होताच. अगदी आईच्या प्रश्नासारखा. रूमाल आहे का? अशा प्रश्नांमागचं तत्त्व प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात असेल का?

माझ्या आयुष्यातल्या अनेक तरल आठवणींचा संबंध रूमालाशी आहे. ऑस्कर पास्तर नावाच्या माझ्या मित्राने सांगितलेली हकिगत ऐकल्यापासून तुमच्याकडे रुमाल आहे का ? या प्रश्नाने माझ्या मनात कायम पिच्छा पुरवला आहे. सोव्हिएत लेबर कॅम्पमध्ये तो असताना एका रशियन म्हातारीनं त्याला असाच एक रुमाल दिला होता. भुकेनं व्याकुळलेल्या आणि भिका-याची कळा आलेल्या ऑस्करला जेऊ घातलं. तिचा मुलालासुद्धा ऑस्करप्रमाणेच दूर पाठवण्यात आलं होतं. त्या म्हातारीच्या दृष्टीनं ऑस्कर कोण होता? दोन्हीही! दारात आलेला भिकारी आणि दूर कुठेतरी असलेला तिचा मुलगा. तुझ्याकडे रुमाल आहे का? या प्रश्नामागची भावना म्हातारीच्या कृतीतून जाणवत होती. हा प्रश्न प्रत्येक ठिकाणी लागू आहे का? कायद्याच्या आवरणाखालच्या पोलादी पडद्यांनी जखडलेल्या साम्राज्यांनासुद्धा? स्टॅलिनवादी शिक्षण डोक्यात घुसडणा-या लेबर कॅम्पना?

रुमालाशी संबंध असलेली आणखी एक कहाणी आहे. मॅट नावाचा माझा काका होता. १९३०मध्ये त्याला व्यावसायिक शिक्षणासाठी तिमिसोआरा शहरात पाठवण्यात आलं. तिथले सारे शिक्षक कडवट नाझी होते. तोही नाझीवादानं भारला गेला. आतापर्यंतचं ऐकीव नाझी तत्त्वज्ञान प्रत्यक्षात राबवायला मिळावं, या हेतूनं तो रोमानियन लष्करात भरती झाला. युद्धाच्या आघाडीवर होणारा खून-खराबा तो रोजच पाहत होता. एके दिवशी त्याचा फोटो घरी आला. बॉम्बवर्षावात तो मरण पावला होता. माझ्या आजीच्या दृष्टीनं तो फोटोही एखाद्या रुमालासारखाच होता. पांढ-याशुभ्र कापडात चिरनिद्रा घेत पहुडलेला एक नाझी आणि तिच्या लाडक्या लेकाची आठवण! माझ्या आजोबांनी पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केलं होतं. ते नेहमी म्हणायचे,जेव्हा राष्ट्रध्वज फडफडू लागतात, तेव्हा विचारक्षमता अडगळीत जाते. मी जी हुकुमशाही अनुभवली, त्या राजवटीत मी आजोबांच्या म्हणण्याचा प्रत्यय घेतलाय.

रुमालासारख्या छोट्या गोष्टींचा कशा-कशाशी संबंध असू शकतो? अशा गोष्टी हिंसाचक्राचाही एक भाग असू शकतात. ज्याला जर्मन भाषेत डेव्हिल्स सर्कल म्हणतात. माझ्या आईला एके दिवशी रोमानियन पोलिसांनी आपल्याबरोबर येण्यास फर्मावलं. त्यावेळी त्यानं तिला विचारलं, तुमच्याकडे रुमाल आहे का? तिच्याकडे नव्हता. लगबगीने घरात जाऊन तिनं हाती लागेल तो रुमाल घेतला. पोलिस स्टेशनात आल्यावर त्यांनी तिला मनसोक्त शिव्या घातल्या. ती रडली. डोळे पुसायला रुमाल होताच. दिवसभर तिला कोठडीत ठेवण्यात आलं. तिनं काय केलं असावं? रडणं थांबल्यावर मळकटलेली कोठडी रुमालानं स्वच्छ केली. फर्निचर पुसलं. तिच्याकडून हे ऐकल्यावर मी हतबुद्धच झाले. मी रागानेच तिला विचारलं,तुला अशा प्रकारे कोठडीत ठेवणा-यांबरोबर तू अशी कशी वागलीस? ती सहजपणे म्हणाली, माझा वेळ जात नव्हता आणि कोठडीही अस्वच्छ होती. चांगली गोष्ट ही होती, की त्यावेळी पुरूषांचा मोठा रुमाल मी बरोबर नेला होता. पण, तिच्या वागण्याचा अर्थ मला लागला. हा अतिरिक्त अपमान तिनं आपणहून जरी ओढवून घेतला असला, तरी तेव्हाही अशा कामातून तिनं स्वत:चं माणूसपण जपण्याचीच धडपड केली.

हुकुमशाहीत असंही घडत असतं, हे आपण अनुभवतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण, ते उच्चारू शकत नाही. पण, जे बोलू शकत नाही, ते लिहू मात्र शकतो. मी ज्या परिस्थितीत राहिले, तिथे मी फक्त शांतपणे लिहू शकत होते. माझ्या जीवनतृष्णेनं तिथल्या हुकूमशाहीच्या जीवघेण्या भीतीचा शब्दांच्या साहाय्याने मुकाबला केला. मानवी जगण्यातला मूल्यात्म भाव हिरावून घेणा-या जगावर निरकुंश राज्य करू पाहणा-या हुकूमशाह्यांना माझा हाच प्रश्न आहे, तुमच्याकडे रुमाल आहे का?



No comments:

Post a Comment