Saturday, April 30, 2011

अर्थासह अनुवादु..!

" अनुवाद करताना आशयाच्या आत्म्याशी प्रतारणा केली गेली, की मूळ साहित्यकृतीचा खूनपडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे अनुवादकाची जबाबदारी लेखकाहून मोठी असते। पणसाहित्यविश्वाकडून अनुवादकांची दखल घेतली जात नाही, अशी खंत साहित्य अकादमीच्या वतीनेमुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्यामराठी भाषांतरेया परिसंवादात सहभागीझालेल्या अनुवादकांनी व्यक्त केली. "


सृजनाच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून भाषेचं महत्त्व असले, तरी तिला भौगोलिक मर्यादा पडतात. अनुवादित साहित्यकृतींच्या बाबतीतही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भाषेचा अडथळा पार करताना संबंधित साहित्यकृतीचा मूळ गाभा हरवण्याचा धोका निर्माण होतो. ज्या सांस्कृतिक परिपोषणाने तिला साहित्यिक मूल्य आलं आहे, ते अनुवादातूनही सिद्ध करणं, ही मोठीच कसोटी आहे. त्यामुळे एखादी साहित्यकृती हे तिच्यातील वेगळंपण, तिच्यातली अभिजातता, अंगभूत सौंदर्य, सामाजिक, राजकीय आदी संदर्भाच्या अनुषंगाने येणा-या तिच्या मूळ सांस्कृतिक आविष्काराशी प्रामाणिक राहून दुस-या भाषेत प्रकट करणं, हे तितकंच जिकिरीचं आणि आव्हानात्मक काम आहे. साहित्याच्या प्रांतात सृजन आणि अनुवाद यांच्यात डावं-उजवं करण्याची प्रथा आहेच. तिथेही ती निर्धारित मूल्यांच्या मापदंडांवर तोलली जात असली, तरी अनुवादाला दुय्यम स्थान स्वीकारावं लागतं. अनुवाद म्हणजे अनु:सृजन की, सृजनाचे निव्वळ भाषांतर, हा प्रश्न साहित्यक्षेत्रात वारंवार चर्चिला जातो. साहित्य अकादमीच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात भरविण्यात आलेल्या परिसंवादात याच विषयावर विचारमंथन झाले. सहभागी अनुवादक-लेखकांनी अनुवादाचा इतिहास, परंपरा, प्रगती, सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने यांचा परामर्श घेतला. ख्यातकीर्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात शीला कोळंबकर, अपर्णा लांजेवार, दामोदर खडसे, सुनीता परांजपे, लक्ष्मीनारायण बोल्ली, लक्ष्मण हर्दवाणी या मान्यवर अनुवादकांनी आपले विचार मांडले. त्याचा थोडक्यात घेतलेला हा गोषवारा.

अपर्णा लांजेवार यांनी अनुवादित साहित्याची उत्पत्ती विशद केली. भारतीय समाजात उत्तरोत्तर बळकट होत गेलेल्या वर्णव्यवस्थेमुळे ज्ञानाच्या आदान-प्रदानाच्या प्रक्रियेत खंड पडला, हे त्यांनी ऐतिहासिक दाखले देत उद्धृत केले. प्राचीन काळात संस्कृतसारखी समृद्ध ज्ञानभाषा असतानाही तिच्याद्वारे अनुवादाचं काम झालं नाही, असा मुद्दा लांजेवार यांनी आपल्या भाषणात मांडला. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी दाखले देताना म्हटलं की, वैदिक आणि वैदिकोत्तर काळात संस्कृतवर अभिजनांनी मक्तेदारी प्रस्थापित केली. त्यामुळे आपोआपच इतर जाती-वर्ण ज्ञानप्रक्रियेपासून वंचित राहिले. याचा परिणाम भिन्न-भिन्न समाजांमधील सांस्कृतिक देवाण-घेवाण खुंटण्यात झाला. अलेक्झांडरने भारतावर स्वारी केल्यानंतर काही संस्कृत पंडीत आपल्याबरोबर नेले. पण त्यांच्याकडून ग्रीक साहित्य संस्कृतमध्ये अनुवादित होऊ शकलं नाही. अपौरुषेय वेद अथवा गीता यांच्यासारख्या अध्यात्मशिरोमणी ग्रंथांचीही जगाला ओळख होऊ शकली नाही. याउलट, मुस्लिमांनी अरेबिक आणि फारसी भाषेत जगभरातील साहित्य अनुवादित करण्याचा सपाटा लावला. बुद्धाचं तत्त्वज्ञानही पालीतून चिनी-जपानीसारख्या भाषांमध्ये अनुवादित झालं. पण धार्मिक कर्मठतेमुळे संस्कृतने बुद्धाची दखल घेतली नाही. केवळ संस्कृतमध्येच उपलब्ध असलेलं जीवनविषयक ज्ञान मध्ययुगीन संतांनी बंडखोरी करून सामान्यजनांसाठी खुलं केलं. ज्ञानाचा हा ओघ मराठीतही पाझरला आणि समृद्ध झाला. अनुवादाच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अध्यात्मिक आणि तात्विक क्षेत्रापुरतं कवाडबंद असलेलं मराठी साहित्य खुलं झालं. अमेरिकन रोमॅन्टिसिझमला खतपाणी घालणा-या पूर्वसुरींचा प्रभाव आधुनिक मराठी साहित्यिकांवरही पडला. सगळे विचार रिचवत मराठी साहित्य समृद्ध होत गेलं. आता ही प्रक्रिया समाधानकारक सुरू आहे.

दामोदर खडसे यांनी आपल्या भाषणात शब्दांचं अर्थवाहीपण जपण्यावर भर दिला. ग्रामीण अथवा दलित साहित्यातील परिभाषा इतर भाषांमध्ये उपलब्ध नसतात. शब्द स्वत:सोबत जी संस्कृती वाहत असतात, तिची नाळ तुटण्याचे प्रसंग अनुवाद करताना निर्माण होतात. अनुवादाला चपखल प्रतिशब्द सुचला नाही की, भाषा आपटी खाऊ लागते. अनुवादक भरकटू लागतो. मूळ लेखकाला नेमकं जे म्हणायचं अथवा सुचवायचं आहे, ते अनुवादातून प्रतीत होत नाही. त्यामुळे वाचकाच्या मनात मूळ लेखकाच्या सृजनशीलतेविषयी शंका उत्पन्न होते. नेमक्या याच कारणांमुळे गद्यापेक्षा कवितांचे अनुवाद ही सर्वात आव्हानात्मक बाब आहे. मूळ साहित्यकृतीत वापरल्या गेलेल्या प्रतिमा आणि त्यापाठीमागील संदर्भाचे ग्रहण दुस-या संस्कृतीविश्वात वावरणा-या वाचकांना होणं, यातच अनुवादाचं साफल्य असते. लक्ष्मीनारायण बोल्ली, सुनीता परांजपे, शीला कोळंबकर, लक्ष्मण हर्दवाणी यांनीही आपल्या बोलण्यातून असाच सहमतीचा सूर व्यक्त केला. अनुवादाला बरे दिवस आले असले, तरी अनुवादकांना चार दिन सुखाचेयायचे आहेत. त्यांची आर्थिक पिळवणूक, लेखक-प्रकाशकांकडून होणारी हेटाळणी या व्यावहारिक मुद्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आलं.

अनुवाद करताना आशयाच्या आत्म्याशी प्रतारणा केली गेली, की मूळ साहित्यकृतीचा खून पडल्याशिवाय राहत नाही. सृजनाची अभिव्यक्ती स्वभाषेतून करणा-या लेखकाला प्रकटीकरणाचे बंधन नसते. किंबहुना, या स्वैर, तरीही आवश्यक स्वातंत्र्यामुळेच तो अस्सल साहित्याचा निर्माता ठरतो. चोखंदळ वाचक त्याला डोक्यावर घेतात. पण, हे साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित करणा-याची जबाबदारी लेखकाहून मोठी असते. अनुवादकाला एकाच वेळी विभिन्न सांस्कृतिक अवकाशांमध्ये वावरावे लागते. अनुवादाच्या माध्यमातून एका अपरिचित संस्कृतीची ओळख तो दुस-या समाजातील वाचकांना करुन देत असतो. एका अर्थाने तो अव्याहत चाललेल्या सांस्कृतिक दिंडीचा बिनीचा शिलेदार आहे. जागतिकीकरणानंतर भाषेच्या उदारीकरणाचेही दिवस आले आहेत. आतापर्यंत स्वकोशात मग्न राहिलेल्या जागतिक पटलावरच्या विविध संस्कृती एकमेकांशी देवाण-घेवाण करू लागल्या आहेत. त्यामुळे विरोध आणि विकासाच्या प्रक्रियेला कधी नव्हे इतकी प्रचंड गती मिळाली आहे. आपली नितांतसुंदर मराठी भाषाही याला अपवाद कशी असेल? विकासाच्या प्रक्रियेत आत्मविश्वासाने सहभागी व्हायचं की, विरोध करून खोटा अहंगंड आणि दुबळा न्यूनगंड पोसायचा, याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. चक्रधर-ज्ञानोबांनी जोपासलेला मराठीचा वटवृक्ष आणखी बहरेल की झडेल, हे त्यातूनच तर ठरेल!

No comments:

Post a Comment